वर्तनात अनुरूप बदल कसा करावा !
आपल्या दैनंदिन आयुष्यात सुयोग्य वर्तनाला असाधारण महत्त्व आहे. वर्तन म्हणजे काय, तर आपली कृती, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद होय. वर्तन योग्य, बरोबर, चांगले, सकारात्मक असेल तर आयुष्याची वाटचाल सुकर आणि सुखकर होते. मात्र हे वर्तन स्थळ, काळ आणि व्यक्तीसापेक्ष असते. तसेच वर्तन तयार होण्यात अनेक घटक कारणीभूत असतात, जसे की आनुवंशिकता, कौटुंबिक संस्कार, सामाजिक संस्कार, स्वतःचे अनुभव, स्व-संवाद, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण . प्रस्तुत लेखात मानवी वर्तन, वर्तनाचे प्रकार आणि वर्तनात अनुरूप व सुयोग्य बदल कसे घडवून आणावेत आणि त्यातून विकास व प्रगती कशी साधावी याबाबत प्रकाश टाकण्यात आला आहे.
मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. माणसाच्या जडणघडणीत मानवी वर्तन हे मध्यवर्ती भूमिका बजावत असते. मानवी वर्तन हे विविध कृती, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांचा समुच्चय आहे. मानवी वर्तनामागे विचार, भावना, प्रेरणा, इच्छा, आकांक्षा, श्रद्धा, हेतू, कल्पना आणि मूल्ये कार्यरत असतात. तसे खोलवर पाहिले तर मानवी वर्तन हे खूप वैयक्तिक स्वरूपाचे आणि व्यक्तीसापेक्षसुद्धा असते.
वर्तन हे स्वभावाप्रमाणे बऱ्याच अंशी आनुवंशिक नसले, तरीही वर्तनाचा काही भाग हा आनुवंशिक असू शकतो. तसेच कौटुंबिक वातावरणाच्या अनुषंगाने जे संस्कार व्यक्तिमत्त्वावर होतात, त्यावर वर्तन निश्चित होत असते. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो समाजात मोठा होतो. अशा वेळी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने संस्कार होऊन वर्तन तयार होते. अनेक प्रकारचे अनुभव व्यक्तीला येत असतात. त्याच्या आधारे वर्तन तयार होत असते. तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आत्मजाणीव आणि स्व-संवाद यांच्या आधारानेही वर्तन तयार होत असते. मात्र तयार झालेले वर्तन कायम बदलणारे असते आणि ते व्यक्ती, स्थळ आणि काळ याप्रमाणेही बदलत असते.
वर्तनाचे मुख्य दोन प्रकार असतात त्यामध्ये सुयोग्य किंवा चांगले वर्तन आणि अयोग्य किंवा वाईट वर्तन समावेश होतो. वडीलधारी व्यक्तींशी नम्रपणे वागणे, प्रतिकूल परिस्थितीत शांत आणि संयमी राहणे, गरजूंना मदत व सहकार्य करणे, कामाची जबाबदारी स्वीकारणे इत्यादी बाबी सुयोग्य आणि चांगल्या वर्तनात येतात. व्यसन करणे, रागाच्या भरात बोलणे, नियम मोडणे, आळस करणे, इतरांचा अनादर करणे इत्यादी बाबी या अयोग्य किंवा वाईट वर्तनात येतात.
वर्तनाचा यश आणि अपयश तसेच प्रगती आणि विकास यांवरही परिणाम होत असतो. वर्तन जर चूक, अयोग्य, वाईट असेल तर विविध संधी मिळत नाहीत, नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होते, वाद वाढायला सुरुवात होते, प्रतिष्ठासुद्धा घसरते आणि एकंदर अधोगती सुरू होते. त्यामुळे आपले वर्तन हे सुयोग्य व चांगले कसे राहील, यावर जाणीवपूर्वक काम करावे लागते.
वर्तनाचे व्यक्तिमत्त्वनिहाय अजून चार प्रकार पडतात. यामध्ये शारीरिक, भावनिक, मानसिक आणि सामाजिक या प्रकारांचा समावेश होतो. शारीरिक वर्तनात बोलणे, कृती आणि शारीरिक हावभाव यांचा समावेश होतो. भावनिक वर्तनात आनंद, राग, दुःख इत्यादी भावनांचा समावेश होतो. मानसिक वर्तनात विचार, निर्णय, तर्क, समस्या सोडविणे यांचा समावेश होतो. सामाजिक वर्तनात समाजातील विविध घटक यांच्या समवेत होणारा संवाद समाविष्ट होतो. साहजिकच, चांगले व सकारात्मक जीवन जगायचे असेल तर या चारही वर्तनप्रकारांवर काम करावे लागते.
वर्तन बदलू शकते का? हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. त्याचे उत्तर असे आहे की, होय, वर्तन बदलू शकते. यासाठी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन वेळोवेळी होणे आणि वर्तनातील दोष निवारणार्थ काम होणे गरजेचे ठरते. निरंतर आत्मपरीक्षण हाही वर्तन दुरुस्त करण्याचा एक राजमार्ग आहे. मात्र त्यासाठी स्वतःशी संवाद साधावा लागतो. आपली चिकित्सक अशी वृत्ती आपल्याला स्वजाणीव करून देत असते. त्यातूनही अनुषंगिक असे वर्तनात बदल घडून येऊ शकतात. नवीन प्राप्त झालेले ज्ञान आणि दैनंदिन जीवनात आलेले अनुभव तुमच्या वर्तनात अनुरूप बदल घडवून आणू शकतात. मात्र या सर्व गोष्टी घडून येण्यासाठी एका विशिष्ट अशा प्रक्रियेतून आपल्याला पुढे जावे लागते.
त्यामध्ये पहिली पायरी आहे ती जाणीवेची. त्यात आपले वर्तन बदलायचे आहे याची जाणीव होते. दुसरी पायरी आहे, जो वर्तनात बदल हवा आहे तो स्वीकार करणे. तिसरी पायरी आहे, जो वर्तनात बदल हवा आहे तो बदल घडवून आणण्यासाठी निश्चय करणे. चौथी पायरी आहे की, एकदा वर्तनात बदल करण्यास सुरुवात झाली की त्या बदलाचा सराव करावा लागतो, ज्यामुळे शरीर, मन व बुद्धी त्या वर्तनाला स्वीकारतील. पाचवी पायरी आहे की, जो वर्तनात बदल घडवून आणला आहे त्या बदलात सातत्य ठेवणे. सहावी पायरी आहे की, वर्तनात जो बदल झाला आहे त्याचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे. एकंदर वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे ही एक प्रक्रिया असून तिला योग्य पद्धतीने हाताळावे लागते, ज्याद्वारे अनुरूप बदल घडून येतील.
एकंदर वर्तन हे व्यक्तीचे एक मूलभूत असे अंग आहे. सकारात्मक वर्तनाचा स्वीकार करणे आणि नकारात्मक वर्तनाचा त्याग करणे ही व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाची पायरी ठरते. चुकीचे, अयोग्य वर्तन हे विकास आणि प्रगतीसाठी कायम अडसर ठरते आणि एकंदर व्यक्तीच्या वाटचालीवर त्याचे विपरीत परिणाम होतात. वर्तन बदलू शकते; मात्र त्यासाठी योग्य पद्धतीने योग्य पायऱ्या वापरून अनुरूप बदल घडवून आणावे लागतात. अशा प्रकारे वर्तनात अनुरूप व सकारात्मक बदल केले तर तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल होऊन तुम्ही एक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत, सुखी व समाधानी आयुष्य जगू शकता.
राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी
ट्रान्सफॉर्म युवरसेल्फ ००४ /१०१
दिनांक ०६.०४.२०२६