तुमचे अस्तित्व समजून घ्या! Understand Your Existence!

तुमचे अस्तित्व समजून घ्या! Understand Your Existence!

     विश्व ही एक अथांग पोकळी असून ती आकारहिन आहे. तिचा उगम नाही आणि शेवट पण नाही. ती कोठून सुरू होते आणि कोठे संपते हे पण माहीत नाही. जे काही आहे ते आहे आणि जे काही घडते ते घडते. जे काही आहे आणि जे काही घडते ते या पोकळीत अस्तित्व दाखवते. साहजिकच विश्वाच्या अफाट पसार्‍यात आपले अस्तित्व अतिसूक्ष्म बिंदुरूप आणि आणि तितकेच क्षणभंगुर असे आहे. असे असले तरी बरेच लोक आपण खूप महत्वाचे आणि मोठे आहोत आणि जे काही घडत आहे ते आपल्यामुळेच घडत आहे, असा स्वत:चा समज आणि इतरांचा गैरसमज करुन देत असतात. आपले अस्तित्वच आपण चुकीच्या पद्धतीने समजून आणि उमजून घेत असल्याने अनेक अडचणी आणि समस्या निर्माण होतात. अस्तित्व समजून घेणे म्हणजे काय तर या भौतिक-अभौतिक, ज्ञात-अज्ञात, सजीव-निर्जीव गोष्टीने बनलेल्या विश्वात तुमचे स्वत:चे अस्तित्व शोधून त्याची निश्चिती करणे होय. प्रस्तुत लेखात आपण कोण आहोत? आपला जन्म का झाला? आपले कर्तव्ये काय आहे? आपले अस्तित्व कसे आहे? आपले अस्तित्व किती आहे? आपले अस्तित्व कसे समजून घ्यावे ? आपले अस्तित्व अर्थपूर्ण कसे बनवावे? यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ज्ञात माहिती प्रमाणे या विश्वात असंख्य आकाशगंगा आहेत. या प्रत्येक आकाशगंगेमध्ये असंख्य तारे किंवा सूर्य आहेत. या अनेक सूर्याच्या अनेक सूर्यमाला आहेत आणि या सूर्यमाला मध्ये गुंफलेले ग्रह आहेत. आपली आकाशगंगेचे नाव मिल्की वे असे आहे. तिच्यात असंख्य असे तारे आहेत. या पैकी सूर्य हा तारा असून त्याच्या भोवती एकूण आठ ग्रह फिरतात त्यातील पृथ्वी हा जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. विश्वाच्या या अफाट पसार्‍यात ज्ञात माहिती प्रमाणे फक्त पृथ्वी या ग्रहावर जीवसृष्टी आपले अस्तित्व टिकवून आहे. जीवसृष्टी मध्ये ढोबळमानाने प्राणी, पक्षी, कीटक, जिवाणू, विषाणू, परजीवी अशा असंख्य जीवांचा समावेश होतो. हे सर्व जीव एकमेकांशी जीवन साखळीने(Life Cycle)गुंफलेले आहेत. एक जीव हा दुसर्‍या जीवावरच अवलंबून असल्याचे या जीवन साखळीत दिसून येते. म्हणजे वाघ हरिणला खातो, हरिण वनस्पती खातात, वनस्पती जिवाणू पासून कुजलेला पालापाचोळो यातून खनिजद्रवे घेतात. एकंदर ही जीवन साखळी निरंतर चालू असते. असे असले तरी मानव सोडून इतर कोणताही जीव जीवन साखळीचा चक्रव्यूह भेदू शकलेला नाही. मानवाने म्हणजे होमो सपियन या शहाण्या माणसाने याने मागील एक लाख वर्षात या जीवन साखळीत मध्यभागी असणारे त्याचे स्थान त्याच्या उच्च अशा आकलन शक्ति आणि अगम्य अशा बुद्धीच्या जोरावर शीर्ष किंवा उंच स्थानावर नेले आहे.

हे उच्च स्थान त्याने मागील एक लाख वर्षाच्या अथक प्रयत्न आणि परिश्रम याद्वारे मिळविले असले तरी ते टिकविण्यासाठी त्याला कायम संघर्ष करावा लागला आहे. हा संघर्ष सर्वप्रथम सृष्टीतील इतर जीव जंतु सोबत करावा लागतो. त्यानंतर इतर प्रदेशातील मानव यांच्याशी करावा लागतो. त्यानंतर आपले आप्त स्वकीय यांच्याशी करावा लागतो आणि शेवटी त्याचा संघर्ष त्याच्या स्वत:शी असतो. स्वतशी संघर्ष म्हणजे भावना आणि विचार यातील संघर्ष, आपला मेंदू आणि मन यातील संघर्ष आणि आपले सचेतन आणि अचेतन मन यातील संघर्ष. हा संघर्ष सर्वात आधी आपल्याला जिंकावा लागतो. जर आपण हा संघर्ष जिंकला तरच इतर संघर्षाला आपण योग्य प्रकारे सामोरे जावू शकतो. मात्र या साठी अगोदर आपल्याला आपण कोण आहोत? आणि आपले अस्तित्व काय आहे? हे पडताळून पहावे लागते.

आपण कोण आहोत याची सुरुवात अगदी लहान वयापासून होते. ज्या वेळी आपल्याला कळायला लागते त्या वेळी आपण रडून आपला प्रतिसाद नाकारात्मक आहे असे दर्शवतो. रडण्यातून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपल्या हसण्यातून आपला प्रतिसाद सकारात्मक आहे हे समोरच्याला कळायला लागते. बालवयात आपण हट्टी होतो आणि आपल्या शाब्दिक आणि अशाब्दिक संवादातून आपण इतरांचे लक्ष वेधून घेतो. कुमार वयात आपल्याला काय हवे आणि काय नको याची पूर्ण समज विकसित झालेली असते आणि आपण आपले बरेचसे निर्णय स्वत: घेण्याचा प्रयत्न सुरू करतो. हे कुमार वय यामुळेच संवेदनशील बनते कारण या वयातच आपण आपले अस्तित्व निश्चित करण्यास सुरुवात करतो.जर आपल्या अस्तित्वाला कोणी धक्का लावत असेल तर आपल्या भावना उफाळून येतात आणि आपण संघर्ष करण्यास तयार होतो. त्यामुळे हे वय तेवढे संवेदनशील आणि नाजुक असे असते तेवढेच आपल्या शारीरिक मानसिक आणि भावनिक विकासाचे असते. या वयात फुलाच्या कळीला जसे आपण जपतो अगदी त्या प्रमाणे जपावे लागते. न खूप प्रेम करावे न खूप राग करावा अशी ही परिस्थिती असते. त्या नंतर मात्र तरुण वयात आपले अस्तित्व पक्के झालेले असते, मात्र भविष्यात उभे राहण्याची आणि टिकून राहण्याची चिंता पदोपदी पुढे उभी राहत असते. अशा वेळी आपल्या अस्तित्वाला कष्टाची आणि परिश्रमची जोड द्यावी लागते तेंव्हा कोठे आयुष्याला बहर येतो. आपल्या विचारांना संयम आणि चिकाटी याचा मुलामा तर कायम द्यावा लागतो तरच एक भक्कम असे अस्तित्व आणि आयुष्य उभे राहते.

कष्ट, परिश्रम, संयम, चिकाटी आणि पाठबळ यातून अनेक जण एक ठराविक ऊंची गाठतात. एकदा ही ऊंची गाठली की त्यांना त्या उंचीवरून इतर सर्व लोक हीन,निम्न, नीच, निष्कृष्ट वाटायला सुरुवात होते. आपण म्हणजेच जग आहे आणि आपण म्हणजेच सर्व आहे, असा अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण होतो. त्यांचे पाय जमिनीवर न राहता वर येतात. जसे बैलगाडी खालून कुत्रा चालत असतो आणि त्या कुत्र्याला बैलगाडी आपणच ओढत आहोत असे वाटते तसे एकंदर या ऊंची गाठलेल्या लोकांना वाटायला सुरू होते. आत्मविश्वासाची जागा जेंव्हा मद, मोह, मत्सर, लोभ, तिरस्कार आणि अहंकार हे षड्रिपू घेतात त्यावेळी असे व्यक्तिमत्व निर्माण होते. आपले अस्तित्व हे उंच, मोठे आणि इतरांपेक्षा वेगळे आहे असा गैरसमज निर्माण झाला की हा व्यक्तिमत्वाचा दोष निर्माण होतो. हा दोष निर्माण झाला की लोक तुमची खोटी स्तुती करून अजून तुमच्या पासून त्यांचा फायदा करून घेतात. वाईट लोक तुमचे मित्र होतात आणि चांगले लोक तुमच्या पासून दूर जातात. तुमच्या समोर लोक एक बोलतात आणि पाठीमागे दुसर बोलतात. लोक अधिक स्वार्थी होऊन त्यांचा हेतु साध्य करण्यासाठी पुढे सरसावतात. सर्व काही छान आणि फील गुड घडत असल्याने तुम्ही काय करताय, कसे वागताय हे तुम्हाला कळत नाही. कालांतराने एक दिवस असा येतो की तुमचे अस्तित्व हळू हळू लोप पावून तुम्ही बाजूला फेकून दिले जावून जग पुढे वाटचाल करायला सुरुवात करते. तुम्ही कितीही आक्रोश केला तरी विश्वाच्या या अफाट पसार्‍यात तुमचा आक्रोश शून्यवत होवून जातो.

साहजिकच विश्वाच्या हा अफाट अशा पोकळीत आपले अस्तित्व तपासायला गेल्यास असे दिसून येते की विश्वाची निर्मिती ही १३८० कोटी वर्षापूर्वी झाली तर पृथ्वीची निर्मिती ४५४ कोटी वर्षापूर्वी झाली आहे. पृथ्वीवर जीवसृष्टि अस्तित्वात येवून ३७० कोटी वर्ष तर रानटी माणसाची निर्मिती होवून १५ लाख वर्ष तर शहाणा माणूस निर्मिती होवून १.५० लाख वर्ष झाली आहेत. जर हा कालावधी आणि मनुष्य प्राण्याचा जगण्याचा कालावधी याची तुलना केली तर हा कालावधी अति सूक्ष्म असा येतो. संपूर्ण पृथ्वीचे क्षेत्र हे ५०.९६ कोटी चौरस किलोमीटर तर उपलब्ध जमिनीचे क्षेत्र १४.८६ कोटी चौरस किलोमीटर आहे. हेक्टर मध्ये १४८६० कोटी हेक्टर जमीन पृथ्वीवर उपलब्ध आहे आणि भारताच्या बाबतीत ३२.८७ कोटी चौरस किलोमीटर जमीन उपलब्ध (३२८७ कोटी हेक्टर) आहे. तसे पहिले तर फक्त २ चौरस मीटर जागा आपल्याला लागते. आजची लोकसंख्या ही ७८८ कोटी आहे तर भारताची लोकसंख्या १४४ कोटी आहे. म्हणजे ७८८ कोटी पैकी आपण एक आहोत. असे मानले जाते की आज पर्यंत ११५०० कोटी लोक जन्माला येवून मृत्यू पावले आहेत. म्हणजे आपणही लवकरच मृत्यू पावल्यानंतर ११,५००,००,००,००१ यात समाविष्ट होणार आहोत.एकंदर क्षेत्र आणि लोकसंख्या याच्याशी तुलना करता तुमचे अस्तित्व अत्यंत सूक्ष्म असे होवून जाते. जगातील सर्व सजीवांचे बायोमास हे ६०० अब्ज टन आहे. बायोमास म्हणजे जैव वस्तुमान होय. त्यापैकी माणूस प्राण्यांचे एकत्रित बायोमास हे ०.०१ टक्के आहे. यावरून तुम्हाला सृष्टीच्या या अफाट पसार्‍यात तुमच्या अस्तित्वाचा अंदाज अजून स्पष्ट होवू शकेल.

उपरोक्त सर्व विवेंचन तपासले असता आपण आपले अस्तित्व उच्च, मोठे, विशाल आणि अवाढव्य करण्याचा आपण नाहक प्रयत्न करत असतो. जे आहे आणि जी वस्तुस्थिती आहे त्या पेक्षा आपण मोठे होण्याचा आणि दाखविण्याचा प्रयत्न करतो. आपले अस्तित्व नाहक मोठे केल्याने अनेक नकारात्मक लहरी आपल्यावर येवून आदळत असतात. दु:खाचे चटके अधिक प्रमाणात आपल्याला बसायला सुरुवात होते. इतरांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढत असल्याने आणि त्या अपेक्षा इश्चा असूनही पूर्ण होत नसल्याने सर्वदूर अशी नाराजी निर्माण होते. आपले अस्तित्व मोठे आणि उच्च झाल्याने अनेक स्वार्थी आणि लबाड लोक दुखावले जावून ते कट कारस्थान रचण्यास प्रवृत होतात. आपले अस्तित्व मोठे केले की इतरांच्या नजरा आपल्याकडे वळतात आणि आपल्यावर पाळत ठेवण्यास प्रारंभ केला जातो. अस्तित्व मोठे झाल्याने इतरांच्या पोटात दुखायला सुरवात होते. आपले अस्तित्व हळू हळू दुसर्‍याच्या डोळ्यात खुपायाला सुरुवात होते. एकंदर या सर्व बाबी, गोष्टी आणि घटना घडायला सुरुवात झाल्याने आपली अधोगती सुरू होण्यास सुरुवात होते.

सबब आपण कोण आहोत आणि आपले अस्तित्व काय आहे याची वस्तुनिष्ठ तपासणी आपण वेळोवेळी करावी लागते. आपण जे आहोत आणि जसे आहोत तेच समोर ठेवावे लागते. लोक वेडे नाहीत आणि लोक सर्व समजत असतात हा विचार समोर करावा लागतो. मुंगी होवून साखर खावी लागते आणि शब्दात गोडवा आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. आपले राहणीमान आणि आपले वागणे हे आपल्या खर्‍या अस्तित्वाला साजेसे ठेवावे लागते. तसेच हळू हळू मद, मोह,मत्सर, लोभ, तिरस्कार आणि अहंकार या षड्रिपुंचा त्याग करावा लागतो.जे काही चालले आहे आणि जे काही घडत आहे त्यासाठी आपण फक्त निमित्तमात्र आहोत हे समजून घ्यावे लागते. आपल्यावाचून जग थांबणार नाही आणि आपला जीवन प्रवास हा काही घटकेचा आहे हे वेळोवेळी समजून उमजून घ्यायला हवे. आपल्याला या सृष्टीमध्ये माणूस प्राणी म्हणून जगायला मिळाले या बाबत आपण निसर्गाप्रती आणि सृष्टीप्रती कायम कृतज्ञ आणि नतमस्तक राहायला हवे. आपला जन्म आणि आपले अस्तित्व हे अधिक जबाबदार करून ही सृष्टी आणि जग अजून सुंदर कसे बनवता येईल हा विचार आपल्या मनात आणि ध्यानात ठेवून आपण कार्ये आणि कृती करायला हवी. जग सुंदर आणि छान झाले की आपलेही अस्तित्व अधिक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी होते.

जीवन अनमोल आहे. ते अधिक सुंदर बनवूया.

६८/१०१ दिनांक १७.०६.२०२३

सुखाचा शोध ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७