चप्पल कराटे
शाळा सुटायची वेळ झाली होती; मात्र काळे सरांचा भूगोल विषयाचा तास हनुमानाच्या शेपटीसारखा बराच लांबला होता. काही मुलांनी तर तास संपायच्या आधीच वह्या व पुस्तके त्यांच्या बंद आणि चैन तुटलेल्या पिशवीत अक्षरशः कोंबली होती. उंदीर जसा बिळातून डोके बाहेर काढतो, तशी अवस्था काहींच्या पिशवीतून बाहेर आलेल्या पुस्तकांची होती. तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा वाजली आणि आहे त्या ठिकाणी काळे सरांनी भूगोलाचा तास थांबवला. शाळेची घंटा वाजली की शिक्षकांनी आपले शिकवणे आहे त्या ठिकाणी थांबवायचे, हा शाळेचा अलिखित नियम होता.
नेहमीप्रमाणे आजही शाळा सुटली म्हणून आनंदाला उधाण आले होते. तसे हे रोजचेच होते; मात्र या रोजच्याचा आम्हाला कंटाळा नव्हता. वर्गातून रेटारेटी आणि ढकलाढकली सुरू झाली, जसे काय जो आधी बाहेर पडेल त्याला प्रशस्तीपत्रक मिळणार होते. मी आपला थोडा निवांत बाहेर पडत असे, कारण हॉस्टेल आणि शाळा यांतील अंतर फक्त हाकेच्या अंतरावरच होते. वर्गातील मुली नेहमीच मुलांचा लोंढा बाहेर पडला की हळुवार बाहेर पडत. असंही त्यांना घरी जाऊन आमच्यासारख्या उनाडक्या करण्याची परवानगी नव्हती. शाळेत दिवसभर दमल्यानंतर घरी गेल्यावर त्यांना आईला घरकामात मदत करायची होती. शाळा सुटली तशी माझी पावले हॉस्टेलच्या दिशेने वळली. सोबत काही मित्र होते. आज वर्गात काय घडले, कोणी काय केले, कोणी कोणाची उडवली, कोणी सरांचा मार खाल्ला, याची चर्चा रंगली होती. मात्र आजचा झालेला वर्गपाठ आणि उद्याचा गृहपाठ याबाबत चर्चा करायला कोणाजवळ वेळ नव्हता.
मी आणि माझ्याच वर्गातला माझा मित्र अशोक मंद पावलांनी आणि इकडच्या-तिकडच्या गप्पा करत हॉस्टेलवर पोहोचलो. शाळेचे कपडे बदलले आणि घडी करून आज्जीने प्रेमाने दिलेल्या लाकडी पेटीत हळुवार ठेवून दिले. एवढ्यात सुनीलही हॉस्टेलवर आला. सुनील नववी ‘अ’ तुकडीत होता, तर मी नववी ‘ड’ तुकडीत होतो; त्यामुळे आमची शक्यतो भेट सकाळी आणि सायंकाळी होत असे. सुनील आणि आम्ही एकाच गावचे असल्यामुळे आमच्यात जिव्हाळा आणि प्रेम बऱ्यापैकी होते. शाळा सुटल्यावर थोडा वेळ मिळाला की आम्ही बाहेर क्रिकेट किंवा कबड्डी खेळायला जात असू; परंतु दुपारी थोडा पाऊस झाल्याने मैदानावर चिखल झाला होता.
“राजू, आज बाहेर जायची सोय नाही. काय करायचं?” सुनील थोड्या निराश सुरात म्हणाला.
“अरे, आज चप्पल कराटे खेळूया,” असे मी म्हटल्याबरोबर तो तयार झाला.
बरेच दिवस झाले आम्ही ‘चप्पल कराटे’ खेळलो नव्हतो, म्हणून आज चप्पल कराटे खेळण्याचे आम्ही दोघांनी मिळून ठरवले. सुनीलकडे मागच्या महिन्यात पस्तीस रुपयांना घेतलेली पैरागॉन कंपनीची चप्पल होती आणि माझ्याकडे अल्फा कंपनीची चप्पल होती. आमची हॉस्टेलची रूम तशी प्रशस्त होती आणि अजूनही हॉस्टेलची इतर मुले बाहेरच रेंगाळत होती. त्यामुळे एका दिशेला सुनील आणि दुसऱ्या दिशेला मी अशी आम्ही जागा घेऊन चप्पल कराटे खेळ सुरू केला.
‘चप्पल कराटे’ या नावीन्यपूर्ण खेळाचा शोध मीच लावला होता. यामध्ये दोन खेळाडू समोरासमोर उभे राहत. ज्याचा टर्न असेल त्याने पायातील चप्पल पायाने दुसऱ्याच्या अंगावर मारायची, असा तो खेळ होता. जर मारलेल्या चप्पलचा अंगाला स्पर्श झाला, तर एक गुण. अशा प्रकारे ‘चप्पल कराटे’ खेळ आमचा सुरू झाला.
मी चप्पल माझ्या उजव्या पायाने ताकद लावून मारली, तशी सुनीलने डाव्या बाजूला सरकून ती हुकवली. त्यानंतर सुनीलने पायाने चप्पल मारली, ती मीही हुकवली. असे करता करता काही चप्पला अंगाला लागत होत्या आणि काही आम्ही चुकवत होतो. खेळ बराच रंगात आला होता. सुनीलचे साधारण आठ गुण, तर माझे साधारण तीन गुण झाले होते. सुनीलचे अकरा गुण झाले की मी हरणार, अशी मला भीती वाटत होती. हारायचे नाही म्हणून मी पूर्ण ताकदीने आणि नेम धरून पायाने चप्पल सुनीलकडे मारत होतो. मात्र सुनील चप्पलेसारखाच चपळ होता. तो अलगद बाजूला होऊन माझी चप्पल हुकवत होता.
असा खेळ बराच जोशात आला. तेव्हा मी त्याच जोशात पूर्ण ताकदीने चप्पल पायाने सुनीलकडे जोरात भिरकावली. मात्र माझ्या लगेच लक्षात आले की ती चप्पल सुनीलपर्यंत पोहोचलीच नाही. एक मोठा आवाज झाल्याचे आणि पाऊस पडतो तसे काहीतरी पडल्याचे मला जाणवले. काहीतरी गडबड झाली आहे, हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. मी मान वर करून पाहिले तर ट्यूबलाईटचा फक्त साचा दिसत होता आणि ट्यूबलाईटच्या काचेच्या नळीचे तुकडे-तुकडे होऊन खाली पडले होते. हे दृश्य पाहून तर मी गळूनच गेलो आणि मटकन माझ्या लाकडी पेटीवर बसलो.
एवढे होऊनही सुनील नेहमीप्रमाणे घाबरला नव्हता, कारण आरोपी मी होतो आणि सुनील बनणार होता माफीचा साक्षीदार. त्याने लगेच झाडू आणून काचा जमा करायला सुरुवात केली. एव्हाना “राजूने ट्यूबलाईट फोडली” ही बातमी वाऱ्यासारखी हॉस्टेलमध्ये पसरली होती. मी थोडा आजूबाजूचा अंदाज घेतला आणि हळूच हॉस्टेलमधून धूम ठोकली. मी पूर्ण घाबरलो होतो आणि काय करायचे, एवढी अक्कल माझ्याकडे अजिबात नव्हती. शेवटी एसटी स्टँडला मी एका लहान मंदिराच्या ओट्यावर जाऊन शांत बसलो. विचार काही सुचत नव्हते. रडूनही झाले होते. आता काय आणि कसे होणार? रेक्टर आपली खरडपट्टी काढणार आणि आपल्या घरीही हे कळणार, या विचाराने पोटाला अधूनमधून गोळा येत होता.
अंधार पडायला सुरुवात झाली होती. गावांकडे जाणाऱ्या मुक्कामी एसटी बसेस एक-एक करून निघून जात होत्या. माझ्या गावाची मुक्कामी एसटी उभी होती; मात्र माझ्या खिशात एक फुटकी कवडी नव्हती. तेवढी माझ्यात हिम्मत नव्हती की विनातिकीट मी गावाकडे एसटी बसने प्रवास करू शकेन. तसेच असे कोणालाही न सांगता गावाकडे निघून जाणे मला परवडणारे नव्हते. आता डोळ्यांतून धारा वाहायला सुरुवात झाली होती. आजच्या जेवणाची वेळही समीप आली होती. आज उपाशी राहायला लागते की काय, अशी परिस्थिती झाली होती. जेवायला मिळाले नाही तरी चालेल; मात्र रेक्टरकडून मार आणि बेइज्जती नको, असे मला राहून राहून वाटत होते.
रडून-रडून डोळ्यांतील पाणी संपले होते आणि हळूहळू अंधार गडद होत होता. पुन्हा हॉस्टेलकडे जावे असे सारखे वाटत होते; मात्र हिम्मत होत नव्हती. तेवढ्यात गोविंद मामा आणि राजू नाना बाजूच्या रस्त्याने येताना दिसले. तेव्हा कुठे माझ्या आणि त्यांच्याही जीवात जीव आला. त्यांनी मला शोधण्यासाठी पूर्ण घोडेगाव पायाखाली घातले होते आणि मी त्यांना सरतेशेवटी एसटी बस स्टँडला सापडलो होतो. ते समोर आले तसे मी जोराने रडायला लागलो. दोघांनी मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण माझ्या डोळ्यांतील अश्रू काही थांबत नव्हते.
“गोविंद मामाने मी फोडलेल्या ट्यूबलाईटच्या जागी पस्तीस रुपयांची नवीन ट्यूबलाईट विकत घेऊन हॉस्टेलच्या रूममध्ये लावून दिली आहे आणि रेक्टर यांना याची खबर लागलेली नाही,” असे राजू नाना यांनी सांगितल्यावर कुठे माझ्या जीवात जीव आला.
त्यांनी “हॉस्टेलला चल,” असे म्हटल्यावर खरंतर माझ्या मनात धस्स झाले. इतर मुले, रेक्टर आणि माझी फजिती असा तो कार्यक्रम होणार असल्याने मी हॉस्टेलवर यायचे नको म्हणत होतो. मात्र दोघांनी माझी समजूत घातल्यावर मी मंद पावलांनी त्यांच्या सोबत हॉस्टेलकडे रवाना झालो.
एव्हाना जेवण होऊन गेले होते. माझे जेवणाचे ताट त्यांनी घेऊन झाकून ठेवले होते. मी हॉस्टेलवर गेलो आणि वर पाहिले तर नवीन ट्यूबलाईट प्रकाशमान झाली होती. नवीन ट्यूबलाईटमुळे आज हॉस्टेलच्या पाच नंबरच्या रूममध्ये प्रकाश नेहमीपेक्षा जास्त वाटत होता. मी आपला मुकाट्याने लाकडाच्या पेटीवर बसलो.
“राजू, जेवून घे,” असे गोविंद मामांनी सांगितल्यावर मी जेवायला बसलो. मात्र आज जेवणाला रोजच्यासारखी चव नव्हती. माझ्या भीमपराक्रमामुळे ते बेचव झाले होते. मी जेवण केले आणि थोडा वेळ बसून कोणाशीही काहीही न बोलता झोपी गेलो.
सकाळी उठलो तरीही कालचा प्रसंग डोळ्यांसमोरून जात नव्हता. सुनील मात्र काही घडलेच नाही, या आविर्भावात वावरत होता. सकाळी मी आवरले आणि माझी पावले शाळेच्या वर्गाकडे वळली. नेहमीप्रमाणे गोंगाट सुरू होता. कोण कोणाशी काय बोलत आहे, याचा मेळ कोणालाही नव्हता. हळूहळू कालच्या घटनेतून मी बाहेर येत होतो. पुढे मी शोधलेल्या ‘चप्पल कराटे’ या खेळाचा हॉस्टेलमधील सर्वच मुलांनी एवढा धसका घेतला की, मी शोधलेला हा खेळ हॉस्टेलमधून कायमचा लुप्त होऊन गेला.
राजीव नंदकर अतिरिक्त जिल्हाधिकारी
तालुक्याची शाळा : छोट्या गोष्टी मोठे धडे
००१/२०२६ दिनांक १८.०७.२०२६