स्वत:ला तर काही कळत नाही ! अन् दुसऱ्याचे काही ऐकायचे नाही !

स्वत:ला तर काही कळत नाही ! अन् दुसऱ्याचे काही ऐकायचे नाही !

          आपली आकलन क्षमता, बुद्धीचातुर्य आणि विचारशक्ती यांच्या माध्यमातून मानवाने  संपूर्ण विश्वाचे रहस्य उकलण्याचा ध्यास घेतला आहे. सृष्टीतील सर्वच ज्ञात आणि अज्ञात गोष्टीवर त्याचा अधिकार आहे, असा त्याचा दावा आहे. त्याची ध्येये आणि ध्यास याला कोणीही रोखू शकत नाही, असेही तो नेहमी सांगत असतो. असे असले तरी माणूस हा जेवढा शहाणा तेवढाच गर्विष्ठ असा प्राणी आहे. त्यामुळे तो स्वत:ला तर कधीच कमी लेखत नाही, उलट दुसरे कसे साधारण आहेत आणि मी कसा असाधारण आहे, याबाबतची त्याची नेहमी बढाई चाललेली असते. आपल्या आजूबाजूला असेही काही लोक आढळून येतात की, त्यांना एखांद्या विषयाबाबत काहीही कळत नसत आणि त्यांना त्या विषयाबाबत दुसऱ्याचे काहीही ऐकून घ्यायचे नसत.तरीही ते मोठ्या आविर्भावाने मिरवत असतात. थोडक्यात सांगायचे तर ‘स्वत:ला तर काही कळत नाही !अन दुसऱ्याचे काही ऐकायचे नाही’! असे हे लोक असतात. प्रस्तुत लेखात आपण अशा लोकांविषयी जाणून घेण्याचा आणि आपण जर या लोकांसारखे असू तर आपल्यात कोणते इष्टतम बदल घडून आणायचे या बाबतही उहापोह करणार आहोत.

          माणूस जन्माला येतो त्यावेळी त्याच्या आकलन शक्तीच्या आधारे तो आजूबाजूच्या परिसरातील अनेक गोष्टी, बाबी आणि वस्तू यांचे त्याचे पंच इंद्रियाद्वारे आकलन करतो. हे होणारे आकलन आणि स्व:अनुभवातून साठवलेली साठवलेली माहिती याच्याशी मेळ घालून तो ज्ञान प्राप्त करतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, लहान मुल, त्याचे आई आणि वडील जेवायला बसल्यावर गरम भांडे पकडते तेंव्हा त्याला चटका बसतो. ज्या वेळेस पुन्हा ते मूल भांडे धरायला जाते त्या वेळी होणारे आकलन आणि पूर्वीची चटका बसतो हि माहिती याचे विश्लेषण करून ते मूल परत गरम भांड्याला हात लावत नाही. अशा प्रकारचे विविध ज्ञान आपण दैनंदिन जीवनात वापरून आपली आयुष्याची मार्गक्रमणा करत असतो. मात्र मानवाच्या मनातून निर्माण होणारे विचार आणि भावना आणि अकलानाद्वारे ग्रहण ज्ञान यांचा नेहमी संघर्ष होत असतो. असा संघर्ष जास्त प्रमाणात होण्यास सुरुवात झाली कि त्या व्यक्तीची प्रगती आणि विकास थांबतो. तसेच आपला स्वभाव ,आपल्या सवयी आणि आपले वर्तन हे आपल्या आयुष्यावर बऱ्यापैकी प्रभाव पाडत असतात. आधी आकलन आणि अनुभव याच्या आधारे स्वभाव तयार होतो आणि मग स्वभावाच्या अनुरूप अशा आपल्या सवयी आणि वर्तन घडते.

         आकलन आणि अनुभव हे वयानुरूप आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील घटना घडामोडी यातून विकसीत होतात. निश्चितच प्रत्येकाला आजूबाजूची परिसर आणि परिस्थिती  एक सारखी मिळत नसल्याने, अनेक प्रकारचे गुणविशेष आणि स्वभाव वैशिष्टे असलेली मानसं आजूबाजूला पहावयास मिळतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे जे म्हटले जाते ते या मुळेच. तसेच प्रत्येकाची आकलन क्षमता आणि जन्मजात बुद्धी कमी जास्त असल्याने मिळालेली अथवा पाहिलेली सर्व माहिती त्याला उमजेल असेही नसते. या साठी जेंव्हा नवीन बाब अथवा गोष्ट समोर येते तेंव्हा आपल्याला तिचा अर्थ लावता येईलच असे नसते. साहजिकच दैनंदिन कामकाजात विविध माहितीचा अर्थ लावण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी आपल्याला दुसर्यांच्यावर अवलंबून राहावे लागते. उदाहरण द्यायचे झाल्यास, पावसाचा अंदाज आपण बांधू शकत नाही, तर या साठी हवामान शास्रज्ञ यांच्यावर आपल्याला अवलंबून राहावे लागते. मात्र जर आपण आपल्या अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे जर हवामानाचा अंदाज बंधू लागलो, तर चुका होण्याची शक्यता जास्त राहते.  

         मात्र असे दिसून येते कि काही लोक आपण सर्व ज्ञानी आहोत आणि मला सर्व येते या अविर्भावात वावरत असतात. त्यांना कोणी काही सांगायला गेलं तर ते ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नसतात. वास्तविक त्या ठराविक बाबी आणि गोष्टी बद्दल त्यांना काडीचेही माहित नसते. मात्र पोकळ आत्मविश्वास त्यांच्यात भरून वाहत असतो, त्यामुळे ते आपली ज्ञानाची  द्वारे उघडण्यास कदापी तयार होत नाहीत. एका ठराविक मानसिकतेमध्ये राहण्यास अशा लोकांना नेहमी आवडते. हे लोक मला खूप येते, मला खूप माहित आहे ,मी सर्व काही करू शकतो, असे दाखवत असले तरी आतून मात्र ते कुमकुवत असतात. ‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ अशी यांची गत असते. स्वत:ला काही कळत नाही इतपत ठीक आहे. मात्र हे जेंव्हा हे न कळने दुसरा काहीतरी सांगत आहे, ते न ऐकून घेण्याकडे जाते, त्यावेळी मात्र फक्त नाशिब आणि देवच त्यांना वाचवू शकतो. साहजिकच असे लोक या स्वभावामुळे त्यांची स्वत:ची हानी आणि पिछेहाट घडवून आणतात. सोबत इतरांसोबतचे त्यांचे संबंध कलुषित करतात. साहजिकच ज्या वेळी गरज असते, त्या वेळी त्यांच्या सोबत कोणीही राहत नाही. अशा वेळी उलट पुढे जावून हेच लोक त्यांच्या संकट काळात कोणीही मदतीला आले नाहीत. लोक स्वार्थी आहेत! म्हणून इतरांना दोष देत राहतात. यालाच आपण ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असेही म्हणतो.

      सबब आपण या पैकी तर एक नाहीत ना ? किंवा आपली वाटचाल तर या मार्गावर सुरु झाली नाही ना ? याबाबत आपण स्व-चिंतन आणि स्व-अवलोकन करणे हिताचे आणि आगत्याचे ठरते. कारण जर आपण आपल्याला सर्वज्ञानी समजून इतरांचे काहीही ऐकत नसाल किंवा आपल्याला इतरांना महत्व न देण्यासाठी आपण त्यांचे ऐकून घेत नसाल, तर ती तुमची अधोगतीची नांदी ठरू शकते. जग आणि विश्व अफाट आहे आणि त्याचा पसारा आणि त्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी यांचा आपण ठाव घेवू शकत नाही. अगदी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आणि असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा, बाबींचा आणि घटनांची माहिती घेत असलो, तरी त्यांचा आपण पूर्ण अर्थ लावू शकू असे नाही. या पूर्वी नमूद केल्याप्रमाणे जगातील प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळे गुणविशेष आणि वैशिष्टे घेवून वावरत असतो. त्यामुळे आपला संवाद वाढीव आणि विस्तृत करणे आवश्यक ठरते. ‘जास्त बोलण्यापेक्षा, जास्त ऐकणे अधिक श्रेयस्कर’ एकंदर हे असे आहे. त्यामुळे आपण नेहमी चौकस राहावे. इतरांचा आपण जो पर्यंत आदर आणि सन्मान करत नाहीत तो पर्यंत ते तुम्हाला काही सांगणार नाहीत आणि सल्ला आणि मदत करणे तर दूरच. त्यामुळे लहान असो मोठा इतरांचा आदर करायला शिका. ‘गिव्ह रिसपेक्ट, टेक रिसपेक्ट’ या प्रमाणे हे आहे. आपल्या कामाच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी काम करत असलेले लहान लोक सुद्धा चांगला आणि फायद्याचा सल्ला देवू शकतात. तुमच्या आजूबाजूला काय कट कारस्थान शिजतंय याची माहिती आपले लहान लोकच उत्तम प्रकारे देवू शकतात. तुमच्या कामाच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी काय धोके आहेत , या ठिकाणी काय बदल करायला हवेत याचाही सल्ला आपल्या आजूबाजूचे लोक उत्तम देवू शकतात. तुम्हाला एखांदा निर्णय घ्यायचा असेल तर याबाबत चर्चा, विचारविनिमय हा सुद्धा दुसर्याचे ऐकून घेतल्यानेच होतो. परंतु हे केंव्हा शक्य होते जेंव्हा तुम्ही इतरांचे ऐकून घेता. त्यासाठी ‘स्वत:ला तर काही कळत नाही ! अन दुसऱ्याचे काही ऐकायचे नाही’! या विचाराचा आणि वागण्याचा त्याग करावा लागतो. त्यामुळे आपला संवाद सर्वांसोबत वाढवावा लागतो. त्यातून ज्या बाबी आपल्या समोर येतील त्यावर आधीच नियोजन करून तुम्हाला तुमचे ध्येये आणि यश याच्याकडे मार्गक्रमण करता येते. आणि तुम्ही एक सोपे ,सुटसुटीत, साधे, सरळ आणि सुखी आयुष्य जगायला सुरुवात करता.  

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया

०३६ /१०१ दिनांक २५.१२.२०२१

राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी मुंबई

९९७०२४६४१७