आवश्यक, अत्यावश्यक आणि अनावश्यक 𝐍𝐞𝐜𝐞𝐬𝐬𝐚𝐫𝐲, 𝐄𝐬𝐬𝐞𝐧𝐭𝐢𝐚𝐥 𝐚𝐧𝐝 𝐔𝐧𝐧𝐞𝐜𝐞𝐬𝐚𝐫𝐲

आवश्यक, अत्यावश्यक आणि अनावश्यक 𝐍𝐞𝐜𝐞𝐬𝐬𝐚𝐫𝐲, 𝐄𝐬𝐬𝐞𝐧𝐭𝐢𝐚𝐥 𝐚𝐧𝐝 𝐔𝐧𝐧𝐞𝐜𝐞𝐬𝐚𝐫𝐲

           ज्याला मराठी भाषा वाचता येते त्याने हे तीनही शब्द दूरवरून फक्त बघितले तर त्याला सर्व शब्द ‘आवश्यक’ आहेत असेच वाटेल. एकंदर आपल्या दैनंदिन आयुष्यात असेच घडत आहे जे काही उपलब्ध आहे ते आपल्याला आवश्यकच आहे असे वाटते. जसे आपण फक्त शब्द पहिले ते समजून घेतले नाहीत, असाच घोळ आपल्या आयुष्यात झाला आहे. आपण आपल्या भोवती असणार्‍या सर्वच गोष्टी समजून आणि उमजून न घेता त्या आवश्यकच आहेत आणि त्या आपल्याला आयुष्यात फक्त उपभोगायच्या आहेत अशी धारणा करून घेतली आहे. प्रस्तुत लेखात आपली नक्की आवश्यकता काय आहे? आपल्यासाठी काय अत्यावश्यक आहे? आणि आपल्यासाठी अनावश्यक आहे ? याबाबतचे विवेंचन करणार आहोत.

         जीव-जंतु आणि पशू-पक्षी आणि त्यांचे भरण-पोषण याबाबत माहिती घेतली असता असे दिसते की काही अपवाद वगळता हे सर्व जीव त्यांना निसर्गाने आखून दिलेल्या मार्गावरच चालतात. मानव असा एकमेव प्राणी आहे की तो निसर्गाने आखून दिलेल्या मार्गावरून न चालता त्याच्या मन मर्जिणे आणि बेफिकीर वृतीने चालत राहतो आणि वारंवार निसर्गात हस्तक्षेप करतो. भौतिक सुखे उपभोगण्याची त्याची हौस आणि आताच हवे ही वृती त्याला कधीही स्वस्थ बसू देत नाही. यामुळे तो त्याच्या आजूबाजूला आणि आवाक्यात असणार्‍या सर्वच संसाधानांचा व बाबींचा उपभोग घेण्यासाठी सरसावलेला पाहायला मिळतो. त्यामुळे आवश्यक काय, अत्यावश्यक काय आणि अनावश्यक काय याचा भेद करणेच त्याला जमत नाही किंवा तो तसे जाणीवपूर्वक करत नाही. निसर्गात मध्ये जे काही उपलब्ध आहे ते सर्व आपल्याच मालकीचे आणि आपल्यालाच उपभोग घेण्यासाठीच आहे, याप्रमाणे त्याचे वागणे आणि वर्तन असते. जसे जमेल तसे तो निसर्गातून ओरबंडून घेत असतो. मात्र देण्याची वृती त्याच्यामधून लुप्त झालेली पाहावयास मिळत आहे.

          मागील तीन लाख वर्षात अकरा हजार पाचशे कोटी मानव जन्माला आले आणि नष्ट झाले. सध्या मानवाची पंचवीस हजारावी पिढी भूतलावर आहे. असे असले तरी मागील पाचशे वर्षात ही संख्या भरमसाठ वाढल्याने निसर्गावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वाढत असलेला गैरवापर यामुळे हवा, पाणी आणि जमीन प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. निसर्गात उपलब्ध असणारे पाणी, खनिजे, वृक्ष याचा जास्तीत जास्त वापर करून मानवाने निसर्गाचे संतुलन आणि जीवन साखळी बिघडवण्यामध्ये मुख्य भूमिका निभावली आहे. या सर्व गोष्टीचा परिपाक हा वातावरणीय बदल आणि जागतिक तापमान वाढ या मध्ये झालेला दिसून येत आहे. यामुळे साहजिकच निसर्ग चक्र बिघडले असून कधीही पाऊस, कधीही गारपीट, कधीही दुष्काळ आणि कधीही वादळ यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. निसर्गावर प्रभुत्व दाखवण्याचा अट्टहास आणि निसर्गामध्ये अनावश्यक असा हस्तक्षेप या मुळे आपल्याला कोरोना सारख्या नवीन विषाणूंचा आणि मुकरमायकोसिस सारख्या नवीन बुरशीजन्य रोगांचा आणि प्लेग आणि कॉलरा सारख्या जिवाणू रोगांचा सामना करावा लागत आहे. साहजिकच निसर्गाने त्याचे रोद्र रूप दाखवण्यास हळूहळू सुरुवात केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

         साहजिकच मानवाने किमान यातून बोध घेवून इथून पुढे निसर्गासोबतचे आपले सहसबंध ठेवणे आणि पूरक असे जीवन शैलीचा यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. आवश्यक काय आहे त्याचा संवर्धनीय उपभोग घेणे, अत्यावश्यक असणार्‍या बाबी ह्या जपून वापरणे आणि अनावश्यक बाबींचा त्याग करणे तमाम मानवजातीच्या अस्तित्वासाठी आवश्यक ठरणार आहे. निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन हेच मानव जातीचे संरक्षण आणि संवर्धन आहे ही भावना आणि विचार आपल्या सर्वांमध्ये रुजवणे आवश्यक व अनिवार्य बाब ठरणार आहे. ही जरी सामूहिक जबाबदारी असली तरी जो पर्यंत प्रत्येक व्यक्ति आपले योगदान देणार नाही तो पर्यंत हे शक्य शक्य होणार नाही.

         त्यामुळे मानवी जीवांचा आपला प्रवास होत असताना आपल्याला नक्की काय आवश्यक आहे, काय अत्यावश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे याबाबतची समज लहान मूलापासूनच  तर जेष्ठ नागरिक पर्यंत रुजवायला लागणार आहे. यामध्ये आवश्यक तेवढाच म्हणजे १८०० ते २२०० किलो कॅलरी असलेला आहार सेवन करणे, उपलब्ध असलेले पाणी याचा वापर हा प्रतिदिन ६० लीटर एवढा मर्यादित ठेवणे, घन कचर्‍याची विल्हेवाट योग्य रीतीने लावणे आणि प्लॅस्टिकचा वापर न करणे, आपल्या घरातील सांडपाणी शोष खडयात जिरवणे, विजेचा वापर जपून करणे, पेट्रोल-डीझेल-गॅस या जैविक इंधनांचा वापर जपून करणे, शेतीमध्ये रासायनिक खते आणि औषधे यांचा वापर संतुलित करणे,प्रत्येक वर्षी प्रत्येक कुटुंबाने किमान सात झाडे लावणे, आपल्या स्व-कमाई मधील किमान १ टक्के हिस्सा हा गरीब दुर्बल गरजूवंत यांचेसाठी खर्च करणे, आपल्या परिसरात स्वच्छता ठेवणे अशा किमान गोष्टी आपण करू शकलो तरी निसर्गाप्रती आपले योगदान दिसून येईल. निसर्ग हाच शक्तिचे रूप असल्याने निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन केल्याने निसर्गाची शक्ति तुम्हाला ऊर्जा देईल आणि तुमचा विकास घडवून आणेल यात शंका नाही. त्यामुळे तुमचे आयुष्य अजून सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखकर होईल.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया

०२०/२०२१ दिनांक २९.०५.२०२१

राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी मुंबई

९९७०२४६४१७