मच्छरमय जगात ! In the world of mosquitoes

मच्छरमय जगात ! In the world of mosquitoes #mosquito#मच्छर#insect#कीटक

एक मच्छर साला आदमी को *** बना देता है ! या डॉयलॉग पेक्षाही रात्रभर कानाजवळ गुणगुण करुन झोपमोड करणारा मच्छर जास्त त्रासदायक ठरतो. अशा अगणित मच्छरांनी अनेक माणसांची सुखाची झोप खराब केली आहे. मानव आणि मच्छर यांचं नातं किती लाखो वर्षांपासून आहे हे माहीत नाही. मात्र माणूस प्राणी जन्माला आल्यानंतर त्याचं या सृष्टीतील स्वागत त्याला कडकडून चावा घेऊन करणारा जगात जर कोणी असेल तर मच्छर होय. जन्म ते मृत्यू या प्रवासात माणसाला सर्वात जवळून जास्त त्रास बहुतेक मच्छरच देत असावा. मात्र असा हा त्रासदायक मच्छर अनेकांसाठी जीवघेणाही ठरतो हे वेगळं सांगायला नको. मच्छरांच्या जगात ३५०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. प्रस्तुत लेखात मच्छर कीटकाबाबत हौशी वाचकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

मच्छर हा कीटक इतर कीटकांप्रमाणे अंडी, अळी, कोष आणि प्रौढ असा जीवनक्रम पूर्ण करत असतो. जन्माला आल्यानंतर पुढील किमान आठ आठवडे हा सर्वांना हैराण करत असतो. विशेष म्हणजे मादी मच्छर ही आठ आठवडे जगते मात्र नर मच्छर आठ दिवसात दम सोडतो.

नर व मादी मच्छर हे फक्त माणसाचं किंवा इतर प्राण्यांचं रक्त पिऊनच जगतात असं आपल्याला नेहमी वाटतं परंतु ते पूर्णतः खरं नाही. नर व मादी मच्छर यांना जगण्यासाठी झाडातील पाने व फुले मधील रस पुरेसा असतो. मात्र ज्यावेळी मादी मच्छरला अंडी देऊन तिचा वंश वाढवायचा असतो त्यावेळी तिला प्रोटीन आणि आयर्न याची गरज असते. अशा वेळी प्रोटीन आणि आयर्न याचा मुख्य स्रोत म्हणून मादी मच्छर ही माणसाचं किंवा इतर प्राण्यांच रक्त शोषुन साधारण एका वेळी १०० ते ३०० अंडी घालते. संपूर्ण जिवनकाळात चार ते पाच वेळात ती ५०० ते १००० अंडी घालून आपला जीवनक्रम पूर्ण करते. अशी अंडी ही साचलेल्या पाण्यावर किंवा पाण्याच्या जवळच्या ओल्या जागेत दिली जातात. कारण अंड्यातून अळी बाहेर आल्यावर ती पाण्यात जगते.

रक्त शोषण्यासाठी मच्छरचे तोंड म्हणजे एक नलिका असते आणि तिला सहा सुया असतात. आपल्या त्वचेमधून ही नलिका आत गेली की मच्छर आत लाळ सोडतात त्यामुळे रक्त लगेच गोठत नाही आणि ते अलगद नळीवाटे ओढलं जातं. साधारण मादी मच्छर त्याच्या वजनाच्या तीन पट जास्त रक्त शोषते.

मच्छर जेंव्हा उडतो त्यावेळी त्याचा स्पीड ३ किलोमीटर प्रति तास असा असतो. तोच स्पीड मीटर मध्ये काढला तर साधारण एका सेकंदाला तो एक मीटर जाऊ शकतो.म्हणून आपण हातांनी मच्छर मारण्याचा प्रयत्न केला तर तो सहसा हाती लागत नाही.जेंव्हा तो रक्त पिऊन सुस्तावतो त्यावेळी त्याला हातांनी मारणे अधिक सोपे होते.

साधारण मच्छर हे २५ फूट उंच स्वतः उडू शकतात मात्र जर हवा जोरात खालून वर वाहत असेल तर हे अधिक उंचीवर उडत जाऊ शकतात. काही उंच इमारती मध्ये मच्छर आढळतात कारण ब्रिडींग साईट जर चेंबर मध्ये असतील तर मच्छरांची निर्मिती होत राहते. तसेच वाऱ्याने वाहून आणलेले मच्छर काही उंच इमारती मध्ये येतात आणि काही दिवस तेथे स्थिरवतात. सर्वात जास्त उंचावरची मच्छरची एन्ट्री ही चेंबर मधून उडत उडत उंचीवर आल्याने होते.

मच्छर कानाजवळ आल्यावर गुण गुण आवाज येतो त्याला इंग्रजी मध्ये बझिंग साऊंड असे म्हणतात. हा आवाज मादी मच्छर तिचे पंख एका सेकंदाला ३०० वेळा फडफडत असल्याने निर्माण होतो. निर्माण होणारा आवाज हा ५०० हर्ट्झ वारंवारतेचा आणि ३० डेसीबल असल्याने आपल्याला ऐकू येतो( मनुष्य प्राणी हा २० हर्ट्झ ते २० हजार हर्ट्झ वारंवारता रेंज मधील आणि १ ते १४० डेसीबल तीव्रतेचा आवाज सहन करू शकतो). बऱ्याच वेळा मश्चर आपल्या कानाकडेच का येतो हा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र तो कानाकडे येत नसून आपल्या उच्छ्वासातुन बाहेर पडणार कार्बन डायऑक्साईड कडे तो आकर्षित होतो.

मच्छरांच्या काही प्रजाती ह्या अनेक रोगांचे जिवाणू व विषाणू याचा प्रसार मानवजाती मध्ये करतात. एडीस इजिप्ती हा मच्छर डेंगू, चिकणगुणिया, झिका हे रोग पसरविण्यास कारणीभूत ठरतो. अनाफिलस हा मच्छर मलेरिया रोगाचा प्रसार करतो. कुलेक्स नावाचा मच्छर हा फिलारियासिस ह्या रोगाचा प्रसार करतो. जगभरात दरवर्षी मच्छरानी पसरलेल्या रोगांनी साधारण ७ ते ८ लाख लोक मरण पावतात हे अधिक धक्कादायक आहे.

आपण घरी जी मच्छर मारण्यासाठी कॉईल किंवा लिक्विड वापरतो ती सिंथेटिक पायरेथ्रोईड पासून तयार केलेली असते. या कॉईल किंवा लिक्विडमध्ये प्रालेथ्रिन किंवा रीनोफ्लूथ्रिन किंवा आलेथ्रिन किंवा ट्रान्सफ्लूथ्रिन या प्रकारची द्रवे किंवा इनग्रेडिंएंट वापरली जातात. मच्छरला नाक नसते त्यामुळे तो नाकाने श्वास घेत नसून त्याच्या शरीरावर अतिसूक्ष्म छिद्र असतात त्यातून हवा आत जाऊन ऑक्सिजन त्याचा रक्तात मिसळला जातो. हे इनग्रेडिंएंट हवेत मिसळून मच्छराच्या रक्तात गेली की मज्जापेशी मधील सोडियम आयनचे वहन विस्कळीत होवून मच्छर आधी पेरालाईज होतो आणि नंतर मरतो. मात्र अशी कॉईल किंवा लिक्विड वापरत असताना आपण खिडकी उघडी ठेवणे आवश्यक आहे. तसेच फॅन बंद ठेवून असे कोईल किंवा लिक्विड वापरू नये.मच्छरांपासून बचाव करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे मच्छरदाणी होय.

एकंदरीत मानवी जीवन आणि त्याचे निसर्गातील विविध जीव जिवाणू सोबतचे वास्तव्य हे कालातीत आहे.मात्र असे वास्तव्य त्याच्या वाटचालीस हानिकारक ठरू नये म्हणून तो या हानिकारक जीव व जंतू सोबत कायम संघर्ष करत आला आहे आणि हा संघर्ष पुढेही असाच चालू राहणार आहे. मच्छर आणि त्याचं मानवी वस्तीत असलेलं अस्तित्व हे विस्मयकारक तर आहेच तसेच प्राणघातकही आहे. त्यामुळे एकीकडे मानवाने आपली प्रतिकारक क्षमता वाढवत असतांनी योग्य यांत्रिक, जैविक, रासायनिक, सेंद्रिय पद्धती वापरून मच्छरांचा बंदोबस्त करून आपले जीवन अधिक सुकर आणि सुखकर करण्याकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.

राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी

०२/१०० मार्च २०२६

कीटकांची आश्चर्यकारक दुनिया लेखमाला

९९७०२४६४१७