नातेसंबंधातील मनोमिलन ( 𝐑𝐞𝐮𝐧𝐢𝐨𝐧 𝐢𝐧 𝐚 𝐑𝐞𝐥𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬𝐡𝐢𝐩)

नातेसंबंधातील मनोमिलन ( 𝐑𝐞𝐮𝐧𝐢𝐨𝐧 𝐢𝐧 𝐚 𝐑𝐞𝐥𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬𝐡𝐢𝐩)

दिवसेनदिवस वाढत चाललेले कौटुंबिक कलह व ताणले जाणारे नातेसंबंध हा सध्या चिंतेचा व चर्चेचा विषय आहे. कुटुंबातील विविध सदस्यांनी त्यांच्या परस्पर वर्तनात योग्य समन्वय साधला नाही, कि कौटुंबिक कलह निर्माण होतात. जैविक व सामाजिक दृष्ट्या स्री व पुरुष एकमेकांस पूरक असतात असे आपण मानतो, तशी पद्धती सुधा रूढ झाली आहे. वंश वाढवणे , सामाजिक व धार्मिक आचार याचे पालन करणे , कौटुंबिक संस्था वृद्धिंगत करणे, मुलांचे संगोपन करणे, वृद्धांची काळजी घेणे, जीवन विषयक दैनंदिन गरजा भागवणे अशा अनेक कामाची विभागणी स्री आणि पुरुष यांच्यामध्ये आपणास पहावयास मिळते. अशी विभागणी जरी होत असली तरी मानसिक, शारिरीक व भावनिक मनोमिलन जो पर्यंत पूर्णत्वास जात नाही तो पर्यंत त्यांचेत एकमेका बदल असलेले प्रेम व परस्पर सहकार्य निर्माण होत नाही. त्या मुळे आपण आपल्या कुटुंबात नातेसंबध विषयक मनोमिलन साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मानवी जीवनात वाढत चाललेली भोग व विलास वृत्ती या मुळे “ये दिल मांगे मोअर” अशी सर्वांची स्थिती व वृत्ती निर्माण झाली आहे. त्या मुळे दिवसेनदिवस वाढत जाणाऱ्या अपेक्षा व मागण्या आणि त्याला न मिळणारा प्रतिसाद यातून मनुष्य प्राणी दु:खी होत आहे . काळाच्या ओघात किंवा जैविक दृष्ट्या निर्माण झालेली हि सामाजिक व्यवस्था एवढी तकलादू होणे हे सामाजिक शास्राच्या दृष्टीने फार भूषवाह नाही. वास्तविक नातेसंबंध दृढ होणे व त्यांचेतील परस्पर संवाद वाढणे या साठी व्यापक स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र असे होताना दृष्टीक्षेपात पडत नाही. जर हे असेच चालू राहिले तर सामाजिक व्यवस्था खिळखिळी झाल्यावाचून राहणार नाही. एकदा समाज व्यवस्था खिळखिळी झाली कि तो समाज लयाला जावून नामशेष होण्याची भीती निर्माण होवू शकते. त्या अनुषंगाने आपण नातेसंबध विषयक मनोमिलन दृढ करण्यावर भर दिला पाहिजे

या साठी थोडा व्यक्ती निरपेक्ष विचार व चिंतन केले कि मार्ग सापडतो. आपण कोण आहोत? व आपले कौटुंबिक व सामाजिक कर्तव्य काय आहे? आपण काय करायला हवे? आपण काय करत आहोत ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. निसर्गाचा मानव निर्माण करण्यामागे काय उद्दात हेतू होता? या मागील कारणमीमांसा मित्रांनी जाणून घेणे सुद्धा प्रस्तुत ठरेल. मानवी समाजाची उत्क्रांती व उन्नती होत असतानी त्याला खूप संघर्ष व लढाया करायला लागल्या हे सर्वश्रुत आहे. आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर त्याने हिंस्र प्राण्यांना बंदी बनवले व आकाशाला गवसणी घातली. हा प्रवास दिसतो ठेवढा सोपा कधीच नव्हता. मानवी प्राणी जेवढा क्रूर ठेवढाच तो भावनिक सुद्धा होता आणि त्यामुळे त्याला भावनिक आधार मिळणे क्रमप्राप्त होते. म्हणजेच स्री व पुरुष यांनी मानवी उत्क्रांती होत असतांना परस्पर पूरक काम केले. त्या मुळेच मनुष्य प्राण्याची वाटचाल अति पासून इत पर्यंत झाली. त्या मुळे स्री व पुरुष मधील हि परस्पर सह पूरकता कायम राखणे हे आपले कर्तव्ये आहे.

मात्र सध्याच्या बदलत्या बदलत्या काळात या नातेसंबंधाने वेगळे रूप धारण केले आहे. या मागचे कारण अगदी सोपे आहे ते म्हणजे मीच का करू ?हि वृत्ती , परस्पर बाबत असलेला दुराग्रह, पूर्वग्रह दुषित पणा आणि मी श्रेष्ठ आहे हि दाखवण्याची जिज्ञासा. यामुळे आपोआप मानवाचे वर्तन बदलत जाते आणि जाणीव पूर्वक अपेक्षा लादल्या जातात आणि त्या पूर्ण नाही झाल्या कि नातेविषयक संबध ताणले जातात. हे कधी कधी नकळत होते तर कधी जाणीवपूर्वक घडवून आणले जाते.

या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती ती स्री असो व पुरुष यांनी आपल्या शारीरिक , भावनिक व मानसिक गरजा व अपेक्षा ह्या कश्या नियंत्रित करता येतील यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकदा यावर नियंत्रण प्रस्तापित झाले कि माणूस माणसा सारखा वागण्यास सुरुवात करतो आणि त्या अनुषंगाने त्याचे वर्तनात इष्ट असे बदल होतात. तसेच आपले आयुष्य हे अनमोल व महत्वाचे असून त्या साठी प्रत्येकाने आपली विचार प्रक्रिया सुदृढ व सकारात्मक करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. एकदा विचार प्रक्रिया नियंत्रित केली कि त्याचा प्रभाव आपल्या वागणुकीवर व वर्तनावर होतो. चांगले वागणे व सुयोग्य असे वर्तन आपल्या अंगी आले कि आपला इतरांविषयी होणारा तिरस्कार हळू हळू कमी होवू लागतो व ताणले गेलेले नाते संबध हळू हळू दृढ होयाला लागतात. परंतु या साठी पण सर्वांनी खूप कार्यकुशलतेने विचार व प्रयत्न करायला पाहिजेत .

काळाच्या ओघात तयार झालेली अनेक उन-पाउस, सुख-दुख पाहिलेली व सर्व प्राण्यामध्ये सर्वात दृढ असलेली हि कौटुंबिक नाते संबंधाची विन अशीच घट्ट राहावी यासाठी आपण सर्वांनी जाणीव पूर्वक प्रयत्न करायला हवेत. चला आपल्या जीवनाचे मूल्य व महत्व आपणच अधोरेखित करूया व त्या अनुरूप त्याला अनमोल असे बनवूया. विजय तुमचाच आहे .

०१२/१०१ दिनांक ०८.०४.२०२१
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी,
९९७०२४६४१७