भावनिक बुद्धिमत्ता Emotional Intelligence

भावनिक बुद्धिमत्ता Emotional Intelligence

         मानव हा एक हुशार प्राणी आहे, असे आपण म्हणतो. मात्र या हुशारी मागे तीन बुद्धिमत्ता काम आणि कार्ये करत असतात, हे लक्षात घ्यावे लागते. या तीन बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन बुद्धिमता, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता होय. एक चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी या तीनही बुद्धिमत्ता अनिवार्य आणि आवश्यक असतात. विशेष म्हणजे या तिनीही बुद्धिमत्तांचा वेगवेगळ्याने विचार करता येत नाही तर त्या परस्पर संबधित आणि अंतर्गत जोडणी असलेल्या असतात. मागील तीन शतकात आपण फक्त अध्ययन बुद्धिमता हिच्याशी संबधित होतो, मात्र मागील तीन दशकात भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता याबाबत बरेच संशोधन होवून त्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. जेवढी अध्ययन बुद्धिमता महत्वाची आहे, तेवढीच सामाजिक बुद्धिमत्ता आणि त्यापेक्षाही भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची आहे आता हे सर्वमान्य होत आहे. मात्र आपण आपल्या अज्ञानामुळे फक्त अध्ययन बुद्धिमत्तेला महत्व दिल्याने जीवनात अनेक समस्या निर्माण होतात, तसेच जे अपेक्षित आहे ते प्राप्त होण्यात अडथळे निर्माण होतात. तसेच ध्येये आणि उदीष्टे गाठण्यापासून आपण दूर जातो. खर्‍या अर्थाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या तिन्ही बुद्धिमतांवर कामकाज करावे लागते. प्रस्तुत लेखात भावनिक बुद्धिमत्ता बाबत आपण माहिती घेणार आहोत.

        मनुष्य प्राणी हा जन्माला आल्या नंतर त्याची जनुकीय रचना ही त्याला त्याच्या पूर्वजांकडून मिळते.जन्म झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून मिळणार्‍या अनुभावातून जे काही तो घेतो आणि शिकतो त्यातून त्याचे व्यक्तिमत्व तयार होते. यातील काही गोष्टी आणि बाबी जाणीवपूर्वक तर काही अजाणतेपणाने घडत असतात. या सर्व प्रक्रिया आणि परिपाकमधून त्या व्यक्तीचे एक विशेष असे व्यक्तिमत्व तयार होते. साहजिकच या व्यक्तिमत्वाला तीन प्रकारच्या बुद्धिमत्ता सोबत घेवून वाटचाल करावी लागते. या मधील भावनिक बुद्धिमत्ता ही मेंदू आणि मनाशी निगडीत असून आपले मन कशा प्रकारे भावनांचे उत्सर्जन, पर्यवेक्षन, व्यवस्थापन आणि नियंत्रण करते यावर ही भावनिक बुद्धिमत्ता अवलंबून असते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या भावना आपण कशा प्रकारे प्रकट करतो आणि दुसर्‍याच्या भावना कशा प्रकारे समजून घेतो या बाबतची असणारी अंगभूत क्षमता होय.

      डेनियल गोलमैन यांना भावनिक बुद्धिमत्तेचा प्रणेता असे म्हटले जात असले तरी त्या पूर्वी पीटर सालवोय आणि जॉन मेयर तसेच बार आणि आण यांनीही भावनिक बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही कायम बदलणारी आणि वर्गीकरण करता न येणारी असते. त्यामुळे आज असे वागणारा व्यक्ती उद्या तसे वागेल याची खात्री कोणी देवू शकत नाही. भावनिक बुद्धिमता ही मापन करणे आणि तिची गणना करणे म्हणावे तेवढे सोपे काम नसते. भावनिक बुद्धिमत्ता मापन करताना त्यात अनेक दोष राहतात कारण माणसाचे वर्तन, स्वभाव, सवयी आणि दृष्टीकोण हे काम बदलणारे असतात. भावनिक बुद्धिमत्ता ही स्पष्टपणे दिसून येत नाही, कारण ती अंतर्मनाशी संबधित असते. ती थोडी अस्पष्ट आणि पुसट असते, त्यामुळे तीचे अस्तित्व लक्षात येत नाही. ती कायम खोलवर रुजलेली असते. भावनिक बुद्धिमत्ता ही कधीच एकांगी नसते तर ती समज आणि समाज यांचे एक अंग आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही माणसाला एका विवक्षित अशा उच्च पातळी वर घेवून जाते. 

    भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेक वेळा चुकतात आणि इतरांच्या भावना समजून न घेतल्यामुळे अनेक लोक दुरावतात हे भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव असण्याचे लक्षण आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही अनेक भावनांच्या संयोजन आणि संश्लेषण यातून तयार होते. तिचा उगम मनातून होतो नंतर ती विचारांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करते आणि तिचा शेवट हा कृतीतून होतो. भावनिक बुद्धिमत्तेची मैत्री विचारांशी जमली तर त्यातून सकारातमक्ता निर्माण होते आणि मैत्री जमली नाही तर नकारात्मकता निर्माण होते. भावनिक बुद्धिमत्ता ही फक्त उगम पावून चालत नाही, तर तिचे कृतीक्षम उपयोजन करावे लागते. एखाद्या बद्दल नुसती दया आणि माया असून चालत नाही तर ती जेंव्हा कृतीतून अस्तीत्वात येते तेंव्हा ती पूर्ण रूप धारण करते. भावनिकता फक्त असून चालत नाही तर तिच्या जोडीला कृती असायला हवी. रस्त्याने चालताना कोणी मदत मागितली तर ती जेंव्हा आपण देतो तेंव्हा तेथे अध्ययन बुद्धिमत्ता काम करत नाही तर भावनिक बुद्धिमता काम करते. 

     भावनिक बुद्धिमता मध्ये वाहून जाण्याला थारा नाही. या मध्ये भावना ह्या काळाच्या कसोटीवर आणि वस्तुस्थितीवर तपासून घ्याव्या लागतात. भावनांना नियंत्रण करून त्या योग्य मार्गाने प्रवाहीत जर कोणी करत असेल तर त्याची भावनिक बुद्धिमता भक्कम असते. भावनांना संयमाची व्यसन घातली की भावनिक बुद्धिमत्ता अजून मजबूत होते. संयमाने बर्‍याच गोष्टी आणि बाबी मिळण्याची शक्यता अधिक वाढते. भावनाचे बांध जितके मजबूत तेवढं त्यात वाहून जाण्याची भीती आणि शक्यता कमी होते. भावनिक बुद्धिमत्ता ही फक्त भावना नियंत्रित करत नाही तर त्यांना योग्य मार्गाने प्रवाहीत करते. एकंदर भावनांना आवर घालण्यात आपली भावनिक बुद्धिमतात महत्वाची आणि प्राथमिक अशी भूमिका बाजवते.  

      इतरांबाबत असलेली समानभूती म्हणजे इतरांच्या पातळीवर आणि भूमिकेत जावून समजून आणि उमजून घेण्याची क्षमता होय. समानभूती जेवढी जास्त तेवढे तुम्ही अधिक लोकप्रिय आणि लोकाभिमुख होता. लोकप्रिय आणि लोकाभिमुख या अर्थाने की लोक तुमचं फक्त आदर करत नाहीत तर तुम्हाला मदत करण्यास पुढे सरसावतात. भावनिक बुद्धिमत्ता ही मानवी संबध आणि सहकार्य वृद्धिंगत करते. संबध हे संवाद वर अवलंबून असतात. संवाद जेवढा निकोप तेवढे संबध दृढ होतात. साहजिकच संवाद परिपक्वपणे साधण्यासाठी आपल्या भावनांवर आपले योग्य आणि अचूक असे नियंत्रण आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही भावनिक दृष्ट्या किती स्थिर आहात त्यातून संबंधाची विन पक्की आणि घट्ट होते. 

    परदेशात आता सामाजिक आणि भावनिक शिक्षण(एसईएल)नावाचा अभ्यासक्रम शिकवला जातो. याच्या मार्फत भावनिक बुद्धिमत्ताची योग्य अशी वाढ विध्यार्थी मध्ये केली जाते. यात जीवन जगण्यासाठीची विविध कौशल्ये वाढविण्यावर भर दिला जातो. यातून एक सर्वसमावेशकता निर्माण होवून एक समग्र असा विकास घडून येतो. या मधून निर्णय क्षमता, समस्या सोडविणे आणि चरित्र विकास साधला जातो.प्रत्येक बाब, घटना आणि गोष्ट हिचे विश्लेषण होत असल्याने काय उचित? आणि काय अनुचित? काय चांगले ? आणि काय वाईट? या मध्ये फरक करता येतो.

    भावनिक बुद्धिमतात जेवढी भावनाचा आवेग कमी करते तेवढेच आत्मजाणीव आणि आत्मविकास घडवून आणते. आत्मजाणीव म्हणजे काय तर आपल्या मनाला आणि अधिक खोलवर जाणणे आणि आपल्या आत्म्याला काय वाटते हे आपल्याला कळने म्हणजे आत्मजाणीव होय. आत्मजाणीव होण्यास सुरुवात झाली की तुमचे विचार आणि भावना एका सरळ रेषेत काम करतात.आत्मजाणीव मधून प्रेम आणि माया निर्माण होते. आत्मजाणीव कायम राखण्यासाठी आत्मव्यवस्थापण करणे आवश्यक असते. आत्मविकास म्हणजे काय तर आपण आतून आणि बाहेरून तेवढेच खंबीर होत जाणे होय. आत्मविकास म्हणजे आत जे चालले आहे ते बाहेर प्रकट होणे. त्यामुळे दुट्टपी किंवा दुतोंडी पणा वर्तनात आणि स्वभावात आढळत नाही. त्यातून एक सकारात्मक असे वर्तन तयार होते. सकारात्मकता ही संवाद वाढवून चांगले संबध प्रस्तापित होतता.  मानवी मेंदू हा नाविन्यता आणि सृजनशीला जन्म देतो या मागे त्याची उच्च अशी आकलन क्षमता, कल्पनाशक्ती, विचारांचे सामर्थे आणि भावनाचे अस्तित्व मदत करत असतात. आत्मसंयम हा खरे पहिलं तर स्वय प्रेरणे मधून उगम पावून उत्साह  आणि चिकाटी असेल तरच टिकून राहतो.   

   भावना आवेग म्हणजे भावनांच्या आहारी जाणे होय. या मध्ये भावनांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहत नाही. राग आला तर तो तीव्र असतो आणि भीती वाटली तर ती खोलवर असते. भावनांवर नियंत्रण नसल्यास एकंदर त्रासदायक भावना निर्माण होतात. या भावना अस्वस्थ करतात. यातून तणाव आधारित नातेसंबद्ध तयार होतात आणि वैयक्तिक नाते संबध कमालीचे ताणले जातात. भावना आवेग वाढला आणि कायम राहिला तर संघर्ष आणि हिंसा तयार होते. भावना आवेग वाढला तर आत्मक्लेश वाढतो आणि त्याचे पर्यावसन हत्या किंवा आत्महत्या मध्ये होवू शकते.  

    एकाकी, त्रासलेली, चिंतातूर, काळजीत असणारी, किरकिर करणारी, कुरबुर करणारी, किचाळणार्‍या लोकांमध्ये अध्ययन बुद्धिमत्ता असेलही परंतु निश्चितपणे त्यांच्यात भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव आहे हे अधोरेखित होते. कारण आत्मनियंत्रण न साधता आल्याने भावनांचे दोर त्यांच्या हातातून सुटलेले असतात.काल्पनिक आणि आभासी जगात वावरणारी लोक हे जास्त बुद्धिमत्ता असणारी असतात मात्र भावनिक बुद्धिमत्ता असलेली लोक वस्तुनिष्ठ जगात वावरतात. जेथे भावना नियंत्रण नाही आणि नुसता भावना आवेग आहे तेथे पश्चाताप, निराशा, बेपरवाई, उपेक्षितता, अविस्कळीतपणा, दुर्लक्ष आणि भावनिक अस्वस्थता निदर्शनास येते. या सर्व गोष्टीचे दूरगामी परिणाम हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतात. हिंसा, कोत्तेपणा , रिक्तपणा, या गोष्टीची वाढ होत राहते.  

       व्यवसाय आणि उद्योग या ठिकाणी व्यवस्थापन कौशल्ये सोबतच तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये अती आवश्यक असतात. ही सर्वच कौशल्ये पूर्णतः अध्ययन बुद्धिमत्तेशी संबधित नसतात तर ते भावनिक बुद्धिमत्तेशी संबधित असतात. त्यामुळे व्यवस्थापन आणि व्यावसायिक कौशल्ये ही भावनिक बुद्धिमत्तेचे क्षेत्र व्यापतात. जेवढे हे क्षेत्र व्यापक आणि समृद्ध असेल तेवढे व्यवसाय आणि उद्योग यात भरभराट होते. वैयक्तिक, कौटुंबिक ,व्यवसायीक, समूह आणि सामाजिक पातळीवर भावनिक बुद्धिमत्ता मानवीय स्वरूप धारण करते त्यामुळे एक सुबत्ता आणि सुरक्षितता निर्माण होवून तुम्ही सर्वच पातळ्यावर यशस्वी होण्यास सुरुवात होता.

    अशा प्रकारे भावनिक बुद्धिमत्ता ही सर्वसमावेक्षक आणि समग्र असून आपण भावनांचे  व्यवस्थापन जाणीव पूर्वक कसे साधतो यावर तिची वाढ अवलंबून असते. भावनिक बुद्धिमत्ता ही तुम्ही तुमच्या भावना, विचार आणि कृती यात समन्वय कसे साधता आणि त्यातून एक स्थिर आणि तेवढेच खंबीर आयुष्य कसे जगता यावर ठरते. भावनिक बुद्धिमत्ता ही आत्मजाणीव आणि आत्मसंयम याच्याशी निगडीत असते. आत्मजाणीव मध्ये आपल्याला नक्की काय हवे आणि काय करायचे याची जाणीव असते तर आत्मसंयम मध्ये आपण भावनांच्या सोबत वाहवत जात नाहीत. समानभूती ही भावनिक बुद्धिमत्तेची कसोटी असते यात आपण समोरच्याच्या पातळीवर जावून विचार करून कृती करतो. भावना, विचार आणि कृती यांचा समन्वय, आत्मजाणीव आणि आत्मसंयम याची वृद्धी आणि समानभूती याच्या आधारे आपण एक साधे,सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करतो.  

जीवन अनमोल आहे! ते अधिक सुंदर बनवूया !

७१/१०१ दिनांक ०४.०७.२०२३

सुखाचा शोध ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७