संधी ओळखा आणि आव्हाने पेला ( Identify Opportunities and Accept Challenges)

    संधी ओळखा आणि आव्हाने पेला ( Identify Opportunities and Accept Challenges)

       ज्या प्रमाणे आयुष्यातील एक घटना संपूर्ण आयुष्य बदलून टाकते, अगदी त्या प्रमाणे एक संधी आयुष्याला कलाटणी देवू शकते. मात्र बहुतांशी लोक नशिबावर भरवसा ठेवून संधीची वाट पाहत बसतात. संधी तर मिळतच नाही, पण संधीचा संधीवात कधी होतो, हे सुद्धा त्यांना कळत नाही. संधी ही कायम पुसटशी असते, ती कधीही खूप गाजावाजा करत येत नाही, त्यामुळे ती ओळखण्यासाठी तेवढेच शांत, नम्र आणि संयमी व्हावे लागते. अनेक वेळा आपण आजूबाजूला पाहतो की, लोक मला संधी मिळत नाही असे कायम ओरडत असतात. त्यांचा हा आवाज आणि अक्रोश एवढं मोठा असतो की, संधी त्यांचे दार ठोठवून जाते तरी त्यांना कळत नाही. काळ पुढे सरकत राहतो तशा संधी कमी कमी होत जातात. साहजिकच संधी ओळखणे साठी एक विशेष कला आणि कौशल्ये हस्तगत करावे लागते. त्याची जोपासणूक करावी लागते आणि अधिक शांत, नम्र आणि संयमी व्हावे लागते तेंव्हा कोठे संधी मिळते. तसेच नुसती संधी मिळून उपयोग होत नाही, तर संधी सोबत आव्हाने सुद्धा समोर येतात. साहजिकच ही आव्हाने पेलण्यासाठी कष्टाची तयारी, ज्ञान, अनुभव, कौशल्ये, सकारात्मक दृष्टीकोण आणि आत्मविश्वास अत्यावशक असतो. तरच संधीचे सोने होवून जीवन अधिक आनंददायी आणि सुखकर होते. प्रस्तुत लेखात संधी म्हणजे काय? ती कशी शोधायची? तिचा शोध कसा लावायचा?, आव्हाने म्हणजे काय? ती कशी पेलावीत? संधी सोबत आव्हाने कशी येतात? त्यातून मार्ग काढून संधीचे सोने कसे करावे? अशा विविध बाबीवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

आपले मानवी जीवन म्हणजे फक्त ‘एकाकी अस्तित्व’ नाही तर, या जीवनाला अनेक घटक आणि बाबी कायम स्पर्श करत राहतात. आपले कुटुंब, आपले आप्तेष्ट, आपले समाज बांधव, आणि आपल्या कामाच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी असलेले सहकारी हे आपल्या जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव टाकत असतात. आपल्याला आलेले अनुभव आणि या विविध घटकांचा प्रभाव या आधारे आपल्या जीवनात संधी उपलब्ध होत असतात. संधी ही एक अशी परिस्थिती असते की जी एका ठराविक वेळी उपलब्ध होत असून तिच्या आधारे तुम्ही तुमचे उदीष्टे आणि ध्येये गाठण्याकडे मार्गक्रमण करत असता. मात्र एका परिस्थितीत आणि ठराविक वेळी निर्माण किंवा प्राप्त झालेले संधीकडे फक्त पाहत बसून चालत नाही, तर तिच्यावर काम करावे लागते, तिच्यावर स्वार व्हावे लागते तेंव्हाच ती तुम्हाला निश्चित स्थळी पोहचवते.

संधी ही एक उपलब्धता असून ती कामकाज आणि त्याद्वारे साध्य होणारे यश याकडे मार्गस्थ करते. संधी ही नदीसारखी प्रवाही असते आणि हवेसारखी वाहणारी असते. आपण जर स्तब्ध उभे राहिलो तर ती स्पर्श करून निघून जाते. एका ठिकाणी एका ठराविक वेळी संधी उपलब्ध होती हे आपल्याला कळत सुद्धा नाही. त्या साठी उपरोक्त सांगितल्या प्रमाणे संधी ओळखावी लागते आणि त्यावर स्वार व्हावे लागते. जसे घोडा फक्त धरून चालत नाही, तर लगाम खेचून त्यावर स्वार व्हावे लागते तसे हे आहे. संधीवर स्वार झालो तरच गती मिळते आणि विजयी पताका रोवता येते.

संधी मिळणे आणि निर्णय घेणे या दोन्ही बाबी आपल्या जीवनात खूप महत्वाच्या असतात. अनेक वेळा संधी मिळते मात्र आपण योग्य वेळी योग्य असा निर्णय घेत नसल्याने संधी निघून जाते. त्यामुळे संधी प्राप्त झाल्या नंतर निर्णय घेणे ही बाब खूप आवश्यक असते. निर्णय घेणे हे एक कौशल्ये असून त्यासाठी ज्ञान, अनुभव, मार्गदर्शन आणि दृष्टीकोण यावर काम करावे लागते. आपल्या जीवनात अनेक घटना आणि बाबींचा निर्णय घेता न आल्यामुळे अनेक संधी हातातून आपल्या गेलेल्या असतात. शिक्षण पूर्ण झाले की आपण नोकरीच्या शोधात असतो. या वेळी आपल्या समोर अनेक संधी येतात परंतु मला अमुक पॅकेजची नोकरी पाहिजे तमुक या शहरात नोकरी पाहिजे असे विचार करून अनेक संधीवर आपण पाणी सोडतो आणि शेवटी हात हलवत परत येतो. हे असे का होते कारण आपण ज्ञान, अनुभव, मार्गदर्शन आणि दृष्टीकोण यात कमी पडतो. यात कमी का पडतो कारण ज्ञान, अनुभव, मार्गदर्शन आणि दृष्टीकोण हे आपल्याला ताबडतोब आणि झटपट हवे असते. आपल्याला क्रियेमध्ये जास्त स्वारस्य असते कारण प्रक्रियेसाठी थांबण्याचे धेर्ये आणि संयम आपल्यात नसतो. आपल्याला आपल्या जीवनात उत्क्रांती पेक्षा क्रांति हवी असते.

आम्ही पुण्याला राहायला आलो, त्यावेळेस आमच्या सोबत असणारी मांजर, तिची तीन पिल्ले आणि टायसन नाव असलेला आमचा कुत्रा हे सर्व सोबत घेवून चला, असा मुलांचा मोठा आग्रह आसतांनी सुद्धा मी जवळच्या मित्रमंडळीकडे त्यांची व्यवस्था लावून आलो. मुलांची पाळीव प्राण्याबाबत ओढ एवढी तीव्र होती की, मुलांनी मांजर शोधून घरी आणण्यापेक्षा मांजरं मुलांना शोधत घरी यायला लागली. जवळपास आठ ते दहा मांजर रोज घरचा पाहुणचार घेण्यासाठी येवू लागली, मुले त्यांना गोंजारत होती. माझी फक्त एकच अट होती की तुम्ही मांजरांना जवळ करा, मात्र त्यांना घराच्या आत आणायचे नाही. साहजिकच या तडजोडीवर मांजर आणि मुलांची दोस्ती सुरू झाली. आमच्या घरी एक काळी मांजर येत असे. तिचे नाव त्यांनी लिली ठेवले. आमची मुले सतत त्या मांजरीच्या मागे लागत. तिला दूध आणि इतर पदार्थ खायला देत. एवढा जीव लावूनही आणि एवढ्या संधि देवूनही. त्या मांजरीने तिची पिल्ले दुसरी कडे दिली. पुढे पिलांचे काय झाले माहीत नाही. परंतु आता कधीतरी लिलि मांजर येते आणि दूध पीवून जाते. त्याच वेळी एक दुसरी मांजर येत असे. तिचे मुलांनी मिलि असे नाव ठावले. तिला दूध आणि इतर पदार्थ खायला देत. या मांजरीने मात्र संधि ओळखली आणि पिल्ले आमचे घरच्या वरच्या माळ्यावर एका कोपर्‍यात दिली. त्या नंतर तिची आणि तिच्या पिल्लांची काळजी आमच्या मुलांनी इमाणे इतबारे घेतली. आज ही लिली आणि तिची पिल्ले आमच्या कुटुंबातील एक सदस्य झाली आहेत आणि छान आयुष्य जगत आहेत.हे  नुकतेच घडलेले उदाहरण तुम्हाला सांगण्याचा हेतु हाच की मिलि आणि लिली दोघांनाही समान संधी आली होती फक्त ती मिलिने ओळखली आणि आपले जीवन अजून सुखी आणि सुसह्य केले. आपलीही अवस्था अनेक वेळा लिलि सारखी होते. आजूबाजूचे लोक आपल्याला मार्ग दाखवत असतात , मदत आणि सहकार्य करत असतात आणि संधी उपलब्ध करून देत असतात. मात्र आपण आपल्या धुंदीत राहून समोर आलेल्या संधी धुडकावून लावतो आणि आपले जीवन अधिक दुख:मय करून टाकतो.

आपण समाजात पाहतो, की बरेच युवक वर्तमान काळात मौज आणि मज्जा यावर जास्त लक्ष देवून भविष्यकाळ हा नशिबाच्या हवाली करत असतात आणि भविष्य काळाकडे डोळे लावून बसतात. असे युवक वर्तमान काळातील प्रत्येक दिवस हा नशिबाच्या हवाली करतात. मात्र दिवसामागून महीने आणि महिन्यामागून वर्ष जातात नशीबाचे दार मात्र कधीच उघडत नाही. अल्लीबाबा चाळीस चोर या गोष्टीत ज्या प्रमाणे अल्लीबाबाचा मोठा भाऊ कासिम खजाण्यात ‘तिळा तिळा दर उघड’ म्हणून प्रवेश करतो मात्र तेथील सोने आणि चांदी पाहून त्याचे डोळे दिपून जातात आणि तो दरवाजा उघडून बाहेर येण्याचे शब्दच विसरून जातो. आपले नशीब त्या खजाण्याच्या  दरवाजा सारखे झाले आहे, की जेथे आपण कष्टाचा मंत्र विसरून गेलो आहोत. कोणी तरी येईल आणि आपल्याला खजाण्यातून बाहेर काढेल या आशेवर आपण बसून राहतो आणि एक दिवस काळरूपी चाळीस चोरांचा सरदार आपला घात करतो. आज सोशल मीडियाच्या खजाण्यात दरवाजा उघडून आत गेलो आहोत, मात्र तेथून बाहेर पडण्याचा मंत्र विसरून गेलो आहोत. म्हणजेच संधी मिळाली तर त्या संधीतून अनेक आव्हाने निर्माण होत असतात. जसे कासिम ने मिळालेल्या संधीच्या आधारे प्रवेश केला मात्र त्या नंतर निर्माण झालेली आव्हाने तो पेलू शकला नाही.

नशीब ही एक संकल्पना असून ती आयुष्यातील काही घटनांशी जोडलेली असून ती घडणार्‍या घटनांशी कार्य कारण भाव दर्शवते. जसे माझे नशीब थोर म्हणून मी आज अपघातातून वाचलो. माझे नशीब म्हणून मला नोकरी मिळाली. माझे नशीब चांगले म्हणून मला छान घर मिळाले.या सारखे वक्तव्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतो. मात्र नशीब या संकल्पने मागे एक श्रद्धा काम करते आणि ती हा कारण आणि कार्य भाव जोडून देण्याचे काम करते. मात्र नशीबाच्या भरवश्यावर संधी शोधणे म्हणजे अंधार्‍या जागी तीर मारणे आहे. त्यामुळे नशिबावर  हवाला भूतकाळात असावा मात्र भविष्य नशिबावर अवलंबून ठेवू नये, नाहीतर वर्तमान काळात घात होतो. म्हणजेच भूतकाळ आणि वर्तमान काळ याला नशिबाचे पाठबळ असते मात्र भविष्याल नशिबाचे पाठबळ नसते. साहजिकच भविष्याला नशिबाचे पाठबळ असते, तर लोकांनी कष्ट करायचे सोडून देवून नशिबावर हवाला ठेवला असता. तसेच नशीब ही एक अशी गोष्ट आहे की ती कष्टाला आणि परिश्रमाला चिटकुन असते. ती जो कष्ट आणि परिश्रम करतो त्याच्या पारड्यात ती आपले माप टाकते.

संधी बदल घडवून आणते. संधी कामाचा व्याप वाढवते. संधी ही कायम आव्हाने निर्माण करते. साहजिकच ही आव्हाने पेलण्याची क्षमता तुमच्या मध्ये निर्माण व्हावी लागते. जर ही क्षमता तुमच्या मध्ये निर्माण झाली नाही तर तुम्ही संधी मिळूनही अपयशी होता. त्यासाठी संधी सोबत आव्हाने येणारच याची खूणगाठ मनाशी बांधा. त्या आव्हानांना पेलण्यासाठी तयारी करा. तुमची बलस्थाने कोणती आहेत यावर काम करा. बर्‍याच वेळा बलस्थाने माहीत नसल्याने आव्हाने पेलता येत नाहीत. राम भक्त हनुमान यालाही कित्येक दिवस त्याची बलस्थाने माहीत नव्हती परंतु त्याला जेंव्हा याबाबत आठवण करून देण्यात आली त्या नंतर तो बलशाली हनुमान बनला. आपल्या आयुष्यातही आपली अनेक कला आणि कौशल्ये ही आपण विस्तारत नसल्याने ती आपल्या दफन /दहन सोबतच पंच तत्वात विलीन होतात.

आपल्या आयुष्याचा संधी आणि त्या संधी सोबत येणारी आव्हाने हा एक अविभाज्य भाग आहे. जो काम करतो तोच चुका करू शकतो. जो संधी वर काम करतो, त्यालाच आव्हाने पेलावी लागतात. संधी ही नशीबाचा भाग नसते आणि संधीसाठी नशिबावर अवलंबून राहू नये. नशीब ही एक संकल्पना असून ती भूतकाळातील घटनाशी निगडीत असावी वर्तमान काळ हा मात्र कष्ट आणि कर्तुत्व यावर उभा असावा तरच भविष्य काळ यशस्वी आणि उज्वल होवू शकतो. संधी ही शोधावी लागते कारण ती अनेक रूपात आपल्या आजूबाजूला असते. त्यासाठी डोळस आणि व्यावाहारिक व्हावे लागते. एकदा संधी शोधली की तिचे सोने करावे लागते नाही तर अकार्यक्षमता आणि अकर्तुत्व हे संधीचे मातेरे करते. त्यामुळे संधी शोधून, तिच्यावर स्वार होवून, कष्ट आणि परिश्रम करून आणि आपल्या कामकाजात उत्साही आणि सकारात्मक राहून यशस्वी होता येते आणि त्या आधारे एक साधे, सोपे, सरळ ,सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगता येते.

५५/१०१ दिनांक २८.११.२०२२

जीवन विषयक कौशल्ये ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७