काम आणि कष्टातून  सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती कशी प्राप्त कराल How to get a feeling of happiness and joy from hard work

काम आणि कष्टातून  सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती कशी प्राप्त कराल How to get a feeling of happiness and joy from hard work

साधारण वीस वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी आणि आम्ही सर्वच मित्र स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असू. आमचा अभ्यास सकाळी आठ वाजता सुरु होत असे व रात्री आठ वाजता संपत असे. हा अभ्यास निश्चितच कष्टसाध्य असल्याने मी दिवसभर खूप थकून जात असे, म्हणजे पाठीला रग लागलेली असे, नोटस काढून काढून बोटांना खड्डे पडलेले असत  आणि त्या उपर पोटात भुकेचे कावळे कोकत असत. पण मला आठवते जेंव्हा संध्याकाळी अभ्यास संपवून मी घरचा प्रवास करायला सुरुवात करत असे त्या वेळेस या कष्टातील एक आनंदची अनुभूती मला माझ्या मनाला नेहमी जाणवत असे. आजचा दिवस सत्कारणी लागला आणि आपण आपली ध्येय आणि उदिष्टे यांच्या कडे  योग्य रीतीने मार्गक्रमण करत आहोत याची ती सुखद अनुभूती होती. हि बाब मी आयुष्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून मार्गक्रमण करतांनी अनेक वेळा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. काम आणि कष्ट याला प्राथमिकता दिली कि त्या मधून एक प्रकारची सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती निर्माण होते हे मी वेळोवेळी अनुभवले. मात्र अशी कष्टातून सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती  प्राप्त करणे, ती वृद्धिंगत करणे आणि ती टिकवून ठेवणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही.मात्र हे एकदा जमले कि तुम्ही शरीराने आणि मनाने तुमच्या कामाशी एकरूप होता त्यातून तुम्हाला समाधान, सुख , आनंद मिळतो आणि तुम्ही यशाकडे वाटचाल करता.प्रस्तुत लेखात आपण कामातील कष्टातून सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती  कशी प्राप्त करायची यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काम आणि कष्ट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीवनरूपी नौका पुढे घेवून जाणेसाठी काम आणि कष्टाला पर्याय राहत नाही. फरक एवढच असतो कि काही कष्ट हे शारीरिक स्वरूपाचे तर काही मानसिक स्वरूपाचे असतात. जर तुम्ही आय टी कंपनीत काम करत असाल तर या कामाचा दबाव डोळे, मेंदू , शरीर आणि मन यावर येत असतो. जर तुम्ही प्लास्टिक मोल्डिंगच्या कंपनीत काम करत असाल तर त्याचा दबाव तुमचे हात, पाय , डोळे, मेंदू आणि मन यावर येत असतो. सांगण्याचे तात्पर्य हेच कि कोणत्याही कामाचा ताण हा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर येत असतो. मात्र असा ताण  आपण कशा  प्रकारे हाताळायचा याचे कसब आपण हस्तगत करणे आवश्यक आणि अनिवार्य असते. नाहीतर सतत ताण निर्माण झाल्याने तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तर धोक्यात येतेच, शिवाय तुमची प्रगती आणि विकास हा उलट्या दिशेने होण्यास सुरुवात होतो. त्यासाठी काम आणि कामासाठी उपसले जाणारे कष्ट यातून सुखदायक  भावना आणि आनंदाची अनुभूती कशी हस्तगत करायची ते समजून घेवूया.

  • कामाचे स्वरूप समजून घ्या : सोपवलेले काम किंवा हाती घेतलेले काम आणि त्याचा आवाका आपण समजून घेत नसल्याने आपल्याला योग्य नियोजन करता येत नाही. नियोजन फसले कि काम फसते. काम फसले कि वेळेचा अपव्यय होतो. वेळेचा अपव्यय झाला कि आर्थिक नुकसान होते.आर्थिक नुकसान झाले कि मानसिक त्रास होतो. एकंदर आपले काम काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे, त्याची वेळ सीमा काय आहे.  हे सर्वप्रथम समजून घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा काहीही नियोजन न  करता आपण कामकाज सुरु करत असल्याने बरेच पुढे गेल्यानंतर कामातील त्रुटी लक्षात येतात आणि कामाचा आणि वेळेचा बट्याबोळ होत असतो. सबब सर्वप्रथम कामाचे स्वरूप समजून घ्या.
  • कामाचे उदिष्ट आणि ध्येय तपासा : तुम्हाला जे काम सोपवले आहे किंवा तुम्ही जे काम करत आहात त्याचे उदिष्टे आणि अंतिम ध्येये काय आहेत त्याची माहिती घ्या. ज्या कामाला आणि कष्टाला अंतिम ध्येय नसते ते काम म्हणजे फक्त ढोर मेहनत असते हे विसरता कामा नये. त्यामुळे तुमच्या कामाचे अंतिम ध्येय निश्चित करा. तुम्ही जर शेतात काम करत असाल तर उत्पादित झालेला माल हा बाजारपेठेत चांगल्या किमतीला विकायचे ध्येय तुमचे असेल. जर तुम्ही खाजगी कंपनीत असाल तर दिलेला जॉब हा कमी वेळात तयार करू एक उत्कृष्ट कर्मचारी म्हणून चांगले पकेज मिळवू हे तुमचे ध्येय राहील. तुम्ही आय टी कंपनीत असाल तर सोपवून दिलेले सोफ्टवेअर तुम्ही कमी  वेळात आणि अचूक पणे तयार कराल कि ज्यामुळे तुम्हाला अजून चांगल पेकेज मिळेल. म्हणजे तुमच्या कामाचे तुम्ही अंतिम ध्येय पहिले निश्चित करणे आवश्यक राहते. तरच त्या कामात तुम्हाला उत्साह येवू शकेल. तसेच प्रत्येक काम हे फक्त आर्थिक मापदंडात असतेच असेही नाही .त्यामुळे सोपवले मापदंड हेच उदिष्टे  आणि ध्येय असतात हे लक्षात घ्या.
  • कामाचे वेळ आणि प्राथमिकता निश्चिती करा : आपल्याला सोपवलेले काम किंवा आपण हाताशी घेतलेले काम हे पूर्णतः समजून घेतले कि त्यातील अनेक घटक यांचे संयोजन कसे करायचे हे ठरवता येते. आपल्याकडे असलेली वेळेची मर्यादा आणि उपलब्ध असलेले संसाधने यावरून कामाची प्राथमिकता निश्चितीकरण करा. कामाची लहान लहान तुकड्यामध्ये विभागांनी करा शक्य असेल तर कामाचे विकेंद्रीकरण करा. कामाची तुकड्यांमध्ये विभागनी झाली कि त्यातील प्रत्येक भागाची किंवा तुकड्याची प्राथमिकता निश्चित करा. आपण काय करतो कि काम न विभागता एकदम डोक्यावर घेतो त्यामुळे एकदम दबाव निर्माण होऊन आपण कोलमडून पडतो.
  • कामाशी प्रामाणिक राहा : कामाशी प्रामाणिक राहणे म्हणजे दिलेले लक्षांक, दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण रीतीने काम पूर्ण करणे होय. लोक सोपवलेली कामे करतात मात्र त्यांच्या सवडीने आणि सोयीने. साहजिकच त्यामुळे कामाशी प्रामाणिक पण राहत नाही आणि काम ज्या गुणवत्तेचे होयला हवे ते होत नाही. एकदा काम मागे पडले कि त्याचा नाहक त्रास आपल्याला होवू लागतो. त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे कामाशी प्रामाणिक राहणे होय.प्रामाणिक राहिल्याने कामातून निर्माण होणारा त्रास हा आपल्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेत व्यवस्थित झिरपतो आणि आपल्याला कामाचा दबाव राहत नाही.
  • कामाशी समरूप व्हा : काम आणि कष्ट हे गुणोत्तर एक समान रीतीने आणि गतीने चालते. काम कष्टाशिवाय नाही आणि कष्ट नाही तर काम नाही. साहजिकच कामाला समरूप होवून कष्ट करणे हि अनिवार्यता ठरते. त्यामुळे योग्य वेळी योग्य प्रकारे कामाला समरूप व्हावे लागते. हि समरुपात काम तर तडीस घेवून जाते आणि त्यातून निर्माण होणारे कष्टाचा त्रास सुद्धा कमी करते. आपले कामाशी जो पर्यंत समरूप होत नाहीत तो पर्यंत त्या कामाची गोडी आपल्यामध्ये निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही.
  • कामाला समर्पित व्हा : कामाला स्वतः समर्पित होणे, हे काम वेळेत आणि गुणवतेने तडीस घेवून जाने साठी आवश्यक असते. समर्पण म्हणजे आपल्या कष्टाची आणि घामाची आहुती काम यज्ञात देणे होय. हे समर्पण दोष विरहित असले कि कष्टाच्या ज्वाला ह्या कामाच्या अग्नीतून बाहेर पडतात. आणि एकदा आपण  या काम यज्ञ कुंडात समर्पित झालो कि काम आणि कष्टाचा त्रास होत नाही. काम हीच पूजा काम हीच भक्ती आणि काम हीच शक्ती म्हणून काम करते. त्यातून एक समर्पणाची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला जातो .
  • कामाचा ताण घेवू नका : ‘कामाचा ताण मी घेत नाही, तर तो येतो’, असे आपल्या पैकी बरेच जण उत्तर देतील. मात्र आपण एकदा तशी मनस्थिती बनवली कि असा ताण येणारच. ताण येत आहे पण मी तो घेत नाही, एवढी जरी खंबीरता दाखवली तरी तणाव कमी होण्यास सुरुवात होते. तणाव हा बऱ्याच अंशी मानसिक असतो. त्यामुळे त्याची सुरुवात हि मानसिकरीत्या होवून त्याचे विपरीत परिणाम शारीरिक होतात . त्यामुळे कामाच्या ठिकाणी काही प्राथमिकता निश्चित करून नियोजन केले कि ताण कमी होतो.
  • कामातील कष्टाला विरोध करू नका : काम म्हटले कि कष्ट उपसावे लागतातच. काम हे कष्टातुच मार्गी लागते. पण आपण जर काम करत असतांना मला कष्ट पडायलाच नको अशी मानसिकता बनवली कि कामाची गती संथ होते. आणि गती कमी झाली कि काम पूर्ण होण्यास वेळ लागतो. वेळ लागला कि कामाचा ताण परत आपल्या दिशेने सरकतो. त्यामुळे जेवढा विरोध कष्टाला तुम्ही कराल तेवढा त्या कष्टाचा त्रास तुम्हाला होईल हे लक्षात घ्या.
  • कामाच्या ताणाला परतून लावू नका: तुम्ही जर कामातून निर्माण होणाऱ्या ताणाला  परतून लावायचा प्रयत्न केला तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होतील आणि तुम्ही जर ताण येतो म्हणून काम थांबवले तर तुमची अपेक्षित उदिष्टे पूर्ण होवू शकणार नाहीत. त्यामुळे बऱ्याच लोकांची फसगत होते. काम टाळावे कि काम करावे अशी फसगत झाली कि शक्यतो काम थांबले जाते किंवा टाळले जाते आणि प्रगतीचा आलेख खाली खाली जाण्यास सुरुवात होते .
  • कामातील तणावाला योग्य प्रकारे प्रवाहित करा : अगोदर सांगितल्या प्रमाणे काम आणि त्याला जोडून येणारे कष्ट  हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. यामुळे याचे महत्व विचारात घेवून आपण काम पूर्ण करत असतानी निर्माण होणाऱ्या तणावाला योग्य प्रकारे प्रवाहित केले पाहिजे. त्याला योग्य दिशा दिली पाहिजे. कामातून निर्माण होणाऱ्या तणावाला प्रवाहित करायला येणे हि खूप महत्वाची बाब आहे. त्यासाठी कामातील अडचणी शेयर करा त्याबाबत चर्चा करा. कामाचा जास्त तणाव येत असेल तर थोडे थांबा पुन्हा काम सुरु करा.
  • कामात थकवा आणि आळस याची भेट होवू देवू नका : काम करत असताना आपल्या शरीरातील उर्जा कामानुरुप खर्च होत असते. शेतीतील किंवा खाजगी कंपनीतील कष्टाचे काम असेल तर शरीरातील उर्जा खर्च झाल्याने तुम्हाला एक प्रकारचा थकवा येत असतो. या थकव्याला आळसा मध्ये रुपांतरीत करण्याचे काम तुमचे मानसिक स्वास्थ आणि संतुलन करत असते. एकदा तुमचा थकवा आणि आळस याची गट्टी जमली कि तुमचे काम अडकलेच म्हणून समजा. त्यामुळे तुमचा थकवा हा मानसिक आळसापासून दूर ठेवायला शिका .
  • कामाचा अपमान करू नका : बऱ्याच वेळा आपण स्टेटमेंट ऐकतो कि मला कामाचा खूप कंटाळा आला आहे! असे बोलून खरे तर कामाचा किंवा कष्टाचा आपण अपमान करत असतो. आपण निवडलेले किंवा आपल्या वाट्याला आलेले काम हे एकदा स्वीकारले कि त्यात तडजोड किंवा चालढकल करता कामा नये. अकारण याचा संयुक्तिक परिमाण आपल्या एकंदर जीवनाच्या वाटचालीवर होतो. त्या मुळे आपले काम मग ते बौद्धिक असो किंवा कष्टाचे असो आपण त्यातून मिळणाऱ्या फायद्याकडेच फक्त लक्ष न देता त्यातून निर्माण होणारी मत्ता व निर्माणधीनता याकडे लक्ष दिले पाहिजे
  • कामाबद्दल मन संकुचित करू नका : आपले मन संकुचित केले कि कामातून व कष्टातून निर्माण होणारे फायदे हे खुरटे व तोकडे होतात. त्यासाठी कामातून आणि कष्टातून निर्माण होणारा ताण आणि त्रास मधून आनंद व सुख शोधण्याचे कसब आपल्याला निर्माण करावे लागणार आहे. हे कसब  आपल्या अंगी रुजवण्यासाठी आपण काय काम करत आहोत किंवा करणार आहोत याच्याशी प्रामाणिक व समरस व्हा. एकदा हि समरसता आली कि कामातील गोडी वाढते व त्या बद्दल आपल्याला प्रेम वाढते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी मन संकुचित करू नका .

अशाप्रकारे उपरोक्त बाबींचा स्वीकार करून आपल्या प्रत्येक कामाचा श्रीगणेशा करायला हवा. कामाला गती देण्याचा प्रयत्न अत्यंत समरूप आणि समर्पित होवून करा. लहान काम, मोठे काम असा भेदभाव करू नका. कामाची चालढकल करू नका. काम आणि कष्ट हाच मानवाचा धर्म आहे. कामातच मानवी जीवनाचे रहस्य सामावलेले आहे. काम आणि कष्ट यातूनच तुमचा विकास आणि आयुष्य घडत असते हे कदापी विसरू नका. आपले लहान काम किंवा मोठे काम आणि कष्ट यातूनच देश घडत असतो आणि विकास पावत असतो. म्हणूनच या बाबी जाणीवपूर्वक स्वीकारून आणि त्यांची अंमलबजावणी आपल्या दैनंदिन कामकाजात करून काम आणि कष्ट यातून सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती घेवून एक सोपे , सरळ , सुटसुटीत , साधे , समाधानी आणि सुखी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा .

जीवन अनमोल आहे ते अधीक सुंदर बनवूया

०३४ /१०१ दिनांक ११.११.२०२१

राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी मुंबई

९९७०२४६४१७