शारीरिक व मानसिक आरोग्य व्यवस्थापन(Physical and Mental Health Management ) 

शारीरिक व मानसिक आरोग्य व्यवस्थापन(Physical and Mental Health Management ) 
        आरोग्यम धनसंपदा किंवा हेत्ल्थ इज वेल्थ असे आपण नेहमी ऐकतो व म्हणतो पण त्याची अंमलबजावणी आपण दैनंदिन आयुष्यात करतो का ? हा एक मोठा गहन प्रश्न आहे. आरोग्य शिक्षण फक्त पुस्तकी स्वरुपात बंदिस्त केलेले आढळून येते त्यामुळे शरीर ही जी आपली निसर्गदत्त संपती आहे तिच्या कडे लक्ष न दिले जाता भौतिक व तात्काळ मिळणार्‍या सुख व ऐश्वर्य कडे लक्ष दिले जाते. वास्तविक सध्याच्या काळात आयुष्याविषयी झालेली अनास्था व असणारी अनिश्चितता यामुळे  मनुष्य प्राणी हा भौतिक सुखाकडे जास्त आकृष्ट झाला आहे. माझे जीवन हे अनमोल आहे, माझे शरीर ही माझी संपती आहे, शरीर कमवले पाहिजे असे जरी आपण विध्यार्थी दशेत वदवून घेत असलो तरी त्याचा विरोधाभास पुढील आयुष्यात झालेला दिसून येतो. आपले जीवन अनमोल आहे आपले शरीर ही आपली संपत्ती आहे आणि तिचे जतन, रक्षण व संवर्धन करणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे,हे स्वतच्या मनावर बिंबवले पाहिजे.  
      
        मेंदू, हृदय, फुफुसे, यकृत, किडनी हे शरीरातील पाच अवयव आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मात्र आपण या अवयवांवर किती प्रमाणात प्रेशर अथवा दाब निर्माण करत आहोत हे आपण समजून घेत नाहीत. सरासरी ५० ते ७० किलोग्रामच्या दरम्यान आपले वजन आवश्यक असताना आपण काही लोक ७० ते १०० किलोग्राम वजन घेवून आयुष्य कंठत असतात. साहजिकच या अवयवांना त्याच्या सर्वसाधारण कामापेक्षा दीड ते दुप्पट पट काम करावे लागते . त्या मुळे जर हे पाच अवयव दिड पट काम करत असतील तर ६०-७० वर्ष व दुप्पट काम करत असतील तर ४०-५० वर्ष पर्यंतच मानवाचे आयुष्य सीमित होते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेतान आपले वजनाचा बीएमआय १८ ते २४ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे एखांद्या व्यक्तीची ऊंची १६० से मी असेल व वजन ६० किलो असेल तर त्याचा बीएमआय हा 22 ते 24 च्या दरम्यान येतो हे एक चांगले निर्देशांक आहे.
        
        आपला आहार हा सुद्धा खूप महत्वाची बाब आहे हे लक्षात घ्यावे. आपण काय खातो ,किती खातो ,कसे खातो व किती वेळा खातो हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. आपला आहार सकस व पौष्टिक असावा म्हणजे नक्की कसा असावा याबाबत अनेक समज गैरसमज पसरले आहेत .आपली शरीराची ऊर्जा व उत्साह टिकवून ठेवण्यासाठी १८०० ते २००० उष्मांक निर्माण  करणारा व आपला BMI २४ च्या आत ठेवणारा आपला आहार असावा. अजून विस्ताराने पाहायचे झाल्यास प्रती दिवस २०० ते ३०० ग्राम कार्बोदके, ४०-६० ग्राम प्रोटीन , ५०-७० ग्राम स्निग्ध पदार्थ , २०-३० ग्राम फायबर्स, विटामीन व मिनरल आवश्यक त्या प्रमाणात आपल्याला आहारातून मिळायला हवेत. या अनुषंगाने विविध पदार्थ ,भाज्या, फळे यांचा समावेश आपल्या आहारात आहे का याबाबत आपण जागरूक असायला हवे. आपल्या खाण्याच्या वेळा ह्या कमाल २ असाव्यात व सरासरी  सकाळच्या जेवणाची वेळ ही दुपारी एक च्या आसपास व रात्री च्या जेवणाची वेळ आठच्या आसपास असावी.
     
      दुसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे आपला शारीरिक व्यायाम होय. व्यायाम बाबत बोलायचे झाल्यास व्यक्तीची दोन ग्रुप मध्ये विभागणी करावी लागते. पहिला ग्रुप म्हणजे असे लोक की जे दिवसभर शारीरिक कष्टाची कामे करतात व दूसरा ग्रुप म्हणजे शारीरिक कष्टाच्या कामाशी संबधित नसलेला ग्रुप. या दुसरे ग्रुप मध्ये आपण असू तर आपण रोज किमान ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करणे अनिवार्य व अत्यावश्यक आहे. माझे असे निरीक्षण आहे की कष्टाचे काम न करणारे सरासरी ५-७ टक्के लोकच शारीरिक व्यायाम कडे लक्ष देत असतात. इतर लोक आपल्या शरीरसंपदे कडे लक्ष देत नाहीत  त्या मुळे ते लवकर रक्तदाब, मधुमेह  या सारख्या व्याधीने ग्रस्त होतात .
  
      तिसरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे झोप. झोप ही मानवी शरीरास अत्यंत उपयोगी बाब आहे. आपला मेंदू आपल्या शरीराने निर्माण केलेल्या उर्जेपैकी ३० टक्के ऊर्जा वापरत असतो. त्याच सोबत सारखे काम करत राहिल्याने त्याला एक प्रकारचा थकवा येत असतो. हा थकवा दूर होणे साठी आपल्याला झोप आवश्यक असते. मात्र सध्या सोशल मीडिया च्या युगात ही झोप सरासरी ४-६तास झाली आहे. त्यामुळे हळू हळू निद्रानाश व चिडचिडेपना निर्माण होत आहे.सरासरी ७-८तास झोप शरीरासाठी आवश्यक आहे.      
          शारीरिक आरोग्य हा विषय ज्या प्रमाणे चर्चिला जातो त्यावर विचार मंथन केले जाते अगदी तसे मानसिक आरोग्य बाबत होताना दिसत नाही. शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य तसे पहिले तर नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र शारीरिक आरोग्य सोबतच मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य हे आपले मन व त्या मधून निघणारे विचार आणि भावना याच्याशी निगडीत असते. तसेच मानसिक आरोग्यावर आपला स्वभाव, आपले वर्तन व आपल्या सवयी ह्या सुद्धा प्रभाव टाकत असतात. मानसिक आरोग्य ढासळण्याचे मुख्य कारण म्हणजे आपले जीवन व सभोवतालची परिस्थिति हिच्याशी मेळ न घालता येणे होय. दिवेसेनदिवस या धावपळीच्या व धाक धकीच्या जीवनता व्यक्ति हा मानसिक तणावखाली असून त्याचे विपरीत परिणाम त्याच्या शारीरिक आरोग्यावर सुद्धा होत आहेत हे ध्यानात घेयला हवे. अनेक शारीरिक रोगांचे मूळ हे मानसिक आजारात आहे हे आता संशोधनअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे मानसिक आरोग्याचीयोग्य चिकीत्सा करणे व त्यावर योग्य असे उपचार करणे आवश्यक आहे.
     
          सकारात्मक जीवन शैलीचा अंगीकार करणे व भौतिक सुखांच्या मागे न लागता वस्तुस्थिती काय आहे याची जाणीव झाली की हळू हळू मानसिक तणाव कमी होवून मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यासाठी सकारात्मक लोकांसोबत राहणे, आपले राहणीमान बदलणे, आपल्या गरजा किमान ठेवणे, वाईट सवयीचा त्याग करणे, शॉर्ट कट मार्ग न अवलंबणे, संभाषण कौशल्य अवगत करणे ,अडचणीत सापडलेल्या व्यक्तिला मदत करणे , सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे, आपले चांगले छंद जोपासणे, वाचन करणे  या सारख्या बाबींचा स्वीकार आपण केल्याने मानसिक तणाव मधून आपण बाहेर पडून एक सुखी व समाधानी आयुष्याच्या नावेवर स्वार होवू शकू.तसेच योग , प्राणायाम , ध्यान धारणा , विपश्यना या सारख्या मानसिक आरोग्य अजून भक्कम  करणार्‍या पद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. या बाबत योग्य सल्ला व मार्गदशन घेवून आपण हे करू शकतो. योग केल्याने तुमचे शरीर लवचिक होते. प्राणायाम मुळे  शरीरात प्राणवायुचा पुरवठा वाढून शरीरातील अनावश्यक द्रव्ये उत्सर्जित होतात. ध्यानधारणा मधून आपल्या स्वत:चा शोध आपल्याला घेता येतो.
  
         खिलाडू वृती असणे हे फक्त मैदानात नाही तर दैनंदिन आयुष्यातही उपयोगी पडणारी बाब आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने किमान वय वर्ष ४५ पर्यंत तरी खिलाडू वृती ठेवणे आवश्यक आहे. या साठी किमान एक सांघिक व एक वैयक्तिक खेळ जाणीव पूर्वक विकसित करणे आवश्यक आहे. आपण दैनंदिन खेळ खेळत असू तर उत्तमच परंतु आठवड्यातून किमान दोन दिवस हे मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्या मुळे तुमचे रक्तभिसरण सुधारते, शरीर लवचिक होवून एक काटकपणा शरीरात निर्माण  होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे मानसिक आरोग्यावर याचा खूप सकारात्मक परिणाम होत असतो.  
      
         मोबाइलच अति वापर केल्याने दृष्टीवर विपरीत परिणाम होत असून त्या मुळे मेंदूवर अनावश्यक दाब निर्माण होत आहे. सलग काही तास मोबाइल पहिल्याने मानेचा मनक्यात  गॅप पडण्याचा धोका आहे हे लक्षात घ्यावे. त्या मुळे मोबाइलचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर करून आपण स्वत:चे नुकसान तर करतच आहोत त्या सोबत समाज व देशाचे नुकसान करत आहोत. सोशल मेडिया साइट्स वर आपण व्यस्त राहत असाल तर तुमची क्रियाशक्ति आणि क्रयशक्ती यावर गंभीर परिणाम होणार आहेत.
         मेंदू, हृदय, फुफुसे, यकृत, किडनी या शरीरातील पाच महत्वाच्या अवयवांची काळजी घेणे. आपला आहार योग्य व संतुलित राखणे, किमान रोज अर्धा तास शारीरिक व्यायाम करणे. किमान एक खेळ वृद्धिंगत करणे. किमान रोज ७ तास पुरेशी झोप घेणे. सकारात्मक जीवन शैलीचा अंगीकार करणे. भौतिक सुखांच्या मागे न लागता अपेक्षा व वस्तुस्थिती यातील अंतर कमी करणे. योग,प्राणायाम व ध्यानधारणा योग्य मार्गदर्शन करणे. या सर्व बाबींचा स्विकार करणे भविष्यात अनिवार्य व अत्यावश्यक ठरणार आहे. हीच सुखी आणि समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली आहे. 
राजू नंदकर,उपजिल्हाधिकारी मुंबई,
बीएस्सी (कृषि),एमबीए,एमए 
९९७०२४६४१७