कीटकांचा मेंदू (मज्जासंस्था)एक अपरिचित आश्चर्य

Insect's brain (nervous system) an unfamiliar surprise
कीटकांचा मेंदू (मज्जासंस्था)एक अपरिचित आश्चर्य Insect’s brain (Nervous System) an unfamiliar surprise

         आधी विश्व मग पृथ्वी आणि त्यानंतर सृष्टी असा सर्वसाधारण प्रवास आहे. विश्वाची निर्मिती साधारण १४०० कोटी वर्षापूर्वी बिग बैंग महाविस्फोटाने झाली हे सर्वश्रुत आहे. पृथ्वीच्या निर्मितीला ५०० कोटी वर्ष तर पृथ्वी वरील सृष्टीची निर्मितीला साधारण ३५० कोटी वर्ष पूर्ण झालेली आहेत. पृथ्वीवर अनेक जीव जंतू आणि पशु पक्षी अनादी काळापासून वास्तव्य करत आहेत. यातील एक महत्वाचा जीव म्हणजे कीटक होय. या कीटकांच्या जवळपास ६० ते ८० लाख प्रजाती अस्तित्वात असून त्यापैकी १० लाख प्रजातीचा अभ्यास काही प्रमाणात उपलब्ध झाला आहे.

          कीटकांची आश्चर्यकारक दुनिया या लेखमालेत आपण आज आपण कीटकांचा मेंदू (मज्जासंस्था)एक अपरिचित आश्चर्य बाबत जाणून घेणार आहोत. किटकाचा मेंदू कसा असतो, तो कोठे असतो, तो विचार करतो का, कीटकांना मन आणि भावना असतात का यावरही आपण प्रकाश टाकणार आहोत.

           किटक हा जीव आपल्या अगदी आजूबाजूला वावरणारा असला तरी पण आपण सर्व त्याच्या अनेक गुण वैशिष्ट्या बाबत अत्यंत अपरिचित आहोत. कीटक अत्यंत गुंतागुंतीची वर्तणूक पद्धत दाखवतात, कीटकांची शिकण्याची क्षमता, सामाजिक संवाद आणि स्थानिक अभिमुखता हि गुण वैशिष्टे मानवांच्या क्षमतांची निश्चितच आठवण करून देतात.‎ मेंदू हा अवयव कोणत्याही प्राण्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा कारण शरीरातील इतर अवयव आणि एकंदर शरीराचे संपूर्ण नियंत्रण हा अवयव करत असतो. चालणे, पळणे, उडी मारणे,पाहणे,ऐकणे, आवाज काढणे,शिकार करणे,आकलन करणे, अर्थ लावणे या सारख्या क्रिया आणि प्रतिक्रियावर नियंत्रण असते ते या मेंदूचेच. असा हा मेंदू प्राण्यांच्या मस्तीस्काच्या कवटीत असून तेथून तो या सर्व बाबी नियंत्रित करत असतो.

       किटकामध्ये मात्र हा मेंदू इतर प्राण्यांसारखा नसतो. तर कीटकांच्या शरीरात मुख्य मेंदूं आणि अनेक उपमेंदू असून ते एक मेकांना एका सूक्ष्म अशा धाग्याने जोडलेले असतात. तर काही ठिकाणी त्यांचे एकत्रीकरण झालेले पहावयास मिळते. सर्वसाधारणपणे किटकाचे शरीराचे विभाजन डोके, छाती आणि पोट असे केले जाते. तसेच त्याचे शरीरावर तीन पंखाच्या आणि तीन पायाच्या जोड्या असतात. आश्चर्य म्हणजे या पाचही भागांचे उपमेंदू वेगवेगळे असतात आणि नियंत्रण सुद्धा वेगवेगळे होत असते. डोक्यातील मेंदू, कीटकांचा छातीला तीन कप्पे असतात त्यात तीन  लहान मेंदू तर पोटाला आठ कप्पे असतात तेथे लहान आठ मेंदू असतात. म्हणजे त्या त्या अवयवाचे काम करणे साठी वेगवेगळे मेंदू किटकांमध्ये कार्यरत असतात. तुम्ही डोके तुटलेले झुरळ कित्येक दिवस जिवंत राहिलेले पहिले असेल कारण त्या वेळी शरीरातील उपमेंदू त्याचे विविध कार्य करतात. निश्चितच खाद्य हे तोंडावाटे आत घेतले जात नसल्याने डोक्याच्या ठिकाणी असलेले मुख तुटल्याने ते झुरळ काही दिवसात मरून जाते. मात्र मेंदू नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला असे आपल्याला म्हणता येत नाही. तर तो मृत्य शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने झालेला असतो.

       आपल्या मेंदू मध्ये अनेक चेतापेशी असतात त्यांना आपण न्युरोन म्हणतो तसेच मेंदूतील संदेश शरीराच्या विविध भागात वाहून नेण्याचे काम मज्जातंतू करत असतात. सर्वसाधारण पणे मानवाच्या मेंदूत आठ ते दहा कोटी चेतापेशींचे जाळे पसरलेले असते तर किटकाच्या मेंदूत एक ते दहा लाख चेतापेशीचे जाळे पसरलेले असते. कीटकांच्या शरीरात विविध ठिकाणी जे लहान लहान उपमेंदू असतात त्यांना गंग्लिया असे म्हणतात. डोक्याच्या जवळ मुख्य मेंदू आणि शरीरात इतर ठिकाणी जे उपमेंदू अथवा गंग्लिया असतात त्यातून कीटक चव, वास, तापमान आणि आद्रता याचा अर्थ लावत असतात. तसेच हवेचा प्रभाव आणि कंपणे सुद्धा कीटक माणसापेक्षा जास्त लवकर जाणू शकतात. मानवासारखी उच्च आकलन शक्ती जरी किटकामध्ये  नसली तरी त्यांचा मेंदू अगदी सौम्य स्वरुपात काही गोष्टी लक्षात ठेवू शकतो. तसेच कीटकांच्या जागी एक सोपी आणि साधारण बुद्धीमत्ता असू शकते असे शास्रद्यांना वाटते. त्यामुळे मधमाशा मध गोळा करून पुन्हा त्यांच्या कॉलनी मध्ये परततात. मुंग्या एका विशिष्ट पद्धतीने मार्गक्रमण करतात.तसेच मुंग्या मधील टीम वर्क तुम्ही पाहिले असेल कि ज्या वेळी मुंग्या एक मोठा साखरेचा खडा सामुहिक पणे उचलून घेवून जातात. या मागे त्यांचा मेंदू त्यांना तसे संदेश पाठवून कार्य घडवून आणतो. मात्र संवेदी चेतापेशी कीटकांच्या संपूर्ण शरीरावर पसरलेल्या असतात. कीटकांच्या अंगावर सेन्सिलम नावाचे लहान केस असून त्यामार्फत तापमान आणि आद्रता या बाबत कीटक संवेदना जाणून घेतात आणि त्याप्रमाणे ते त्यांचे मार्गक्रमण आणि वर्तणूक निश्चित करतात.

        कीटकांची मज्जासंस्था पहिली तर अत्यंत साधी मात्र त्यांच्या जीवनविषयक लढाईसाठी ठेवढीच भक्कम अशी असते. झुरळाला आपण जर पकडायला गेलो अथवा मारायला गेलो तर ते किती शिफातीने निसटते किंवा फुलावर बसलेल्या फुलपाखराला आपण लगेच धरू शकतो का? हे सर्व काही घडते ते किटकांकडे असलेल्या विकेंद्रित अशा मेंदू संरचनेमुळेच. शरीराच्या त्या त्या भागाचे कार्य आणि नियंत्रण हे त्या त्या भागातील उपमेंदू करत असल्याने किटकाच्या क्रिया आणि प्रतिक्रिया जलद गतीने होतात. शिवाय कीटकाच्या शरीराची वाढ जी जलद गतीने होते ती यामुळेच. तसेच कीटक त्यांच्या प्रत्येक जनरेशन मध्ये बदल तात्काळ घडवून आणतात ते या मुळेच. आपण पहिले आहे कि एकच कीटकनाशक जर एक ठराविक कीड रोखण्यासाठी जर वर्षोनोवर्ष फवारले गेले तर ते कीटक त्यांच्यामध्ये आवश्यक असे बदल घडवून आणतात कि ज्यामुळे  त्या औषधाची मात्र त्या कीटकांना लागू पडत नाही. यामागे कीटकांची मेंदू, मज्जातंतू आणि मज्जापेशी महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या गुणसुत्रांमध्ये आवश्यक ते बदल घडून येवून ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये अंतर्भूत केले जातात.   

          एकंदर कीटक आणि त्यांचे जग हे आपल्याला नेहमी बुचकाळ्यात टाकणारे आणि आश्चर्यचकीत करणारे राहिलेले आहे. या किटकांविषयी जाणून घेवू तेवढे कमीच आहे. प्रत्येक किटकांची प्रजाती एक वेगळे आणि वैशिष्टपूर्ण असे गुण विशेष धारण करते. मानवाला या गुण वैशिष्ट्याचे आकर्षण राहिले आहे. चला या कीटकांच्या आश्चर्यकारक दुनियेत पुढच्या भागात अजून काही तरी नवे जाणून, समजून आणि उमजून घेवूया.

 

००४ /१०१ दिनांक १३.११.२०२१

राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी मुंबई

९९७०२४६४१७