ध्येये पूर्ण करण्यासाठी उद्दिष्टांवर काम करा. (𝐖𝐨𝐫𝐤 𝐨𝐧 𝐎𝐛𝐣𝐞𝐜𝐭𝐢𝐯𝐞𝐬 𝐭𝐨 𝐀𝐜𝐜𝐨𝐦𝐩𝐥𝐢𝐬𝐡 𝐆𝐨𝐚𝐥𝐬)

ध्येये पूर्ण करण्यासाठी उद्दिष्टांवर काम करा. (𝐖𝐨𝐫𝐤 𝐨𝐧 𝐎𝐛𝐣𝐞𝐜𝐭𝐢𝐯𝐞𝐬 𝐭𝐨 𝐀𝐜𝐜𝐨𝐦𝐩𝐥𝐢𝐬𝐡 𝐆𝐨𝐚𝐥𝐬)
 
       आपण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत अनेक ध्येये ठरवत असतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. या धडपडीत काहींची फक्त काही ध्येये पूर्ण होतात तर काहींची ध्येये कधीच पूर्ण होत नाहीत. असे का होत असावे? कारण आपल्यापैकी बरेच लोक फक्त ध्येयांवर काम करतात मात्र ध्येये पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक असलेली बाब म्हणजे उद्दिष्टे यांवर काम करायचे विसरून जातात.
 
         ध्येय हे अंतिम ठिकाण आहे, तर उद्दिष्टे ही ध्येयांपर्यंत पोहचण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे साहजिकच उद्दिष्टे आधी येतात नंतर ध्येय येते. अजून विस्ताराने सांगायचे झाल्यास ध्येयाचा मार्ग हा उदीष्टांच्या रस्त्यावरून जातो. साहजिकच आधी ध्येय निश्चित करणे ते पूर्ण करण्यासाठी उद्दिष्टे ठरवणे आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियोजन व कष्ट करणे आणि शेवटी ध्येय गाठणे असा सर्वसाधारण प्रवास असतो.
 
      आपली ध्येय ही उंच पर्वताच्या शिखरांसारखी असतात तर उद्दिष्टे ही शिखरांवर पोहचण्यासाठी असलेल्या पायवाटेसारखी असतात. आपल्याला ध्येय पूर्ण करण्यासाठी ह्या उंच सखल, काट्या कुटयांच्या, माती दगडाच्या पाय वाटेवरून मार्गक्रमण करावेच लागते तेंव्हाच ध्येयाचे शिखर सर होते.
 
      आपल्याला समाजात चार प्रकारची माणसे आढळतात. काही माणसं ध्येयवेडी व स्वप्नवेडी असतात मात्र ती ध्येय पूर्ण करण्यासाठी ती कोणतेही उद्दिष्टे आखून त्यावर काम करत नाहीत. काही माणसे अनेक ध्येय आणि अनेक उद्दिष्टे आखतात आणि आपली ध्येय व उद्दिष्टे यात सारखा बदल करत राहतात त्या मुळे ते कोणत्याच ध्येयापर्यंत अंतिमतःपोहचू शकत नाहीत.काही माणसे ही ध्येय ठरवत नाहीत आणि उद्दिष्टे ही ठरवत नाहीत फक्त आहे ते दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात. काही माणसे ही आपली ध्येये निश्चित करतात त्या प्रमाणे उद्दिष्टे आखतात आणि त्या उद्दिष्टांवर काम करून आपली ध्येय गाठतात. साहजिक आपल्याला या चार माणसांपैकी आपली ध्येये निश्चित करून त्या उद्दिष्टांवर काम करणाऱ्या व्यक्ती सारखे काम करायचे आहे.
 
       आता काही उदाहरणे आपण पाहू, समजा आपल्याला नोकरी मिळवणे हे ध्येय आहे. तर यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य क्लास, योग्य पुस्तके, योग्य अभ्यासिका आणि योग्य व नियोजनबद्ध अभ्यास ही आपली उद्दिष्टे राहातील. आपल्याला जर व्यवसाय किंवा उदयोग करायचा असेल तर जागा निश्चिती, प्रकल्प अहवाल, तांत्रिक बाबी, आर्थिक बाबी, बँक कर्ज, उत्पादन, मार्केटिंग, विक्री आणि ताळेबंद ही उद्दिष्टे ठेवावी लागतील. आता आपली नोकरी/उदयोग/व्यवसाय झाला आता आपल्याला स्वत:चे घर हवे आहे तर घरासाठी सुयोग्य शहर, सुयोग्य ठिकाण, स्वतःची रक्कम, बँक हप्ते इत्यादी उद्दिष्टांवर काम करावे लागेल. गाडी हवी असेल तर गाडी चालवणे, ब्रँड निवड, स्वतःची रक्कम, बँक हप्ते यावर काम करावे लागेल. ही सर्वसाधारण उदाहरणे येथे देण्याचे कारण एवढेच की ध्येये कोणती व ती ध्येये पूर्ण करण्यासाठी ठरवण्यात येणारी उद्दिष्टे कोणती याबाबत कल्पना यावी .
 
        ध्येये ही एकापेक्षा अधिक असू शकतात. मात्र ध्येये ही आपली क्षमता विचारात घेऊन वस्तुस्थितीशी मिळती जुळती असावीत. बऱ्याच वेळा आपली ध्येय ही वस्तुस्थितीशी विसंगत अथवा विरोधीभासी असतात त्यामुळे ती पूर्ण होत नाहीत. एकदा ध्येय ठरवले की त्याची उद्दिष्टे नुसती मनात न ठरवता ती लिहून काढली पाहिजेत आणि त्यांची वेळ सीमा निश्चित केली पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी ठरवलेली उद्दिष्टे कितीही असू शकतात.उद्दिष्टांवर काम सुरू केले की आपण ध्येयाकडे अग्रक्रमन करायला सुरू करतो आणि हळू हळू आपले ध्येय गाठतो.
तर मित्रानो आपली ध्येय निश्चित करा, ती पूर्ण करण्यासाठी उद्दिष्टे ठरवा, उद्दिष्टांवर काम करा आणि ध्येय पूर्ण करून यशस्वी व्हा.
 
जीवन अनमोल आहे ! ते अधिक सुंदर बनवूया!!
 
०१० /१०१ दिनांक ०२.०४.२०२१
राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७