समान किमान समाधान पातळीवर कसे येणार How to Achieve common minimum satisfaction level

समान किमान समाधान पातळीवर कसे येणार How to Achieve common minimum satisfaction level

         समाधान ही एक सुख आणि आनंद मोजण्याची एक मोजमाप पट्टी अथवा पातळी असून ती व्यक्ती परत्वे वेगवेगळे स्केल अथवा पातळी दाखवते. म्हणजेच समाधान हे व्यक्ती परत्वे बदलत राहते. समाधान मोजताना जसे अंतर्गत घटक कारणीभूत होतात तसे बाह्यघटक सुद्धा कारणीभूत होत असतात. समाधानाचे स्केल कायम बदलत असतांना कोणाला काय हवे आहे? यासाठी देणाऱ्याला कायम कसरत करावी लागते. तर घेणाऱ्याला आपला संकुचितपणा सोडून द्यावा लागतो. असमाधानी वृत्ती ही विकासासाठी आवश्यक असली तरी कायम असमाधान हे आपल्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर अत्यंत प्रतिकूल आणि विपरीत परिणाम करते. त्यामुळे ‘समाधान’ या बाबीची योग्य चिकीत्सा होवून तिच्यावर प्रत्येकाने काम करणे आवश्यक ठरते. प्रस्तुत लेखात समाधान म्हणजे काय? समाधान कसे मिळते? ते मिळवण्यासाठी काय करावे? समाधान कायम कसे राखावे? या अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

         समाधान ही एक मानसिक पातळी असून ती सुख आणि आनंद या भावनेशी निगडीत आहे. असे असले तरी असे दिसते की लोकांना आनंद आणि सुख मिळत राहते किंवा लोक आनंद आणि सुख मिळविण्यासाठी धडपडत राहतात, मात्र त्यांना त्यातून समाधान मिळतेच असे नाही. कारण समाधानाची मानसिक पातळी प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी असते. वर नमूद केल्या प्रमाणे मानसिक पातळी ही आपल्या अंतर्भूत घटक आणि बाह्य घटक याच्या संयोगातून निर्माण होत राहते आणि ती कायम बदलणारी असते. आपल्या मन आणि मेंदूच्या एका खोल पातळीवर जावून ती काम करत असल्याने मन आणि मेंदू यांनाही तिचे आकलन होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे एकीकडे आनंद आणि सुख भरून वाहत असतांना समाधान मात्र दूर राहून गेलेले असते.

        समाधान हे भावनांच्या अनेक छटावर सुद्धा काम करते. जसे विविध रंग मिसळून अनेक रंग तयार होतात. तसेच अनेक चांगल्या भावना मिसळून त्यातून समाधान तयार होते. समाधानाची मानसिक पातळी क्षणाक्षणाला बदलणारी असते. जसे शेअर मार्केट वर खाली होत असतो,अगदी तशीच ही मानसिक पातळी क्षणाक्षणाला बदलत राहते. त्यामुळे काही कालावधीपूर्वी एक बाब, गोष्ट, घटक पासून मिळालेले समाधान हे आता समाधान निर्माण करेलच असे नाही. यामागे मानवी मनाचे लहरी,कायम बदलणारे आणि क्लिष्ट स्वरूप कारणीभूत आहे. आपला स्वभाव आणि वृत्तीवर आपले विचार आणि भावना ह्या कायम प्रभाव दाखवत असतात. यालाच आपण मूड स्विंग असे म्हणत असतो. तसेच या विचार आणि भावना यांना कधी कधी आपल्या मेंदूत साठवल्या गेलेल्या भूतकाळातील घटनांची जोड मिळत असते. म्हणजे भूतकाळातील अनेक बाबी, घटना आणि गोष्टी ह्या सुद्धा भावना आणि विचार यात समाविष्ट होतात. तसेच तत्कालीन वर्तमानकालीन परिस्थिती की जे आपल्या आजूबाजूला घडत आहे, मग ते गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत असेल ते सुद्धा विचार आणि भावना यावर प्रभाव टाकतात. साहजिकच आपल्याला भूतकाळातील काही तरी अचानक आठवणे आणि आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना यावर आपले नियंत्रण नसणे, त्यामुळे विचार आणि भावना यात चढ उतार होवून आपले मूड स्विंग होत राहतात.

        हे मूड स्विंग होत असल्याने समाधानाची पातळी खाली वर होत राहते.         साहजिकच तिच्या त्या पातळीवर आपला आनंद आणि सुख पोहचू शकत नसल्याने त्यातून समाधानाची निर्मिती होत नाही. अशोकने इयत्ता दहावी मध्ये ९६ टक्के मार्क मिळवले. अशोक ची आई ही गृहीणी आहे. त्याच्या आईला खूप आनंद निर्माण होवून तिला समाधानाची अती उच्य पातळी मिळते. कारण तिचा भूतकाळ, तिचे विचार, तिच्या भावना आणि तिचे वर्तमानकालीन आकलन याच्या आधारे तिचे सुख आणि आनंद हे तिच्या समाधान पातळीच्या वरती गेलेले असते. अशोकला एक अवनी नावाची बहीण आहे, ती इयत्ता पाचवी मध्ये शिकते. तिला तिच्या भावाला ९६ टक्के मिळाले, हे कळते तेंव्हा आई इतकाच आनंद होत नाही. कारण तिला अजून स्पर्धा आणि मार्क मिळविण्यासाठी अशोकने घेतलेले कष्ट याची म्हणावी तेवढी जाणीव नसते. साहजिकच तिला आनंद होतो. मात्र समाधानाची ती पातळी ती गाठत नाही. अशोकचे वडील हे शिक्षक आहेत. त्यांनी शाळा, मुले आणि अभ्यास, इतर शाळांतील मुलांची प्रगती, भूतकाळातील मुलांची प्रगती या सर्व गोष्टी जवळून पाहीलेल्या असतात. त्यामुळे त्यांचे विचार आणि भावना आणि त्याची समाधान पातळी याला अशोकचे यश हे किंचित स्पर्श करते. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात समाधान लाभते, मात्र जे अशोकच्या आईला समाधान मिळाले ते त्यांना मिळत नाही. अशोक मात्र खूप कष्ट घेणारा आणि होतकरू मुलगा आहे. त्याचे आकलन वडीला इतके निश्चितच नाही. त्याच्या शाळेत त्याच्या पुढे आजून खूप मुले आहेत. असे असले तरी त्याचे आकलन, विचार आणि भावना या आधारे त्याची समाधान पातळी ही वडिलांच्या वर आणि आईच्या खाली आहे. उपरोक्त घटना, कुटुंब आणि त्यांची एकाच घटनेत समाधानाची पातळी ही आपल्याला वेगवेगळी दिसून येते. म्हणजे एका असाधारण घटनेत सुद्धा समाधानाच्या पातळी मध्ये एकाच कुटुंबात एवढे कमालीचे चढ उतर दिसून येतात. तर साधारण घटनांचे बाबतीत समाधान पातळी कीती संवेदनशील पणाने काम करत असेल याचा प्रत्येय येतो.

      उपरोक्त बाबी पाहता समाधान ही एक क्लिष्ट, लहरी, गुंतागुतीची आणि व्यक्तीपरत्वे बदलणारी बाब असली तरी त्यावर आपल्याला काम करावे लागते. जर आपण त्यावर काम नाही केले तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आणि घडत असलेल्या अनेक बाबींपासून सुख आणि आनंद आपण प्राप्त करू शकणार नाहीत. जर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, बाबी, घटना याच्यातून आनंद आणि सुख मिळविण्यात आणि त्यातून समाधानाची पातळी गाठण्यात आपल्याला सारखे सारखे अपयश येत राहीले, तर त्यातून एक नैराश्य आणि औदासिन्न निर्माण होते, की जे आपली मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात आघात करते. त्यामुळे तुमच्या स्वभाव चिडचिडा आणि कायम असमाधानी असा होतो. या मुळे आपले तर विविध संबंध खराब होतातच शिवाय उत्साह संपुष्टात आल्याने कामाची प्रत अत्यंत घसरते आणि आपली उत्पादन क्षमता कमी होते, यामुळे आपण एक मानसिक दृष्टचक्रात अडकण्याचा धोका निर्माण होतो. आणि त्यातून बाहेर पडणे खुपच अशक्यप्राय होवून जाते. आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी आणि उपक्रम होत असतात. अनेक अशा गोष्टी आहेत की त्यातून आपल्याला आनंद मिळू शकतो. आपले अनेक छंद आपण जोपासून आनंदी राहू शकतो. मात्र आपण आपली समाधानाची पातळी ही अत्यंत उच्य पातळीवर ठेवलेली असल्याने आपण या सुखाला आणि समाधानाला पारखे होतो.

       सबब आपल्याला आपल्या समाधान पातळीवर जाणीव पूर्वक काम करावे लागते. ती एका योग्य आणि समान किमान पातळीवर आणावी लागते. याचा अर्थ असा मुळीच नाही की आपल्या महत्वाकांक्षा आणि आपली जिद्द याला सोडून द्यावे. किंवा आपण अल्पसंतुष्ट आणि मिळेल त्यात समाधानी राहावे. तर समाधान पातळी ही योग्य आणि समान किमान पातळी वर आणावी लागते. आता समाधान हे समान किमान आणि योग्य पातळी वर आणण्यासाठी काय करावे हे पाहूया. त्यासाठी आपले या भूतलावरील स्थान निश्चिती करणे आवश्यक ठरते. हे स्थान भौगोलिक दृष्ट्या निश्चिती नसून ते व्यापकतेने काळानुरूप निश्चित करावे लागते. म्हणजे आपण साधारण १६ ते २४ या वयात काय होतो? आणि आता काय आहोत?. आपल्या भावना, विचार, आनंद आणि सुख याच्या आधारे निर्माण होणारी वय वर्ष १६ ते २४ मधील समाधान पातळी काय होती? आणि ती आत्ता काय आहे?. तर तुम्हाला लक्षात येईल की या काही वर्षात आपली समाधानाची पातळी आपण खूप वरती आणि उच्च अशा पातळीवर नेवून ठेवलेली आहे. साहजिकच ह्या समाधान पातळीवर आपली कोणतीच निर्माण होणारी अथवा मिळणारी बाब पोहचत नसल्याने आपण कायम असमाधानी आणि दु:खी होत आहोत. अगदी लहान सहान गोष्टी की ज्यातून आनंद मिळतो ह्या गोष्टी या पातळी पर्यंत पोहचू शकत नसल्याने आपण आनंद, सुख आणि समाधान या पासून कोसो दूर राहून जात आहोत. काही वर्षापूर्वी आपल्याला वडापाव खावून मिळणारे समाधान आता मिळत नाही, काही वर्षापूर्वी चित्रपटगृहात चित्रपट  पाहायला गेल्यावर मिळणारे समाधान आता मिळत नाही, काही वर्षापूर्वी आपण आपल्या गावाकडील टेकडीवर गेल्यानंतर होणारा आनंद आणि त्यातून निर्माण होणारे समाधान आता मिळत नाही, काही वर्षापूर्वी आपली जुन्या मित्राला भेटल्यावर मिळणारे समाधान आता मिळत नाही. अशा प्रकारे काही वर्षापूर्वीच्या त्याच अनेक गोष्टी आपल्याला आनद आणि समाधान देत असत, त्याच गोष्टी आता आनंद आणि समाधान देत नाहीत, कारण आपण आपण आपली समाधान पातळी एका उच्य आणि अशक्यप्राय अशा पातळीवर नेवून ठेवली आहे. साहजिकच ह्या गोष्टी त्या पातळीला स्पर्शच काय तिच्या जवळपासही जात नाहीत आणि त्यामुळे आपण कायम असमाधानी राहत आहोत आणि असमाधानी होत चाललेले आहोत.

        आशा प्रकारे आपण आपला शोध घेवून आपली समाधानाची पातळी एका समान किमान आणि योग्य पातळीवर आणण्यासाठी आपला भूतकाळ अत्यंत सहाय्यभूत ठरू शकतो. आपला स्व-इतिहास या पेक्षा कोणतेही गोष्ट आपल्याला मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरू शकत नाही. त्यामुळे या बाबत आपण आपल्या भूतकाळाचे सिंहावलोकन करून आपण आपली समाधान पातळी खरच उच्य अशा पातळीवर नेवून ठेवली आहे का? हे आपले आपण तपासणे आवश्यक आहे. एकदा या बाबत चिकीत्सा झाली, की तिला हळू हळू समान किमान आणि योग्य अशा पातळीवर आणणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते. त्यानंतर भूतकाळातील घटना, बाबी, गोष्टी या परत रिपीट करायचा प्रयत्न करा. आपल्या मनात दडलेल्या आठवणी, पुरून ठेवलेल्या अनेक इस्चा  आणि आकांक्षा बाहेर काढा त्या प्रमाणे आपली कृती करा. जर आपल्याला आपल्या मामाच्या गावाला त्यांच्या अंगणातील आब्यांच्या झाडाखाली शांत बसून भोजन करायचे असेल तर ते करून पहा. आपला इयत्ता नववीचा जिवलग मित्र याला एक दिवस भेटायला जावून गप्पा मारा आणि एकत्र जेवण करा. आपण पदवीला असताना आपण ज्या ठिकाणी अभ्यास करायचो त्या ठीकाणी एक दिवस जावून बसून पाहा. अशा कीतीतरी गोष्टी की ज्या आपल्याला आनंद आणि समाधान देवून गेल्या आहेत. त्या केल्या की आपली समाधान पातळी हळू हळू खाली येवून ती एका समान किमान आणि योग्य पातळी वर येइल. अशी एक समान किमान आणि योग्य समाधान पातळी आपण गाठली की वर्तमान काळात आपण आपले दैनंदिन कामकाज करत आणि आयुष्यरूपी प्रवास करत असतांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी, बाबी आणि घटना याकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहण्याची दृष्टी निर्माण होवून, त्या गोष्टी आपल्याला आनंद, सुख आणि समाधान देतील आणि त्यातून आपण एक साधे, सरळ, सुटसुटीत, सोपे आणि सुखी आयुष्याकडे मार्गक्रमण करू शकाल.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया

०४१ /१०१ दिनांक ०१.०२.२०२२

सुखाच्या शोधात ©

राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७