संवाद, समन्वय आणि सहकार्य Communication, Coordination & Cooperation

संवाद, समन्वय आणि सहकार्य Communication, Coordination & Cooperation

 मानवी जीवन हे सतत प्रवाही असते. काहींचा प्रवाह हा संथ तर काहींचा जलद असतो. काहींचा स्वच्छ तर काहींचा गढूळ असतो. या जीवनरूपी प्रवाहात अनेक चढ-उतार आणि अडथळे येत असतात. असे असले तरी आपल्याला या जीवनरूपी प्रवासात पुढे मार्गक्रमना करावीच लागते. असा हा जीवनरूपी प्रवासाचा प्रवाह सुखकर आणि आनंददायी व्हावा यासाठी आपल्याला अनेक घटक आणि बाबी सोबत संवाद, समन्वय आणि सहकार्य साधावे लागते. असा संवाद, समन्वय आणि सहकार्य कसे साधावे आणि त्यातून आपली प्रगती कशी करावी याबाबतचे विवेंचन आपण प्रस्तुत लेखात करणार आहोत.

     आपण जन्माला आल्यापासून आपला मृत्यू होत पावेतो आपला जीवनप्रवास हा एक प्रवाहासारखा मार्गक्रमण करत असतो. असे मार्गक्रमण चालू असताना आपले कुटुंब, आपले मित्र, आपले अप्तेष्ट आणि कामकाज आणि व्यवसाय निमित्त आपला वावर असतो तो समाज आपल्यावर अनेक प्रकारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव टाकत असतात. असा प्रभाव हा एकतर भावनिक स्वरूपाचा असतो किंवा व्यावसायिक स्वरूपाचा असतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्याला ह्या प्रभावाचे गणित समजले तो अधिक प्रगतीकडे मार्गस्थ होतो. त्यामुळे आपल्या भोवताली असणार्‍या विविध घटकांसोबत आपण संवाद, समन्वय आणि सहकार्य साधुनच आपला जीवनरूपी प्रवासाचा प्रवाह मार्गस्थ करावा लागतो.

     संवाद म्हणजे अशी कृती की जिच्या माध्यमातून आपण माहिती, कल्पना आणि भावना याचे आदान-प्रदान करतो(Communication is an the act of sharing or exchanging information, ideas or feelings). मात्र असा संवाद हा सध्याच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात कमी कमी होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जरी आभासी-वर्चूअल संवाद वाढलेला असला तरी तो संवाद प्रत्यक्ष स्वरुपात काही तरी निर्माण करण्यात उपयोगी पडत नाही असे आत्ता हळू हळू सिद्ध होत आहे. आभासी-वर्चूअल संवादातून तात्पुरते उत्साह वर्धक वाटत असले तरी त्यातून कायमस्वरूपी भरीव बदल होत आहेत असे दिसत नाही. एकंदर आपल्या प्रगतीत या आभासी-वर्चूअल संवादाचा म्हणावा तेवढा फायदा होताना दिसत नाही. एकंदर प्रत्यक्ष संवाद कमी झाल्याने परस्पर अविचाराचे ढग निर्माण झाले आहेत. तसेच त्यामुळे संवाद हा कोणत्याही कार्याची सुरवात असल्याने संवादच होत नसल्याने नसल्याने विविध कार्य व कामे पुढे जातांना दिसत नाहीत. सबब परस्परातील प्रत्यक्ष संवाद जाणीवपूर्वक वाढवणे आवश्यक आहे आणि त्यातून कृतीक्षम कामकाज मार्गी लागणे आवश्यक ठरणार आहे.

     आपल्या सोबत आणि अवती भोवती असलेल्या विविध घटक समवेत योग्य असे संघटन साधून त्यातून अपेक्षित परिणाम मिळवणे म्हणजे समन्वय होय. (Coordination is the organization skill of different things or people so that they can produce suitable result). मात्र असा समन्वय साधण्याचे कौशल्ये आणि कसब आपण काळाच्या ओघात साध्य करत नसल्याने आपल्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि अपेक्षित परिणाम साधता येत नाही. त्यामुळे आपली प्रत्येक कृती ही समन्वय साधण्याकडे झुकलेली असायला हवी. समन्वय म्हणजे फक्त तडजोड असेही काहींना वाटू शकते. मात्र तसे नाही, समन्वय हा योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य व्यक्तीशी साधलेला सर्वसाधारण मेळ असतो. आपली ज्यावेळी दिनचर्या सुरू होते त्यावेळी अगदी आपली पती/पत्नी, आई –वडील, मुले यांच्यासोबत समन्वय साधून आपण सुरुवात करायला हवी. समन्वय साधण्याची पहिली स्टेप ही संवाद असते आणि त्यानंतर कृती होते हे लक्षात घ्यावे. आपल्यापैकी बर्‍याच जणांना कृती करायची घाई असते त्यामुळे योग्य संवाद न होता कृती झाल्याने त्याचे अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत. कुटुंबामधील आपसपासातील संवाद कमी झाल्याने समन्वयाचे सुद्धा तीन तेरा वाजले आहेत असेही म्हणावे लागते. त्यासाठी आपल्या कुटुंब सदस्यांसोबत रात्री जेवण झाल्यावर आणि सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर जाणीवपूर्वक संवाद साधने आवश्यक ठरते आणि त्यातून खूप काही साध्य होवू शकेल.

     सहकार्य म्हणजे एकत्र येवून, एकमेकाला मदत करून एक ठराविक उदेश अथवा हेतु साध्य करणे होय. (Cooperation is an act or instance of working or acting together for a common purpose or benefit). मात्र आपण पाहत असतो की एकत्र येण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची वृती आपल्या सर्वांमध्ये कमी झालेली आहे. अनेक गोष्टी ह्या परस्पर सोशल मीडिया आणि महिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असल्याने लोक एकत्र येणे तसे दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे विविध कामांना तर गती तर मिळतच नाही आणि एकंदर सर्वच ठिकाणी निराशा आणि नैराश्य वातावरण तयार झाले आहे. व्यक्ति हा आत्मकेंद्री आणि एककेंद्री झाल्याने परस्पर सहकार्यातून जी कामे पूर्वी मार्गी लागत  असत ती कमी झालेली दिसून येत आहेत. एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!  हे वचन लोप पावतांना दिसत आहे. सहकार्यच लोप पावल्याने एकंदर मानवाची प्रगती खुंटलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. सहकार्याची जागा ‘गिव्ह अँड टेक’ किंवा ‘टेक अँड गिव्ह’ ने घेतलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. प्रत्येक व्यक्ति हा दुसर्‍या व्यक्तीशी स्पर्धा करत असल्याने तीव्र स्वरूपाचे संपतीचे आणि आणि संसाधनाचे केंद्रीकरण होत आहे. ही बाब सामाजिक अभिसरण आणि विकासासाठी निश्चितच चांगली नाही.

     त्यामुळे सर्वसमावेशक आणि विकसित असा समाज जर घडवायचा असेल तर सकारात्मक संवाद, योग्य समन्वय आणि परस्पर सहकार्य घडवून येणे आणि आणणे आवश्यक आणि अनिवार्य ठरणार आहे.  त्या अनुषंगाने चला आपला संवाद वाढवूया, प्रत्येक ठिकाणी समन्वय साधण्याचा प्रयत्न करूया आणि परस्पर सहकार्याची मुहर्त मेढ रोवूया. हे सर्व आपण साध्य करायला लागलो की आपले जीवन अधिक साधे, सोपे ,सरळ, सुटसुटीत आणि सुखी होईल.  

    जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया !

०२३/१०१ दिनांक २१.०७.२०२१

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७