चिंता, उदासीनता, खिन्नता आणि नैराश्य पासून मुक्ती मिळवा ! Get relief from Anxiety, Nervousness, Melancholy and Depression!

चिंता, उदासीनता, खिन्नता आणि नैराश्य पासून मुक्ती मिळवा ! Get relief from Anxiety, Nervousness, Melancholy and Depression!

     मानवी जीवन म्हटले की चढ आणि उतार, ऊन आणि पाऊस आणि सुख आणि दु:ख ठरलेले असते. एकंदर मानवी जीवन हे कधीच एकसमान आणि एकसारखे नसते त्यामुळे असे होणे किंवा असणे हा एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. समुद्राच्या लाटांच्या हिंदोळ्यात नावेची जी अवस्था असते तीच अवस्था सृष्टीच्या या भव्य पसार्‍यात मानवाची असते. मात्र समुद्राच्या लाटा ह्या बाह्य भागाकडून धक्का देत असतात मात्र मानवाला बाह्य सृष्टी आणि त्याची अंतर्गत सृष्टी कायम धक्का देत असते. मानवाची अंतर्गत सृष्टी म्हणजे मानवी मन आणि मेंदू आणि त्यातून बाहेर पडणारे विचार आणि भावना होत. यामुळे अंतर्गत आणि बाह्य हिंदोळे मानवी जीवन हे तेवढेच संवेदनशील बनवते. मानवी मन त्याचे अस्तित्व, मानवी बुद्धी आणि तिची क्लिष्टता आणि मानवी मेंदू त्याची उच्च क्षमता या बाबी अनेक प्रकारचे भावनिक आणि वैचारिक चढ उतार निर्माण करतात. मग यात आनंद आणि सुख असो किंवा दु:ख आणि भीती असो. या प्रमाणेच मानवी मन  हे भीती, निराशा, चिंता, उदासीनता, खिन्नता आणि नैराश्य या भावनांची निर्मिती करते. जेंव्हा यांचे प्रमाण किंवा वारंवारता वाढते तेंव्हा त्याची परिणीती मानसिक विकार आणि आजार यात होते. प्रस्तुत प्रकरणात भीती, निराशा, चिंता, उदासीनता, खिन्नता आणि नैराश्य काय आहे? ती कशी तयार होते? तिचे काय परिणाम होतात? तीच्या पासून मुक्तता कशी मिळवावी? या बाबत विवेचन करण्यात आले आहे.

आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासात अनेक चढ उतार अनुभवास मिळतात. मनुष्य प्राणी जन्माला येतो ती काही अंनुवंशिक अशी गुणवैशिष्टे घेवुनच. जसे जसे आयुष्य पुढे जाते तसे तसे अनेक अंतर्गत आणि बाह्य घटक मानवी जीवनावर प्रभाव दाखवतात. जीवन प्रवासात जसा जसा हा प्रभाव वाढत जातो तसे तसे सोपे आणि सुटसुटीत असलेलेल आयुष्य अजून क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे होते. आशा आणि निराशा आणि सुख आणि दु:खाचे तरंग वर खाली होवू लागतात. जसे काही प्रदेशात हवामान विषम असते तसे आयुष्यही विषम होवून जाते. कधी खूप दु:ख तर कधी सुख. जेवढा आयुष्याचा पसारा वाढत जातो तेवढेच अडचणी आणि समस्यांचा व्याप वाढत जातो. उगमाकडे नदी ही नितळ असते पण ती जेंव्हा समुद्राकडे जाते तेंव्हा ती गढूळ होत जाते. पाणी आणि पात्र वाढलेले असते पण तेवढीच दुर्गंधी आणि गढूळपणा आलेला असतो. जीवनही तसेच असते जेवढे वय पुढे जाते तेवढा पसारा वाढून आयुष्यात नदी सारखा गढूळपणा येत राहतो. साहजिकच हा गढूळपणा काढून टाकण्यासाठी सकारात्मकतेची तुरटी कायम फिरवावी लागते. आयुष्यात आलेला हा गढूळपणा म्हणजेच भीती, निराशा, चिंता, उदासीनता, खिन्नता आणि नैराश्य होय.

चिंता ही अति काळजीचा आणि अनामिक भीतीचा एक संयुक्त परिपाक आहे. भीती ही आपला मनामद्धे आणि विचारामद्धे कायम घर करून राहते. अति काळजी आणि अनामिक भीती ही घडलेल्या किंवा घडणार असलेल्या गोष्टीपासून आणी घटनांपासून निर्माण होते. चिंता म्हणजे एकंदर भविष्यात अमुक असे घडले तर किंवा तमुक तसे घडले तर त्याचे वाईट आणि प्रतिकूल परिणाम आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर होतील याबाबतची मनाची धारणा होय. बर्‍याच वेळा अति काळजी ही अनावश्यक असते. जेंव्हा अनामिक भीती आणि अनावश्यक काळजी ही तीव्र आणि खोलवर पसरते तेंव्हा चिंता निर्माण होते. चिंतेचा उगम हा भविष्यातील अनिश्चितता यातून होत असतो. माझ्या मुलगा इयत्ता बारावी मध्ये आहे तो अभ्यास करत नाही. मग त्याचे अडमिशनचे काय होणार याची चिंता कायम सुरू राहते. प्रोमोशन यादी मध्ये नाव आहे, मात्र चौकशी सुरू झाल्याने प्रोमोशनला अडचण येते की काय अशी अशंका निर्माण होते यातूनच चिंता निर्माण होते.

चिंता हळू हळू गडद होत गेली किंवा अशा अनेक चिंताजनक गोष्टी एकत्र आल्या की त्याचे रूपांतरण काही कालावधी नंतर उदासीनतेमध्ये होते. उदासीनता हळू हळू खिन्नतेकडे घेवून जाते. खिन्नता ही उदासीनते पेक्षाही तीव्र अशी असते. खिन्नता ही दिवसाची सुरुवातच नकारात्मकतेने आणि चुकीच्या पद्धतीने करते. खिन्नते नंतर येते ते औदासिन्य. तसे पहिले तर उदासिनता आणि औदासिन्य हे दोन्ही शब्द एकच वाटतात. परंतु उदासिनता हे थोडी वरवर असते मात्र औदासिन्न हे खोलवर असते. अशा प्रकारे चिंतेपासून सुरू झालेला हा प्रवास उदासीनता, खिन्नता ,औदासिन्य या मार्गाने नैराश्य पर्यंत होतो. नैराश्य निर्माण झाले की माणूस नकारात्मक होयला सुरुवात होते. त्याला कशातच स्वारस्य राहत नाही. तो आनंददायी आणि दु:खदायी भावना आणि यश आणि अपयश याकडे एकाच दृष्टीने पाहतो. त्याला सकारात्मक आणि नकारात्मक यातील फरक कळत नाही. एकंदर त्याची दृष्टी आणि वृती ही संकुचित होवून जाते.

अशा प्रकारे व्यक्ति भीती, निराशा, चिंता, उदासीनता, खिन्नता आणि नैराश्य या प्रकारच्या मानसिक आणि भावनिक स्थिति मध्ये गेला की त्यातून त्याला बाहेर काढणे अवघड आणि जिकरीचे होवून जाते. यातून थोड्या कालावधी साठी काही लोक बाहेर येतात आणि पुन्हा त्या मध्ये फसून जातात. काही लोक स्वत:ला कामात गुंतवून, काही नामस्मरन करून आणि काही सल्ला व मार्गदर्शन घेवून बाहेर येतात. मात्र बहुतांश लोक या दृष्टचक्रात अडकून जातात. साहजिकच या अवस्थांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम होतात. तसेच कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक परिणाम सुद्धा या दृष्टचक्रात अडकल्याने होतात. शारीरिक समस्या जसे रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, ब्रेन स्ट्रोक सारखे आजार वाढण्याची शक्यता बळावते. तसेच या अवस्थेमुळे शारीरिक व्यायाम आणि इतर कामकाज या कडे संपूर्ण दुर्लक्ष होते. कामात आणि कार्यात असणारा उत्साह या दृष्टचक्रामुळे पूर्णत: थांबतो. मानसिक स्तरावर नकरात्मकता येवून विचार प्रक्रिया पूर्णत खराब होवून जाते. तेच तेच विचार येणे आणि त्यामुळे डोके गर गर फिरणे, स्मृति कमी होणे अशा अनेक मानसिक समस्या निर्माण होतात. भावनिक चढउतार या दृष्टचक्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर होतात. भावना आवेग वाढतो, भावना दाबून ठेवल्या जातात किंवा भावना एकदम उफाळून येतात. एकच भावना तीव्रतेने व्यक्त केली जाते. एकंदर व्यक्तीचे भावनाविश्व संपूर्ण बिघडून जाते. कौटुंबिक स्तरावर कलह निर्माण होतात. कुटुंबामध्ये संघर्ष वाढतो. एकमेकाविषयी असलेले प्रेम संपुष्टात येते. असा व्यक्ति कुटुंबापासून दुरावला जातो. सामाजिक पातळीवर सामाजिक सहसंबद्ध आणि सहकार्य संपुष्टात येते. समाजात असा व्यक्ति वावरत असताना विक्षिप्तपने वागतो म्हणून लोक त्याच्या पासून दूर जातात. अशा व्यक्तिला सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम यापासून जाणीव पूर्वक दूर ठेवले जाते. आर्थिक पातळीवर या व्यक्तीची बरीच पीछेहाट होते. भीती, निराशा, चिंता, उदासीनता, खिन्नता आणि नैराश्य या दुष्टचक्रात अडकलेल्या व्यक्तिला नोकरी, उद्योग किंवा व्यवसाय करण्यात अनेक समस्या निर्माण होतात. तो एकाग्रतेने काम करत नसल्याने आर्थिक नुकसान होते. तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोघांनाही असा व्यक्ति आवडत नसल्याने त्यांचे सहकार्य संपुष्टात येते. एकंदर करियर विकास आणि प्रगती यामध्ये पीछेहाट होते.

उपरोक्त परिणाम आणि नुकसान विचारात घेता भीती, निराशा, चिंता, उदासीनता, खिन्नता आणि नैराश्य काय आहे? आणि मला त्यांनी घेरल आहे का? याची चिकित्सा स्वत: करून उपाययोजना कराव्या लागतात. त्याचे मूळ शोधून तेथून ते समूळ उपटून काढावे लागते. जेथे हे बांडगुळ वाढले आहे तेथून ते काढून टाकावे लागते. योग्य समुपदेशन, सल्ला आणि मार्गदर्शन घेवून हे दृष्टचक्र भेदावे लागते. भीती हा तसा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. भीती आहे म्हणून माणूस टिकून आहे. भीतीच माणसाला माणूसपण शिकवते. भीतीतून पलायन किंवा फाईट या कृतीची निर्मिती होते. बिबट्या समोर आला तर नकीच पलायन होईल पण कुत्रा समोर आला तर फाईट साठी प्रयत्न तरी होईल. कुत्रा आला तर पहिले आपण आवाज करून त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करू. हा प्रयत्न फेल गेला तर आपण दगड उचलून त्याला मारू आणि एवढे करूनही तो जर जोरात अंगावर धावूनच आला तर पलायन शिवाय पर्याय नाही. आपल्या दैनदिन जीवनात फाईट आणि पलायन याचा अनुभव आपल्याला नेहमी येत असतो. भीतीतून जे काही निर्माण होते त्याला आपण सामोरे जावून कृती करायला हवी. जर कृती नाही झाली आणि भीती आहे तशीच अडकून राहिली तर भीती ही लवकरच चिंतेमध्ये बदलते.

चिंता अनेक प्रकारच्या अति काळजीचा आणि अनामिक भीतीचा एक समुच्चय असतो. चिंता निर्माण होवून ती माणसाला चितेकडे घेवून जाते असे उपरोधिकपणे म्हटले जाते. चिंता पासून मुक्तता मिळविण्यासाठी अनेक प्रकारच्या अति काळजीच्या आणि अनामिक भीतीच्या मुळा पर्यंत जावे लागते. तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाची काळजी आहे, तुम्हाला तुमच्या मुलाला चांगल्या कॉलेज मध्ये अडमिशन मिळेले की नाही याची काळजी आहे. तुमच्या घरावर असणारे कर्ज तुम्ही फेडू शकाल का याची काळजी आहे. व्यवसाय साठी घेतलेले थकीत कर्ज वसूली साठी तुमचे घरावर जप्ती येईल की काय अशी भीती आहे. कार्यालयात एक चुकीची संचीका तुमच्या कडून मंजूर झाली आहे ती बाब भविष्यात बाहेर येईल का याची चिंता तुम्हाला आहे. अशा काळजी आणि भीती एकदा आपल्या नोंद वहीवर उतरवल्या की त्यातील एक एक भीती आणि काळजी घेवून तिच्याशी डील करावे लागते. तिच्या मागचे आणि पुढचे धागेदोरे शोधावे लागतात. त्यातील कारण कार्य भाव शोधावा लागतो आणि उत्तम नियोजन आणि परिश्रमपूर्वक त्यावर मातही करावी लागते. एकंदर चिता होणेसाठी जे अनेक घटक किंवा बाबी जबाबदार आहेत ते एकत्र न सोडवता वेगवेगळ्याने सोडवावे लागतात. म्हणजे आपल्या कडील धाग्याला खूप गाठी पडल्या असतील तर सर्व गाठी आपण एकाच वेळेस सोडवत नाही. तर एक एक घेवून त्या सोडवतो, हे एकंदर असे आहे.

चिंता दीर्घ काळ सुरू राहिली ही त्यातून नैराश्य निर्माण होते. कारण आपण योग्य वेळी योग्य प्रकारे चिंता दूर करण्यासाठी उपाययोजना आखलेल्या नसतात. त्यावर कृतीशील राहुन  काम आणि कार्य केलेलं नसते. साहजिकच त्यामुळे चिंतेमधून नैराश्य निर्माण होते. चिंता निर्माण झाली तर आपण सहजतेने त्यातून बाहेर पडू शकतो हे आपण पहिले, मात्र मात्र नैराश्य निर्माण झाले की त्यातून बाहेर पडणे थोडे कठीण झालेले असते. अशा वेळी आपली मानसिक आणि भावनिक पातळी उच्च स्तरावर घेवून जावून नैराश्य दूर करावे लागते. मात्र हे प्रत्येकाला शक्य होत नाही. तर अशा वेळी योग्य सल्ला, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समुपदेशन याचा स्विकार करावा लागतो. कारण यात आपल्या नैराश्यकडे एका तटस्थ अशा भावनेने पहिले जाते. जेंव्हा तुम्हाला तुमचे कौटुंबिक कलह या मुळे नैराश्य निर्माण झाले आहे. व्यवसायात सारखा तोटा होत असल्याने नैराश्य निर्माण झाले आहे. अशा वेळी तुम्ही यातून बाहेर येण्यासाठी योग्य आणि उचित सल्ला, मार्गदर्शन आणि समुपदेशन घेणे गरजेचे असते. परंतु आपला अहंकार आडवा येत असल्याने आपण या मार्गाला जात नाहीत आणि असेच खोलवर नैराश्य मध्ये रुतून आणि फसून जातो. नैराश्य यावर मात्र करता आली नाही की, खिन्नता, उदासिनता आणि औदासिन्न तुम्हाला चोहोबाजूंनी घेरते आणि अजून तुम्ही मानसिक आणि भावनिक अशा निम्न पातळीवर पोहचता की जेथे तुम्हाला फक्त समुपदेशन आणि काही प्रमानात मेडिकेशन ची गरज भासू शकते. यातूनही बाहेर पडण्याचा लोक अतोनात प्रयत्न करतात मात्र परिस्थिति हाताबाहेर गेलेली असते. साहजिकच अशाही वेळी लोक समुपदेशन घेत नाहीत आणि आपले आयुष्य अजून बेसुर आणि अर्थहीन करून टाकतात.

एकंदर अनामिक अशी भीती आणि सतत वाटणारी काळजी, त्यातून निर्माण झालेली निराशा आणि चिंता आणि त्या पुढेही जावून आलेली उदासिनता, खिन्नता आणि नैराश्य तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर अधू किंवा अपंग करते. तसेच यामुळे तुमचे वैयक्तिक जीवन, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक जीवन आणि स्थान याला अहोटी लागते. त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे नियोजनबद्ध, वेळ आणि प्राथमिकता व्यवस्थापन साधणारे आयुष्य जगावे लागते. अनामिकपणे उदभवलेली भीती आणि सतत वाटणारी काळजी ही योग्य वेळी समूळ नष्ट करावी लागते. त्यातूनही चिंता वाढीस लागल्यास अजून भक्कमपणे उभे राहून तिला दूर सारावे लागते. पुढे जावून उदासिनता, खिन्नता आणि नैराश्य निर्माण झाल्यास योग्य व्यक्तीचा सल्ला, मार्गदर्शन आणि समुपदेशन घेवून बाहेर पडावे लागते. अशा प्रकारे नियोजनबद्धता, वेळ आणि प्राथमिकता व्यवस्थापन साधणारे आणि भीतीला आणि काळजीला समूळ नष्ट करणारे आयुष्य जाणीवपूर्वक जगावे लागते. तसेच चिंता, उदासिनता, खिन्नता आणि नैराश्य निर्माण झाल्यास स्व-प्रयत्न करून आणि उचित व्यक्तीचे सल्ला, मार्गदर्शन आणि समुपदेशन घेवून साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी असे आयुष्य जगता येते.

जीवन अनमोल आहे , ते अधिक सुंदर करूया

६३/१०१ दिनांक १६.०४.२०२३

सुखाच्या शोधात ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७