आक्रमकता आणि हिंसकता कमी करा Reduce Aggression & Violence

आक्रमकता आणि हिंसकता कमी करा Reduce Aggression & Violence

         मानवाच्या गळ्यातून जसे सप्त सुर बाहेर पडतात अगदी त्या प्रमाणे मानवी मनातून भीती, दुख, आनंद, राग, तिरस्कार, आश्चर्य आणि प्रेम ह्या सात भावना बाहेर पडतात. ज्या प्रमाणे तीन मुख्य रंग मिसळून रंगाच्या अनेक छटा निर्माण होतात तशाच प्रकारे या भावनांच्या  मिश्रणातून अनेक प्रकारच्या उपभावनांच्या छटा तयार होतात. आपला स्वभाव आणि आपला दृष्टीकोण हा आपण आपल्या भावनांचे आणि विचारांचे व्यवस्थापन आणि प्रकटीकरण कसे करतो यावरही बरचसा अवलंबून असतो. मात्र आपल्या भावना, विचार, स्वभाव आणि दृष्टीकोण याला जेंव्हा ठेच  पोहचते किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे त्या विरुद्ध गोष्टी घडल्यास आपल्याला तणाव निर्माण होतो. या तणावाची पुढची पातळी म्हणजे आक्रमकता आणि हिंसकत्ता होय. आक्रमकता ही सामान्य स्थितीत सकारात्मक असूही शकेल, मात्र हिंसकता ही नेहमीच नकारात्मक असते. आक्रमकता अंगी असणे हे कोणतेही कार्य किंवा काम तडीस घेवून जाण्यासाठी आवश्यक बाब असते. मात्र दैनदिन जीवनात कायम आक्रमक राहणे हे आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, कौटुंबिक आणि सामाजिक सहचर्य आणि सहकार्य याला ठेच पोहचविणारे ठरते. तसेच हिंसकता कोणतीही असो तिचे कोणत्याच बाजूने समर्थन मात्र होवू शकत नाही. प्रस्तुत लेखात आक्रमकता आणि हिंसकता म्हणजे काय? ती कशी निर्माण होते? तीचे आपल्यावर काय परिणाम होतात? आक्रमकता आणि हिंसकता कमी कशी करावी ? आणि त्या संबंधित इतर बाबींवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

सृष्टीतील तमाम जीव-जंतूस जगण्यासाठी जन्मापासून संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष भरण  आणि पोषणसाठी असतो तर कधी  इतर शिकाऱ्यापासून बचाव करण्यासाठी असतो. खरे सांगायचे तर जीवन साखळी मध्ये दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्यात असणार्‍या जीवांना सर्वात जास्त संघर्ष करावा लागतो. कारण या टप्यातील जीवांना जीवन साखळीत वरुन आणि खालून दबाव असतो. एकीकडे भरण आणि पोषण यासाठी असणारी वणवा आणि भक्षापासून शिकार होण्याची कायम धोका त्यांच्या समोर असतो. तीन लाख वर्षापासून अगदी अलीकडे दहा हजार वर्षापर्यंत मानव हा जीवन साखळीत मधल्या स्तरावर असल्याने त्यालाही हा कायम धोका होता. मात्र मागील बारा हजार वर्षात त्याने अविश्वसनियरित्या आणि स्वत:च्या विलक्षण अशा बुद्धिमत्तेच्या जोरावर जीवन साखळीत अगदी वरच्या स्तरावर झेप घेतली आहे. जैविक दृष्ट्या ही मोठी झेप असली तरी मानसिक पातळीवर त्याच्या गुणसूत्रात दडलेली आक्रमकता आणि हिंसकता ही कायम मध्ये मध्ये डोके वर काढत असते.

मानवी समाज आणि त्याची संस्कृती आणि त्या पाठोपाठ आलेला धर्म व्यवस्था यामुळे मानव एका विशिष्ट अशा सामाजिक बंधनात अडकत गेला आणि त्याने सुसंस्कृत होण्याकडे वाटचाल केली. रानटिपणा ते सुसंस्कृतपणा यासाठी त्याला अनेक वर्ष खर्ची घालावी लागली. रानटिपणा, संस्कृती, धर्म आणि सुसंस्कृतपणा आणि मानवी मुल्ये असा त्याचा असाधारण  प्रवास आहे. साहजिकच या द्वारे त्याची वाटचाल अमानवीय कडून मानवी स्वरूपाकडे झाली. आक्रमकता ही एक मानवी मनाची अवस्था आहे. जेंव्हा आपल्याला अपेक्षित असणारे घडत नाही किंवा आपल्यावर कोणी तरी आक्रमण करत आहे किंवा आपल्या अस्तित्वाला धोका आहे असे ज्यावेळेस आपल्या मन आणि बुद्धी याला वाटते त्यावेळी मेंदूकडून शारिरीक अवयवाना एक संदेश पाठवून आक्रमकता निर्माण केली जाते. लहान बहीण आणि भाऊ एकत्र खेळतात परंतु लहान बहिणीची एखांदी आवडती डॉल मोठा भाऊ घेतो त्यावेळी ती आक्रमक होवून त्याला चावा घेते. शाळेत दोन मित्र एकाच वर्गात शिकत असतात. मात्र जेंव्हा एक मित्र दुसर्‍या मित्राची इतर चार चौघात चेष्टा मस्करी करून त्याच्या अस्तित्वाला धोका अथवा त्याला खाली दाखवतो त्यावेळी आक्रमकता उफाळून येवून भांडण होते. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी पुढे जाण्यावरून  आणि बॉसच्या पुढे पुढे करण्यावरून ऐकमेकांत आक्रमकता वाढीस लागून संघर्ष निर्माण होतो. यात एक विशेष बाब लक्षात येते जेवढे आपण लहान तेवढा संघर्ष समोर होतो मात्र जेवढे आपण मोठे तेवढा संघर्ष पाठीमागून होतो.

हिंसकता ही अत्यंत तीव्र अशी स्वरूपाची कृती असून या मुळे शारीरिक स्वरूपाचे आणि कधी कधी न भरून येणारे असे नुकसान होते. हिंसकता ही बऱ्याच अंशी आक्रमकतेमधून निर्माण  होते. आक्रमकतेने अगदी तीव्रतेची आणि टोकाची पातळी गाठली की, त्यातून समोर समोर संघर्ष होवून त्याचे रूपांतर हिंसेत होते. हिंसा ही मानवी समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याने इतिहासात सर्व प्रथम कलिंगच्या युद्धाचे सम्राट अशोकाच्या विचार आणि जीवनक्रमावर दूरगामी परिणाम झाले. युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दुःखी झाला. केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला. यातून अशोकाने परत कधीही युद्ध आणि हिंसा न करण्याचा निश्चय केला. या युद्धानंतर कोणत्याही प्रकारचे दुःख त्याला सहन होईनासे झाले. मनुष्य आणि इतर प्राणी किंवा वनस्पतींचीही केलेली हिंसा त्याला आवडत नसे आणि त्याने अहिंसात्मक मार्गाचा स्वीकार केला. त्या नंतर अनेक संत आणि तत्वेवेत्ते यांनी समाजाला  उपदेश करत असताना हिंसेतून मानवाची कशा प्रकारे हानी होते आणि मनुष्यत्व पासून तो दूर कसा जातो ते प्रतिपादले  आणि सबब हिंसेचा मार्ग न अवलंबता अहिंसा तत्वाचा स्वीकार करावा अशी शिकवण दिली. अहिंसेच्या मार्गाचे सर्वात मोठे पुरस्कर्ते म्हणजे महात्मा गांधी होत. त्यांनी ब्रिटीश साम्राज्य विरुद्ध स्वातंत्र्य लढा देण्यासाठी अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि तो लढा यशस्वी करून दाखविला.

अशा प्रकारे आक्रमकता आणि त्यातून होणारी हिंसा ही मानवी समाजास कायमच अपायकारक ठरते. वैयक्तिक पातळीवर असो किंवा सार्वजनिक पातळीवर आक्रमकता आणि हिंसा ही मानवी संबध दूषित करून परस्पर सहकार्य संपुष्टात आणते. आक्रमकता ही काही अंशी आवश्यक असली तरी कायम आक्रमक राहिल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक पेच प्रसंग निर्माण होतात आणि नुकसान होते. आक्रमकता ही अनेक प्रकारचे संबध खराब करण्यास करणीभूत ठरते. कायम आक्रमक राहिल्याने लोक तुमच्या पासून दूर जातात आणि वेळेवर मदत करत नाहीत. आक्रमक राहिल्याने अडचणीत येण्याची आणि अडचणीत आणणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढते. आक्रमकतेतून दुसर्‍याचे पेक्षा स्वत:चे जास्त नुकसान होते. आक्रमकतेतून जास्त शत्रू तयार होत असल्याने ते एकत्र येवून आपल्या प्रगतीत आणि विकासात अनेक प्रकारचे अडथळे आणण्यास सुरुवात करतात. त्या पुढे जावून हिंसा ही तर माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यातून उठवते. हिंसा करणे किंवा हिंसेचे समर्थन करणे हे सुज्ञ आणि सुसंस्कृत समाजास शाप ठरते.

अशा प्रकारे आक्रमकता आणि त्यातून निर्माण होणारी हिंसा यावर आपल्याला वैयक्तिक पातळीवर काम करावे लागते. हिंसेचा विचार तर मी करणारच नाही, हिंसेचा पुरस्कारही  आणि त्या हिंसेला मदत पण करणार नाही अशी पहिली मनाशी खूनगाठ पक्की करावी लागते. आक्रमकता ही मुत्सेदिगिरीच्या दृष्टीने काही प्रमाणात आवश्यक असली तरी आक्रमकता कायम अंगी बाळगणे आणि तिचा नकारात्मक गोष्टीसाठी गैरवापर करणे हे समर्थनीय होवू शकत नाही. आपल्यातून कायम उफाळून येणारी आक्रमकता कशी कमी करता येईल आणि त्यातून कोणतेही धोके, अडचणी आणि समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी जेवढे शक्य होईल तेवढे आपण दक्ष राहिले पाहिजे. आक्रमकता कमी करून सहिष्णूता आणि सहचर्य वाढीस लावण्यासाठी सर्वांनी  आपला हातभार लावणे आवश्यक आहे. तसेच आक्रमकतेचे रूपांतर हिंसेत आणि हिंसेचे रूपांतरण उन्माद यात होणार नाही याची फार काळजी घ्यावी लागते

अशा प्रकारे आपले आयुष्याचे मार्गक्रमण करत असतानी आक्रमकता शक्य होईल तेवढी  कमी करणे. समाजातील सर्व घटक यांचे महत्व आणि मूल्य समजून घेवून त्यांच्याशी नाते आणि संबंध जोडणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते. आक्रमकता कमी करण्यासाठी विविध भावना आणि सकारात्मक विचार यांचा सुयोग्य  संगम आणि संयोजन साधावा लागतो. काही प्रमाणात ध्यानधारणा आणि प्राणायम आणि त्याला योगाची जोड देता येतीय का ते पहावे लागेत. धीर धरून आणि संयम ठेवून आक्रमकपणा जेवढा कमी करता येईल तेवढे त्यावर काम करणे वेळोवेळी आवश्यक ठरते. आक्रमकतेपेक्षा सहिष्णुता स्विकार करणे कधीही फायदेशीर ठरून तुम्ही एक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करता.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया

६५/१०१ दिनांक २७.०४.२०२३

सुखाच्या शोधात ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७

.