स्पर्श संवाद Haptic Communication

स्पर्श संवाद Haptic Communication

‘स्पर्श’ शब्दच तसा मूलतः हृदयस्पर्शी आहे. स्पर्श हा फक्त ‘स्पर्श करणे’ किंवा ‘टू टच’ एवढ्या पुरता मर्यादित नाही, तर तो पुढे जावून भावनेला साद घालतो. जसा तो भावनेला साद घालतो तसा तो संदेश पोहचविण्याचेही काम करतो. “स्पर्शातून जे जाणिले,ते शब्दांनी न कळले” असे उगाच म्हटले जात नाही. स्पर्श संवाद हा तसा अगदी काही अल्पकाळाचा,परंतु समजुतीचे धागे पक्के करण्यात आणि गैरसमजुतीच्या गाठी सैल करण्यास तो मदत करतो. आजच्या या प्रस्तुत लेखात स्पर्शातून होणाऱ्या संवाद बाबत आपण विवेंचन करणार आहोत.

सध्याच्या या सोशल मीडिया, कोव्हीड साथीच्या आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मुले, आई ,वडील, भाऊ, बहीण, मित्र, मंडळी यांचेसोबतचा आपला स्पर्श संवाद हळू हळू कमी होत आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल . कारणे काहीही असो मात्र असा संवाद कमी होणे म्हणजे मानवाच्या मूलभूत गुणवैशिष्टेचा त्याग करण्यासारखे आहे हे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते. आपली एकूण पाच ज्ञानेंद्रिये असून त्या आधारे आपण विविध गोष्टीचे आकलन करत असतो . यात प्रामुख्याने डोळ्यांच्या आधारे आपल्याला सृष्टी दिसते, नाकाने आपल्याला वस्तु किंवा पदार्थ याचा वास घेता येतो, जीभेने आपल्याला वस्तु किंवा पदार्थ याची चव कळते , कानाने आपण आवाज ऐकतो, तर त्वचेने आपण स्पर्श ज्ञान मिळवतो. आपली त्वचा आणि विशेषतः हाताची त्वचा आणि त्यातून मिळणारे स्पर्श ज्ञान ही आपल्या आकलनात मोठ्या प्रमाणात भर घालत असते .मात्र हे स्पर्श ज्ञान फक्त गरम आणि थंड , कडक आणि मऊ , एवढ्या पुरते मर्यादित न राहता ते आपल्याला आपल्या भावनांशी जोडते हे विशेष.

आईच्या कुशीत लेकराने स्पर्शातून केलेला हट्ट , भावाला घट्ट मिठी मारून हक्काने बहिनीने मागितलेली गोष्ट, भावाने भावाला हातात हात घेवून काम तडीस घेवून जायचे याचा दिलेला विश्वास, वडिलांनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवून दिलेले बळ आणि प्रोत्साहन , पत्नीने अथवा प्रेयसीने प्रियकराचा हात हात घेवून स्पर्शातून पोहचवलेली प्रेम भावना, मित्राने मित्राच्या हातात हात देवून अथवा गळ्यात पडून दिलेला विश्वास , वरिष्ठांनी खांद्यावर हात ठेवून दिलेली शाबासकी ह्या सर्व घटना आणि रुपे ही त्या स्पर्श रूपी संवादाचीच.

मायेचा स्पर्श, प्रेमाचा स्पर्श, विश्वासाचा स्पर्श, शाबासकीचा स्पर्श, प्रोत्साहानाचा स्पर्श, आधाराचा स्पर्श, काळजीचा स्पर्श असे सर्वसाधारणपाने स्पर्शाचे सात प्रकार दिसून येतात. स्पर्शातून साधला जाणारा संवाद जेवढा अचूक आणि बिनचूक असतो तेवढा इतर कोणत्याही संवादाच्या माध्यमातून नसतो हे लक्षात घ्यावे. स्पर्शातून साधलेला संवाद हा खोलवर जाणारा आणि निरंतर टिकणारा असतो. आपण ज्या वेळेस एखांद्याला खूप छान काम केले असे फक्त म्हणतो आणि तेच आपण एखांद्याचा हात हातात घेऊन अथवा पाठीवर हात ठेवून खूप छान काम केले असे म्हणतो तेंव्हा ती शाबासकी आणि प्रोत्साहन खूप खोलवर पोहचते. आपण एखांद्याच्या डोक्यावरुन किंवा पाठीवरून मायेने हात फिरवतो त्यावेळी त्या स्पर्शातून मिळालेले आधार हा शब्दांनी दिलेले आधारा पेक्षा कितेक पटीने जास्त असतो. एखांद्या व्यक्तीने तुमचे काम होईल असे फक्त शब्दांनी सांगणे आणि आपला हात हातात घेऊन काम नक्की होईल असा विश्वास देणे यात खूप फरक असतो.

एकंदरच स्पर्शातून साधलेला संवाद अथवा त्यातून पोहचवलेला संदेश हा उच्च पातळीवर काम करतो. तो मेंदू केंद्राला तर साद घालतोच त्याच सोबत भावना केंद्राला सुध्दा विश्वासात घेत असतो . म्हणजे मेंदू आणि मन यांचे संयोजन एका रेषेत करण्याचे काम स्पर्श करत असतो. स्पर्शातून साधलेला संवाद हा विश्वासपात्र असतो त्यामागचे कारण हेच की तो शरीर, मन आणि मेंदू यांना एका सरळ रेषेत जोडतो आणि यात मजबूतपणा आणतो.

विभक्त कुटुंब पद्धतीने माणसं दुरावली, सोशल मीडिया मुळे संवाद कमी झाला आणि कोव्हिड साथीने तो अजून कमी करून टाकला. सोबत स्पर्शातील संवाद तर लोपच पावला. संवाद कमी झाला की, समज आणि गैरसमज वाढीस लागतात, परस्पर अविश्वास निर्माण होतो. परस्पर सहकार्य संपुष्टात येते, मन मोकळे होत नसल्याने मन आणि मेंदूवर प्रेशर निर्माण होतो, एकाकी वाटायला लागते,चिडचिड सुरू होते आणि एकंदरच त्याचे मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होण्यास सुरुवात होते.

त्यामुळे संवाद आणि विशेषतः स्पर्शातुन संवाद हळू हळू सुरू करायला हवा. वेळ भेटेल त्यावेळेस किमान आप्तेष्ट आणि मित्रमंडळी यांची विचारपूस करायला हवी. शक्य आहे तेथे स्पर्शातून संवाद साधायला हवा. याची सुरुवात आपल्या स्वतः पासून ,आई आणि वडील यांचा हात हातात घेऊन करा, तुम्हाला लगेच बदल जाणवेल.एकमेकाला समजून आणि उमजून घेयाला हवे. एकदा हा स्पर्शातील संवाद हळू हळू वाढला की नात्यांमद्धे निर्माण झालेल्या अविश्वास कमी होण्यास मदत होईल आणि अजून निकोप आणि सुदृढ अशी नाती तयार होतील . तुम्ही अजून सोपे, सुटसुटीत, सरळ, साधे आणि सुखी जीवन जगाल.
जीवन अनमोल आहे, ते अधिक सुंदर बनवूया.