शिक्षक नाही तर आम्हाला गुरुवर्य हवेत !
शिक्षणाचे विविध टप्पे पार केले की विद्यार्थी पदवीधर होतो. पदवीधर झाल्याने त्याला नोकरी देण्याचे आश्वासन काही संस्था किंवा व्यक्ती देतीलही, मात्र तो एक जबाबदार नागरिक होईलच याची शाश्वती देण्याचे धाडस आजच्या घडीला कोणी करत नाही. सध्याचे पारंपारिक शिक्षण हे मानवी जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करते असेही नाही. शिक्षण हे एकाकी आणि तोकडे असल्याने शिक्षणाने विद्यार्थी हा जीवनाच्या रहाडगाड्यात यशस्वी होईलच असेही नाही. स्मृतीक्षमता हीच बुद्धिमत्ता असा गैरसमज मागील अनेक शतकांत करून घेतला गेला असल्यामुळे तात्विक व तार्किक प्रतिप्रश्न विचारण्याची आणि सत्य शोधन करण्याची आपली प्राचीन परंपरा आपण कालबाह्य करून बसलो आहोत.
पूर्वी उपनयन विधी केल्यानंतर बालक हा विद्यार्जन करण्यासाठी गुरुच्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात जात असे. असे हे विद्यार्जन हे गुरुच्या झोपडीवजा घरात निसर्ग आणि जीवन याच्याशी अधिक समरूप आणि समरस होऊन घ्यावे लागे. साहजिकच, यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण आणि सर्वसमावेशक अशी तयारी होऊन, एक जबाबदार नागरिक बनून तो गुरुदक्षिणा अर्पण करून बाहेर पडे. ग्रामीण भागातील काही झेडपीच्या शाळा या अर्थाने थोड्याशा जवळ जाणाऱ्या आहेत. तेथील शिक्षक हे निसर्ग व जीवन याच्याशी शिक्षण निगडित करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र ही संख्या खूप कमी आहे.
शिक्षण फक्त बौद्धिक पातळीशी निगडित ठेवल्याने भावनिक व सामाजिक बुद्धिमत्तेची पातळी विद्यार्थी यांच्यामध्ये म्हणावी तेवढी रुजलेली आणि वाढलेली दृष्टीक्षेपात पडत नाही. वाढते शहरीकरण आणि त्यामुळे कोंबड्यांच्या खुराड्यासारख्या शाळा यात विद्यार्थी निसर्गाशी समरूप होतो का हेही एक कोडे आहे. चांगली बौद्धिक पातळी तुम्हाला एक चांगला नोकरदार बनवू शकेलही, मात्र एक चांगला नागरिक बनविण्याची जबाबदारी बौद्धिक पातळी कधीही पूर्णतः घेत नाही. चांगले वागणे, नीतीमूल्ये जपणे आणि चांगला विचार करणे हे बौद्धिक पातळीशी पूर्णतः निगडित नाही. त्यामुळे “अति शहाणा त्याचा बैल रिकामा” ही म्हण प्रचलित असावी. शिक्षणाने शहाणपण येतही असेल, मात्र प्रज्ञा आणि विवेक जागृत होईल असेही नाही.
शिक्षण ही काही उपचारपद्धती नाही, तर ती एक जीवनपद्धती आहे. यात फक्त औषधरूपी विषयांचे डोस पाजून उपयोग नसतो, तर त्यासाठी पद्धतशीर असे विविध संस्कारांचे लसीकरण करावे लागते. वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांचे एकसमान पद्धतीने मूल्यांकन करण्याची चूक आपण अनेक दशकांपासून करत आलो आहोत. एकसमान शिकविण्याची कार्यपद्धती, एकसमान परीक्षा पद्धती आणि एकसमान गुणदान पद्धती यामुळे विद्यार्थ्यांचे एकसमान मूल्यांकन होत असेलही, मात्र वस्तुनिष्ठ आणि निरपेक्ष असे मूल्यमापन कदापि होत नाही. बुद्धिमत्ता ही बर्याच अंशी आनुवंशिक असताना, उच्च, मध्यम आणि सर्वसाधारण बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका काढणे आणि त्यांचे त्या प्रश्नपत्रिकेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मूल्यमापन करणे हे अधिक वस्तुनिष्ठ राहू शकत नाही. त्यामुळे बुद्धिमत्ता ही गुणवत्ता नाही एवढे जर आम्हाला उमजले, तरी आम्ही किमान सुरुवात करू शकू. मग त्यापुढे जाऊन, ते शिक्षण हे निसर्ग आणि जीवन याच्याशी अधिक समरूप कसे होईल यावर काम करू.
विषय हा अधिक सोपा करून त्याचा निसर्ग आणि जीवन याच्याशी कसा सहसंबंध लावता येईल याचा अभ्यास शिक्षकांनी केला, तर ते अधिक चांगले गुरुवर्य होऊ शकतील. आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षकापेक्षा किंवा सरपेक्षा ‘गुरुवर्य’ यांची जास्त गरज आहे. शिक्षक हे पाठ्यपुस्तके आणि परीक्षा याच्या बाहेर जायचा प्रयत्न करत नाहीत. जर तेच शिक्षक गुरुवर्य या भूमिकेत असतील, तर आपला विद्यार्थी जीवनाच्या संघर्षपूर्ण लढतीत यशस्वी कसा होईल यासाठी ते कायम आणि निरंतर कार्यरत राहतील.
निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण एवढाच मर्यादित विचार करून चालत नाही, तर निसर्ग म्हणजे विश्व अशा व्यापक अर्थाने अर्थबोध करावा लागतो. एकंदर आपल्या अनंत आणि अथांग विश्वाशी समरूप असे शिक्षण दिले की ते अधिक खोलवर, स्पष्टपणे आणि ठळकपणे विद्यार्थ्यांच्या मनात जाते. निसर्गात विविध जैविक आणि अजैविक घटना घडत असतात. या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करायला विद्यार्थी तयार असले पाहिजेत. तार्किक विश्लेषण केल्यानंतर त्यातून निष्कर्ष काढण्याचे धाडस विद्यार्थ्यांमध्ये असावे. यासाठी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना मार्ग दाखवतील ते गुरुवर्यांच्या भूमिकेत असलेले शिक्षक होत.
शाळेच्या पटांगणात बिबट्याचे ठसे दिसत आहेत आणि रात्री बिबट्या शाळेच्या पटांगणामध्ये येऊन गेला हे सांगायला सूक्ष्म निरीक्षणशक्ती, उच्च विश्लेषण क्षमता, अचूक निष्कर्ष आणि मोठे धाडस या गोष्टींची जास्त गरज असते. एकंदर, आपल्या आकलनबुद्धीच्याही बाहेर एक जग आहे आणि त्या जगात येणाऱ्या असंख्य अनुभवांचे तार्किक विश्लेषण करण्याची क्षमता शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी.
जीवन हा एक संघर्ष आहे पहिल्या श्वासापासून मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत. असा हा असह्य करणारा संघर्ष सुसह्य करण्यासाठी जीवनोपयोगी आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. जीवनामध्ये खऱ्या अर्थाने व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे करत असतील, तर ती कौशल्ये; मात्र कौशल्यविकासापेक्षा संज्ञात्मक विकास यावर जास्त भर दिल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे एखादा विद्यार्थी पदवीधर होईपर्यंत त्याचा संज्ञात्मक विकास झालेला दिसतो, मात्र कौशल्यविकास हा अत्यंत कमी किंवा कधी शून्यही असतो.
पारंपरिक शिक्षण पूर्णतः त्याज्य नाही, मात्र प्राचीन शिक्षण हा या पारंपरिक शिक्षणाचा मूलाधार असावा. “विद्या विनयेने शोभते!” किती मोठा अर्थ! मात्र नीती आणि मूल्ये यांची वानवा ही सर्वच ठिकाणी दृष्टीक्षेपात पडते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन अधिक अर्थपूर्ण करणारे शिक्षण देण्याबाबत विचार व्हावा.
एकंदर, शिक्षणाने एकरूपता आणि समरूपता ही जीवनाशी अधिक साधायला हवी. निसर्ग म्हणजे आपला परिसर हा विद्यार्थ्यांनी अधिक ठळकपणे जाणून घ्यायला हवा. कार्यकारणभाव शोधण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी आणि पालकांनी रुजवायला हवी. मानवी जीवन अधिक मौल्यवान, अर्थपूर्ण आणि नीतीमूल्यांची जाण असलेले होईल, यासाठी विद्यार्थीदशेतच सर्वंकष प्रयत्न हवेत.
राजीव नंदकर, सहयोगी प्राध्यापक
तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी
यशदा पुणे
9970246417