सामाजिक बुद्धिमत्ता Social Intelligence

सामाजिक बुद्धिमत्ता Social Intelligence

बुद्धिमत्ता ही एक मानसिक क्षमता आहे. बुद्धिमत्ता ही एक ज्ञानाचा संग्रह असून ती काही अंशी अंगभूत आणि काही अंशी बाह्यभूत आहे. आकलनातून आणि अनुभवातून ज्ञान मिळते आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर जीवन सुसह्य करण्यासाठी केला जातो यालाही बुद्धिमत्ता म्हणतात. बुद्धिमत्ता ही एक सर्वसमावेशक अशी संकल्पना असून तिची विभागणी अध्ययन बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता या तीन मुख्य प्रकारात केली जाते. अध्ययन बुद्धिमत्ता प्रमाणे मागील काही दशकात सामाजिक बुद्धिमत्ता बाबतही संशोधन चालू आहे. मानव हा मानवी समाजाचा एक विभिन्न असा अंग किंवा घटक आहे. त्याला समाजापासून कदापि वेगळे करता येत नाही आणि तो सुद्धा समाजा शिवाय वेगळा राहू शकत नाही. तो समाजात जन्माला येतो, समाजात वाढतो आणि समाजातच मृत्यू पावतो. समाज हा त्याच्यासाठी आणि तो समाजासाठी अशी जोडणी आणि बंध हे कायम अस्तीत्वात असतात .साहजिकच त्याला या सामाजिक परिघात राहून आपल्या जीवनाची परिक्रमा करावी लागते. समाजातील त्याचे स्थान आणि अस्तित्व हे अनेक घटकांवर अवलंबून असते त्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपली सामाजिक बुद्धिमत्ता होय. सामाजिक बुद्धिमत्ता किती? आणि कशी आहे? यावर त्याचे समाजातील स्थान, अस्तित्व, प्रगती आणि विकास बर्‍याच अंशी अवलंबून असते. सामाजिक बुद्धिमत्ता उत्तम आणि उच्च दर्जाची असणारी माणसे यशाच्या उच्च शिखरावर पोहचलेली पाहावयास मिळतात. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? सामाजिक बुद्धिमत्ता कशी फायदेशीर ठरते? सामाजिक बुद्धिमत्तेचे विविध घटक कोणते? यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण प्रस्तुत लेखात करणार आहोत.

सामाजिक बुद्धिमत्ता ही एक सर्वसमावेक्षक, समग्र आणि एकात्मिक अशी बाब आहे. सामाजिक बुद्धिमत्तेच्या आधारे सामाजिक परिघात स्वत:ला आणि इतरांना समजून घेतले जाते आणि स्थान निश्चिती केली जाते. सामाजिक बुद्धिमता ही इतरांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया समजून आणि उमजून घेण्याची क्षमता दर्शविते. समाजातील घटकांचे वर्तन आणि सवयी ह्या समजून घेण्याची आणि त्या आधारे आपली कृती आणि प्रतिक्रिया देण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. सामाजिक जाणिवा आणि सामाजिक समस्या ठळकपणाने समजून घेणेची पात्रता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. तसेच समाजात सहजपणे वावरणे म्हणजे सुद्धा सामाजिक बुद्धिमत्ता होय. एकंदर समाजात शहाणपणाने वागणे आणि समाजाने तुमचे शहाणपण स्वीकारणे म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. सामाजिक बुद्धिमत्ता मध्ये अनेक घटक आणि बाबी यांचा समावेश होतो. यामध्ये परस्पर सहकार्य, संवाद कौशल्ये, सह संबध, आंतरवैयक्तिक संबंध, सामाजिक संघर्ष व्यवस्थापन, सामाजिक बांधिलकी, वचनबद्धता, चांगल्या गोष्टीचे समर्थन, संयम, सांस्कृतिक अभिमुखता, सामाजिक समानभूती, समन्वय, सहयोग, वागण्याची रीत इत्यादि बाबींचा याचा समावेश होतो. या सर्व बाबी आणि घटक यांचा एकत्रित परिणाम आणि प्रभाव आपल्या सामाजिक बुद्धिमत्तेत दिसून येतो.

समाज हा एका चौकटीत राहतो आणि सामूहिकपणाने पुढे मार्गक्रमण आणि वाटचाल करत राहतो. या समाजाच्या परिघात लोक जन्माला येतात आणि मृत्यू पावतात मात्र समाज त्याच गतीने पुढे चालत राहतो. समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून या सामाजाच्या सामूहिक अशा रूपाशी आपल्याला परिचित व्हावे लागते. या समाजाशी आपण कसे एकरूप होतोय आणि या समाजासोबत कसे संयोजन साधतो यावर तुमची वाटचाल आणि तुमचे भवितव्य अवलंवून असते. या समाजासोबत तुम्हाला संयोजन आणि समन्वय साधता आला नाही तर तुम्ही समाजाच्या बाहेर फेकले जावून तुमची एकट्याची वाटचाल अजून क्लिष्ट अशी होते. त्यामुळे समाजासोबत आपण कशा प्रकारे समन्वय साधतो, संयोजन साधतो आणि संवाद साधतो आणि त्यातून स्वत:चा विकास आणि प्रगती घडवून आणतो हे अत्यंत महत्वाचे असते. असा तुमचा विकास आणि प्रगती होत असताना एकंदर समाजाचीच प्रगती आणि उन्नती होते.

समाज म्हणजे अनेक व्यक्तींचा बनलेला एक समूह की जो परस्पर सहकार्यावर काम करतो आणि काही अटी आणि शर्ती याने तो बांधलेला असतो. समाज म्हणजे एक समान पद्धती, चाली, रिती, श्रद्धा असलेला समूह होय. समाजाचे काही ठरलेले नियम असतात आणि त्या नियमांनुसार समाजातील प्रत्येक घटकांनी आपले वागणे आणि वर्तन ठेवावे लागते. समाज हा कायम एकसंध असतो. तो अनेक उपघटक यांचा बनलेला असतो. समाजामध्ये अनेक घटक हे एकमेकाशी जोडले गेलेले असतात. समाज हा कायम सामूहिक वाटचाल करतो. समाजातील बदल हे कधीच एकसमान आणि एकसारखे नसतात. समाजाला त्याच्या सीमा असतात. समाजाची स्वीकारता कायम कमी असते. समाजाचा मूळ घटक म्हणजे व्यक्ति होय. समाजामध्ये काही व्यक्तींचे समहू असतात त्यांचा आपण संघटना म्हणतो. काही दबाव गट सुद्धा समाजात कार्यरत असतात. काही संस्थात्मक संरचना समाजात कार्यरत असतात.

समाजाच्या विपरीत काही केल्यास समाज त्या व्यक्तिला बहिष्कृत करण्याचा धोका असतो. तसेच समाजाला धोका होईल असे वर्तन तुमच्याकडून झाल्यास तुम्ही समाजापासून दूर फेकले जाता. बर्‍याच वेळा तुम्ही समाजाचे घटक म्हणून राहता मात्र समाजात तुम्हाला काडीचीही किंमत मिळत नाही. समाज हा एकंदर क्लिष्ट आणि समजण्यास अवघड आहे. समाजातील बदल हे ऊर्ध्वगामी आणि अत्यंत सूक्ष्म आणि धीम्या पद्धतीने घडत असतात. समाजाला डावलून तुम्ही काही बदल करावयास गेल्यास तो सहजा सहजी समाजाला रुचत नाही. असे काही घडले तर समाज तुम्हाला बहिष्कृत करून तुमची किंमत शून्य करण्यास मागे पुढे पाहत नाही. असे हे का घडते? तर सामाजिक बुद्धिमत्तेचा अभाव असल्यामुळे असे घडते.

साहजिकच समाजात राहून आपली मार्गक्रमणा यशस्वीपणाने पूर्ण करण्यासाठी आपल्याला एका विशेष अशा बुद्धिमत्तेची गरज असते. अशी बुद्धिमत्ता की जी आपला समाजाशी असलेला संबध, समन्वय, सहकार्य आणि संश्लेषण अधिक परिणामकारक करून आपले आयुष्य अधिक अर्थपूर्ण असे बनवेल. ही बुद्धिमत्ता जेवढी जास्त तेवढे तुम्ही अधिक यशस्वी होणार. सामाजिक बुद्धिमत्ता ही अध्ययन बुद्धिमत्तेपेक्षा वेगळी असून ती काही अंशी निरीक्षण आणि अनुभव याच्या आधारे प्राप्त होते. त्यामुळे सामाजिक बुद्धिमत्तेचा अभाव असल्याने अध्ययन बुद्धिमत्ता उत्तम असूनही अपयशी झालेले लोक समाजात आपल्याला सर्वत्र दिसून येतात. त्यामुळे सामाजिक बुद्धिमत्तेचे अनुषंगाने सहसंबद्ध, परस्पर सहकार्य, संवाद कौशल्ये, आंतरवैयक्तिक संबंध, सामाजिक संघर्ष व्यवस्थापन, सामाजिक बांधिलकी, वचनबद्धता, चांगल्या गोष्टीचे समर्थन, संयम, सांस्कृतिक अभिमुखता, सामाजिक समानभूती, समन्वय, सहयोग, वागण्याची रीत इत्यादि घटकांवर काम करावे लागते.

सामाजिक बुद्धिमत्ता मध्ये सहसंबद्ध याला अनन्यसाधारण महत्व आहे. साहजिकच एका व्यक्तिला दुसर्‍या व्यक्तिसोबत किंवा समुहासोबत विविध प्रकारचे वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक सहसंबद्ध ठेवावे लागतात. हे सहसंबद्ध प्रस्तापित करण्यासाठी एक विशेष असे कौशल्ये त्या व्यक्तीला अंगी बनवावे लागते. हे सामाजिक सहसंबद्ध अचानक आणि आपोआप तयार होत नाही. तर त्यासाठी अनुभव, निरीक्षण आणि विश्लेषण या तीन बाबीवर काम करावे लागते. आपल्या दिनक्रियेत आपला अनेक व्यक्तींसोबत, समूहासोबत, संस्थांसोबत आणि संघटना सोबत संबध येत असतो. असा संबध जर अर्थपूर्ण बनवायचा असेल तर त्यासाठी या संबधांचे सूक्ष्म असे निरीक्षण आणि तार्किक विश्लेषण करावे लागते. त्याच सोबत येणारे अनुभव आणि घटना या बाबतीत कायम विश्लेषकाच्या भूमिकेत राहावे लागते. त्यातून हे सहसंबध दृढ होवून परस्पर सहकार्य तयार होवून विकास आणि प्रगती साधता येते.

सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये परस्पर सहकार्य तेवढेच महत्वाचे असते. समाज आणि समाजातील विविध घटक यांच्या सहकार्यावर आपले भवितव्य आणि भविष्य अवलंबून असते. साहजिकच सामाजिक बुद्धिमत्तेचे जोरावर हे सहकार्य आपण किती आणि कशा प्रकारे प्राप्त करून घेतो यावर आपली प्रगती आणि विकास अवलंबून असतो. समाजातील त्रयस्थ व्यक्ति आणि समूह आपल्याला सहकार्य करण्यासाठी कायम तत्पर असतात असे नसते तर ते कमालीचे चोखंदळ असतात. सहकार्य हे कधी व्यक्तीगत पातळीवर असते तर कधी व्यवसायीक पातळीवर असते. तसेच हे सहकार्य मिळविणे एवढे सोपे कधीच नसते. समाजाच्या दृष्टीने लायक आणि योग्य आहे अशा व्यक्तिला हे सहकार्य पुरविले जाते. साहजिकच हे सहकार्य मिळविण्यासाठी तुम्हाला तुमची सामाजिक बुद्धिमत्ता उच्च अशा पातळीवर घेवून जावी लागते. जेवढे तुम्ही सकारात्मक राहून सहकार्य वाढवणार तेवढे तुम्हाला इतरांचे सहकार्य प्राप्त होणार.

सामाजिक बुद्धिमत्ता मध्ये संवाद कौशल्ये याचाही वाटा महत्वाचा ठरतो. सामाजिक जीवनात तुमचे संवाद कौशल्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. संवाद कौशल्ये ही शाब्दिक आणि अशाब्दिक स्वरूपाची असतात. जेवढे तुम्ही योग्य प्रकारे संवाद साधता तेवढे तुम्हाला समाजाकडून स्वीकारले जाते. संवाद ही कोणत्याही मदतीची पहिली पायरी असते. तुमचा संवाद किती चांगला आणि इतरांच्या मनाचा ठाव घेणारा आहे यावर समोरचे सामाजिक घटक तुम्हाला सामावून घेण्यास तयार होत असतात. संवादमध्ये फक्त बोलण येत नाही तर ऐकण आणि किती प्रतिसाद मिळतोय हे पाहणं तेवढेच महत्वाचे ठरते.

सामाजिक बुद्धिमत्ता मध्ये तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे? यालाही महत्व आहे.तुमची स्वीकारता ही तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे यावर ठरते. व्यक्तिमत्व म्हणजे फक्त तुम्ही कसे दिसता एवढे मर्यादित नसून तुमची देहबोली कशी आहे. तुम्ही कसा प्रतिसाद कसा देता. किती अदबीने आणि आस्थावाईकपणे आणि गांभीर्यपूर्वक चौकशी करता. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय कसा देता. या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वात येतात आणि त्यांचा अंतर्भाव सामाजिक बुद्धिमत्तेत होतो. व्यक्तिमत्व हे साधारणपणे पाच घटकात विभागले जाते. यात तुमची सहमती कशी आहे ते पहिले जाते. कामात तुम्ही किती झोकून देता की काढता पाय घेता हे कायम पडताळले जाते. सामाजिक कार्य आणि कर्तव्ये पार पडण्यात तुम्ही किती सहभाग घेता आणि किती कर्तव्य निष्ठता दाखवता हे पण व्यक्तिमत्वचा भाग आहे. बहिर्मुखता हा सुद्धा व्यक्तिमत्व सकारात्मक असल्याचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही बहिर्मुख होवून इतरांना स्वीकारता हेही तितकेच महत्वाचे ठरते. तुम्ही समाजात किती मोकळेपणाने वावरता हा सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग येतो. जेवढे जास्त तुम्ही मोकळे तेवढे समाजात तुमचे स्थान उत्तम होते.

सामाजिक बुद्धिमतेमध्ये समानभूती महत्वाचा घटक आहे. यात आपण दुसर्‍याच्या पातळीवर जावून विचार करतो. मी जर त्याच्या जागेवर असतो तर मला कसे वाटले असते हे यात पहिले जाते. त्यामुळे एखांदी प्रतिक्रिया आणि कृती ही दुसर्‍याला किती हानी पोहचवू शकते याची पडताळणी समानभूती मध्ये अगोदरच केली जाते. त्यामुळे शक्यतो आपली कृती आणि प्रतिक्रिया या मुळे दुसर्‍याला हानी पोहचत तर नाही ना? आणि त्याला नुकसान होत तर नाही ना? हे पहिले जाते. समानभूती आपल्यात जास्त असेल तर इतरांचे दु:ख, समस्या आणि अडचणी आपल्याला लवकर लक्षात येतात. समानभूती जेवढी जास्त तेवढे अधिक लोक आपले अनुयायी होतात. जेवढे जास्त अनुयायी तेवढी जास्त प्रसिद्धी होवून तुमची प्रगती आणि विकास होतो.

समूह आणि संघटन कौशल्ये ही सामाजिक बुद्धीमतेचा भाग आहेत. एखांदा समूह तयार करेने त्या समूहाचे नेतृत्व करणे. समूहाला योग्य दिशा दाखवणे. समूहाचे ध्येये आणि उदीष्टे गाठण्यासाठी मदत करणे हा सामाजिक बुद्धिमत्तेचा महत्वाचा भाग आहे. समूहाचे संघटन आणि समूहातील घटकांचा समन्वय घडवून आणल्यामुळे अशक्य अशा गोष्टी करणे शक्य होते.

समाजातील विविध समस्या आणि अडचणी याबाबत गंभीर विचार क्रिया ही सामाजिक बुद्धिमत्तचा भाग आहे. अनेक बाबतीत आपण पूर्वग्रहाने दूषित असतो. त्यामुळे आपले निर्णय चुकण्याची शक्यता वाढते. गंभीर विचार प्रक्रिया मध्ये आपल्याला निरीक्षणामुळे आणि इतर प्रकारे प्राप्त झालेली माहितीचे आपण वस्तुनिष्ठ असे विश्लेषण करतो आणि आपले त्याबद्दल मत बनवून योग्य असा निर्णय घेतो. जेवढी आपली गंभीर विचार प्रक्रिया सुदृढ आणि पूर्वग्रह विरहित असेल तेवढे आपले सल्ले आणि मदत घेण्यास समाजातील विविध घटक पुढे येतात.

सामाजिक आणि सांस्कृतिक अभिमुखता तुमची किती आहे? हा सुद्धा सामाजिक बुद्धिमत्तेचा भाग आहे.सामाजिक बुद्धिमत्ते मध्ये तुम्ही समाजसेवेत किती सहभाग दाखवता हे पण तितकेच महत्वाचे असते.समाजात वावरत असतांना समाजातील नीती मूल्ये, चाली रिती, संस्कृती इत्यादि बाबी आणि गोष्टी दुर्लक्ष करून चालत नाही तसेच त्या विपरीत अथवा विरूद्ध अशी भूमिका घेता येत नाही. समाजाप्रती तुम्ही किती अभिमुख आहत आणि समाजातील या गोष्टींना तुम्ही किती सहजतेने स्वीकारता यावरही तुमचे यश अवलंबून असते.

सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये संयम महत्त्वाची भूमिका बजावत असतो. समाज हा क्लिष्ट आणि समजून घेण्यास अत्यंत अवघड असल्याने या ठिकाणी प्रत्येक पातळीवर आणि पावलावर संयम  ठेवून पुढे जावे लागते. अनेक वेळा संयम तुटण्यासारख्या गोष्टी आणि बाबी होतात परंतु या वेळी तुम्ही स्थिर राहून स्वत:चा संयम कायम राखावा लागतो. समाज हा संयमी माणसांना स्वीकारतो. कारण संयम ही उच्च व्यक्तिमत्व ओळखण्याची खूण आहे.

समर्थन करणे हा एक सामाजिक बुद्धिमत्तेच भाग आहे. तुम्ही चांगल्या गोष्टीचे समर्थन कसे तटस्थपणे करता आणि वाईट गोष्टींना तेवढ्याच सक्षमपणे नाकारता हे समाजात खूप महत्वाचे ठरते. तुम्ही काय करत आहात. कोणत्या गोष्टीचे समर्थन करत आहात हे समाज पाहत असतो. अशा वेळी तुमच्या व्यक्तिमत्वचा आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा कस लागतो.

वचनबद्धतेला समाजात खूप महत्व असते. तुम्ही जे वचन दिले अथवा तुम्ही ज्याचे आश्वासन दिले ते तुम्ही पूर्ण करण्यावर भर देता का? हे समाज पाहत असतो. वचनबद्धता ही फक्त आश्वासन नसते तर ती एक सकारात्मक कृती असते. लोक तुम्ही दिलेल्या वचनबद्धता बाबत तुम्हाला पाहत असतात. जेवढे तुम्ही दिलेले वचन पाळता तेवढं समाज तुम्हाला  स्वीकारतो आणि पुढे घेवून जातो. मी या वर्षी मोकळ्या जागेत वृक्ष रोपण करील ही वचन दिल्यानंतर पावसाळा सुरू झाल्यावर वृक्षरोपण करणे ही झाली वचनबद्धता.

सामाजिक बांधिलकी ही सुद्धा तेवढीच महत्वाची बाब आहे. मी समाजाचा एक महत्वाचा घटक आहे आणि मी या समाजाचे देण लागतो. ही बांधिलकी आपल्या आयुष्यात कायम आपण अंगी बाळगावी लागते. बांधिलकी ही फक्त बोलून आणि चर्चा करून प्राप्त होत नाही तर त्यासाठी कृती आणि क्रिया करावी लागते. काही तरी निर्माणधीन आणि इतरांना त्याचा लाभ होईल असे काम आणि कर्तव्ये पार पडावे लागते. समाजात शक्य होईल तेंव्हा मी रक्तदान करून जीवनदान देण्याचे पुण्य काम करतो ही झाली सामाजिक बांधिलकी.

सामाजिक संघर्ष व्यवस्थापन हा सामाजिक बुद्धिमत्तेचा महत्वाचा घटक आहे. आपण पाहतो की समाजात व्यक्ति-व्यक्ति मध्ये किंवा समूह-समूह मध्ये किंवा गटा-गटा मध्ये कायम संघर्ष होत असतात. काही वेळा हे संघर्ष सौम्य असतात तर काही वेळा अत्यंत टोकाचे आणि तीव्र असतात. हे संघर्ष आपण कसे हाताळतो किंवा त्यात तोडगा कसा काढतो यावर आपले सामाजिक स्थान अवलंबून असते. या वेळी सर्वात महत्वाचे म्हणजे संघर्ष करणार्‍या व्यक्तीने अथवा समूहाने तुम्हाला तोडगा काढण्यासाठी शिष्टाई म्हणून स्वीकारावे लागते. ही स्वीकारता तुमचे ज्ञान, कौशल्ये, अनुभव आणि दृष्टीकोन यावर अवलंबून असते.

अंतरवैयक्तिक संबध विकसित करण्याबाबत तुम्ही कशा प्रकारे कामकाज करता.तसेच अंतरवैयक्तिक संबध टिकवून तुम्ही कसे ठेवता हा सामाजिक बुद्धिमत्तेचा भाग आहे. आपण समाजात वावरतो त्या वेळेस आपला अनेक व्यक्तींसोबत संबंध येत असतो. साहजिकच असे संबध अगदी अल्प, तात्पुरते तसेच दीर्घ कालावधीचे असतात. यात आपण आपले संबध कसे प्रस्तापित करत आहोत यावर तुमचे सामाजिक स्थान ठरत असते. तुम्ही फक्त अल्प काळा  पुरते, कामा पुरते आणि फायद्या पुरते जर आंतरवैयक्तिक संबंध ठेवत असाल तर त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी आणि बाबी यांचा दीर्घकाळ तोटा होतो. या उलट सामाजिक अंतर वैयक्तिक संबध जेवढे दीर्घ आणि मजबूत तेवढे तुम्ही अधिक प्रगती करता.

अशा प्रकारे सामाजिक बुद्धिमता तुमच्या ठायी असेल तरच तुम्ही समाजात सर्वसमावेशक आणि समग्र अशी प्रगती आणि विकास करू शकता. सामाजिक बुद्धिमत्ता ही एकाच घटकावर अवलंबून नसून ती अनेक घटकांचा समुच्चय आहे तसेच तो अनेक बाबींचा एकात्मिक असा अराखडा आहे. सामाजिक बुद्धिमत्ता वृद्धिंगत करण्यासाठी ह्या विविध बाबी, घटक आणि गोष्टी यावर खूप विचारपूर्वक काम करावे लागते. सामाजिक बुद्धिमत्ता मध्ये परस्पर सहकार्य वाढविणे, संवाद कौशल्ये वृद्धिंगत करणे, सहसंबद्ध विकसित करणे, आंतरवैयक्तिक संबध विकसित करणे, सामाजिक संघर्ष व्यवस्थापन करणे, सामाजिक बांधिलकी जपणे, वचनबद्धता राखणे, चांगल्या गोष्टीचे समर्थन करणे, संयम कायम राखणे, सांस्कृतिक अभिमुखता राखणे, सामाजिक समानभूती राखणे या घटकांचा आपल्या व्यक्तिमत्वात समावेश करावा लागतो. एकंदर सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे समाजातील विविध घटकांशी योग्य प्रकारे सहसंबध, समन्वय आणि सहकार्य साधण्याचे कौशल्ये की ज्याद्वारे या प्रत्येक घटकाचा आपले जीवन अर्थपूर्ण आणि यशस्वी बनविण्यासाठी उपयोग करून घेण्याची क्षमता प्राप्त करणे होय. अशा प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वात हे घटक अंतर्भूत करून सामाजिक बुद्धिमत्तेच्या आधारे एक साधे, सरळ, सोपे, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करता येते.

जीवन अनमोल आहे! ते अधिक सुंदर बनवूया !

७२/१०१ दिनांक १०.०७.२०२३

सुखाचा शोध ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७