सभ्य, नम्र, सदाचारी, शालीन, विवेकशील, विनयशील, सुसंस्कृत बना! Be Decent, Humble, Polite, Virtuous, Courteous, Prudent, Modest and Cultured!
सभ्य, नम्र, सदाचारी, शालीन, विवेकशील, विनयशील, सुसंस्कृत बना! Be Decent, Humble, Polite, Virtuous, Courteous, Prudent, Modest and Cultured!
सभ्य, नम्र, सदाचारी, सद्गुणी, शालीन, विवेकशील, विनयशील आणि सूसंस्कृत बनावे असे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र या मराठी शब्दांचा मराठी अर्थच आपल्याला खोलवर माहीत नसल्याने आपण त्या शब्दांच्या अर्थाप्रमाणे वागतही नाही आणि अनुकरणही करत नाही. यात दोष जसा अनुकरण न करणार्यांचा आहे तसा तो जे हे सांगतो त्याचाही आहे. हे शब्द उच्चारुन तसे वागा असे सांगितले जाते मात्र जो हे सांगत आहे त्यालाही या शब्दांचे अर्थ आणि मर्म कळलेले नसते. त्यामुळे जे सांगितले ते अनुकरणीय कसे होणार? हाच मुख्य प्रश्न असतो. वास्तविक सांगणारा आणि ऐकणारा या दोघांनीही हे शब्द समजून आणि उमजून घेणे आवश्यक असते. तसेच या शब्दांची व्यापकता आणि खोली लक्षात घेवून त्याचे अनुकरणही करणे आवश्यक असते. शब्द फक्त काही अक्षरे एकत्र येवून बनत नाही तर त्या मागे त्याचा काहीतरी अर्थ दडलेला असतो. शब्द जेवढे सहजतेने आपण वापरतो तेवढेच सहजतेने त्यांचा अर्थ आपण समजून घेत नाहीत. साहजिकच यामुळे जे काही पोहचवायचे आहे ते योग्य प्रकारे पोहचत नाही किंवा अर्धवट पोहचते. दैनदिन जीवनात सभ्य, नम्र, सदाचारी, शालीन, विवेकशील, विनयशील, सूसंस्कृत या शब्दांचा गर्भित अर्थ समजून घेणे आवश्यक ठरते. तसेच त्या प्रमाणे आपल्या जीवनात अनुकरण करणे, एक उत्तम असा समाज निर्माण करणे आणि त्यातून उज्वल राष्ट्र निर्माण करणे हे आपले प्रथम कर्तव्ये ठरते. प्रस्तुत लेखात या शब्दांचा अर्थ, मीमांसा, या प्रमाणे होणारी किंवा अत्यावश्यक असणारी वागणूक, वर्तन आणि अनुकरण तसेच या आधारे उत्तम पिढी निर्माण करण्याकडे कशी वाटचाल करावी? अशा अनेक बाबीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मानवाचे माणूसपण हे त्याच्या कडे असलेल्या अनेक गुण वैशिष्टे यामुळे प्रतीत आणि प्रभावी होते. माणूस म्हणून जगण्यासाठी त्याला कायम संघर्ष करावा लागतो. त्याच प्रमाणे माणूसपण कायम राखण्यासाठी काही गुणांचा स्विकार तर काही गुणांचा त्याग करावा लागतो. एका सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा व्यवस्थेमध्ये धर्माची बंधने, जातीचे नियम, समाजातील चाली रिती, रूढी, परंपरा याचेही जतन आणि संवर्धन त्याला करावे लागते. तसेच समाज जीवनात वावरत असताना त्याला नीती मूल्ये जपावी लागतात आणि या नीती मूल्ये याला अनुसरून त्याला अनुकरण करावे लागते. या सर्व बाबींच्या आणि गोष्टींच्या बाहेर जावून त्याला सभ्य, नम्र, सदाचारी, शालीन, विवेकशील, विनयशील, सुसंस्कृत बनण्यासाठी कायम प्रयत्नशील राहावे लागते. त्याच सोबत नुसते बनून चालत नाही तर त्याचे अनुकरणही करावे लागते तरच जीवनाच्या परिपूर्णतेकडे प्रवास होतो. हा प्रवास निश्चितच चढ-उतार खाच-खळगे यांचा असतो मात्र त्याच्या पुढे जावून आणि समाजातील नकारत्मकता बाजूला सारून सभ्य, नम्र, सदाचारी, शालीन, विवेकशील, विनयशील, सुसंस्कृत बनावे लागते. एकीकडे असे वागल्याने किंवा बनल्याने खरच जग सुंदर होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु माणसाने आपले मन, आपले विचार आणि आपली आजूबाजूची जागा स्वच्छ आणि सुंदर केली की निराशेचा आणि नकारत्मकतेचा अंधार हळू हळू दूर होण्यास मदत होते.
तो खूप सभ्य (Decent) माणूस आहे, असे आपण सहज म्हणतो. सभ्य म्हणजे काय तर इतरांशी चांगले वागणारा, इतरांना अत्यंत सन्मानपूर्वक वागवणारा, इतरांचे ऐकून घेणारा आणि सर्वांशी चांगले आणि सुयोग्य असे वर्तन ठेवणारा माणूस होय. सभ्य हा एक नाम वाचक शब्द आहे. सभ्यता ही अनुकरणीय अशी असते आणि ती अनुकरणातुनच जन्म घेते. सभ्य व्यक्ती सामाजिक नियम आणि अटी पाळण्यात सर्वात पुढे असतात. सभ्यता ही अत्यंत कोमल, मृदु आणि लवचिक अशी असते. सभ्य लोक सर्वांनाच हवे हवेसे वाटतात आणि आवडतात. सभ्यता ही एक शिस्त आहे आणि ती अंगवळणी पाडावी लागते. मीच का सभ्य बनू? असा एक विचार नेहमी समोर येतो. परंतु सभ्यता आपल्या मनाला आणि विचाराला एक दिशा दाखवते. सभ्य लोक सूयोग्य असेच वर्तन करतात. सभ्य माणसाकडे स्वीकारहर्ता जास्त असते. सभ्यतेमधून एक सकारात्मकता वलय आपल्या भोवती तयार होते. त्या मुळे अडचणीत आणणारे लोक आपोआप दूर जातात आणि चांगल्या, उत्तम आणि गुणी माणसांचा सहवास सुरू होतो. असा सहवास लाभला की आपले जीवन प्रसन्न होवून आपण हळू हळू सुखाच्या अनुभूती कडे प्रवास करतो.त्यामुळे कायम आपल्या मध्ये सभ्यता रुजविण्याचा प्रयत्न हवा.
नम्रता(Humbleness) ही वागण्यात असते आणि ती आपल्या दैनंदिन व्यवहारातून प्रतीत होते. आपल्याकडे आलेला व्यक्ति याचे काळजीपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत केल्याने आपला नम्रतेचा भाव दिसून येतो. नम्रता ही जगाकडे व्यापक आणि विशाल दृष्टीकोणातून पहिल्याने तयार होते. कोणी उच्च नाही कोणी कनिष्ठ नाही तसेच कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही हा विचार नम्रतेचे बीज पेरतो. नम्र व्यक्ति हा लीन आणि विनम्र असा असतो. हा व्यक्ति कधीही मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानत नाही आणि वागत नाही. नम्रता हे विशेषण आहे. नाम किंवा कर्ता याबाबत नम्रता हा शब्द माहिती देतो. जेवढ तुम्ही नम्र असाल तेवढा तुमचा स्वीकार इतरांकडून आणि समाजाकडून होत असतो. गर्विष्ठपणा हा नम्रते मध्ये कमी केला जातो किंवा सोडून दिला जातो. नम्र माणूस हा स्वता:ला खूप महत्व देत नाही तर इतरांना जास्त महत्व देवून इतरांचा कायम आदर करतो. असे लोक जास्त अभिमान बाळगत नाहीत. नम्रता ही अचानक निर्माण होत नाही तर ती हळू हळू अंगी आणावी लागते.नम्रता असेल तर माणसे आणि पुढे जावून जग जिंकता येते. कायम नम्रता अंगी बाळगण्याचा प्रयत्न करा.
सदगुणातून Virtuous सदाचाराचा Polite उगम होतो. सद्गुणी व्यक्ति हा सदाचारी असतो. सदाचारी हा शब्ध सद आणि आचार या शब्दापासून बनला आहे. सदाचारी यातील सद म्हणजे चांगले असे आहे. चांगले असे आचरण करणारा म्हणजे वागणारा तो सदाचारी होय. सद्गुणी आणि सदाचारी माणूस हा अत्यंत हवाहवासा असा असतो. कारण तो त्याच्या आचरण आणि सद्गुण यातून इतरांसाठी दिवा होवून`प्रकाश दाखवत इतरांना मार्गस्थ करत असतो. सद्गुणी हा व्यक्ति चांगल्या गुणाचा समुचय असलेला माणूस असतो. अनेक चांगले गुण त्याच्या ठायी वास करतात. सद्गुण हे मानवाच्या ठायी वास करतात आणि त्याला उत्तम बनवतात. सद्गुण हा ज्ञान, माहिती आणि क्षमता या पेक्षा वेगळा असतो. सद्गुण हे एक वैशिष्ट्य पूर्ण असे गुण असतात आणि सदाचार ही एक वागण्याची पद्धत असते. परोपकार, संयम, सत्यवचन हे काही सद्गुण सांगता येतील. सॉक्रेटिस हा सद्गुण म्हणजेच ज्ञान समजत असे. अरिस्टोटल मात्र सद्गुण म्हणजे विवेकला धरून जगणे असे सांगतो. प्लेटो मात्र प्रज्ञा, ध्येर्ये, संयम आणि न्याय याला सद्गुण असे म्हणतो. सद्गुण अंगी बाळगून सदाचाराचा अवलंब केल्याने माणूस एक वेगळ्या उंचीवर जातो.
शालीन Courteous माणूस हा अत्यंत लीन असा असतो. त्याचे इतरांसोबतचा व्यवहार हा अत्यंत साधपणाने आणि खरेपणाने असतो. त्याचे वागणे आणि बोलणे हे उच्च अशा दर्जाचे आणि प्रामाणिकपणाचे असते. शालीन हा एक गुणधर्म आहे. यामध्ये विविध सकारात्मक भूमिकेचा संग्रह येतो .शालीनता ही अनेक ठिकाणी अधोरेखित केली जाते. शालीन व्यक्ति हा आदरणीय असा असतो. तसेच तो दखलपात्र देखील असतो.शालीन व्यक्तिला सहजा डावलले जात नाही. त्याची शालीनता हेच त्याचे वैभव असते.
विवेक म्हणजे Prudent होय. विवेकशील म्हणजे सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याचे ज्ञान ठेवून वागणारा माणूस होय. विवेकशील असणे ही मनुष्याची एक जागृत अशी अवस्था आहे. विवेकी माणूस नैसर्गिक आणि कुत्रीम असे दोन्ही नियम याचे पालन करतो. विवेक मध्ये भविष्याचा वेध घेतला जातो. आपले निर्णय हे भविष्यात सुखदायक ठरतील की दुखदायक यावर सारासार विचार केला जातो. विवेकाने घेतलेला निर्णय हा जास्त फलदायी असतो कारण यात परिणामांचा सांगोपांग विचार केलेला असतो. विवेक हे भविष्याकडे डोळसपणे पाहण्याची शक्ति प्रदान करते. निवाडा, निर्णय आणि निकाल हा जेंव्हा काळजीपूर्वक आणि संवेदनशील पद्धतीने दिला जातो तेंव्हा तो विवेकपूर्ण रीतीने दिला असे म्हटले जाते. विवेक मध्ये तुमच्या निवडी आणि तुमचे निर्णय हे विचारपूर्वक आणि बुद्धिगम्य पद्धतीने घेतले जातात. विवेकपूर्ण निर्णय मध्ये भावनांना अतिक्रमण करू दिले जात नाही. झाड तोडू नये हा झाला नैसर्गिक नियम तर रस्त्याच्या चालतानी डाव्या बाजूने चालावे हा झाला कृत्रिम नियम. विवेकशील माणूस हा चुकीच्या गोष्टी स्वीकारत नाही आणि करतही नाही. म्हणून आपण अधिक विवेकपूर्ण आणि विवेकशील बनण्याकडे वाटचाल करायला हवी.
विनय Modest म्हणजे वागण्याची रीत होय. विद्या विनयेन शोभते असे म्हटलं जाते त्याचा अर्थ असा की नुसती बुद्धिमता किंवा विद्या असून उपयोग नाही तर त्या सोबत विनयशीलता सुद्धा अंगी बाळगायला पाहिजे. विनय आणि विनम्रता हे दोन्ही शब्द शक्यतो एकाच अर्थाने वापरले जातात. विनय हा वागण्याची रीत असली तरी तो विनय हा अंगी आणण्यासाठी मनावर संस्कार करून घ्यावे लागतात. विनय हा फक्त बुद्धिमत्ते मधून निर्माण होत नाही तर त्याला योग्य आणि चांगल्या विचारांची जोड द्यावी लागते. विनय ही एक सभ्यता आणि शुभ्रता असते. विनय हा एक दागिना आहे. की जो व्यक्तीला अजून चांगले बनवतो. क्षमता आणि कर्तुत्व याचा अहंकार विनयशील लोक सोडून देतात आणि अधिक स्थिर आणि नम्र होतात.
सूसंस्कृत Cultured हा शब्द आपली संस्कृती सोबत संबध दर्शविणारा असला तरी अर्थ खूप वेगळा आहे. प्रत्येक समाज हा एक सभ्यता आणि संस्कृती घेवून पुढे जातो. इतिहास मागे पडतो मात्र संस्कृती जाणीव पूर्वक पुढे घेवून जावी लागते. संस्कृती हा शब्द जीवनाच्या उन्नती साठी वापरला जातो तर सूसंस्कृत हा तसा व्यक्तिनिष्ठ असा शब्द आहे. एखांदा व्यक्ति हा अनेक सदगुण अंगी बाणवतो याचा अर्थ तो सूसंस्कृत आहे असे आपण म्हणतो. एखांदा व्यक्ति उच्च विध्याविभूषित आहे त्याला आपण सूसंस्कृत म्हणतो. सूसंस्कृतपणा आजच्या या युगात अंगी असणे हे एका सुदृढ अशा समाजाचे लक्षण आहे. सूसंस्कृत समाज हा ऊर्ध्व दिशेने प्रवास करतो. या समाजात मानवी मूल्ये आणि मानवी अधिकार याची पायमल्ली केली जात नाही. कायदे हे लादायचे नसतात तर ते पाळायचे असतात यातून सुसंस्कृतपणा प्रतीत होतो. जेवढा समाज सूसंस्कृत तेवढा तो समाज जास्त विकसित होतो आणि लाभाचे वितरण समान होते.
अशा प्रकारे माणसाचे माणूसपण आणि माणुसकी वृद्धिंगत करून एक सशक्त असा समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सभ्य, नम्र, सदाचारी, शालीन, विवेकशील, विनयशील, सुसंस्कृत बनण्यासाठी कायम प्रयत्नशील राहावे लागते. सभ्य माणूस हा सर्वांशी चांगले आणि सुयोग्य असे वर्तन ठेवणारा असतो आणि त्यामुळे परस्पर सहकार्य वाढते. नम्रता ही जगाकडे व्यापक आणि विशाल दृष्टीकोणातून पाहाण्यासाठी मदत करते आणि अंतरवैयक्तिक संबध दृढ करते. सद्गुण अंगी बाळगून सदाचाराचा अवलंब दैनदिन जीवनात केल्याने माणसाचे माणूसपण वाढीस लागून समाज एकसंध होतो. शालीन माणसाला सहजा डावलले जात नाही. त्याची शालीनता हेच त्याचे वैभव असते. विवेकशील असणे ही मनुष्याची एक जागृत अशी अवस्था आहे त्यातून सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याचे ज्ञान आणि भान ठेवून निर्णय घेतले जातात. विनय हा वागण्याची रीत असली तरी विनय हा अंगी आणण्यासाठी मनावर संस्कार करून घ्यावे लागतात. सूसंस्कृतपणा आजच्या या युगात अंगी असणे हे एका सुदृढ अशा समाजाचे लक्षण असून सूसंस्कृत समाज हा ऊर्ध्व दिशेने प्रवास करतो. एकंदर माणूस सभ्य, नम्र, सदाचारी, शालीन, विवेकशील, विनयशील, सूसंस्कृत बनला की त्याचे आयुष्य साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी होण्यास मदत होते.
जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया
६६/१०१ दिनांक ०४.०५.२०२३
सुखाच्या शोधात ©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७