आम्ही एवढे स्वार्थी व संकुचित का होत आहोत !Why we are becoming so selfish and narrow-minded day by day!

आम्ही एवढे स्वार्थी व संकुचित का होत आहोत !
𝐖𝐡𝐲 𝐰𝐞 𝐚𝐫𝐞 𝐛𝐞𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐬𝐨 𝐬𝐞𝐥𝐟𝐢𝐬𝐡 𝐚𝐧𝐝 𝐧𝐚𝐫𝐫𝐨𝐰-𝐦𝐢𝐧𝐝𝐞𝐝 𝐝𝐚𝐲 𝐛𝐲 𝐝𝐚𝐲!

कणीसाला जेंव्हा दोन दाणे नव्हते आणि जेंव्हा एक वेळेच्या जेवणाची भ्रांत होती; तेंव्हाही आम्ही एवढे स्वार्थी आणि संकुचित नव्हतो. पण आता धान्याची कोठारे तुडुंब भरलेली आहेत आणि आम्ही मनाने रिक्त झालो आहोत. पोटातूनही तृप्तिचे ढेकर बाहेर पडत आहेत आणि आमचे आत्मे आतृप्त झाले आहेत. सर्वकाही असूनही स्वतःला गर्दीत शोधणारे आपण, एवढे स्वार्थी व संकुचित कसे आणि केंव्हा झालो हे आपल्याला कळलेच नाही.

लोकांची उत्पादकता, उत्पादनक्षमता, त्यातून होणार देशाचा विकास आणि त्यातून झिरपणारे फायदे हे सर्वदूर व सर्वसमावेशक असतात. जर सर्वत्र आणि सर्वच लोक हळूहळू स्वार्थी व संकुचित होत गेले की हे फायदे सर्वदूर झिरपत नसल्याने सामाजिक व आर्थिक पातळीवर एक नकारात्मकता व निरुत्साह तयार होत असतो. एकंदरच सध्याचा कोरोना महामारीचा उद्रेक आणि इतर अनेक प्रासंगिक कारणांमुळे निर्माण झालेली स्वार्थी विचार व संकुचित भावना या मुळे समाजाचे एकाच बाजूला धुर्विकरण झालेले दिसून येत आहे.अशी ही स्वार्थी विचार व संकुचित भावना ही फक्त वैयक्तीक पातळीवरच नाही तर सार्वजनिक पातळीवर सुद्धा आपल्याला प्रकर्षाने पाहायला व अनुभवायला मिळत आहे. परस्पर सहकार्य व एकमेकाना मदत हळू हळू दुरापस्त होतेय, अशी एकंदर परिस्थिति निर्माण झाली आहे.

सामाजिक शास्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मानवी जीवनाची सुरवात आणि शेवट हा मानवी समूह ,त्यातील परस्पर सहकार्य व एकमेकाना मदत याचेशी निगडीत आहे. जेथे ‘मानवी समूह’ हा विचार सोडून ‘एकटा’ हा विचार रूजेल व वाढेल त्या क्षणाला मानवाची वाटचाल त्याच्या शेवटाकडे होतांना आपल्याला दिसेल. जो एकटा कधी राहिलाच नाही आणि जो एकटा कधी जगलाच नाही तो ज्या दिवशी एकटा पडेल त्या दिवसापासून त्याचा नाश सुरू होईल हे एक अटळ असे सत्य आहे .

साहजिकच मानवी जीवन, त्याचा समुह , परस्पर सहकार्य आणि एकमेकांना मदत आणि त्यातून समाजाची, राष्ट्राची आणि जागतिक मानवी समूहाची वाटचाल होणे ही काळाची गरज आहे. या लेखात त्या अनुषंगाने आम्ही एवढे स्वार्थी व संकुचित का होत आहोत? याची कारणमीमांसा आपण करणार आहोत. तसेच हा स्वार्थीपणा व संकुचित वृत्ती का व कशी त्याग करायची याबाबतचे विवेंचनही आपण करणार आहोत .

बाळ जेंव्हा जन्माला येते तेंव्हा ते आपल्या आईच्या कुशीत वाढते पुढे काही दिवस आईच त्याचे पालन पोषण करते. त्यानंतर बाळाचे वडील आणि कुटुंबातील सदस्य त्याचे पालन पोषण सुरू करतात आणि बाळ कुटुंबात हळूहळू वाढू लागते. अजून बाळ मोठे झाले की नातेवाईक ,आप्तेष्ट आणि मित्रमंडळी हेसुद्धा बाळाच्या शारीरिक , मानसिक व सामाजिक वाढीस आपल्या परीने हातभार लावतात . पुढे या बाळाच्या आयुष्याला त्याचे मित्र, शिक्षक आणि मार्गदर्शक सहकारी दिशा देतात आणि देशाचा एक जबाबदार नागरिक तयार होतो. तात्पर्य हेच की एक जबाबदार नागरिक म्हणून तयार होण्यासाठी किमान हजारो हात आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आणि कळत-नकळत आपल्याला लागलेले असतात. अजून विस्ताराने सांगायचे झाल्यास या हजारो हातांनी आपल्याला घडवलेले असते. असे असतांनाही आपण आयुष्याच्या एका ठराविक मुक्काम वर पोहचल्यानंतर या सर्वांना जाणीवपूर्वक विसरून जातो आणि फक्त स्वत:चा विचार करून स्वार्थी व संकुचित होतो .

स्वार्थ हा वैयक्तिक असतो, कौटुंबिक असतो आणि सामाजिकही असू शकतो. जितके आपण संकुचित व स्वार्थी होतो तितका आपला विकास थांबतो हे वाचक मित्रांनी लक्षात घ्यावे. एखादं काम पुढे घेवून जाण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने आपल्या संपर्कात आलेल्या मानव समूहाचे अनेक सकारात्मक तरंग लहरी (Positive Vibes) आपल्याला मदत करत असतात . याउलट आपण स्वार्थी व संकुचित होतो तेंव्हा या लहरींची मदत आपल्याला मिळत नाही. कधी कधी आपल्या स्वार्थी विचार व संकुचित वागण्याने लोक एवढे दुखावले जातात की ते जाणीवपूर्वक तुमच्याबद्दल नकारात्मक तरंग लहरी(Negetive Vibes) तयार करतात. साहजिकच तुमच्या कामामध्ये यामुळे अडथळे व अडचणी येतात आणि कधी कधी तुम्ही अपयशी सुद्धा होता.

कुटुंब ,समाज व देश याची उत्पादन आणि उत्पादक क्षमता सुद्धा ही परस्पर सहकार्य व एकमेकांना मदत यावर अवलंबून असते. ज्या राष्ट्रात आणि ज्या समाजात लोक अति स्वार्थी आणि संकुचित होतात ,तो देश आणि तो समाज अनुत्पादकेतेकडे आणि अविकसितपणाकडे वाटचाल करू लागतो.

या भयानक आशा संकटातून म्हणजे स्वार्थी विचार व संकुचित भावना यातून बाहेर पडायचे असेल तर संत ज्ञानेश्वर यांनी दिलेला संदेश, हे विश्वची माझे घर | ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर | आपणची जाहला || आपल्याला समजून उमजून घ्यावा लागेल . एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे आपण आपले काम व कार्य व्यापक करायला हवे.जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा॥ या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती मदत आपण करायला हवी.

आपला स्वार्थी वागणे व संकुचित विचार हा आपल्यालाच घेवून डुबणार आहे हे समजून घ्यायला हवे. यश प्राप्ती साठी अथवा यशस्वी होण्यासाठी कष्ट, परिश्रम आणि मेहनत याशिवाय एक महत्वाचा स्पार्क आवश्यक असतो आणि तो फक्त आपल्या सभोवताली वावरणार्‍या माणसांकडून तयार होणाऱ्या सकारात्मक लहरी व तरंग यातून येत असतो हे लक्षात ठेवूनच आपले वागणे सर्वव्यापी व विचार व्यापक करा .

एकदा तुम्ही स्वार्थी व संकुचित भावना व विचार याचा त्याग केला की, “की इतनी शिद्दत से तुझे पाने की कोशिश की है! कि हर जर्रे ने तुझे मुझसे मिलाने की साजिश की है.”!! या प्रमाणे तुम्ही जी गोष्ट ठरवाल ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी सृष्टी मधील सर्व शक्ति एकवटून तुम्हाला मदत करतील आणि तुम्ही स्व:विकास ते राष्ट्र विकास असे अग्रक्रमन कराल. तुमचे जीवन अजून सोपे, सुटसुटीत , सरळ,सुखी आणि यशस्वी होईल .
जीवन अनमोल आहे ! ते अधिक सुंदर बनवूया !!

०११ /१०१ दिनांक ०५.०४.२०२१
राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७