प्रशासन लोकाभिमुख करणारा अधिकारी -उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर,

प्रशासन लोकाभिमुख करणारा अधिकारी -उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, यांच्या मराठवाड्यातील बारा वर्षाच्या प्रदीर्घ सेवाकाळातील प्रशासकीय कामकाजाचा वेध घेणारा विस्तृत लेख ‘सक्सेस हिरोज’ या लोकप्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
संपूर्ण मासिक
पेज
प्रशासन हे शासन आणि जनता या मधील दुवा म्हणून काम करत असते. जनतेच्या समस्या आणि अडचणी काय आहेत? ते जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे प्रशासकीय व्यवस्थेचे आद्य कर्तव्ये ठरते. आपल्या पदाचा धाक दाखवून किंवा आपल्या स्व:ताच्या बढाया मारून प्रशासन चालवता येत नाही तर जनतेशी सुसंवाद साधून, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, शासन व जनता यांच्यातील दुवा बनून प्रशासन चालवले जाते. या विचारावर चालणारे, प्रशासनाची धुरा कार्यक्षमपणे आणि पारदर्शकपणे सांभाळणारे एक सृजनशील अधिकारी म्हणून राजीव नंदकर यांचा उल्लेख करावा लागेल. मूळचे पुणे जिल्ह्यातील असलेल्या राजीव नंदकर यांनी मराठवाड्यात तब्बल एक तप म्हणजे बारा वर्ष विविध कार्यकारी पदांवर नोकरी केली आहे. आपल्या कार्यकाळात दुष्काळ, गारपीट, पूर, कायदा-सुव्यस्था, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न,विविध अनुदाने वाटप,पर्यटन,  सामान्य नागरिकाच्या विविध समस्या इत्यादी प्रश्न त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कौशल्याने हाताळले. उपविभागीय अधिकारी(प्रांत),जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अशा विविध पदावर त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. नव्हे तर एक वेगळी छाप निर्माण केली. सातत्यानं निरीक्षण आणि परीक्षणाची नजर असलेले राजीव नंदकर हे एक अभ्यासू अधिकारी आहेत. त्यामुळे ते प्रशासकीय सेवेत नव्याने येणाऱ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. 
आपण आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट ध्येय ठेवले आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न  केले तर हमखास यश मिळते त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मुंबई येथे सध्या कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांचे देता येईल. ग्रामीण भागात शिक्षण घेत एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करीत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारलेल्या राजीव नंदकर यांचा प्रवास कष्ट, मेहनत,जिद्द आणि चिकाटीने भरलेला आहे. जीवनाच्या वाटचालीत अनेक खाचखळगे अनुभवलेल्या नंदकर हे आज युवकांचे आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्याचे प्रेरणास्थान  ठरले आहेत. पारदर्शक आणि कार्यक्षम कारभार, नवनवीन उपक्रम राबवून त्या माध्यमातून गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. 
उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बोरघर या छोट्याशा गावी १ मे १९८१ साली झाला. पुण्यापासून १०० कि.मी.अंतरावर उत्तरेस शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे गाव. वडिल सिताराम नंदकर हे शासकीय नोकरीस पुण्यास होते. परंतु त्यांनी त्यांचे आई ,वडील आणि लहान भाऊ यांची त्यांच्यावर  जबाबदारी असल्याने आपल्या कुटुंबाला शहरात न हलविता गावीच ठेवले. त्यामुळे राजीव नंदकर यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. प्राथमिक शाळेची शैक्षणिक स्थिती आता जशी आहे तशीच होती. गणित, विज्ञान, इंग्रजी या महत्त्वपूर्ण विषयांना शिक्षक नव्हते. त्यामुळे त्यांचं इंग्रजी व गणित फार काही सुधारलं नाही. त्यानंतर आठवी ते बारावी शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी आंबेगाव येथे झाले. दहावीत ६२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर गणित व इंग्रजी विषयात थोडीफार प्रगती झाली. त्या प्रगतीवरच अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. परंतु पहिल्याच वर्षी चाचणी परीक्षेत केमिस्ट्री विषयात शून्य गुण मिळाल्यामुळे ते निराश झाले आणि विज्ञान शाखा सोडण्याचे त्यांनी वडिलांकडे बोलून दाखवले. तेव्हा वडिलांनी त्यांना धीर देत ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. वडिलांनी त्यांना विश्वास दिला. या विश्वासाच्या जोरावरच त्यांनी बारावीचा चांगला अभ्यास केला. अभ्यासाची गती वाढवली आणि बारावी परीक्षेत ६५टक्के गुण घेऊन ते उत्तीर्ण झाले. बारावीनंतर त्यांनी डीएड, बीएएमएस आणि बीस्सी ऍग्रीसाठी अर्ज भरले; परंतु मित्रांच्या सल्ल्यानुसार बीएस्सी एग्रीकल्चरला ऍडमिशन घेतले. कृषी महाविद्यालय पुणे येथे प्रवेश घेतला. त्यामुळे सहाजिकच वडिलांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. पहिल्याच वर्षी अभ्यासाची गती वाढवून इंग्रजीत सुधारणा केली. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि ८१ टक्के गुण मिळवून बीस्सी ऍग्री पदवी संपादन केली. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमधून किटकशास्त्र विषयात त्यांनी प्रवेश घेतला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु अगोदर जी हातात येईल ती नोकरी करायची आणि नंतर पुढील शिक्षणाचा विचार करायचा, असे ठरवून त्यांनी पुण्यात कृषी सहायक आणि नंतर नाशिक येथे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये उप व्यवस्थापक म्हणून नोकरी पत्करली. नाशिकमध्ये त्यांनी चार वर्षे बँकेत नोकरी केली. या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. चार वर्षात शेतकऱ्यांना १२५ कोटींचे कर्ज वाटप करून ९५ टक्के वसुली मिळवली. योजनांचा लाभ देत पाचशे ते हजार शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा केली. ही बाब भविष्यातील चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या यशस्वितेची नांदी ठरली. बँकेत नोकरीला असतानाच राजीव नंदकर यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. दररोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास असे चार तास अभ्यास करू लागले. सन २००३ मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा अर्थात एमपीसीची परीक्षा दिली. परंतु अवघ्या दोन गुणांनी वर्ग २ अधिकाऱ्याची पोस्ट हुकली,  त्यांची निवड झाली नाही. नंतर २००४ मध्ये झालेल्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची राज्यात २४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी कालावधीमध्ये राजीव नंदकर यांनी गडचिरोली जिल्ह्यात काम केले.  नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली ; परंतु कसल्या प्रकारची भीती वाटली नाही. कारण ज्यांची शून्यातून सुरुवात होते त्यांना कशाची भीती वाटत नाही असे ते नेहमी सांगतात. प्रशिक्षण कालावधीत त्यांनी प्रशासकीय कामकाजासह अनेक बाबी समजून घेतल्या. पुढे बीड जिल्ह्यातील धारूर या तालुक्याच्या ठिकाणी परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून नेमणूक मिळाली.याठिकाणी त्यांनी प्रशासकीय बारकाव्यांचा सखोल अभ्यास करून वेगवेगळे उपक्रम राबवत विकासाचा मार्ग आखून दिला. प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. प्रशासकीय गतिमानता वाढण्यास व प्रशासन लोकाभिमुख होण्यास मदत झाली. राजीव नंदकर यांचा बारा वर्षाचा सेवा काळ मराठवाड्यात गेला.या कालावधीत त्यांनी त्यांचं बारा वर्षांच्या सेवाकाळात  मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये काम केले. बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद या जिल्ह्यांमधील काम पाहत असताना  विविध पदांवर आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. 
कन्नड जिल्हा औरंगाबाद या याठिकाणी उपविभागीय अधिकारी असताना शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पुढे आला असता त्यावर अभ्यास करून तालुक्यातील एक हजार कुटुंबांचे सर्वेक्षण त्यांनी केले. यात शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची सखोल माहिती घेत विश्लेषणात्मक अभ्यास केला. तसेच त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या कार्यालयात आत्मविश्वास हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह महिला, विद्यार्थी यांच्या तक्रारींचे निरसन करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. एकल महिला सर्वेक्षण करून १८ हजार महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. एकाच वेळी १५२ पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे आणि आठेचाळीस पूर्ण केली.
जालना येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम करत असताना पाँस मशीनद्वारे धान्य पुरवठा करण्याच्या योजनेत राज्यात सुरुवातीचे सहा महिने ते आघाडीवर होते. या योजनेत संपूर्ण शिधापत्रिका डिजिटलायझेशन करण्यात आले. लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून त्याला धान्य वितरीत केले जाऊ लागले.परिणामी योग्य लाभार्थ्यांपर्यंत धान्यपुरवठा होऊ लागल्याने सर्वसामान्य माणसाचा पुरवठा विभागावरील विश्वास वाढू लागला. धान्याच्या काळ्या बाजाराला आळा बसून अनेक क्विंटल धान्य शिल्लक राहू लागेल.वर्षभरात जवळपास दीड लाख क्विंटल धान्याची बचत होऊ लागली. उज्वला गॅस योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. यासाठी त्यांनी एक लाभ लाभार्थी यांना ऑफर लेटर देऊन जवळपास ७५ooo गॅस जोडण्या दिल्या. 
*शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य*
बँकेत नोकरीला असताना त्यांचा शेतकऱ्यांशी जवळून संबंध आला. शेतकरी कुटुंबातील ते असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती. म्हणूनच ते म्हणतात, शेतकऱ्यांच्या शेतात पाय ठेवल्याशिवाय आणि शेतकर्‍यांच्या घरात चहा घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची नक्की परिस्थिती समजत नाही. त्यामुळे त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांशी संपर्क ठेवला. बँकेत असताना त्यांच्यासाठी पीक कर्ज, द्राक्षबाग कर्ज, इमू (शहामृग) पालन, कुक्कुटपालन यासारख्या अनेक योजनांचा लाभ दिला. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यानंतर प्रशासकीय सेवेत आल्यानंतरही शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांची नाळ जोडलेली राहिली. शेतकरी आत्महत्या कारण शोध आणि उपयोजना ही योजना राबवून तालुक्‍यातील दुर्गम आशा गावात मूलभूत सुविधा पुरविल्या. या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्याशी संबंधित २४ कार्यालयाशी जोडून शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. एवढेच नाही तर ‘भेगाळलेली भुई’ या लघुनाटिकेच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावर प्रबोधन केले. शेतकऱ्यांचा  जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ग्रामीण भागातील शेतीतून जाणारे रस्ते व शेतीचे वाद यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गावागावातील शेतकऱ्यांच्या शेतातील रस्त्याचे प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविणे शक्य झाले. तसेच शेतीचे वादही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जालना येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) असताना भूसंपादनाचे ३२१ प्रकरणे निकाली काढून जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना मावेजा मिळवून दिला. खुलताबाद येथे राजस्व अभियानांतर्गत डिजिटल सातबारा उपक्रम राबविण्यात आला. 
*रजा नामंजूर न करणारा अधिकारी*
शासकीय कार्यालयात नोकरी करीत असताना कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या ताणतणावांना सामोरे जावे लागते. तसेच कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांना रजा घ्यावी लागते. परंतु काही अधिकारी कर्मचाऱ्यांना रजा देताना टाळाटाळ करतात किंवा आपल्या पदाचे महत्त्व वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक तर कधी नाईलाजास्तव रजा नामंजूर करतात. परंतु राजीव नंदकर हे एकमेव असे अधिकारी आहेत की ज्यांनी एकाही कर्मचाऱ्याची रजा नामंजूर केलेली नाही. रजा दिल्यामुळे कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या व्यापातून मुक्त होऊन आपला वेळ कुटुंबासोबत किंवा मित्र परिवारासोबत घालवितो. त्यामुळे तो तणाव मुक्त होऊन परत कार्यालयात आल्यानंतर दुप्पट वेगाने काम करतो, ही बाब त्यांनी निरीक्षणातून पडताळली होती. अर्थात ज्याचा त्याचा काम करून घेण्याचा हा हातखंडा म्हणावा लागेल. 
*व्यक्तिगत जीवनापेक्षा कर्तव्याला प्राधान्य*
अधिकारी म्हणून काम करीत असताना बऱ्याच वेळा आपल्या वैयक्तिक गोष्टींना बाजूला सारून कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागते. असाच प्रसंग राजीव नंदकर यांच्याही वाट्याला आला.  ६ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांना कन्यारत्न जन्मले.त्यामुळे त्यांना आनंद झाला; परंतु त्याचवेळी केंद्रीय मंत्री दुष्काळी दौऱ्यावर येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच त्यासाठी नियोजन करावयाचे असून तात्काळ येण्यास सांगितले. तेव्हा एक दिवसही न थांबता त्यांना दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी कर्तव्यावर हजर व्हावे लागले. त्यातच दुसऱ्या दिवशी मुलीची तब्येत खराब झाल्यामुळे तिला दवाखान्यात दाखल करावे लागले. अशावेळी धीर देण्यासाठी आपण त्या ठिकाणी असायला हवे होते ; परंतु ते जमले नाही. याठिकाणी त्यांनी व्यक्तिगत जीवनापेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिले.
*क्रिकेट आणि लेखनाचा छंद*
राजीव नंदकर यांना क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. शारीरिक आणि मानसिक जडण घडणीसाठी खेळ हा महत्त्वाचा आहे असे त्यांचे मत आहे. महसूल विभागाच्या अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजविल्या आहेत. मराठवाडा महसूल विभागाच्या क्रिकेट संघाचे ते कर्णधार राहिले आहेत.आजही ते वेळ मिळेल तेंव्हा क्रिकेट खेळतात. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. खेळासोबतच त्यांना लेखनाचा छंद आहे. राजीव नंदकर यांची चार पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये महाराजस्व अभियान, चारा छावणी, बळीराजा तुझ्यासाठी, पुरवठा विभाग : एक दृष्टिक्षेप या पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे दीडशे लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांचे आंतराष्ट्रीय स्तरावर पाच शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. दररोज दीडशे ते दोन हजार शब्द लेखन करीत असतात. त्यांनी स्वतःचा  ब्लॉग सुरू केला आहे. शिवाय सतत नवीन काही शिकण्याची उर्मी अंगी बाणवली आहे. काळासोबत चालायचे असेल तर नवनवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत, असे त्यांचे मत आहे. 
*प्रत्येक अधिकाऱ्याने लेखाजोखा मांडला पाहिजे*
विद्यार्थ्यांना जसे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर प्रबंध सादर करावा लागतो. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना देखील तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्याने केलेल्या विधायक कामाचा लेखाजोखा मांडणे अनिवार्य केले पाहिजे, असे राजीव नंदकर यांचे मत आहे. असा लेखाजोखा मांडल्यामुळे आपण केलेल्या कामाचा ताळेबंद समोर येईल. त्यातून आपल्या कार्यपद्धतीत काय बदल हवा हे समजेल आणि कोणता अधिकारी कशाप्रकारे काम करीत आहे हे शासनाला  आणि जनतेस समजून येईल. त्यासाठी ते त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळावर एक पुस्तक प्रसिद्ध करतात.अधिकारी बनणे तुलनेने सोपे आहे परंतु नंतरचे काम तितकेच आव्हानात्मक आहे हे सांगायला ते विसरत नाहीत. अधिकारी झाल्यानंतर सर्वसमावेशक आणि सर्वांना न्याय देणारी  कामे करावी लागतात. आपल्यातील नैतिकता, पारदर्शकता आणि कार्यतत्परता दाखवावी लागते तरच लोक आणि लोकप्रतिनिधी आपल्यापाठीशी उभे राहतात, असा सल्ला राजीव नंदकर देतात. 
*डोक्यावर बर्फ, तोंडात साखर!*
शासकीय नोकरीत अधिकारी म्हणून काम करीत असताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करावे लागते, याबद्दलचा एक प्रसंग राजू नंदकर यांनी उदाहरणासह सांगितला. एका गावातील स्मशानभूमीचा वाद होता. हा वाद सोडवत असताना चर्चेत कनिष्ठ अधिकाऱ्याच्या तोंडून चुकीचे शब्द वापरले गेले. त्यामुळे संतप्त झालेला नागरिकांनी चक्क मृतदेह तहसीलदार यांच्या कक्षेत आणून ठेवला. तेव्हा नंदकर यांनी समजूत घालून नागरिकांना शांत केले. नागरिकांशी असलेले चांगले आणि सोहदपूर्ण संबंध या ठिकाणी कामी आले.तुम्ही कसे काम करत आहात हे लोक पाहत असतात अणि योग्य वेळी ते तुम्हाला मदत करतात किंवा तूम्ही जर चांगले वागत नसाल तर अडचणीत आणतात असेही ते आवर्जून सांगतात. अशीच बाब प्रशासकीय काम करत असताना येणाऱ्या राजकीय दबावाबाबत त्यांनी सांगितली. शासन व प्रशासन ही लोकशाही व्यवस्थेचे दोन चाके आहेत. लोकप्रतिनिधींनासोबत काम करतांना त्यांचे विचार ऐकून काम करावे लागते. ते काय सांगतात, त्यामागील भावना काय, उद्देश काय हे लक्षात घेतले पाहिजे.  पूर्वग्रहदूषितपणा न ठेवता काम केले पाहिजे. राजकीय मंडळींना समजून घेत त्यांची नियमात बसणारी कामे तात्काळ केली पाहिजेत. त्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. त्यांच्याशी समन्वय साधून काम केले तर कुठलाही दबाव येणार नाही. परंतु त्याचसोबतच ते जर चुकीचे काम  सांगत असतील तर त्यांना शांतपणे नकार देण्याचे धेर्य आपल्यात असावे लागते आणि ते नैतिकतेमधून येते असे ते म्हणतात.  आपली शासन व्यवस्थाच एकमेकांशी पूरक व परस्परांवर नियंत्रण ठेवणारी आहे, असे नंदकर सांगतात. 
*मार्गदर्शक कोण असावेत?*
आपल्या जीवनाच्या जडणघडणीत आपण कोणाला मार्गदर्शक मानावे याबाबत राजीव नंदकर सांगतात, आपले पालक आणि नातेवाईक, मित्र, शिक्षक हे आपले मार्गदर्शक असले पाहिजेत. शिवाय आपल्याला नुसते वर्गमित्र असून चालत नाही तर ज्युनियर सहकारी व सीनियर सहकारी  देखील मित्र असायला हवेत. कारण त्यामुळे आपल्याला भूत,भविष्य आणि  वर्तमान या तिन्ही काळातील बदलांचा अंदाज येतो आणि त्यादृष्टीने पाऊल टाकता येते, वाटचाल करता येते, भविष्याचा अंदाज घेता येतो. स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी अशा तीनही काळावर वर्चस्व असले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. वसतिगृहाचे गृहपाल रमेश काळे हे विद्यार्थीदशेत त्यांचे मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांनीच त्यांच्यामध्ये  आत्मविश्वास निर्माण केला. राजीव नंदकर हे स्वतः एक उत्तम मार्गदर्शक आहेत. यशदा सारख्या संस्थांमध्ये जाऊन ते प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात. आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी व्याख्याने दिली आहेत. नाशिक,जळगाव,अहमदनगर, हिंगोली येथे जाऊन अनेक प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले आहे. यशमंथन ,जीवन शिक्षण इत्यादी मासिकात लेखन केले आहे.ते प्रशासकीय कामकाजवर लिहीत असतांना मनोविश्लेषण, मानसशास्त्र आणि तत्वज्ञान यावरही लिखाण करतात त्यामुळे ते अनेकांचे मार्गदर्शक आणि वाटाडे ठरले आहेत. 
 *निरंतर शिक्षण*
 राजीव नंदकर हे आजही निरंतर शिक्षण घेत आहेत.नुकतेच त्यांनी एमबीए (बँकिंग, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स) वेलींगकर इन्स्टिट्यूट मुंबई येथून पूर्ण केले.इंदिरा गांधी  राष्ट्रीयमुक्त विध्यापिठ मधून त्यांनी एमए (ग्रामविकास) पूर्ण केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट मधून त्यांनी ट्रेंनिग डिप्लोमा पूर्ण केला आहे.सध्या ते एमए (मानसशास्त्र)करत आहेत.ते सांगतात की निरंतर शिक्षण घेत राहिल्याने तुमचे ज्ञान, कौशले आणि सकारात्मक दृष्टिकोन यात वृद्धी होते.त्यामुळे वेळ मिळेल तसे शिक्षण घेत राहिले पाहिजे.
*काय आहे यशाची गुरुकिल्ली?*
जन्मजात प्रत्येक व्यक्तीच्या अंगी अनेक गुण, कौशल्य असतात; परंतु या अंगभूत कलागुणांना वाव मिळत नाही किंवा तो मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात नाहीत. जर आपल्यातील कौशल्य विकसित करून त्याचे चांगले सादरीकरण करण्यात आले तर प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळविता येते. त्यासाठी आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले पाहिजे. चांगल्या मित्रांच्या, चांगल्या व्यक्तींच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. आपले ध्येय, उद्दिष्ट ठरवली पाहिजेत. कुठे जायचे ? काय करायचे?हेच कळत नाही, त्यामुळे आज अनेक युवकांची तारांबळ उडते आणि काही कळेपर्यंत वय निघून जाते, कारण वय कुणासाठी थांबत नाही. तरूणांनी नेहमीच किमान पाच वर्ष जगाच्या पुढे चालले पाहिजे. चांगलं ते आत्मसात करण्याची आणि आपल्यातील कौशल्याची गती वाढविण्याची गरज आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच अपारंपरिक शिक्षणाची आवश्यकता आहे. काळाची गरज लक्षात घेऊन विविध सॉफ्ट स्किल्स, व्यवस्थापन स्किल्स, माहिती तंत्रज्ञान स्किल्स, संभाषण स्किल्स यासारखी विविध कौशल्ये आत्मसात केली तर आपण स्पर्धेत टिकून राहू शकतो,हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे राजीव नंदकर सांगतात.