तुमची सप्तचक्र जाणून घ्या !

तुमची सप्तचक्र जाणून घ्या !

       आपले अस्तित्व हे एकाकी आणि अलिप्त नसून ते अनेक अंतर्गत आणि बहिर्गत घटक आणि बाबी याच्याशी संयोग आणि समयोजन साधत असते. विविध घटक आणि बाबी यात आपली शरीर ऊर्जा, मेंदूतील सूक्ष्म तरंग, मनातील भावना, मनातील विचार, कुटुंब, समाज आणि पंचमहाभूते यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यांनाच सप्तचक्रे असे संबोधले जाते. ही सर्व चक्रे एकमेकात गुंफलेली असतात. ही चक्रे कधी कधी एकत्रित अस्तित्व दर्शवतात तर कधी कधी वेग वेगळे. मानवी जीवन आणि त्याची अस्तित्वाची निश्चिती करत असतांनी ही चक्रे जाणून घ्यावी लागतात. तसेच त्यांचे वहन, संयोग आणि संयोजन योग्य प्रकारे होईल हे पहावे लागते. हे सातही चक्र समजून घेवून त्याचे वहन, संयोग आणि संयोजन योग्य प्रकारे साधल्यास जीवन अधिक सुखी आणि समृद्ध होते. प्रस्तुत लेखात ह्या सात चक्रांबाबत आपण विवेचन करणार आहोत.

आपल्या शरीरात अस्तित्वात असलेल्या ऊर्जेचे पहिले चक्र असते. मानवी शरीर हे पेशी आणि उत्ती या पासून बनलेले असते. प्रत्येक पेशी हे ऊर्जेचे केंद्र असते. साहजिकच या ऊर्जेचे वहन आपल्या शरीरात होत असते. ही ऊर्जा वापरुन मेंदूसह इतर अनेक अवयव आपले विविध प्रकारचे कार्य पार पाडत असतात. साहजिकच या ऊर्जेचे वहन हे समप्रमाणात, समपातळीत आणि समदिशेने व्हावे लागते. ज्या वेळी आपण अधिक लठ्ठ आणि अधिक कुश होतो त्यावेळी ऊर्जा चक्रात अडथळे निर्माण होतात. जेंव्हा या ऊर्जेच्या वहनात अडथळे निर्माण होतात त्या वेळी शारीरिक विकार तयार होतात. सबब आपले ऊर्जेचे चक्र हे योग्य प्रकारे कार्यरत राहील, याबाबत आपण दक्ष राहायला हवे. त्यासाठी चांगला आणि शुद्ध असा आहार घेवून त्याला शारीरिक व्यायामाची जोड द्यावी लागते.

दुसरे चक्र असते ते कंपने किंवा तरंग लहरी यांचे. आपला मेंदू अति सूक्ष्म लहरी आणि तरंग निर्माण करतात. यामध्ये गॅमा, बीटा, अल्फा, थिटा आणि डेल्टा या लहरी किंवा तरंग यांचा समावेश होतो. इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम द्वारे मेंदूतील वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या लहरी मोजतात. गॅमा तरंग हे ३० हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता निर्माण करतात. आपला मेंदू ज्यावेळी तल्लख आणि हुशार असतो आणि निर्णयक्षम असतो त्यावेळी गॅमा अवस्था असते. बीटा तरंग हे १३-३० हर्ट्झ वारंवारता निर्माण करतात. ज्यावेळी आपण जागरूक असतो आणि आकलनक्षम असतो त्यावेळी आपली बीटा अवस्था असते. अल्फा तरंग हे ८-१२ हर्ट्झ वारंवारता निर्माण करतात. आपण काम शांतपणे मन लावून करतो त्यावेळी अल्फा अवस्था असते. थिटा तरंग हे ४-८ हर्ट्झ वारंवारता निर्माण करतात. ज्यावेळेस आपण संमोहन स्थिती, कल्पनारम्य, सृर्जनशील, खोलवर आठवणीमध्ये, ध्यानात, अध्यात्म ,योग यात असतो त्यावेळी थिटा अवस्था असते. डेल्टा तरंग हे ४  हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता निर्माण करतात. आपण ज्यावेळी झोपेत असतो त्यावेळी ती डेल्टा अवस्था असते.  आपला जीवनविषयक प्रवास सुसह्य कसा होईल यासाठी आपण कायम प्रयत्नशील असतो. साहजिकच आशा वेळी विविध तरंग आणि लहरी आणि त्यांचा मन आणि मेंदू यांचेशी संबंध समजून घेवून त्या प्रमाणे त्याला अधिक जागरूक आणि तल्लखपणाने काम करावे लागते. या विविध अवस्था आणि त्यातील तरंगचक्र कळले की आपण त्याप्रमाणे ध्यान ,प्रार्थना, अध्यात्म, योग आणि प्राणायाम याचा वापर करून उच्च अनुभूती प्राप्त करू शकतो.  

तिसरे चक्र असते ते भावनांचे. आपले मन सहा प्रमुख भावना निर्माण करते. मानवी मन ही एक जाणीव आहे. मानवी मेंदू हा विलक्षण स्वरूपाचा एक क्लिष्ट शारीरिक अवयव असून तो अनेक महत्वाच्या बाबींचे केंद्र आहे. जे काही निर्माण होते ते तेथूनच आणि जे काय घडवून आणले जाते ते तेथूनच. मानवी मन आणि मेंदू हे विविध प्रकारच्या जोडण्या साधत असतात. ह्या जोडण्या जैव रासायनिक प्रक्रिया, विद्युत रासायनिक प्रक्रिया आणि विविध संप्रेरके यांचे स्राव यातून निर्माण होत असतात. ह्या जोडण्या साधत असताना त्यातून बाह्य अथवा अंतर्गत प्रभावामुळे भावना निर्माण होतात. विशेषतः अशा भावना ह्या मेंदूच्या खोलवर आणि मध्यभागी असलेले आमयग्डला या भागातून निर्माण होतात. तसेच मेंदूचे इतर भाग सुद्धा परस्पर पूरक रीतीने विविध प्रकारच्या भावना निर्मिती मध्ये सहभाग घेत असतात. साहजिकच या जोडण्या, परस्पर सहसंबध यातून मानवी मन हे विविध प्रकारच्या भावनाची निर्मिती करत असते. यात काही मुख्य भावना आणि उप भावना यांचा समावेश होतो. आपल्या मनात ज्या भावना तयार होतात त्यात आनंद, सुख, समाधान दुःख, वेदना, भीती, राग, क्रोध, आश्चर्य, तिरस्कार, द्वेष, मत्सर, इच्छा, समाधान, तृप्तता, गर्व, लालसा, प्रेम, करुणा, दया, मोह, अहंकार, खिन्नता, औदासिन्य, कंटाळवाणे, काळजी, माया, हेवा, असूया, घृणा, स्तुती ,कौतुक, उत्सुकता, एकाकीपण याचा समावेश होतो. या भावना  बदलणार्‍या आणि तीव्र आणि सौंम्य स्वरुपाच्या असतात. तसेच या भावना कधीच एकसमान नसतात. या भावनाचे मुख्य वैशिष्टे असे की त्या व्यक्तीपरत्वे आणि व्यक्तीगणिक असतात. म्हणजेच त्यांचे अस्तित्व हे व्यक्तिनिहाय बदलणारे असते.  साहजिकच मानवी जीवनात या भावनांना अनन्य साधारण असे महत्व प्राप्त होत असते. मानवी आयुष्य हे या विविध भावनांच्या भोवतीच फिरत असते किंवा या भावनाच माणसाचे आयुष्य गतिमान करत असतात. व्यक्तीच्या आयुष्यात जे चढ उतार येतात ते या भावभावना मुळेच. या भावना माणसाला नियंत्रित करतात, तसेच याच भावनामुळे माणूस अनियंत्रित आणि स्वैर सुद्धा होतो. जे काही आजूबाजूला आणि आयुष्यात घडत त्यावर भावनाचा प्रभाव खूप मोठा असतो म्हणजेच माणसाचे संपूर्ण आयुष्य हे भावनांनी व्यापलेले असते. भावनांना योग्य प्रकारे समजने आणि त्यांना योग्य प्रकारे प्रवाहीत करणे हे काम आपले मन करत असते.

चौथे चक्र असते आपल्या विचाराचे. मेंदूला आपले पाच ज्ञानेद्रिये अनेक प्रकारचे माहितीची रसद पुरवत असतात. ही माहिती आपल्या मेंदूकडे विविध ज्ञानेद्रिये मार्फत जेंव्हा पोहचते, ती त्या वेळी फक्त माहिती विस्कळीत स्वरुपात असते. एकदा ही माहिती प्राप्त झाली की मेंदूमध्ये भूतकाळात साठवलेल्या महितीशी तिचा संबध येवून आकलन होते. हे आकलन होत असताना नवीन मिळालेली माहिती स्मृति केंद्रात साठवली जाते. म्हणजे माहिती प्राप्ती आणि तिची आकलन आणि तिची साठवणूक अशी प्रक्रिया निरंतर चालू असते. अशा प्रकारे या नव्या माहितीचा पूर्वीच्या साठविलेल्या माहितीशी अर्थ लावून अथवा जोडून मनातल्या मनात काही आखाडे बांधले जातात त्याला आपण विचार म्हणतो. मात्र हे विचार प्रत्येक वेळेस समोर आलेल्या वस्तू अथवा घटनेशी निगडीत नसतात तर ते अत्यंत स्वैर आणि असंबद्ध असेही असतात. हे विचार ज्या वेळी सुसंघटीत रीतीने मांडले जातात तेंव्हा ज्ञान तयार होते. आणि याच ज्ञानाचा वापर वाढ, प्रगती आणि विकास यासाठी केला जातो. या मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक विचाराचे वलय असते. त्यामुळे चांगले विचाराची बैठक ठेवणे आणि आपली विचारशैली ही सकारात्मक ठेवणे याबाबत विचार चक्र योग्य पद्धतीने कार्यात्मक ठेवावे लागते.

पाचवे चक्र असते आपल्या कुटुंबाचे. आपल्या कुटुंबात आपले पती किंवा पत्नी, मुले ,आई-वडील, भाऊ-बहीण यांचा समावेश होतो. जर संयुक्त कुटुंब असेल तर सदस्यांची संख्या जास्त असते आणि केंद्रीत कुटुंब असेल तर ही संख्या साधारण तीन किंवा चार असते. कुटुंब हा मानवी जीवनांचा अविभाज्य असा भाग आहे. आपल्याला कुटुंबापासून वेगळे आणि कुटुंबाला आपल्यापासून वेगळे करता येत नाही. सुख आणि दु:ख वाटून घेणारे सोबत असतील तरच जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तसे नसेल तर ते जीवन हे नीरस आणि बेचव होवून जाते. आपल्या कुटुंबाचा मोठा प्रभाव आपल्यावर असतो. कुटुंबातील वातावरण कसे आहे? यावर आपली प्रगती निर्धारण होत असते. जर कुटुंबात कटकटी आणि वाद असतील तर त्यामध्ये आपला बराच वेळ जातो, शिवाय मानसिकता सुद्धा खराब होते. हेच वातावरण आनंदी आणि सोहदपूर्ण असेल तर प्रगती आणि विकास जास्त होतो. त्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबाचे नेतृत्व करावे लागते आणि सोबत सामंजस्य भूमिका ठेवून सर्व सदस्यांना वेळ आणि न्याय द्यावा लागतो. आर्थिक मदत जेवढी महत्वाची आहे, तेवढीच मानसिक आणि भावनिक मदत महत्वाची आहे, हेही लक्षात घ्यावे लागते.त्यामुळे कुटुंबाचे चक्र महत्वाचे ठरते.

सहावे चक्र असते ते आपण ज्या समाजात वावरतो आणि त्या समाजाचे आपण घटक असतो त्या समाजाचे. कोणताही व्यक्ति हा एका समाजात जन्माला येतो आणि त्या समाजात वावरतो. समाजाच्या चाली, रिती, रिवाज श्रद्धा, परंपरा ह्या त्याला पाळाव्या लागतात. समाजभिमुख त्याला कायम राहावे लागते. जर तो समाजविमुख झाला तर समाजाकडून होणारे परस्पर सहकार्य संपुष्टात आल्याने त्याची प्रगती खुंटते. त्यामुळे आपण समाजाचे एक महत्वाचे असे घटक आहोत आणि समाजाशी सलग्न राहूनच आपल्याला जीवन व्यतीत करावयाचे आहे. हे आपण कायम ध्यानात आणि मनात ठेवावे लागते. सामाजिकत्व हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. कुटुंब पद्धती ही समाजाची एक बैठक आहे. त्यामुळे समाजात काय घडते हे डोळसपणाने पहावे लागते. तसेच सामाजिक कामात आणि कार्यात आपला सहभाग नोंदवावा लागतो. जेवढी आपली सामाजिक बुद्धिमता वाढेल तेवढी तुम्ही अधिक प्रगती करून यशस्वी होता.त्यामुळे हे चक्र कायम कार्यान्वित ठेवावे लागते.

सातवे आणि शेवटचे चक्र असते ते पंचमहाभूताचे. पंचमहाभूतामध्ये पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश यांचा समावेश होतो. या पंचमहाभूता सोबत आपल्याला कायम संयोजन करावे लागते. पृथ्वी म्हणजे आपली धरती की सर्व जिवांचे भरण, पोषण आणि संरक्षण करते. धरतीमातेसाठी आपण कायम नतमस्तक आणि कृतज्ञ असे असायला हवे. जल हे जीवन आहे. महाभारताच्या शांति पर्वात जल बाबत श्लोक आढळून येतो. अद्भिः सर्वाणि भूतानि जीवन्ति प्रभवन्ति च। तस्मात् सर्वेषु दानेषु तयोदानं विशिष्यते।। याचा स्वैर अर्थ असा की, जल मधूनच सर्व प्राणीमात्र यांना जीवन प्राप्त होते आणि सर्व दानामध्ये जलदान सर्वश्रेष्ट आहे. जल वाया जाणार नाही किंवा दूषित होणार नाहीत, याबाबत अधिक कटाक्ष ठेवला पाहिजे. अग्नि बाबत ऋग्वेद मधील पहिलाच श्लोक त्याचे महत्व विशद करतो. तो असा आहे ‘ॐ अग्निमीले पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम्।‘ यात अग्नीची पुजा पुरोहितद्वारे यज्ञ करून केल्याने अनेक लाभ मिळतात असे सांगून यज्ञ महत्व संगितले आहे. साहजिकच मानवी उत्क्रांतीत सर्वात जास्त गती दिली ती अग्निनेच.त्यामुळे आपण अग्नि पुढे कायम नतमस्तक राहावे. वायु हा जीवनाचा आधार आहे आणि वायु नसेल तर जीवन नाही. मात्र हा वायु आपण नित्य नेमाने सेवन करत असतो. असा वायु प्रदूषित होणार नाही याबाबत आपण दक्ष असायला हवे. आकाश ही नुसती पोकळी नाही तर ते आपले कवच किंवा छत्र आहे. आकाशामधून वर्षा आपले अस्तित्व दर्शवते आणि जल निर्मिती करते. साहजिकच पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या चक्राचा आपण कायम आदर करायला हवा.

एकंदर शरीर ऊर्जा, सूक्ष्म तरंग, भावना, विचार, कुटुंब , समाज आणि पंचमहाभूते ही चक्रे आपले जीवन कार्यशील आणि गतिमान करतात. आपली शरीर ऊर्जा ही योग्य प्रकारे वाहते का? या बाबत दक्षता ठेवावी लागते. त्यासाठी आपला आहार आणि व्यायाम याची जोड द्यावी लागते. मेंदू आणि शरीर यातून निर्माण होणारे तरंग हे ध्यान ,प्रार्थना, अध्यात्म, योग आणि प्राणायाम याचा स्विकार करून योग्य आणि समान पातळीवर ठेवावे आणि त्यातून सुखाची अनुभूति घ्यावी लागते. भावना माणसाला नियंत्रित करतात, तसेच याच भावनामुळे माणूस आनंदी आणि सुखी होतो. जे काही आजूबाजूला आणि आयुष्यात घडत त्यावर भावनाचा प्रभाव खूप मोठा असतो. म्हणजेच माणसाचे संपूर्ण आयुष्य हे भावनांनी व्यापलेले असते. भावनांना योग्य प्रकारे समजने आणि त्यांना योग्य प्रकारे व्यवस्थापन करून प्रवाहीत करणे आवश्यक ठरते. आपले विचार ज्या वेळी सुसंघटीत रीतीने मांडले जातात तेंव्हा ज्ञान तयार होते आणि याच ज्ञानाचा वापर वाढ, प्रगती आणि विकास यासाठी केला जातो. सकारात्मक आणि नकारात्मक विचाराचे वलय आपल्या भोवती असते. त्यामुळे आपली विचारशैली ही सकारात्मक ठेवावी लागते. आपल्याला आपल्या कुटुंबाचे नेतृत्व करावे लागते आणि सोबत सामंजस्य भूमिका ठेवून सर्व सदस्यांना न्याय द्यावा लागतो. आर्थिक मदत जेवढी महत्वाची आहे तेवढीच मानसिक आणि भावनिक मदत महत्वाची असते. सामाजिकत्व हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे तर  कुटुंब पद्धती ही समाजाची एक बैठक आहे. त्यामुळे समाजात काय घडते हे डोळसपणाने पहावे लागते. तसेच सामाजिक कामात आणि कार्यात आपला सहभाग नोंदवावा लागतो. जेवढी आपली सामाजिक बुद्धिमता वाढेल तेवढी तुम्ही अधिक प्रगती करून यशस्वी होता. पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश ही चक्रे आपल्याला पूर्णत्व प्राप्त करून देतात. शरीर ऊर्जा, सूक्ष्म तरंग, भावना, विचार, कुटुंब ,समाज आणि पंचमहाभूते या सप्तचक्रा आधारे आपले जीवन साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी होते.

जीवन अनमोल आहे. ते अधिक सुंदर बनवूया.

५९/१०१ दिनांक ११.०३.२०२३

सुखाच्या शोधात ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७