होप्स , होपलेस आणि हेल्पलेस Hopes-Hopeless and Helpless

होप्स , होपलेस आणि हेल्पलेस Hopes -Hopeless and Helpless

        आशावाद हा मानवाचा धर्म आहे. जेथे आशावाद संपतो तेथे आयुष्य निरस होते. आशावादाच्या पायावर यशाच्या इमारतीचे इमले उभे राहत असतात. आशावाद जेवढा प्रबळ तेवढं  कष्टाचं पाठबळ त्याला जास्त मिळत राहतं. अशावादातुनच सकारात्मकतेची उर्जा निर्माण होवून ती तुमचे कार्य अजून सोपे करते. आजचा दिवस माझा नसला तरी उद्याचा दिवस माझा आहे हा विश्वास आणि विचार म्हणजे आशावाद असतो. मात्र असे दिसून येते कि बऱ्याच लोकांचा आयुष्याचा प्रवास हा होप्सकडून होपलेसकडे आणि होपलेसकडून हेल्पलेसकडे असा होतो. त्यामुळे  व्यक्तीच्या प्रगतीत आणि विकासात बाधा निर्माण होते. त्या अनुषंगाने आशावाद काय आहे? (होप), आशावाद का संपतो?(होपलेस) आणि असहायता का येते?(हेल्पलेस) याबाबत उहापोह आपण करणार आहोत. तसेच आयुष्या विषयी कायम आशावादी राहून आपले आयुष्य अधिक सकारात्मक आणि यशस्वी कसे करायचे यावरही आपण प्रकाश टाकणार आहोत.

         आशावाद हा सूर्याच्या किरणांसारखा असतो. ज्या प्रमाणे सूर्याची किरणे आसमंत प्रकाशमान करून त्यात चैतन्य आणतात अगदी त्या प्रमाणे आशावाद आपल्या तनात आणि मनात एक चैतन्य आणि सकारात्मकता निर्माण करतो. हे चैतन्य आणि सकारात्मकता घेवूनच आपण पुढे मार्गस्थ होत असतो आणि आपले ध्येय आणि उदिष्टे साध्य करत असतो. ध्येये आणि उदिष्टे गाठण्यासाठी आशावादाचा टेकू कायम महत्वाचा असतो. मात्र हा आशावाद अपोआप तयार होत नाही तर तो निर्माण करावा लागतो. त्यासाठी आशावादाला प्रयत्नवादाची जोड द्यावी लागते.   

       असा आशावादाचा महिमा जरी असला तरी अशावाद सोडून दिलेले लोक आपल्या अवती भोवती आपल्याला कायम पाहायला व अनुभवायला मिळतात. किंवा असेही काही लोक असतात कि जे फक्त आशावादी राहतात मात्र त्याला प्रयत्नाची जोड देत नाहीत. प्रयत्नाची जोड नसलेला आशावाद म्हणजे शीड नसलेले आणि भरकटले जहाज होय. असे लोक एकदा निराशावादी झाले कि हळू हळू ते इतरांपासून दूर दूर जातात आणि स्वत:हून मदतीचे सर्व दोर कापून टाकतात. त्यामुळे आशावादाचा त्याग कधीही करता कामा नये. आशावाद हा उर्जेचा स्रोत आहे तो कायम तेवत ठेवणे आवश्यक असते. आशावाद हा प्रकाशासारखा असतो तर निराशावाद हा कोळोखासारखा असतो. निराशावाद आला कि आपण आपली वाट चुकतो आणि भलतीकडेच भटकतो. त्यामुळे आपले चांगले होईल आणि आपले भले होईल हा आशावाद ठेवून कष्ट करत राहू हे आपण सारखे मनावर बिंबवले पाहिजे.

        होपलेसपणा(Hopeless) म्हणजे आपल्याकडून कोणतेही कार्य आणि कृती होवू शकणार  नाही याबद्दल इतरांनी केलेले शिक्कामोर्तब होय. काम, कार्य आणि कृती टाळणारे आणि प्रत्येक ठिकाणी नकारघंटा वाजवणारे लोक हळू हळू होपलेस होत जातात. साहजिकच होपलेसपण हे निराशावादाच्या अंधारात उगवते. एकदा याची वाढ झाली कि लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. त्यामुळे असा शिक्का बसने हे स्वयंप्रगतीसाठी खूप घातक असते. म्हणजे आपल्यातला आशावाद सोडून आपण निराशावादाकडे झुकतो आणि त्या प्रमाणे प्रत्येक कार्य व कृती आपली अयशस्वी होत जाते. सर्वसाधारणपणे इतर लोक हे निराशावादाकडे झुकलेल्या आणि अयशस्वी होत असलेल्या व्यक्तीच्या मागे उभे राहत नाहीत आणि त्याला मदतही करत नाहीत. अशा प्रकारे आपण हेल्पलेस आणि असहाय म्हणजे कोणतीही मदत आणि सहकार्य न मिळणारे होत जातो. त्यामुळे आपण होपलेस होणार नाहीत याची सदैव दक्षता आपण घेतली आहे.

        हेल्पलेस (Helpless)याचा शब्दश अर्थ हा ज्याला कोणाचीही मदत मिळण्याची काडीमात्र शक्यता नाही त्याच्यासाठी वापरला जातो. आपण हे नक्की लक्षात ठेवा कि आधी व्यक्ती होपलेस होतो आणि मग हळू हळू हेल्पलेस होतो. ज्याच्या कडून कोणतेही होप्स किंवा आशा नाहीत असे लोकांच्या लक्षात आले कि हळू हळू ते तुमच्या पासून दूर जातात आणि तुम्हाला ते हेल्पलेस करतात. तुम्ही हेल्पलेस झाला कि तुमची प्रगती थांबते हे आपण लक्षात घ्यावे. बर्‍याच वेळा आपल्याला पुढे जाण्यासाठी मदतीची, टेकूची आणि प्रोत्साहनाची साथ हवी असते. मात्र ती वेळेवर न मिळाल्याने आपण असहाय्य म्हणजे कोणतेही सहायत्ता न मिळालेले व्यक्ति होतो. हे सहाय्य अथवा मदत आपल्याला का मिळत नाही याचे दूषण आपण इतरांना देण्यात मात्र माहिर असतो. मात्र आपला स्वभाव, वर्तन व सवयी ह्या एवढ्या नकारात्मक व तीव्र स्वरुपाच्या असतात की सहजा सहजी आपल्याला कोणी मदत करण्याच्या भानगडीत पडत नाही. असे का होते तर तुम्ही होप्स सोडून होपलेस झालेला असता. हा प्रवास आपला कधी होतो किंवा कधी झाला हे आपल्यालाही कळत नाही. आपण आपल्या तंद्रीत आणि ऐटीत राहतो. इतरांचा सल्ला तर दूरच आपण इतरांचे ऐकतही नाही. स्व:ताला काही कळत नाही आणि दुसऱ्याचे काही ऐकायचे नाही अशा प्रकारातले हे लोक असतात. शेवटी निसर्ग हा प्रभावी होवून तो तुमची जागा तुम्हाला दाखवून देतो.

         वरील सर्व विवेंचन पाहता आपण आशावाद हा कायम जागृत ठेवला पाहिजे. आपल्या आशावादाला कामाची, कष्टाची आणि परिश्रमाची जोड दिली कि लवकर उदिष्ट आणि ध्येय दृष्टीक्षेपात येते. आशावाद हे एक दिव्यस्वप्न नाही तर तो एक वास्तववादी विचार आहे कि जो आपल्याला स्फूर्ती आणि प्रेरणा देत असतो. होपलेस हे बिरूद आपल्याला चिटकनार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. यासाठी आपण आपल्याला सोपवलेले आणि दिलेले कामकाज हे वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कटाक्ष ठेवला पाहिजे. काम हीच पूजा आहे हे कायम मनात आणि ध्यानात ठेवले पाहिजे. एकदा आपण होपलेस झालो कि आपला प्रवास हेल्पलेस कडे होणार ह्याची जाणीव सदैव आपल्याला असावी. तर चला अशावादाचा प्रकाश चोहोकडे पसरवूया, कामकाजाला कष्टाची जोड देवून होपलेसपणाला दूर सारुया आणि मदतीचा हात सर्वाना पुढे करूया.हे सर्व जुळून आणि घडून आले कि तुम्ही एक साधे ,सोपे ,सरळ, सुटसुटीत , सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात कराल.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया

०३३ /१०१ दिनांक ११.११.२०२१

राजू नंदकर , उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७