मिलन उड्डाण-𝐍𝐮𝐩𝐭𝐢𝐚𝐥 𝐅𝐥𝐢𝐠𝐡𝐭
कीटकांची आश्चर्यकारक दुनिया – 𝐓𝐡𝐞 𝐀𝐦𝐚𝐳𝐢𝐧𝐠 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐨𝐟 𝐈𝐧𝐬𝐞𝐜𝐭𝐬
मिलन उड्डाण-𝐍𝐮𝐩𝐭𝐢𝐚𝐥 𝐅𝐥𝐢𝐠𝐡𝐭
आधी विश्व मग पृथ्वी आणि त्या नंतर सृष्टी असा सर्वसाधारण प्रवास आहे. विश्वाची निर्मिती साधारण १३८० कोटी वर्षापूर्वी बिग बैंग महाविस्फोटाने झाली हे सर्वश्रुत आहे. पृथ्वीच्या निर्मितीला ५०० कोटी वर्ष तर पृथ्वी वरील सृष्टीची निर्मितीला साधारण ३५० कोटी वर्ष पूर्ण झालेली आहेत.
पृथ्वीवर अनेक जीव जंतू आणि पशु पक्षी अनादी काळापासून वास्तव्य करत आहेत. यातील एक महत्वाचा जीव म्हणजे कीटक होय. या कीटकांच्या जवळपास ६० ते ८० लाख प्रजाती अस्तित्वात असून त्यापैकी १० लाख प्रजातीचा अभ्यास काही प्रमाणात उपलब्ध झाला आहे.
कीटकांच्या या अनेक प्रजाती पैकी मानवाच्या अगदी जवळ आणि अवतीभोवती वावरणारा कीटक म्हणजे मुंगी होय. मुंगीने डंख मारला नाही असा माणूस भेटणे दुरापास्तच. आपल्याला काळी मुंगी , लाल मुंगी , रानटी मुंगी आणि मोठे मुंगळे एवढ्याच प्रजाती माहित आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल आजतागायत मुंग्यांच्या एकूण चौदा हजार प्रजातीची नोंद झाली आहे.
मुंगी हा मधमाशी आणि वाळवी याप्रमाणे एक सामजिक कीटक आहे. सामाजिकता हेच गुणवैशिष्ट्ये मुंग्यांना वैशिष्ट्यपूर्ण बनवत असते.या लेखात मुंग्यांच्या मिलन उड्डाण बाबत आपण जाणून घेणार आहोत.
मुंग्यांच्या एकंदर जीवन प्रवास आणि तिची सातत्यपूर्ण असणाऱ्या कष्टाळू वृत्तीचे माणसाला नेहमी आकर्षण राहिले आहे. मुंग्यांच्या ठायी असणारी ही वृत्ती मानवाला नेहमी प्रोत्साहन देत असते. अशी ही मुंगी एक सामाजिक कीटक असून ती नेहमी कॉलनी-वारूळ करून राहते. या कॉलनी मध्ये एक किंवा अनेक राणी मुंग्या, काही सैनिक मुंग्या आणि खूप कामगार मुंग्या असतात. सैनिक मुंग्या व कामगार मुंग्या ह्या मादी मुंग्या असतात हे आपण लक्षात घ्यावे.
पावसाळा ऋतू सुरू होण्यापूर्वी जो वळवाचा पाऊस होतो. यामुळे योग्य तापमान आणि उचित आद्रता वातावरणात जेंव्हा निर्माण होते आणि हीच परिस्थिती मुंग्यांच्या मिलन उड्डाण साठी पोषक असते. या पोषक वातावरणात आपला वंश वाढवणे साठी मुंग्यांच्या कॉलनी मधील काही निवडक मादी मुंग्या आणि नर मुंग्या यांना पंख येतात आणि ते उड्डाण घेतात.
असे उड्डाण झाले की नर व मादी मुंग्या मध्ये मिलन होते. हे मिलन झाल्यानंतर मादी मुंगी जमिनीवर येते आणि आपले पंख ती कुरतडून टाकते. त्या नंतर पावसाने भिजलेल्या मऊ जमिनीत अंडी घालायला सुरुवात करते. कोठे , केंव्हा, कशी आणि कोणती अंडी घालायची हे संपूर्णपणे मादी मुंगीच्या हातात असते. नर मुंग्या मात्र मिलनानंतर जास्त काळ जगत नाहीत. अगदी सुरुवातीला मादी मुंगी काही अंडी देते त्यातून सैनिक मुंग्या तयार होतात. एकदा ह्या सैनिक मुंग्या तयार झाल्या की ती परत अंडी देते यातून कामगार मुंग्या तयार होतात. अशा प्रकारे तीला राणी मुंगीचा दर्जा प्राप्त होतो. काही सैनिक मुंग्या आणि भरपूर कामगार मुंग्या निर्माण होऊन मुंग्यांची एक मोठी कॉलनी तयार होते.
एक राणी मुंगी १० लाख अंडी देते आणि ३० वर्ष सुद्धा जगू शकते. कामगार मुंग्या सरासरी २ ते ३ वर्ष जगतात. अशी कॉलनी तयार झाली की सातत्य असणारा, नियमांचे पालन करणारा, कष्ट करणारा एक समूह तयार होतो आणि आपला वंश वृद्धिंगत करणारा त्यांचा जीवन प्रवास सुरु होतो.
आपण सुद्धा मुंग्या पासून आदर्श घेवून सातत्यपुर्ण आणि कष्टसाध्य जीवन जगायला सुरुवात केली कि आपण अधिक सुखी आणि समाधानी होतो.
००१/१०१ दिनांक ०८.०६.२०२१
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७