एक सांघिक व एक वैयक्तिक खेळ हवाच!
एक सांघिक व एक वैयक्तिक खेळ हवाच!
खिलाडू वृत्ती असणे हे केवळ मैदानातच नव्हे, तर दैनंदिन आयुष्यातही अत्यंत उपयोगी पडणारी बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान ४५ वर्षे वयापर्यंत तरी खिलाडू वृत्ती जिवंत ठेवणे आवश्यक आहे. यासाठी किमान एक सांघिक आणि एक वैयक्तिक खेळ जाणीवपूर्वक विकसित करणे गरजेचे आहे.आपण दैनंदिन खेळ खेळत असाल तर उत्तमच, परंतु आठवड्यातून किमान दोन दिवस तरी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. मैदानी खेळ खेळल्यामुळे तुमच्यात काटकता, लवचिकता आणि चपळता येते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, श्वसनक्रिया (breathing rate) मजबूत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानसिक आरोग्यावर याचा खूप सकारात्मक परिणाम होतो.
खेळात यश आणि अपयश ठरलेले असते. त्यामुळे खेळ आपल्याला आयुष्यात अपयश आणि नकार पचवण्याची ताकद देतात. जीवनात आपल्याला पदोपदी अपयश आणि नकार येत असतात. या अनुषंगाने आपण हे अपयश व नकार खिलाडू वृत्तीने स्वीकारू शकतो. युवकांनी आपल्या तरुण वयात खेळ आणि आरोग्याकडे विशेष लक्ष पुरवले पाहिजे. बऱ्याच वेळा आपण खेळ खेळत असू तर “तुला कोठे मेडल मिळणार आहे?” असे म्हणून हिणवले जाते आणि नाउमेद केले जाते. वास्तविक आपण खेळ हा आपल्या वैयक्तिक आनंदासाठी, शरीरसौष्ठवासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळत असतो. हार-जीत, जय-पराजय या बाबी कधीच महत्वाच्या नसतात. महत्वाची असते तुमची जिगर, तुमचा उत्साह आणि तुमचे समर्पण.त्यामुळे युवकांनी आपले करिअर आणि अभ्यास सांभाळून खेळ खेळले पाहिजेत. त्याचबरोबर व्यायाम, योग आणि ध्यानधारणेची जोड दिली पाहिजे.
सध्या मोबाईल युगात युवकांचे मैदानी खेळाकडे होणारे दुर्लक्ष ही पालकांसाठी आणि एकंदर समाजासाठी खूप चिंतेची बाब आहे. अगदी लहानपणी हातात पहिले खेळणे न देता मोबाईल दिला जातो. आज अशी किती तरी मुले आहेत की, त्यांना हातात मोबाईल दिल्याशिवाय ते जेवणही करत नाहीत. मूल त्रास देते आणि काम करू देत नाही म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देण्याची नवी पद्धत आज पाहायला मिळते. वास्तविक आपण त्यांच्या हातात मोबाईल देत नसून ‘बॉम्ब’ देत आहोत. हळूहळू मुलांचा प्रवास बाल्यावस्था, पौगंडावस्था आणि युवावस्था असा होतो, मात्र त्यांच्या हातातून मोबाईल काही केल्या सुटत नाही. त्यामुळे युवकांनी मोबाईलचा वापर अत्यंत मर्यादित स्वरूपात केला पाहिजे. सरासरी दिवसात मोबाईलचा वापर ९० ते १२० मिनिटांपेक्षा जास्त असता कामा नये.
मोबाईलचा अतिवापर केल्याने युवकांच्या दृष्टीवर विपरीत परिणाम होतो आणि मेंदूवर अनावश्यक दाब निर्माण होतो. सलग काही तास मोबाईल पाहिल्याने मानेचा मणका गॅप पडण्याचा धोकाही आहे, हे युवकांनी लक्षात घ्यावे.
युवक हे देशाची भावी पिढी आहेत. देशाचे भविष्य त्यांच्या हातात आहे. त्यामुळे मोबाईलचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर करून आपण स्वतःचे नुकसान तर करतच आहोत, त्यासोबत समाज आणि देशाचेही नुकसान करत आहोत. सोशल मीडिया साइट्सवर व्यस्त राहिल्यास आपली क्रिया-शक्तीवर गंभीर परिणाम होणार आहे. मेंदूवर अति दाब निर्माण झाल्याने स्मरणशक्ती कमी होऊन तुम्ही कोणत्याही विषयाचे आकलन आणि विश्लेषण करू शकणार नाही. याचा परिणाम म्हणजे कौशल्य नसलेली, दृष्टीने कमकुवत आणि मेंदूने स्मरणशक्ती कमी असलेली पिढी निर्माण होण्याची भीती सामाजिक शास्त्रज्ञांमध्ये निर्माण झाली आहे.
या सर्व अपायांना एकच पर्याय आहे, तो म्हणजे मैदानी खेळ. मैदानी खेळाचा अर्थ असा नाही की केवळ मातीच्या मैदानावरच खेळले पाहिजे. गल्ली, बोळ आणि अंगणात खेळणेही तितकेच आवश्यक आहे. मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा बॅट किंवा रॅकेट देणे कधीही श्रेयस्कर आहे. युवकांनी तर खेळाला आपलासा करणे अवश्य आहे. खेळ हा व्यायामापेक्षा काही वेगळा नाही, कारण त्यामुळे आपली २०६ हाडे आणि ६०० हून अधिक स्नायू मजबूत होतात. तसेच हृदय आणि फुफ्फुसे मजबूत होण्यास खेळ मोठ्या प्रमाणात मदत करतो. अंगावरील अनावश्यक चरबी जाळून जाते. शरीरात काटकपणा आणि लवचिकपणा वाढतो. खेळ खेळल्याने एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते.
मुलांनी आणि युवकांनी खेळ खेळायलाच हवा. त्याचबरोबर प्रौढ व्यक्तींनीही किमान ४५ वर्षे वयापर्यंत खेळ खेळायला हवा. परदेशात ही खेळ खेळण्याची संस्कृती मोठ्या प्रमाणावर रुजलेली दिसते. तेथे पायात आणि हातात दम असतो तोपर्यंत लोक स्वतःला सक्रिय ठेवतात. त्याउलट आपल्या देशात तरुणपण संपल्यावर (साधारण ३४-३५ वर्षे) खेळणे बंद होते. साहजिकच शरीराची हालचाल मंद झाल्याने मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारखे आजार डोके वर काढतात. या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. एकदा प्रौढ झालो की खेळायचे नसते, अशी समजूत दूर करणे आवश्यक आहे. देशात या बाबत एक व्यापक चळवळ होणे गरजेचे आहे, जी विशेषतः प्रौढांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकेल.
अशा प्रकारे लहान मुलांचा डिजिटल वेळ कमी करण्यासाठी सामाजिक, राजकीय आणि गरज पडल्यास कायदेशीर पावले उचलावी लागणार आहेत. तसेच मुलांना शालेय जीवनातच खेळ आणि व्यायामाचे धडे घालून द्यावे लागणार आहेत. तरुणांनी आपले करिअर अवश्य करावे, यात शंका नाही. पण करिअर करण्याच्या नादात आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने ऐन चाळिशीत रोग घेरतात, हीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे करिअरचा दबाव असला तरी युवकांनी खेळ आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करता कामा नये.प्रौढ व्यक्तींनीही किमान ४५ वर्षे वयापर्यंत शक्य असेल तर सोपे आणि हलके खेळ खेळावेत. त्यामुळे शरीराची लवचिकता वाढते.
चला, खेळ खेळूया आणि एक सुदृढ भारत बनवूया!
राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी यशदा, पुणे