काळावर प्रभुत्व मिळवा (Dominance over time)

काळावर प्रभुत्व मिळवा (Dominance over time)

                काळ हा भूतलावरील सर्व जीवांवर प्रभुत्व गाजवत असतो. सृष्टीतील प्रत्येक जीव हा कायम ह्या काळाशी स्पर्धा करत असतो. काळ हा जसा पुढे सरकतो तसा सृष्टीतील प्रत्येक जीवाला तो मागे टाकण्याचा तो प्रयत्न करतो. मात्र आपल्या आजूबाजूला असे दिसते की, काही लोक काळासोबत चालतात, काही लोक काळाच्या मागे राहून जातात ,काही लोकांची काळासोबत फरफट होते, तर काही लोक काळाच्या पुढेही निघून जातात. त्या अनुषंगाने काळावर प्रभुत्व कसे मिळवायचे याबाबत आपण विचारमंथन करणार आहोत.

              काळाची वर्गवारी आपण दैनंदिन आयुष्यात तीन प्रकारे करतो. जो काळ निघून गेला किंवा मागे पडला त्याला आपण भूतकाळ म्हणतो. आपण जे पाहू शकतो, अनुभवू शकतो आणि ज्याची आपल्याला जाणीव होते तो वर्तमान काळ होय. जो काळ येणार आहे किंवा जी गोष्ट किंवा घटना पुढे घडणार आहे त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो.

             काही लोक मात्र कायम स्वत:च्या भूतकाळाचे रडगाणे गातात, त्यामुळे ते वर्तमान काळात अक्रियाशील होतात आणि भविष्याबाबत निराशावादी होतात. तसेच आपण पाहतो की काही लोक वर्तमान काळात न जगता भूतकाळातील आठवणीत हरवून जातात. काही लोक भविष्याची स्वप्ने रंगवण्यातच दंग असतात. यामुळे काय होते की आपली वर्तमानकाळावरील पकड हळू हळू सैल होते आणि वर्तमान काळातील यश आणि फायदे आपण साध्य करू शकत नाहीत. त्यामुळे या तीनही काळावर आपल्याला प्रभुत्व गाजवणे आवश्यक ठरते. ते कसे गाजवयाचे ते आपण पाहूया

              आपल्या भूतकाळ हा घडलेल्या चुकांमधून कसा बोध घ्यायचा याचे धडे देतो. भूतकाळ हा आपल्या आयुष्याचा आरसा असून तो आपल्याला स्फूर्ति आणि जगण्याची जिद्द सुद्धा देत असतो. ज्याचा भूतकाळ जेवढा उत्तम तेवढाच त्याचा वर्तमान आणि भविष्य काळ सुंदर असतो. भूतकाळातील कष्टाच्या पायावरच वर्तमान आणि भविष्य काळाचे मजले भक्कमपने उभे राहतात. भूतकाळ जरी तुमच्या हातात नसला तरी भूतकाळात आपल्याकडून निर्माण झालेली वैयक्तिक व आंतर वैयक्तिक संबध वृद्धिंगत करण्यासाठी तुम्ही संवाद वाढवायला हवेत. कारण हेच संबध तुम्हाला वर्तमान काळात उभारी व आधार देतात. भूतकाळातील आपण दुसर्‍यांना केलेली मदत, केलेल्या चांगल्या गोष्टी, मिळवलेली शब्बासकी व कौतुक यातून आपण सकारात्मक ऊर्जा मिळवू शकतो. झालेल्या चुका की ज्यामुळे आपल्याला अपयश आले त्या लिहून काढून त्यावर आपण उपाययोजना आखू शकतो.

            आपला वर्तमान काळ हा आपल्या हातात असतो. आपले शरीर आणि आपले मन हे जेवढे वर्तमान काळात कार्यशील व कार्यप्रवण राहील तेवढी आपली प्रगती चांगली व यशाच्या शिखराकडे होते. वर्तमान काळात जेवढा आपण भक्कम करू तेवढा आपला भविष्यकाळ सुसह्य व उत्तम होतो. वर्तमान काळावर प्रभुत्व गाजवण्यासाठी चांगले व सकारात्मक विचार करा. या विचारातून आणि त्याला जोड दिलेल्या परिश्रमातून व कष्टातून टिकावू स्वरूपाचे कार्य करा.कायम  काही तरी निर्माण करण्याकडे आपला कल ठेवा. टिकावू स्वरूपाचे कार्य घडले किंवा काही तरी निर्माणधीन झाले की आपली सामाजिक व आर्थिक प्रगती आपल्याला साध्य करता येते. नवीन विचार ,नवीन बाबी, नवीन गोष्टी ,नवीन सबंध यावर काम करायला हवे. वर्तमानकाळात चांगली सुरुवात केली की भविष्याबबात वाटणारी अनिश्चितता आणि भूतकाळा विषयी वाटणारी निरसता कमी कमी होत जाते.

             भविष्यकाळ हा आभासी जरी असला तरी त्यात आपल्या दुर्दम्य अशा, इश्चा व आकांक्षा याचा आशावाद सामावलेला  असतो. आज मी जे काही करत आहे, त्यातून मी माझे भविष्य अजून उत्तम करेल असा आत्मविश्वास आपल्याजवळ कायम असायला हवा. म्हणजेच भविष्यकाळाच्या आशावादातून वर्तमान काळात कष्ट उपासण्याची ताकत आपल्या सर्वांना मिळते. भविष्य काळाची चिंता सोडून आपल्या भविष्याबाबत सकारात्मक राहणे खूप आवश्यक आहे. भविष्याची उज्वल शास्वती ही वर्तमान काळातील कष्टावर आणि परिश्रमावर अवलंबून असते हे लक्षात घ्यावे.

            अशा प्रकारे आपण एकदा या तिन्ही काळावर प्रभुत्व मिळवले की आपण तीनही काळांवर स्वार होवून आपला  जीवनरूपी रथ यशस्वीपणे मार्गस्थ करतो. चला भूतकाळातून स्फूर्ति घेवून आणि भविष्याबाबत आशावादी राहून वर्तमान काळात जगूया, जीवन सुंदर आहे ते अनमोल बनवूया.

०१८/१०१ दिनांक ०८.०५.२०२१

राजीव नंदकर ,उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७