संघर्ष, तह-तडजोड आणि सोडून देणे-माघार घेणे व्यवस्थापन Conflict, Compromise and Forgiveness Management
संघर्ष, तह-तडजोड आणि सोडून देणे-माघार घेणे व्यवस्थापन Conflict, Compromise and Forgiveness Management
जीवन म्हटलं की संघर्ष आलाच. सृष्टीतील तमाम पशू-पक्षी आणि जीव-जंतु यांना जगण्यासाठीचा संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा मातेच्या गर्भात असल्यापासून ते अटळ अशा मृत्यू पर्यंत सदैव चालू असतो. मात्र संघर्ष हा आयुष्याचा भाग जरी असला तरी कायम संघर्ष करत राहिल्याने त्याचे अनेक चांगले-वाईट परिणाम आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर होत असतात. साहजिकच संघर्षाला तह-तडजोड आणि सोडून देणे-माघार घेणे याची जोड वेळोवेळी आणि गरजेप्रमाणे देणे हि यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली ठरते. त्या अनुषंगाने आज आपण संघर्ष कोठे व किती करावा?, त्याचे चांगले-वाईट परिणाम काय?. तसेच संघर्षाला तह-तडजोड आणि सोडून देणे-माघार घेणे याची जोड कशी द्यावी याचे विवेचन करणार आहोत.
संघर्षाची व्याख्या ही सजीव आणि त्यांचा अधिवास याच्याशी निगडीत असते. अधिवास म्हणजे आपण ज्या वातावरणात आणि परिस्थितीत राहतो व वावरतो ती परिस्थिती होय. कोणताही सजीव किंवा मानव यांचा जर अधिवास उत्तम असेल तर त्याला संघर्ष कमी करावा लागतो आणि या उलट अधिवास जर प्रतिकूल असेल तर संघर्ष जास्त करावा लागतो. त्यामुळे मानवी जीवन आणि त्याला मिळालेला अधिवास यावर त्याचा संघर्ष अवलंबून असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपला अधिवास काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची क्षमता. तुमची क्षमता तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. एकदा क्षमता कळली आणि अधिवास समजला कि संघर्ष, तह-तडजोड आणि सोडून देणे-माघार घेणे यापैकी कोणता पर्याय वापरायचा हे तुमच्या लक्षात येते. मात्र बऱ्याच वेळा आपण आपला अधिवास आणि क्षमता समजून न घेता फक्त संघर्ष करत राहतो आणि त्यामुळे आपले जीवन अजून विस्कळीत आणि दु:खी होवून जाते.
संघर्ष हा आधी आपला आपल्याशी होत असतो. असा संघर्ष हा विचारांचा असतो. कधी मन व मेंदू तर कधी अचेतन मन व सचेतन यांच्या मध्ये हा संघर्ष दिसून येतो. हा संघर्ष जर तीव्र स्वरूपाचा असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कार्यात योग्य संयोजन व सहजीवन करू शकत नाही. विचाराची बैठक असावी मात्र त्यावर अविचारांचा मुलामा नसावा हे लक्षात घेतले पाहिजे. सबब आधी आपल्या आतील संघर्ष आपल्याला हाताळता आला पाहिजे. यासाठी आपली उत्पती हि बिन्दुरूप अशा गर्भापासून झाली असून आपण कालांतराने पंचमहाभूतात सामावून किंवा विरून जाणार आहोत हे सत्य आधी समजून घेतले पाहिजे. आयुष्य हा एक प्रवास असून तो जन्मापासून सुरु होवून मृत्यूपर्यंत संपतो. त्यानुसार आपली मनाची व आत्म्याची शांतता प्राप्त करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यानुसार विचाराच्या संघर्षासोबतच आपली आपल्या मन आणि आत्म्या सोबत तह-तडजोड आपण केली पाहिजे. काही प्रसंगात आपल्या मनाने माघार घेतली पाहिजे. तसेच काही गोष्टी ह्या सोडून दिल्या पाहिजेत. जेवढे आपण धरून ठेवू आणि जेवढ आपण भरून ठेवू तेवढा त्रास आपल्यालाच होणार आहे. त्यासाठी स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवणे, इतरांना मदत करणे, आपले छंद जोपासणे, मित्र आणि नातेवाईक यांच्या संपर्कात राहणे, व्यायाम-योग-प्राणायाम करणे. या सारख्या अनेक गोष्टी व बाबी यांचा अंगीकार केला कि आपला आपल्याशी होणारा विचारांचा संघर्ष कमी होतो आणि आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
दुसरा संघर्ष हा आपले कुटुंब सदस्य, आपले नातेवाईक–आप्तेष्ट, कामाच्या-व्यवसायाच्या-उद्योगाच्या ठिकाणचे सहकारी आणि आपल्या समाजातील इतर माणसे यांच्यासोबत होत असतो. आपण सर्वाना खुश ठेवू शकत नाही. आपण सर्वांच्या इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करू शकता नाही. आपण सर्वांचे मन राखू शकत नाही. हि वस्तुस्थिती पहिली समजून घ्यावी. दुसऱ्याचे विचार आणि वागणूक यावर आपले नियंत्रण नसते आणि ते पूर्ण नियंत्रित करण्याची अपेक्षा ठेवणे चूक आहे. कारण सृष्टीतील प्रत्येक जीव हा स्वतंत्रपणे विचार आणि कार्य करत असतो आणि म्हणून नियंत्रणापेक्षा या संबंधाचे आपण योग्य असे व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. त्यामुळे या व्यवस्थापनात कोणाशी केंव्हा, कोठे आणि किती संघर्ष करायचा,कि तह-तडजोड करायची ,कि सोडून द्यायचे, कि आपणच माघार घ्यायची याचा निर्णय आपल्याला स्वविवेकबुद्धीने घेता आला पाहिजे.
परिस्थिती पूर्णतः हातात असेल आणि इतरांचा आधार व समर्थन मिळणार असेल तर संघर्ष करायला हरकत नाही. परंतु संघर्ष हा सत्याची कास धरणारा असावा. परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे आणि इतरांचा आधार व समर्थन मिळण्याची शक्यता कमी आहे अशा वेळी तह किंवा तडजोड करायला हरकत नाही .जेंव्हा परिस्थिती भयानक प्रतिकूल आहे आणि इतरांचा आधार व समर्थन मिळण्याची सुतराम शक्यता नाही अशा वेळी आपण सोडून द्यायला हवे किंवा माघार घ्यायला हवी.
अशा प्रकारे आपण आपल्या मनातीत आणि मेंदूतील विचारांचा संघर्ष नियंत्रित करायला हवा. आपला अधिवास, आपली क्षमता आणि इतरांचा आपल्याला मिळणारा आधार, मदत व समर्थन यावर आपण संघर्ष, तह-तडजोड आणि सोडून देणे किंवा माघार घेणे या त्रीसूत्रीचा अवलंब करून आपल्या जीवनाचे योग्य असे व्यवस्थापन करायला हवे. यामुळे आपले जीवन अजून साधे ,सोपे, सुटसुटीत आणि सुखकर होईल.
जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया .
०१९/२०२१ दिनांक : २६.०५.२०२१
राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी मुंबई
९९७०२४६४१७