संयम वाढवा आणि संघर्ष टाळा ! Increase Patience & Avoid Conflict!

                                             संयम वाढवा आणि संघर्ष टाळा ! Increase #Patience & Avoid #Conflict!
 
मानवी विचार आणि भावना यातून कृती किंवा प्रतिक्रिया तयार होते. आपली कृती किंवा प्रतिक्रिया ही चांगली किंवा वाईट आणि योग्य किंवा अयोग्य असू शकते. मात्र प्रत्येक वेळी कृती करणे किंवा प्रतिक्रिया देणे आवश्यकच आहे असे नसते. अनावश्यक अशी कृती करणे किंवा गरज नसताना प्रतिक्रिया देणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक बाब कायम काम करते ती म्हणजे संयम होय. संयम ही बुद्धीने भावनेला किंवा मेंदूने मनाला घातलेली साद असते. आता ही साद किंवा आदेश मनाने किवा भावनेने मानायचा की न मानायचा यावर संयम अवलंबून असतो. विचार आणि भावना ह्या वाहत्या नदीच्या प्रवाह सारख्या असतात त्याला योग्य वेळी संयमाचे बांध घालावे लागतात. संयम अंगी असेल तर योग्य विचारा अंती निर्णय घेता येतो. संयम असेल तर वाद आणि संघर्ष टाळता येतात. संयम असेल तर कोणत्याही संकटातुन बाहेर पडता येते. संयम असेल तर कोणतेही कार्य तडीस नेता येते. प्रस्तुत लेखात आपण संयम म्हणजे काय? संयम का आवश्यक आहे ? तो कसा उत्पन्न करावा? संयम मुळे काय फलित मिळते ? आणि इतर संबधित बाबीवर प्रकाश टाकणार आहेत.
 
फार पूर्वीची गोष्ट आहे. कॉलेज मध्ये असताना काही मित्र हे उगाच लहान सहान गोष्टी वरुन चिडविणे, वाद घालणे, धक्का मारणे, मस्करी करणे यात कायम व्यस्त राहत असत. त्यांची ही व्यस्तता अनेक जणांना त्रासदायक ठरत असे. त्यामुळे अनेक वेळा यातून खटके उडणे आणि परिस्थिती भांडणा पर्यंत जाणे या गोष्टी सर्रास घडत असत. मात्र या वेळी आमच्या सारख्या ज्या मित्रांनी संयम दाखवला तोच संयम आमची डळमळीत नाव इथपर्यंत घेवून आला.वास्तविक संघर्ष कायम करत राहिल्याने ऊर्जेचा अनावश्यक असा ऱ्हास होतो हे जेवढे लवकर उमजेल तेवढी लवकर ही ऊर्जा आपल्या उज्वल अशा भवितव्याची निर्मिती साठी वापरता येते. बर्याच वेळा आपण आपला संयम हरवून बसत असल्याने आपली ऊर्जा अनावश्यक अशा ठिकाणी वापरली जावून आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात जर संयम सोडून संघर्षाची साथ दिली तर अभ्यासासाठी उपलब्ध होणारा वेळ संघर्षात वाया जाऊन आणि पदरी अपयश येते हे पुन्हा सांगायला नको. त्या मुळे संयमाचे बाध संघर्षाचे पाणी बाजूंनी काढून देवून आपला प्रवाह संथ रीतीने मार्गस्थ करतात हे लक्षात घ्यायला हवे.
 
आजच्या धावपळीच्या आणि गतिमान जगात संयम हा लोप पावत चालला आहे. भर चौकात सिग्नल तोडणारी माणसं आणि रांगेत उभे न राहता प्रवेश करणारी माणसं हे आपले अवती भोवती घडणारे आणि निदर्शनास येणारे जीवंत असे उदाहरण आहे. मी महत्वाचा आहे आणि माझे काम महत्वाचे आहे यामुळे कायम संयमाची अवहेलना केली जाते. संयम नसला की एक आततायीपणा आणि हिंसकपणा निर्माण होवून चुकीची क्रिया आणि प्रतिक्रिया दिली जाते. लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत संयम हळू हळू लोप पावून त्याची जागा उतावीळपणा घेत आहे. यातून अनेक समस्या निर्माण झाल्याचे पहावयास मिळते.कोणतीही गोष्ट आणि बाब ही शॉर्टकट मार्गाने आणि चुकीच्या पद्धतीने मिळवण्यासाठी आज प्रत्येक जण आतुर आहे या मागे संयमाचा असणारा अभाव हेच मुख्य कारण आहे.आज कोणालाही थांबण्याची आणि वाट पाहण्याची सवय आणि शक्ती राहिली नाही त्यातूनच गळेकापू स्पर्धा निर्माण होत आहे.एखांद्या व्यक्तीवर प्रेम जडले तर तिने लगेच होकार द्यायला हवा, रस्त्यावर गाडीचा धक्का लागला तर लगेच हात उचलला जाणे आणि कोणी रागावले तर लगेच प्रतिक्रिया देणे ही संयमाचा अभाव असल्याची लक्षणे आहेत.
 
संयम हा मेंदू मधून निघणारा आणि भावनांना व्यसन घालणारा एक विचार आहे. की ज्याची दोरी कायम मेंदू मधील बुद्धीचे आणि विवेकाचे केंद्र घट्ट पकडून असते. ज्या वेळी ही घट्ट पकडलेली दोरी ढिल्ली होते अथवा सोडून दिली जाते तेंव्हा संयमाचे बांध फुटू लागतात आणि ते भावनाचा पुर निर्माण करतात. भावनाचा पुर आला की आपण काय कृती करतोय आणि कसा प्रतिसाद देतोय यावर आपले नियंत्रण राहत नाही. संयम हा मानवी मेंदूचा एक हुंकार आहे की जो आपल्याला पुढे चुकीच्या दिशेने जाण्यापासून रोखत असतो. संयम हा एक पर्याय म्हणून काम करतो की जो काय करावे आणि काय नाही करावे याचा वस्तूपाठ घालून देतो. संयमाची लगाम चौफेर धावणार्या विचारांना आणि भावनांना वेसण घालते. संयम हा मानवाला मानवीपण देतो सोबतच माणुसकीच्या भिंती अजून भक्कम करतो. जेथे संयम नांदतो तेथे सुबत्ता आणि वैभव नांदते कारण संयम हा अनेक अडथळे दूर करतो. परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी संयम हा रामबाण औषध म्हणून काम करतो.
 
संयम हा आपोआप उत्पन्न होत नाही तर त्या साठी आपले व्यक्तिमत्वावर काम करावे लागते. यात शंका नाही की काही गोष्टी आणि बाबी ह्या आपल्या आनुवंशिक आणि अंगभूत असतात. मात्र ज्या वातावरणात आपण लहानाचे मोठे होतो त्याचा प्रभाव कायम आपल्यावर राहतो.साहजिकच संयम हा हळू हळू आपल्या व्यक्तिमत्वात अंतर्भूत करावा लागतो. त्या साठी विचारांची पातळी ही अधिक व्यावहारिक आणि भावनांचे बंध घट्ट करावे लागतात. विचारांना व्यापक स्वरूप दिले की भावनांचा बांध लगेच फुटत नाही.भावनांना घट्ट दाबून ठेवल्याने संयम निर्माण होतो असे अजिबात नाही. कारण संयम ही एक कृती आणि प्रतिक्रिया आहे. मग ती आतल्या आत असो किंवा बाहेर असो. संयम म्हणजे भावना दाबून ठेवणे नाही तर भावनांना समपातळीत आणून शांत करणे होय.
 
मुले ऐकत नाहीत म्हणून राग येतो किंवा वाईट वाटते. राग अनावर झाला तर आपला संयम तुटतो आणि आपण मुलांना एकतर बोलतो किंवा मारतो.साहजिकच बोलणे आणि मारणे की राग तीव्रतेने व्यक्त करण्याची प्रतिक्रिया आहे. म्हणजे भावनेची प्रतिक्रिया एका ठराविक पातळीच्या पुढे गेली की आपण संयम तुटला असे म्हणतो. वडील राजू आणि संजू याना आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर घेऊन गेले तर संजू अगदी उतावीळ होईल आणि राजू मात्र शांत राहील. म्हणजे आपण असे म्हणू की राजू मध्ये जास्त संयम आहे आणि संजू मध्ये अजिबात संयम नाही. म्हणजे संजू चा संयम का तुटला तर त्या मागे त्याच्या आवडी आणि निवडी काम करतात. जे आवडते ते लवकर आणि आधी मिळावे या प्रमाणे विचार होऊन त्यातून कृती तयार होते.संयमाचे पाठ हे लहान वयातच मुलांवर बिंबवावे लागतात.मुलांनी काही मागितले तर त्यांना ते लगेच न देता त्याना संयम कसा ठेवावा याची जाण करून देऊन काही दिवसांनी त्यांना ते दयावे.संयम हा लहान वयातच रुजतो आणि वाढतो त्या साठी पालकांची भूमिका मध्यवर्ती रहाते.तरुण वयात संयम कमी होण्यामागे अनेक बाबी आणि घटक कार्यरत असतात मात्र मूल्ये आणि नैतिकता याचे संस्कार या वयात झाले असतील तर संयम वाढण्यास मदत होते.संयम वाढविण्यासाठी खेळ खेळणे, व्यायाम करणे आणि छंद जोपासणे हे पण प्रभावी ठरते. तसेच योग्य, प्राणायाम आणि ध्यानधारणा याचा स्विकार करून आपल्या संयमाची पातळी वाढवता येते.इतरांशी चर्चा आणि विचार विनिमय या आधारे सुद्धा संयम साधता येतो.
 
अशा प्रकारे जगतगुरू संत तुकाराम यांचा अभंग ‘ तुका म्हणे धीराI वीण कैसा होतो हिरा II विचारात घ्यावा लागतो. याचा असा अर्थबोध होतो की,जीवनात धीर, संयम धरल्यास हि-याप्रमाणे मोल प्राप्त होते.अगदी त्या प्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात आपण संयमाला उच्च असे स्थान दिले पाहिजे.एखादी घटना, बाब आणि गोष्ट यावर लगेच क्रिया आणि प्रतिक्रिया न देता सावधपणे आणि काळजीपूर्वक संयमाने ही बाब हाताळली पाहिजे.संयम अंगी ठेवला तर नाते संबंध आणि अंतरवैयक्तिक संबंध सुद्धा खराब होत नाहीत.संयमाने घेतल्यास संघर्ष उत्पन्न होत नाही.संयमाची साथ धरली की यशाकडे हळुवार मार्गक्रमण करून यशस्वी होता येते.आक्रमकतेपेक्षा आणि संघर्षापेक्षा संयमाचा स्विकार करणे कधीही फायदेशीर ठरून तुम्ही एक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करता.
 
जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया
६७/१०१ दिनांक १२.०६.२०२३
सुखाच्या शोधात ©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७