निर्णय क्षमता वाढवा ! Enhance Decision Making Ability!

                                                                                       निर्णय क्षमता वाढवा ! Enhance Decision Making Ability!

       चांगली आणि उत्तम अशी निर्णय क्षमता ही मानवी जीवन अधिक कार्यशील आणि गतिमान बनवते. काय करावे? आणि काय करू नये? तसेच काय स्वीकारावे? आणि काय स्वीकारू नये? हे आपल्या निर्णय क्षमतेवर अवलंबून असते. आलेली संधी ओळखणे आणि ती संधी निवडायची की नाही या बाबतही निर्णयप्रक्रिया महत्वाची भूमिका पार पाडते. दैनदिन जीवनात तर पदोपदी आणि क्षणाक्षणाला निर्णय घेवून आपल्याला वाटचाल करावी लागते. निर्णय बरोबर आले तर जीवन सुखकर होते आणि निर्णय चुकले तर जीवन दु:खमय होते. साहजीकच निर्णयप्रक्रिया आणि निर्णयक्षमतेला मानवी जीवनात असाधारण महत्व प्राप्त होते. मात्र सर्वांनाच चांगले आणि उत्तम निर्णय घेता येतात असेही नाही. काहींचे निर्णय बहुतांशी बरोबर येतात तर काहींचे निर्णय बर्‍याच वेळा चुकतात. निर्णय घेता येणे आणि तोही अचूक, वेळेत आणि फायदेशीरपणे घेता येणे या मागे अनेक घटक काम करत असतात. निर्णय घेणे ही एकाकी प्रक्रिया नसून ती अनेक गोष्टी आणि बाबी यांचा परिपाक आहे. सबब या सर्व गोष्टी आणि बाबी यांचे संयोजन आणि समन्वय साधावा लागतो आणि त्यातून निर्णय घ्यावा लागतो. प्रस्तुत लेखात निर्णय घेण्यामागे कोणत्या बाबी आणि गोष्टी काम करतात? निर्णय घेण्यात अडथळे कोणते येतात? उचित,अचूक आणि फायदेशीर निर्णय कसा घ्यावा ? अशा अनेक बाबीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.     

         निर्णय क्षमता ही एक बोधात्मक, आकलनात्मक आणि मानसशास्त्रीय संकल्पना असून ती अनेक घटक आणि बाबी यांचा समन्वय, संयोजन आणि समुच्चय होवून तयार होते. आपल्या विविध ज्ञानेंद्रिये मार्फत विविध प्रकारचे माहितीचे आकलन आपल्याला होते. हे झालेले आकलन आणि आपल्या मेंदुमद्धे पूर्वीची साठवलेली माहिती या दोघांच्या आधारे विश्लेषण होवून आपल्या ज्ञानात कायम भर पडत असते, त्यातूनच निर्णय क्षमता तयार होते. दैनदिन जीवनात येणारे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे असलेले ज्ञान, अनुभव, कौशल्ये आणि दृष्टीकोण याच्या आधारे आपण विविध प्रकारचे निर्णय घेत असतो. साहजिकच निर्णय घेता येणे आणि त्याची अंमलबाजवणी करणे हे मानवी विकासास हातभार लावून मानवी जीवन सुसह्य करत असते. मात्र असे असले तरी निर्णय घेताच न येणे किंवा वेळ निघून गेल्यावर निर्णय घेणे ही एक महत्वाची अशी समस्या अनेकांमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. मग ते वैयक्तिक स्तरावर असो कौटुंबिक स्तरावर असो, व्यावसायिक स्तरावर असो किंवा कार्यालयीन स्तरावर असो.

     निर्णय घेता न येणे अथवा वेळ निघून गेल्यावर निर्णय घेणे या मुळे अपयश, अडचणी आणि समस्या याचा सामना करावा लागतो. वैयक्तिक आयुष्यात निर्णय घेता आला नाही, तर त्याचा परिणाम आपल्या स्वत:च्या आयुष्यावर होतो. कौटुंबिक जीवनात निर्णय घेता आला नाही तर त्याचा परिणाम आपल्या नातेविषयक संबध यावर होतो. व्यावसायिक किंवा नोकरीच्या क्षेत्रात निर्णय घेता नाही आला तर त्याचा परिणाम आपल्या करियर वर होतो. दैनंदिन जीवन जगत असताना निर्णय घेता आला नाही किंवा तो जाणीव पूर्वक घेण्याचे टाळले, तर त्याचे दुष्परिणाम तर होतातच, परंतु तुमची छबी जन माणसात खराब होते. निर्णय न घेतला गेल्यामुळे आपली कामे खोळंबतात. इतरांना आपल्या बाबत मनात चीड निर्माण होते. तुम्हाला सहकार्य करण्यास कोणीही पुढे येत नाहीत आणि तुम्ही एकाकी पडता. इतरांचा रोष निर्माण होतो. निर्णय न घेतला गेल्याने एकंदर आपल्या कामकाजात आणि आत्मविश्वासात कमतरता येते. त्यामुळे आपण एका विशिष्ट अशा दृष्टचक्रात सापडते. एकंदर त्याचे परिणाम करियर वर तर होतातच त्याच सोबत मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. यामुळे तुम्ही अधिक चिडचिडे आणि चिंताग्रस्त होत असल्याने कौटुंबिक आणि सामाजिक जीवन सुद्धा अशांत होते.

         आपण सामाजिक व्यवस्थेचे व्यवस्थेचे मूलभूत घटक आहोत. समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून आपली कामे, कर्तव्ये आणि जबाबदारया पार पाडव्या लागतात. साहजिकच कामे, कर्तव्ये आणि जबाबदारया पार पाडत असतानी तुमच्या निर्णय क्षमतेला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते.  निर्णय घेता येणं, ही एकांगी अशी क्रिया आणि प्रक्रिया नसून, ती अनेक गोष्टी आणि बाबी यांचा समन्वय आणि समुच्चय असतो. साहजिकच कामे, कर्तव्ये आणि जबाबदारया पार पाडतांनी अशा अनेक गोष्टीचा स्विकार करणे आणि वापर करणे हे आपली निर्णय क्षमता भक्कम करण्यासाठी आवश्यक ठरते. खालील विविध बाबी आणि गोष्टी या आत्मसाद करून आपली निर्णय प्रक्रिया आणि निर्णय क्षमता ही सुयोग्य,कार्यक्षम आणि जलद बनविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.

१.             सामान्य ज्ञान(General  Knowledge) : आकलन आणि माहिती याचे आत्मसादीकरण  मधून सामान्य ज्ञानाची निर्मिती होते. आपल्या अवती भोवती, तालुक्यात,जिल्ह्यात, राज्यात देशात आणि जगात सामाजिक, राजकीय,आर्थिक, धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादि क्षेत्रात काय घडतय आणि जे घडते त्या मागील कार्यकारण भाव लक्षात घेण म्हणजे  सामान्य ज्ञान होय. जो विषय समोर आहे त्या विषयाचे संपूर्ण आकलन आणि त्या सोबत विषय ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक असते. विषय ज्ञान सोबत कार्यकारणभाव सुद्धा माहीत असावा लागतो. ‘ज्ञान हीच शक्ति असते’ आणि ती आपल्या सोबत असेल तर आत्मविश्वासात वाढ होऊन जलद आणि उचित निर्णय घेणे सोपे आणि सुटसुटीत होते.

२.             अनुभव(Experience) : अनुभव हा आपला खरा गुरु आणि मार्गदर्शक असतो. अनुभवाची शिदोरी अथवा गाठोडे सोबत असेल तर आत्मविश्वास कमालीचा वाढतो. मात्र अनुभव हा फक्त रोजचा दिवस ढकल्याने प्राप्त होत नाही किंवा फक्त महीने किंवा वर्ष व्यतीत केल्याने प्राप्त होत नाही तर त्याला संयमाची, अभ्यासाची, कष्टाची आणि चिकित्सक वृतीची जोड द्यावी लागते. असेही दिसते की काही लोक एकाच विषयात किंवा क्षेत्रात काम करत असतात. मात्र त्याच्या बाहेर ते पडत नसल्याने तो अनुभव काही एक कामाचा राहत नाही. कारण अनुभव हा मल्टि डिसिप्लीन असून एकेरी अनुभवाच्या आधारे ज्ञान आणि कौशल्ये यात कोणतेही भर पडलेली नसते. सहजिकच अनुभव सोबत आपले कुतुहुल आणि समजून घेण्याची आणि शिकून घेण्याची वृती विकसित करावी लागते. अनुभव संपन्नता ही आत्मविश्वास देवून निर्णय क्षमतेत वृद्धी घडून आणते, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. सबब आपला अनुभव कसा विस्तीर्ण आणि बहुआयामी होईल याकडे सदैव लक्ष द्यावे. त्यातूनच निर्णय क्षमता मध्ये वाढ होते.

३.             कौशल्ये(Skills): कौशल्ये ही दोन प्रकारची असतात. एक जीवनविषयक व्यवस्थापन कौशल्ये तर दुसरे कार्यालयीन-व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्ये होय. मात्र दोन्ही कौशल्ये ही परस्पर पूरक अशी असतात. ज्ञान आणि अनुभव यांच्या प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोजनातून ही कौशल्ये आत्मसात होतात. कौशल्ये आत्मसाद करणेसाठी कामकाजात तर विविधता आणावी लागतेच, सोबत व्यवस्थापन पद्धती आणि कामकाज  कमालीचे सुधारावे लागते. मुत्सदेगिरी, जबाबदारी आणि उतरदायित्व ही कौशल्ये तुमच्या ठायी रूजली की निर्णय घेण्यास तुम्ही अजून भक्कम होत असता.

४.               दृष्टीकोण(Attitude) : आपले दैनदिन कामकाज करत असतांना ज्ञान आहे, अनुभव आहे आणि कौशल्ये आहेत मात्र दृष्टीकोण हा नकारात्मक आणि संकुचित असेल तर ‘पालथ्या घड्यावर पाणी’ असे होते. त्या मुळे काम करत असतांनी तुमचा दृष्टीकोण  कसा आहे, याला खूप महत्व प्राप्त होते. दृष्टीकोण हा मात्र तुमच्यावर लगतच्या आयुष्यातील संस्कार, मूल्य आणि नैतिकता याच्याशी निगडीत असतो. त्यामुळे जर तो नकारात्मक असेल तर त्यावर मूलभूत किंवा बेसिक असे काम करावे लागते. यात स्व-परीक्षण, सू-संगत, सू-मार्गदर्शन आणि सू-प्रशिक्षण याची जोड द्यावी लागते. त्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर तुमचा दृष्टीकोण कसा आहे हा महत्वाचा घटक प्रभाव टाकतो.

५.             अंतर वैयक्तिक संबंध(Inter Personnel Relation) : आपल्या कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपला एकूण चार लोकांशी संबध येतो. आपले वरिष्ठ, आपले कनिष्ठ, आपले सहकारी आणि कामकाज निमित्त कार्यालयात येणारे लोक. हे चारही लोक ज्ञान, अनुभव आणि कौशल्ये असलेली असतात. त्यामुळे ‘मला सर्व समजते’ असा आविर्भाव न ठेवता या लोकांकडून सुद्धा काही गोष्टी आत्मसाद करून घेणे अनिवार्य ठरते. तसेच या चारही घटकांशी आपले अंतर वैयक्तिक संबध दृढ असले की, आपल्या निर्णय प्रक्रियेवर सुद्धा याचा प्रभाव पडतो आणि आपण अधिक आत्मविश्वासू पद्धतीने निर्णय घेतो.

६.              संवाद कौशल्ये(Communication Skills): तुमच्या संवादात प्रेमळपणा आणि हळुवारपणा असेल त्याच सोबत तुमचा अचूक आणि योग्य असा संवाद असेल तर लोक तुमच्यापुढे व्यक्त होतात. जेवढी माहिती मुक्त संवाद मधून माहित होईल तेवढी निर्णय प्रक्रिया सुलभ आणि सहज होते. संवाद हा कायम एकतर्फी नसतो तर तो दोन्ही बाजूंनी असतो त्यामुळे संवादात तुम्ही किती पुढे येता तेवढेच समोरचे पुढे येण्याचा प्रयत्न करतात. एकदा संवाद वाढला की निर्णय प्रक्रिया जलद गतीने होते. संवादातून  माहिती आणि अनुभव याचे भंडार खुले होत असल्याने निर्णय प्रक्रियेत अचूकता पण गाठता येते.

७.              प्रेरणा आणि प्रोत्साहन( Motivation & Encouragement):प्रेरणा आणि प्रोत्साहन हे जीवन विषयक वाटचालीत आणि कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. दैनदिन जीवनात अनेक लोक, गोष्टी, बाबी आणि घटना यातून मिळणारे प्रेरणा आणि प्रोत्साहन मागील काही दशकात कमालीचे घसरले आहे. त्यामुळे मागील काही दशकात सामाजिक जीवनात कमालीचे नैराश्य आणि अस्थैर्य अनुभवास येत आहे. निश्चितच या मुळे माणसाच्या निर्णय प्रक्रियेवर दूरगामी परिणाम होत आहेत. कोणतेही काम करणारा घटक हा स्वयं प्रेरित असावा लागतो. मात्र ही स्वयंप्रेरणा कोठे तरी लोप होत असल्याचे दृष्टिक्षेपात येते. स्वयं प्रेरणा ही अंतर्मनातून निर्माण होते. ही प्रेरणा निश्चितच निर्णय क्षमतेत भर घालत असते. स्वयं प्रेरणा निर्माण होणेसाठी मन आणि मेंदू यांना एका सरळ रेषेत आणून सकारात्मक विचार शैली अंगीकारावी लागते.  

८.             अनामिक भीती(antonyms fear) : मी निर्णय घेतला तर तो चुकणार नाही ना?. तो चुकला तर मी अडचणीत येणार नाही ना?, अशा अनेक प्रकारच्या अनामिक भीती जीवनात पाहावयास  मिळतात. त्या मुळे निर्णय घेण्यापेक्षा निर्णय न घेतलेले बरे अशी वृत्ती विकसित झालेली पाहावयास मिळते. तिला छेद देण्यासाठी आत्मविश्वास जागृत करावा लागतो. असा आत्मविश्वास हा फक्त ज्ञान, अनुभव, कौशल्ये यातून तयार होतो. तसेच इतर मित्र, सहकारी आणि आप्तेष्ट यांचे असलेले पाठबळ अशी भीती कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावते.  

९.             लोकांच्या वाढत्या अपेक्षा(People’s rising expectations) : सामाजिक व्यवस्थेमध्ये लोकांच्या अपेक्षा वाढत राहणे हे अपेक्षित असते. साहजिकच लोकांच्या वाढत्या अपेक्षा असल्याने निर्णय प्रक्रिये वर त्याचा प्रतिकूल असा परिणाम झाल्याचे पहावयास मिळते.आपण एका उंचीवर गेलो की लोक आपल्याकडे आशावादी भावनेने पाहू लागतात. हे असे झाले पाहिजे हे तसे झाले पाहिजे असे त्यांना वाटू लागते. साहजिकच याचा दबाव आपल्यावर निर्माण होतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रिये मध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लोकांच्या वाढत्या अपेक्षा आणि आपली क्षमता आणि वस्तुस्थिती याचा मेळ घळण्याचे कौशल्ये अंगी आणावे लागते. हे कौशल्य अंगी आले की निरणी घेणे अधिक सुलभ आणि सुटसुटीत होते.

१०.         वेळ व्यवस्थापन(Time Management): ज्याला वेळेचे गणित जमले त्याला वेळेवर निर्णय घेणे जमते. कामकाजाचे वाढते स्वरूप आणि उपलब्ध असलेला वेळ याचे गणित कायम सोडवावे लागते. जर वेळेचे योग्य व्यवस्थापन झाले तरच निर्णय प्रक्रिया जलद आणि कार्यक्षमपणाने होते. यासाठी वेळेवर काम सुरू करणे, कामाचे उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे नियोजन करणे, कामांची महत्वाचे आणि अत्यावश्यक अशी वर्गवारी करणे , तसेच ८०/२० चा नियम वापरुन कामकाजाची उत्पादकता वाढवणे आवश्यक ठरते. त्या साठी नियोजनबद्धता आणि शिस्तबद्धता कामकाजात आणावी लागते.  

११.         प्राथमिकता व्यवस्थापन(Priority Management) : कोणते काम आधी करावे आणि कोणते काम नंतर करावे. कोणते काम आज करावे आणि कोणते काम उद्या करावे याचा काहीही ताळमेळ नसतो. जे पुढे येईल असे काम हातात घ्यायचे असा एक पायंडा पडलेला दिसून येतो. त्यामुळे ज्या कामाचा पाठपुरावा होत नाही ते काम निर्णय प्रक्रियेत मागे पडून जाते. अनेक कामे मागे पडून प्रलंबित कामांचा एक डोंगर तर होतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही वेळखावू होते आणि इतरांचा रोष तयार होतो. साहजिकच प्राथमिकता व्यवस्थापन मध्ये कामकाजाचे अ,ब,क,ड असे वर्गीकरण करावे लागते. तसेच निर्णय प्रक्रियेचे सुद्धा विकेंद्रीकरण करावे लागते.  

   या जलद आणि धावपळीच्या जगात निर्णय प्रक्रिया आणि निर्णय क्षमतेला खूप महत्व प्राप्त झाले आहे. साहजिकच निर्णय प्रक्रिया ही एकांगी प्रक्रिया नसून अनेक गोष्टी आणि बाबी यांचा समन्वय आणि समुच्चय आहे. निर्णय क्षमता ही अचूक, भक्कम आणि जलद होण्यासाठी  सामान्य ज्ञान, अनुभव, कौशल्ये, दृष्टीकोण, अंतर वैयक्तिक संबंध, संवाद कौशल्ये, प्रेरणा-  प्रोत्साहन, अनामिक भीती, लोकांच्या वाढत्या अपेक्षा, वेळ व्यवस्थापन आणि प्राथमिकता व्यवस्थापन या किंवा त्यापेक्षा अधिक घटक आणि बाबी यावर जाणीवपूर्वक कामकाज करावे लागते.निर्णय क्षमता ही प्रक्रिया ही जेवढी अचूक, भक्कम आणि जलद तेवढी यशाची आणि विकासाची हमी मिळते आणि तुम्ही एक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करता.

जीवन अनमोल आहे! ते अधिक सुंदर बनवूया !

६८/१०१ दिनांक २२.०६.२०२३

सुखाचा शोध ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७