समस्या सोडविण्याचे कौशल्ये हस्तगत करा ! Improve Problem Solving Skills !

समस्या सोडविण्याचे कौशल्ये हस्तगत करा ! Improve Problem Solving Skills !

     समस्या, अडचणी आणि अडथळे आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग आहेत. तसे पहिले तर आयुष्य हे कोडे आहे आणि ते आपल्याला सोडवत सोडवत पुढे जावे लागते. मात्र हे कोडे अथवा समस्या सोडविणे यासाठी अनेक पातळी आणि आघाड्या यावर कामकाज करावे लागते. अनेक बाबी, गोष्टी आणि घटक यांचा समन्वय साधून समस्या सोडवाव्या लागतात. समस्या सोडविण्यासाठी वर्तुणूक, स्वभाव आणि दृष्टीकोण यातही इष्ट बदल करावे लागतात. समस्या सोडविण्यासाठी आपल्या वैयक्तिक पातळीवर तर कधी कधी सामूहिक पातळीवर मदत आणि सहकार्य घ्यावे लागते. मात्र ही मदत आणि सहकार्य मिळविणे आणि त्या आधारे समस्या सोडविणे हे तेवढे सोपे आणि सहज नसते. समस्या सोडविणेसाठी अनेक कौशल्ये आणि तंत्र आत्मसात करावी लागतात. त्याच सोबत समस्या सोडविण्यासाठी ज्ञान आणि अनुभवाची जोड सुद्धा द्यावी लागते. तसेच तुमचे संबध कौशल्ये आणि तुमचे संवाद कौशल्ये सुद्धा समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत करत असतात. समस्याचे विश्लेषण तुम्ही कसे करता यावरही ती समस्या सुटणार की नाही हे ठरते. विशेष म्हणजे समस्या सोडविण्यासाठी समस्यांच्या मुळाशी जावे लागते आणि समस्या निर्माण होण्यामागची कारणे शोधून समजून घ्यावी लागतात. एकदा कारणे समजली की त्या आधारे समस्या सोडविणे सोपे होते. प्रस्तुत लेखात समस्या म्हणजे काय? समस्या कशी निर्माण होते? समस्या कशी सोडवावी? अशा अनेक बाबीवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

मनुष्य प्राणी हा कायम मागून पुढे, खालून वर आणि अपयशाकडून यशाकडे वाटचाल करत असतो. अजून विस्ताराने सांगायचे तर तो कायम उदीष्टे आणि ध्येये याकडे मार्गक्रमण करत असतो. अशी ही वाटचाल आणि मार्गक्रमण करत असताना अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होत असतात. एक यशस्वी असे आयुष्य जगण्यासाठी असे हे अडथळे आणि समस्या दूर करण्यासाठी कायम प्रयत्नशील आणि क्रियाशील असे राहावे लागते आणि सखोल विचारांती निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करावी लागते. मात्र आयुष्यातील सर्वच समस्या कायम चुटकी सरशी सुटत नसतात तर समस्या सोडविण्यासाठी अनेक टप्पे, अवस्था आणि स्थिती मधून प्रवास करावा लागतो. अनेक घटक आणि बाबी यांचे संघटन आणि संयोजन करावे लागते. सतत प्रयत्न करावे लागतात. त्यावेळी कोठे समस्या सुटण्यास सुरुवात होवून आयुष्य सुलभ आणि सुटसुटीत होते.

समस्या सोडविण्यासाठी प्रोत्साहन, प्रेरणा आणि दृष्टीकोण ह्या बाबी पण तितक्याच महत्वाच्या ठरतात. त्यामुळे समस्या प्रती आपण कसे अभिमुख आहोत हेही तितकेच महत्वाचे असते. समस्या सोडवणूक ही खर्‍या अर्थाने पाहिले तर एक मानसिक प्रक्रिया आहे पण तिला कायम कृतीची जोड द्यावी लागते. त्यासाठी समस्या शोधणे किंवा त्या मागची कारण मीमांसा शोधने आणि समस्येचा आकार आणि आकारमान निश्चित करणे हेही तितकेच महत्वाचे असते. समस्या सोडविणे ही मानवाची उच्च दर्जाची असलेली आकलन क्षमता आहे. पावसाचे पाणी वाहून जाते आणि मग वापरासाठी पाणी राहत नाही, या समस्येवर मात करण्यासाठी पाणी साठवणूक  साधने माणसाने तयार केली. आकलन म्हणजे काय तर मिळालेल्या किंवा प्राप्त झालेल्या माहितीचे मानसिक प्रतिबिंब होय. समस्या सोडविण्यामद्धे खर्‍या अर्थाने हीच आकलन क्षमता कामास येते. या क्षमतेमुळे समस्येमधील अडथळे दूर होवून समस्या सुटण्यास मदत होते. तसेच समस्या सोडविण्यासाठी तुमची विचारशक्ती ही उत्पादक स्वरूपाची असावी लागते. त्याच बरोबर  तुम्ही समस्येतील प्रत्येक घटक आणि बाब याबाबत संवेदनशील असावे लागते. तसेच समस्या सोडविण्याचा संरचनात्मक क्रम सुटसुटीत असायला लागतो.हे सर्व साधले की समस्या सोडविणे सुलभ होते.

दैनदिन आयुष्यात समस्या सोडविण्यासाठी आपण असमर्थ होत आहोत, हीच एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक घटक, बाबी आणि गोष्ट आपल्या कार्याला किंवा वाटचालीला थांबवत असतात. त्यामुळे विकासात आणि प्रगतीत अडथळे निर्माण होतात आणि आपली कारकीर्द धोक्यात येवू शकते. असे का होते? कारण आपल्याकडे असणारे ज्ञान आणि कौशल्ये याचा असणारा अभाव होय. थोडे काही प्रमाणात ज्ञान आणि कौशल्ये असली तरी नियोजनाचा अभाव आणि कोणतीही रणनीती नसणे ही दुसरी मोठी समस्या दिसून येते. तसेच आपला निराशावादी स्वभाव, वाईट सवयी आणि नकारात्मक दृष्टीकोण ह्या बाबी सुद्धा समस्या सोडविण्यात अडथळे निर्माण करतात किंवा समस्या अजून जटिल बनवतात. जे समोर येईल तसे ते सोडवू अशी वृती आपण ठेवली की तुमची प्रगतीत आणि विकासात कायम मागे पडायला सुरुवात होते.

समस्या सोडविण्यापूर्वी समस्या कशा प्रकारे सुटू शकते याची आभासी प्रतिमा आपल्या मनात उभी करावी लागते. आभासी प्रतिमा काही हवेतून तयार होत नाही तर त्या साठी ज्ञान आणि अनुभव याची आवश्यकता असते. तो जेवढा जास्त तेवढ्या जास्त आभासी प्रतिमा निर्माण करेल तेवढी समस्या सुटण्यास मदत होते. लहान मूल खेळत असताना त्याने चुकून काही तरी गिळले असे त्याच्या चेहर्‍यावरील हावभाव वरुन लक्षात आले तर आपल्याला त्याने काय गिळले असेल याची आभासी प्रतिमा तयार करावी लागते आणि त्या आधारे समस्या सोडवावी लागते.

समस्या सोडविण्यासाठी फक्त बाबी आणि घटक नुसते उपलब्ध असून चालत नाही तर त्या घटकांचा एक ठराविक क्रम लावावा लागतो. तसेच तो क्रम अर्थपूर्ण रीतीने लावावा लागतो. गॅस चा रेगुलेटर गॅसला जोडला आणि चालू केला असता गॅस बाहेर पडायला लागला तर हे गॅस टाकीचा वायसर खराब असेल असे आपण भाकीत करतो त्यामागे गॅस टाकीला असा वायसर असतो याचे ज्ञान असल्यामुळे जर ते माहीत नसले तर गॅस बाहेर कोठून कसा बाहेर पडतोय हे कळणार नाही आणि समस्या ही हेल्पर बोलवून सुटू शकेल हा अर्थपूर्ण क्रम लावता येणार नाही.

समस्या सोडविण्यासाठी संयम सुद्धा आवश्यक असतो. समस्या सोडविण्यासाठी ठराविक वेळ लागतोच त्यामुळे संयम जर अंगी नसेल तर समस्या सुटण्याऐवजी क्लिष्ट होते. स्पर्धा परीक्षेत नापास झाल्यावर संयम ठेवून निर्माण झालेल्या समस्यांवर मात करून यशस्वी व्हावे लागते. प्रवासात कुलंट कमी झाल्या मुळे गाडी गरम झाली तर ती समस्या सुटण्यासाठी संयम राखून काही वेळ जावून द्यावा लागतो. समस्या सोडवत असताना उपलब्ध घटक यांचा योग्य प्रकारे सह संबंध शोधून त्यांचा वापर करावा लागतो. सह सबंध शोधण्यासाठी या घटकांचा उपयोग आपल्याला माहीत असावा लागतो. प्रिंट दिली आणि प्रिंटर मध्ये कागद अडकून बंद पडला तर प्रिंटर, त्या मधील टोनर, पाठीमागे असलेले झाकण हे सर्व घटक यांचे कार्य माहीत असावे लागते तरच समस्या सोडवता येते.

कधी कधी असंबद्ध असे वर्तन आणि वागणूक होवून समस्या सुटण्या ऐवजी अधिक जटिल बनून जाते. त्यामुळे आपल्या मनात अंतर्गत काय चालू आहे तेच बाहेर प्रतीत होत असते.  सबब मनाचा आतील आवाज ऐकावा लागतो. तसेच आपल्या अचेतन मनाचे काय संदेश आहेत ते सुद्धा ऐकावे लागतात. त्यातून एक अंतर्दृष्टी तयार होते आणि ती वाटचाल अधिक सुलभ अशी करते. विस्तृतपणे, उघडपणे आणि पुर्णपणे आपण ज्ञान आणि अनुभव पणाला लावले की निर्णय घेणे अजून सोपे होते आणि समस्या सुटतात.

समस्या ह्या दोन प्रकारच्या असतात. स्पष्टपणे समोर आलेल्या समस्या आणि अस्पष्ट रीतीने समोर आलेल्या समस्या हे दोन प्रकार होत. ज्या समस्या या स्पष्ट असतात त्या सोडविणे सोपे असते मात्र ज्या समस्या अस्पष्ट असतात त्या सोडविणे जिकरीचे होत असते. आपल्या मुलाला गणिते सोडविता येत नाहीत ही स्पष्टपणे समोर आलेली समस्या आहे ती सोडवता येवू शकते परंतु आपल्या मुलाला शब्दाचे उच्चार करताना अडथळे येतात ही अस्पष्ट रीतीने समोर आलेली समस्या होय ती सोडविणे जिकरीचे होते.

समस्या सोडविण्यासाठी सर्वात आधी अनेक घटक की जे समस्या सोडविण्यासाठी मदत करत आहे त्याचा सहसंबद्ध तपासवा लागतो. हा सहसंबध तपासत असतांनी या विविध घटकांचे वर्गीकरण करावे लागते. वर्गीकरण केल्याने सुटसुटीतपणा येतो आणि आपल्याला या प्रत्येक घटकांची क्षमता वाढवता येते. स्पर्धा परीक्षेमद्धे वारंवार अपयश येत आहे ही समस्या सोडविण्यासाठी अनेक घटक जसे मार्गदर्शन, पुस्तके, क्लास, लायब्ररी इत्यादि घटक आणि त्यांचा सहसंबंध तपासावा लागतो आणि समस्येची सोडवणूक करावी लागते.

समस्या सोडवत असताना आपण कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या अनुक्रमाने पुढे जाणार आहात ते पण तपासावे लागते. तसेच समस्या सोडविताना विचारात घ्यावयाच्या घटकांचा क्रमाचा निकष ठरवावा लागतो. वाजवी संयोजन आणि अर्थपूर्ण अनुक्रम हा सुद्धा महत्वाची अशी भूमिका पार पाडतो. तसेच समस्या सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर काम करावे लागते. त्या मध्ये सृजनशील विचार आणि विविध प्रक्रिया पद्धतचा वापर करावा लागतो. ‘समस्या जादूची कांडी फिरवली आणि सुटली असे होत नाही. त्या साठी विविध घटक, बाबी, गोष्टी आणि साहित्य याची जमवाजमव करावी लागते.साहित्याची जमवाजमव आणि प्रत्यक्ष समस्या सोडविण्यास घेणे या मधील काळात विचार प्रक्रिया भक्कम करावी लागते. त्या नंतर एक दृष्टिक्षेप आणि दृष्टीकोण करून त्याच्या आधारे समस्या सोडवावी लागते. तसेच समस्या सुटल्यावर वेळेनुसार ती खरच सुटली आहे का ते तपासावे लागते. समस्या सोडविण्यासाठी त्या समस्याच्या दृष्टीने माहितीचे क्षेत्र याचीही आपणास माहिती प्राप्त करावी लागते. समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने विचार करण्यास सुरुवात करणे ही खूप महत्वाची स्टेप आहे. जे घटक आहेत त्याचा सहसंबद्ध आपल्याला समजला की आपल्याला समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेली रचना आणि कार्यपद्धती निश्चित करता येते.

समस्या सुटत नाहीत कारण त्या मागे अनेक घटक जबाबदार असतात. समस्येबाबत स्पष्टता नसणे, समस्या बाबत संभ्रम असणे, एकच समस्या सोडविण्यासाठी कायम एकच मार्ग अवलंबणे, समस्या सोडवत असताना तिला विरोध होणे, समस्या सोडवत असताना अपेक्षित असणारा बदल न स्वीकारणे, समस्या सोडवितांनी क्लिष्टता जाणवने, विविध घटकांचा सहसंबद्ध प्रस्तापित न करता येणे, घटक हे एकसारखे नसणे, वेळ जास्त लागणे, समस्या ही कायम बदलणारी असणे आणि तात्पुरते उपाय शोधणे या अशा बाबी मुळे समस्या सोडवितांनी अनेक अडचणी तयार होतात किंवा समस्या सोडवितांनी अनेक अडथळे समोर येतात. त्यामुळे यावर योग्य पद्धतीने मात करावी लागते आणि प्रत्यक्षपणे समस्येला हात घालून ती सोडविण्याची कार्यवाही करावी लागते.

तसे पहिले तर ज्ञान आणि कौशल्ये असणे हे समस्या सोडविणे साठी प्रत्येक वेळी पुरेसे असेल असे नसते. तर त्या पुढे जावून समस्या सोडविणे साठी रणनीती आखावी लागते. रणनीती म्हणजे काय तर कोणती गोष्ट कशा प्रकारे, कोणत्या क्रमाने आणि कोणत्या वेळी करायची हे होय. योग्य आणि उचित रणनीतीच्या आधारे आपल्याला समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने विविध घटक यांची जुळवणी करता येते आणि नियोजनबद्ध पुढे जाता येते. समस्या सोडवितांनी वेळेला असाधारण असे महत्व आहे. गणित विषयाचा पेपर सोडवित असताना तेथे गणिते सोडविणेसाठी वेळ हा खूप महत्वाचा असा घटक धरला जातो. दैनदिन जीवनात येणार्‍या आणि अचानक उद्भवणार्‍या समस्या सोडविण्यासाठी आपण किती वेळ घेतो हेही तितकेच महत्वाचे ठरते.

समस्या जर स्व-संबधित असेल तर आत्मपरिक्षण करणे अनिवार्य ठरते. म्हणजे आपण रोज उशिरा उठतो त्यामुळे कार्यालयात पोहचायला उशीर होतो ही जेंव्हा रोजची समस्या बनते त्यावेळी आपल्याला त्या मागचे घटक समजून घ्यावे लागतात. साहजिकच या मागे उशिरा झोपणे, झोप पूर्ण न होणे, उठल्या नंतर दिनक्रिया बाबत नियोजन नसणे इत्यादि असे घटक कारणीभूत असतात. हे घटक तुमच्या वर्तनशी आणि सवयी यांचेशी निगडीत असल्याने वर्तनात इष्ट बदल केला की समस्या सुटण्यास मदत होते. समोरच्याला उत्तम इंगजी बोलता येते मात्र मला इंग्रजी बोलता येत नाही ही एक समस्या म्हणून जेंव्हा पुढे येते त्यावेळी या मागील कोणते घटक ही समस्या निर्माण करतात ते पहावे लागते. या मागे इंगजी शब्दसाठा, व्याकरण, वातावरण आणि सराव हे घटक जबाबदार असतात. नियोजन पूर्वक आणि वेळ देवून या विविध घटकांवर काम करून ही समस्या सोडविता येते .

इष्टतम उपाय कसा शोधावा ही समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने महत्वाची समस्या असते. त्या साठी समस्या ही स्पष्टपणे आणि पुर्णपणे समजून घेणे ही मोठी पूर्वअट असते. आपण समस्या आणि तिचे स्वरूप नीटसे समजून घेत नाही आणि अत्यंत घाईघाईने आणि ढिसाळपणाने उपाययोजना आखतो त्यामुळे समस्या तर सुटत नाही उलट आपण मागे पडतो. आपल्या मुलाने नीट परीक्षेमद्धे अपेक्षित मार्क पाडले नाहीत त्यामुळे त्याच्या भवितव्या बाबत समस्या निर्माण होते. आता ही समस्या सोडविण्यासाठी कोणते घटक अपेक्षित मार्क न पाडण्यास कारणीभूत ठरले ते आधी शोधावे लागतील. मग समजा एकूण दहा घटक निदर्शनास आले. तर या घटकांचा योग्य क्रम लावून त्यावर काम करून पुन्हा एक वर्ष त्याला संधी देवून त्याला चांगले मार्क मिळविण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल आणि समस्येवर मात करावी लागेल.

अशा प्रकारे समस्या सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक कामकाज करावे लागते. समस्या दूर करण्यासाठी कायम प्रयत्नशील आणि क्रियाशील असे राहावे लागते. समस्या शोधणे किंवा त्या मागची कारण मीमांसा शोधणे आणि समस्येचा आकार निश्चित करणे हेही तितकेच महत्वाचे असते. समस्या सोडविण्यासाठी ज्ञान आणि कौशल्ये सोबत नियोजन आणि रणनीती आवश्यक ठरते. समस्या सोडविण्यासाठी ठराविक वेळ लागतोच, त्यामुळे संयम जर अंगी नसेल तर समस्या सुटण्याऐवजी क्लिष्ट होते. विस्तृतपणे, उघडपणे आणि पुर्णपणे आपण ज्ञान आणि अनुभव पणाला लावले की निर्णय घेणे अजून सोपे होते आणि समस्या सुटतात. आशावादी स्वभाव, चांगल्या सवयी आणि सकारात्मक दृष्टीकोण हे घटक सुद्धा समस्या सोडविणेसाठी कारणीभूत होतात. एकंदर या सर्व बाबी, गोष्टी आणि घटक यांचा संयोजन आणि समन्वय साधून समस्या सुटण्यास मदत होते आणि तुम्ही एक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करता.

जीवन अनमोल आहे! ते अधिक सुंदर बनवूया !

७०/१०१ दिनांक २६.०६.२०२३

सुखाचा शोध ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७