प्रज्ञा शील करुणा

प्रज्ञा शील करुणा

       प्रज्ञा, शील आणि करुणा या तीन तत्वांचा अंगीकार करून त्यांची अंमलबजावणी दैनंदिन आयुष्यात केल्याने खर्‍या अर्थाने सुखाचा शोध लागण्याकडे वाटचाल सुरू होते. आकलन हा मानवी बुद्धीचा आधार आहे. मानवी बुद्धि ही निसर्गाची एक मोठी देणगी आहे. मानवी बुद्धि हीच खर्‍या अर्थाने मानवाला इतर प्राणी पशू पासून वेगळे करते. बुद्धीच्या जोरावरच मानव या सृष्टीचा अनीभिक्षित सम्राट बनला आहे. असे असले तरी बुद्धीच्या पुढे जावून मानवाला  मानवीयपण त्याची प्रज्ञा त्याला प्राप्त करून देत असते. त्याच अर्थाने प्रज्ञावंत हो! गुणवंत हो! असा आशीर्वाद दिला जातो. मानवी बुद्धीचे शुद्ध आणि विशाल स्वरूप म्हणजे प्रज्ञा होय. प्रज्ञा ही जागृत अशी एक अवस्था असून ती व्यापक आहे. ती सर्व प्राणिमात्र आणि पंचमहाभूतांकडे समग्र आणि समान अशा दृष्टीने पहाते. विश्व जेवढे व्यापक आणि अथांग आहे अगदी तसेच प्रज्ञेचे स्वरूप आहे. प्रज्ञा आहे तेथे विचार आणि आचार सकारात्मक होतात. प्रज्ञा ही वृत्ती आणि प्रवृती यांना सरळमार्गी बनवते. शील हे कायिक आणि मानसिक यातील द्वंद्व आहे. शील हे चरित्र दर्शविते आणि शीलवान माणसांची निर्मिती होऊन अशी माणसं समाजाला अधिक उंचीवर घेवून जातात. चरित्र हे एक उत्तम आणि चांगले असे व्यक्तिमत्व दर्शवते. करुणा ही दुसर्‍याप्रती असणारी प्रेमळ आणि दयाळूपणाची भावना आहे. करुणेतूनच समानभूतीचा उगम होतो. समानभूतीतून आपण इतरांच्या पातळीवर पोहचून रंजल्या गांजल्यांचे दु:ख कमी करण्याचे प्रयत्न करतो. भूतदया हा सुद्धा करुणेचा एक भाग आहे. जेथे करुणा आहे तेथे प्रेम आहे आणि जेथे प्रेम आहे तेथे सुख आणि आनंद आहे. प्रज्ञा, शील आणि करुणा ह्या मानवी जीवन समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवतात. साहजिकच त्यांचा आचरणात स्वीकार करणे आणि दैनदिन व्यवहारात अंमल करणे सध्याच्या धावपळीच्या जीवनात आवश्यक झाले आहे. प्रस्तुत लेखात प्रज्ञा, शील आणि करुणा याबाबत सविस्तर असे विवेंचन करणार आहोत.

तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा सार प्रज्ञा, शील आणि करुणा यात समावलेला आहे. सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणणे आणि समजून घेणे म्हणजे प्रज्ञा होय. प्रज्ञा हा शब्द प्र आणि  ज्ञा या दोन संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. प्र म्हणजे जोर देणे तर ज्ञा म्हणजे जाणणे होय. जोर देवून ज्ञान जाणणे म्हणजे खरी प्रज्ञा होय. हा जोर विवेकाचा आणि सदविवेकबुद्धीचा असतो. प्रज्ञा म्हणजे अंतिम ज्ञान होय. प्रज्ञा म्हणजे शहाणपण असे “भगवान बुद्ध आणि  त्यांचा धम्म’ या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तथागत गौतम बुद्ध मात्र ज्ञान आणि प्रज्ञा ह्या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्याने स्पष्ट करून सांगतात. ज्ञान हे फक्त बुद्धिशी निगडीत असते मात्र प्रज्ञा ही ज्ञानाचा शहाणपणाने कसा वापर करावा हे सुचवते. प्रज्ञा ही एकाकी नसते तर तिचा वापर कसा होतो यावर तिचे मूल्य ठरते. जर प्रज्ञा विधायक कामासाठी न वापरता विघातक कामासाठी वापरली गेली तर ती प्रज्ञा राहत नाही. प्रज्ञा ही विवेक आणि समयसूचकता निर्धारण करते. प्रज्ञा मुळे काय चांगले आणि काय वाईट यातील भेद तर समजतो.  तसेच सत्य आणि असत्य यातील भेद रेषा फक्त प्रज्ञा मुळे स्पष्ट होते. प्रज्ञा ही ज्ञानाचे उपयोजन कसे करावे हे शिकविते. प्रज्ञा ही माणसाला अधिक डोळस बनवते. जीवन जगण्याची नवीन दृष्टी खर्‍या अर्थाने प्रज्ञा मुळे प्राप्त होते. बुद्धीने फक्त एकाकी आणि एकांगी विचार होतो. प्रज्ञा मात्र विशाल रूप धारण करते. प्रज्ञा ही बुद्धीचे खर्‍या अर्थाने उपयोजन आहे.

शील हे व्यक्तिनिष्ठ असते. शील म्हणजे उत्तम असे आचरण. आचरण उत्तम असेल तरच लोक तुमचा आदर करतात. शील हे तुमचे व्यक्तिमत्व दर्शविते. एकंदर शील म्हणजे तुमचे संपूर्ण अस्तित्व होय. शील ही चांगली अशी नीतीमत्ता दर्शविते. शील हे तुम्हाला सत्याच्या रस्त्यावर मार्गस्थ करते. शील उत्तम असेल तर वाईट कामे करण्यासाठी माणूस आणि माणसाचे मन धजावत नाही. शीलातून भावना आणि विचार याची शुद्धी साधली जाते. खरे पहिले तर शील शिवाय प्रज्ञा अपूर्ण ठरते. खऱ्या अर्थाने प्रज्ञाला शीलाचे आवरण दिले की ती अधिक प्रखर होते. शील हे तुमचे सत्व टिकवते. शीलवान माणसे ही प्रज्ञेला अजून दृढ बनवतात. शीलवान ही सज्ञा शीलाचे जपणूक केल्याने प्राप्त होते. शील जेवढे स्वच्छ तेवढी शक्ति अधिक प्रयुक्त होते. जेथे शील आहे तेथे सत्य नांदते आणि शील असेल तेथे वाईट प्रवृती फिरकत सुद्धा नाहीत. शील हे  सत्याची कास धरते. शील असेल तर असत्याचा अंधार नाहीसा होवून सत्याचा प्रकाश निर्माण होतो.

करुणा हा एक दयाभाव आणि प्रेमभाव आहे. करुणा ही नुसती मानव जाती पुरती मर्यादित नाही तर ती सर्व प्राणिमात्र प्रती दया भाव दर्शविते. करुणा ही एक आस्था आहे की जी दिलासादायक वातावरण निर्माण करते. करुणा ही अतीव प्रेमाचा सुंदर आविष्कार आहे. करुणा ही समानभूतीचे विस्तारीत रूप आहे. करुणा ही समानभूती साधते आणि समोरच्याला इजा पोहचणार नाही या विषयी कायम दक्ष राहते. करुणा ही मायेचा अंकुर असते ती प्रेमाचा ओलावा तयार करते. करुणेमधून मानवी भावना ह्या शुद्ध आणि स्वच्छ रूप धरण करतात. करूणेतून समभाव आणि सहजभाव निर्माण होतो. करुणा असेल तेथे परस्पर द्वेषाच्या भावना ह्या विरून जातात. करुणा ही मानवाला त्याच्या उच्च अशा मानवीय पणाकडे आकृष्ट करून घेवून जाते. करुणेतून इतरांना मदत आणि परोपकार करण्याची सदैव इश्चा निर्माण होत राहते. त्यातून मानव हा एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावतो. करुणेतून मनुष्य प्राणी हा खर्‍या अर्थाने माणुसकीच्या भित्ती उभारतो.

एकंदरपणे प्रज्ञा खर्‍या अर्थाने मानवी बुद्धीच्या सर्व अंगांना स्पर्श करते आणि बुद्धीला  सत्याचा प्रकाश दाखविते. प्रज्ञा ही विवेक जागृत करते. प्रज्ञा ही ज्ञानाच्या कक्षा वाढविते आणि बुद्धीला एक विचाराची बैठक घालून देते. शील हे मानवाचे खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्व दर्शविते. शीलातून मानवी मूल्य वाढीस लागते. शील जेवढे उत्तम तेवढी प्रज्ञा ही प्रखर होते. करुणा ही मानवाला मानवाकडे प्रेमपूर्वक, आदरपूर्वक आणि आस्थेवाईकपणे पाहायला शिकविते. करुणेतून मानवी सहसंबद्ध आणि मानवी दयाभाव वृद्धिंगत होतो. प्रज्ञा, शील, करुणा या तीन तत्त्वांची सांगड घालून कोणताही मनुष्य हा सात्विक आणि प्रज्ञावान होतो आणि साधे, सोपे, सरळ सुटसुटीत आणि सोपे आयुष्य जगण्यास सुरुवात करतो.

जीवन अनमोल आहे! ते अधिक सुंदर बनवूया !

७४/१०१ दिनांक २१.०७.२०२३

सुखाच्या शोधात©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७