मानवी जीवन विकासाच्या सात अवस्था The seven stages of human life development

मानवी जीवन विकासाच्या सात अवस्था The seven stages of human life development

       हिरे, पाचू, माणिक, मोती, सोने आणि चांदी या मौल्यवान गोष्टींना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. या सर्वांमध्ये असलेले वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि त्यांचा दुर्मिळ असा आढळ, हे त्यांना अधिक मौल्यवान करतात. मात्र त्यांना मौल्यवान असे रूप देणारा मानव या पेक्षा कित्येक पटीने अनमोल आहे, हे कायम लक्षात घ्यावे लागते. मानवाची खरी शक्ती त्याचे मन आणि मेंदू या मध्ये दडलेली आहे. या अमर्याद अशा शक्तीच्या जोरावर त्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वाला गवसणी घातली आहे. याच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मानवाने त्याचे जीवन सुसह्य असे बनवले आहे आणि ते अजून सुसह्य कसे बनवता येईल यासाठी त्याची वाटचाल निरंतर चालू आहे. साहजिकच या मानवी शक्तीचा पुरेपूर वापर तो नष्ट होण्याच्या अगोदर होणे गरजेचे आणि आवश्यक ठरते. असे दिसून येते की मानवी संपत्तीचा पुरेपूर वापर केला जात नाही किंवा करून घेतला जात नाही. साहजिकच विविध साधने आणि आयुधे वापरुन सुप्त अशा विविध मानवी शक्तीचा पुरेपूर वापर करून घेणे आवश्यक आहे. असे झाले तरच व्यक्ती विकास आणि त्या अनुषंगाने राष्ट्र विकासाकडे अग्रक्रम करता येईल. प्रस्तुत लेखात मानवी जीवनाच्या सात अवस्था विस्तृत पाने मांडल्या आहेत. या प्रत्येक अवस्थेत मन आणि मेंदू याला जागृत अवस्थेत आणून त्यातून कार्य आणि कृती घडून या मानवी संपतीचा पुरेपूर वापर कसा करायचा आणि यातून व्यक्ति विकास आणि राष्ट्र विकास कसा साधायचा यावर आपण विचार मंथन करणार आहोत.

       मनुष्य प्राणी जन्म घेतो आणि त्याचे भरण आणि पोषण ही मोठी जबाबदारी त्याच्या पालकांवर पडते. त्यावेळी या बाळाला एक पोट असते आणि त्या पोटाला अन्न लागत असते. सध्याचा लोकसंखेचा विस्फोट विचारात घेता आपण उपरोधिकपणे असे म्हणतो की “खायाला काळ आणि भुईला भार”. म्हणजेच एक प्रकारे आपण नव बालकाला हिणवत असतो. पण आपण यावेळी जाणीव पूर्वक विसरतो की, त्या बाळाला एक मन, एक मेंदू आणि दोन हात असतात. तसे पहिले तर मनाला योग्य संस्कार आणि मूल्ये दिली, मेंदूला योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण दिले आणि हाताला कौशल्ये देवून त्या हाताला काम दिले तर मानवाची प्रत्येक पिढी भुईला भार न ठरता तमाम मानवजातीच्या विकासासाठी हातभार ठरेल. हा विचार घेवूनच मानवी भांडवल आणि मानवी साधन संपती हे एक संसाधन समजून त्याचा वापर अधिकतपणे व्यक्ती विकास आणि राष्ट्र विकासासाठी करणे, ही काळाची किंवा जागतिक गरज ठरू पाहत आहे.

          मानवी आयुष्य मानवी संपत्ती म्हणून विचारात घेवून तिचा योग्य आणि पुरेपूर वापर होण्यासाठी मानवी आयुष्याची आपल्याला साधारण सात भागात विभागणी करावी लागते. एकदा ही विभागणी केली की, ती मानवी संपत्ती कशा प्रकारे उर्जाक्षम करून प्रवाहीत करायची यावर काम करणे अधिक सोपे होते. यासाठी पहिला भाग म्हणजे आपली शिशु आणि कुमार अवस्था (वय १ ते १२ वर्ष) पोंगड आणि पूर्व तरुण अवस्था (वय १३ ते २४ वर्ष), तरुण अवस्था (वय २५ ते ३६ वर्ष), प्रौढ अवस्था (वय ३७ ते ४८ वर्ष), प्रौढ आणि पूर्व वृद्ध अवस्था( वय ४९ ते ६०वर्ष), वृद्ध अवस्था (वय ६१ ते ७२ वर्ष) आणि अति वृद्ध अवस्था(वय ७३ -८४ वर्ष). या सात अवस्थामध्ये विभागणी करून त्या प्रमाणे त्या अवस्थेत आवश्यक ती कार्ये आणि कर्तव्ये पार पाडून घेणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते. त्या आधारेच ती मानवी संपत्ती अजून परिनामकारक आणि कार्यक्षिल होते . 

        पहिली अवस्था की जिलाआपण शिशु अवस्था किंवा बाल अवस्था म्हणतो. या अवस्थेचा साधारण कालावधी हा वय वर्ष १ ते १२ असतो. या कालावधी मध्ये त्या शिशुच्या मेंदू आणि शरीराची वाढ होत असते. विविध बाबी, गोष्टी, घटना याचे आकलन होत असताना त्याचे मन हळू हळू तयार होत असते. भावनांची निर्मिती आणि विचारांची निर्मिती याची सुरुवात झालेली असते. हा कालावधी मूल्ये आणि संस्कार रुजवण्याचा सुद्धा असतो. या अवस्थेत पालक, शिक्षक आणि कौटुंबिक सदस्य यांचा प्रभाव त्या नवजात शिशुवर होत असतो. या अवस्थेत मुले अत्यंत खेळकर आणि सकारात्मक असतात. त्यांना आपण जसे प्रवाहीत करू त्या प्रमाणे ती तयार  होतात. म्हणजे मातीच्या गोळ्याला आपण जसा आकार देवू तसा तो घडतो अगदी तसेच हे असते. हा कालावधी त्या मुलासाठी कसा गेला?,यावर त्यांचा स्वभाव आणि वागणे बर्‍याच अंशी प्रभावित झालेले असते. घरातील वातावरण आणि परिसरातील वातावरण यावेळी प्रभाव दाखवत असते. सध्याच्या युगात टेलीविजन, इंटरनेट, मोबाइल आणि सोशल मीडियाचा सुद्धा प्रभाव शिशुंच्या जडण घडण वर निश्चितच होत असतो. अशा प्रकारे ह्या मानवी साधन संपतीचा प्राथमिक विकास या काळात होत असतो हे लक्षात घ्यावे. जेवढा पाया भक्कम तेवढं ही मानवी साधन संपती परिणामकारक ठरण्याची शक्यता वाढते. त्यासाठी या कालावधीत शिशुचा समतोल आणि पोषक आहार यावर लक्ष पुरवणे आवश्यक राहते. जेवढे चांगले पोषण आपण देवू तेवढे बालक सुदृढ होते. काही ठराविक मूल्ये आणि संस्कार या वयातच आपण रुजवत असतो. एकंदर  रोपटे रुजण्याचा हा काळ असतो.

      दुसरी अवस्था की जिला आपण पोंगड-तरुण अवस्था असे म्हणतो. हा कालावधी म्हणजे बाल अवस्था आणि तरुण अवस्था या मधील अवस्था होय. साधारण पोंगंड अवस्था १२ ते १८ वय आणि १८ ते २४ ही तरुण अवस्था असा हा प्रवास असतो. या अवस्थेत मेंदूचा पूर्ण विकास झाला असतो आणि भावना ह्या ठळक झालेल्या असतात. विचार सुद्धा भक्कम झालेले असतात. या तरुणाला स्व:तचे विचार आणि मत सुद्धा असते. भावना बर्‍यापैकी प्रबळ होत असतात. या वयात भावना आणि विचार यांचे तीव्र असे चढ उतार आपल्याला पाहावयास मिळतात. या अवस्थेत शारीरिक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतात आणि होर्मोनल चेंजेस सुरू झालेले असतात. या तरुणाचा आता पालक आणि कुटुंब या वर्तुळाच्या बाहेर म्हणजे समाजात वावर वाढलेला असतो. मित्रांची संख्या वाढलेली असते आणि विद्रोही वृती सुद्धा वाढलेली असते. साहजिकच आयुष्यातील महत्वाचे टप्पे म्हणजे इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, विविध प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा, नोकरी साठी सुद्धा वणवण याचा दबाव कायम या अवस्थेत असतो. ही अवस्था मात्र आयुष्य घडवण्याच्या दृष्टीने आणि एक मानवी संपती निर्माण होण्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आणि तेवढीच संवेदनशील असते. सबब एक मानव म्हणून त्याचे मानवी भांडवल किंवा मानवी संपती मूल्ये वाढणार की तिचा ह्रास होणार हे या अवस्थेत ठरते. या अवस्थेत पालक ,कुटुंबिय, शिक्षक आणि नातेवाईक यांचा प्रभाव कमी होवून समाजातील इतर घटक आणि मित्र यांचा प्रभाव वाढलेला असतो. साहजिकच या अवस्थेत पालकांनी अत्यंत जागरूक राहणे आवश्यक असते. आपल्या पाल्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष असायला हवे. आपले मूल बाहेर काय करते हे किमान पालकांना माहीत असायला हवे. आपल्यावर निसर्गाने एक मानवी भांडवल निर्माण करण्याची आणि त्यातून एक उज्वल अशी मानवी पिढी घडवण्याची जबाबदारी सोपवलेली आहे हे विसरता कामा नये. साहजिकच जेवढे आपले मूल या अवस्थेत उत्तम आणि होतकरू निपजेल त्यातून बलशाली कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व घडू शकते हे कायम लक्षात असू द्यावे.

      तिसरी अवस्था म्हणजे तरुण अवस्था (वय वर्ष २५ ते ३६ ) ह्या अवस्थेत एकाचे चार हात झालेले असतात. कुटुंब,नोकरी/व्यवसाय/शेती याची जबाबदारी अंगावर आलेली असते. मागील दोन अवस्थांमध्ये जीवनाचा पाया कसा रचला गेला यावर ही अवस्था बर्‍याच अंशी अवलंबून असते. या अवस्थेत पत्नी, मुले आणि आई वडील अशा तिहेरी जबाबदारी समोर असते. या अवस्थेत कुटुंबाकडून वाढलेल्या अपेक्षा यामुळे काहीशी दमछाक होते. घर, गाडी आणि मुलांचे शिक्षण आणि आजार आणि औषधपाणी यातही आर्थिक ओढाताण पाहावयास मिळते. कुटुंबाप्रमाणे तसेच कार्यालय/उद्योग/व्यवसाय/शेती यातूनही अपेक्षा वाढलेल्या असतात. या अवस्थेत आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, त्यांनाही आपल्याला सांभाळून घेवून कामकाज करायचे असते. त्यामुळे या अवस्थेत शारीरिक आणि मानसिक ओढाताण ठरलेली असते. नातेवाईक आणि समाज याकडूनही रास्त अपेक्षा वाढतात त्यामुळे धावपळ ही ठरलेली असते. या अवस्थेत मात्र आपल्याला खूप फोकस ठेवून काम करावे लागते. तुम्हाला नक्की काय करायचे आहे याची दिशा या अवस्थेत पक्की लागते. तसेच अंतर वैयक्तिक संबध या अवस्थेत दृढ करण्यावर भर द्यावा लागतो. ही अवस्था एकंदर आयुष्यात स्थिरस्थावर होण्याची असल्याने यात कायम अति कार्यक्षिल आणि कार्यप्रवण राहावे लागते.

       चौथी अवस्था म्हणजे प्रौढ अवस्था की जिचा साधारण काळ हा ३७ ते ४८ असा असतो. या कालावधीत थोडासा माणूस स्थिर झाल्यासारखा वाटतो पण आतून तो अस्थिर असतो. कुटुंब काही अंशी स्थिरावलेले असते, कौटुंबिक कलह, कटकटी आणि तक्रारी कमी झालेल्या असतात. नात्यांमद्धे परिपक्वता आलेली असते. तरुणपणातून प्रौढ होत असतांनी शारीरिक बदल जाणवू लागलेले असतात. तसेच मुलांची १० वी आणि १२ या अवस्थेत असते. आई आणि वडील यांच्याही आजारपणाच्या तक्रारी वाढलेल्या असतात. घर आणि गाडी याचे बँक हफ्ते सुरू झालेले असतात त्याचाही आर्थिक दबाव काही प्रमाणात असतो. मात्र नोकरी आणि व्यवसाय यात तोच तोच पणा आल्याने एक नैराश्य येते असते. तोच तोच पणा आणि झालेली धावपळ आणि शारीरिक आणि मानसिक ओढाताण यामुळे थोड्या काही प्रमाणात मधुमेह आणि उच रक्तदाब याच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात. ही अवस्था आपल्या पुढील तीन अवस्थांची पायाभरणी असते. या अवस्थेत काही अंशी शरीराची झीज होणे सुरू झालेले असते. या अवस्थेत आपण जेवढे चित्त आणि शरीर शांत आणि संयमी ठेवू तेवढी आपल्या शरीराची झीज कमी होते. त्याचा फायदा हा पुढील तीन उतारवय अवस्थामध्ये होणार असतो हे विसरता कामा नये. या अवस्थेत मात्र आपण कला आणि छंद यावर काही प्रमाणात लक्ष पुरवणे आवश्यक असते. तसेच काही करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आपण या अवस्थेत करू शकतो. की ज्यामुळे आयुष्यातील कंटाळवाणा तोच तोच पणा कमी होवू शकेल. थोडा व्यायाम, थोडे चालणे आणि काही प्रमाणात शक्य असेल तर योग आणि प्राणायाम याचा स्विकार होणेही गरजेचे असते.

       पाचवी अवस्था ही म्हणजे प्रौढ आणि पूर्व वृद्ध अवस्था होय. ही अवस्था ४९ ते ६० अशी दिसून येते. या अवस्थेत नोकरी /व्यवसाय यातील उतरार्ध आलेला असतो. माणूस या अवस्थेत समाधानी असणे आवश्यक असते. मात्र आयुष्यात बरेच काही करायचे राहून गेले याचाही त्रास हळू हळू होत असतो. मुले जर या कालावधीत त्यांच्या पायावर उभी राहिली तर थोडेसे हायसे वाटत असते. मात्र जर या उलट परिस्थिती असेल तर त्याचा एक मोठा ताण या वयात आपल्यावर येत असतो. त्यामुळे आपले नैराश्य हे औदासिन्न मध्ये बदलण्याचा धोका निर्माण झालेला असतो. माझे पुढे काय आणि कसे होणार याचीही अनामिक भीती यावेळी वेळोवेळी येत असते. माझा सांभाळ आणि माझे आजारपण यात काळजी कोण घेणार ही भीती सतावू लागलेली असते. मानसिक सोबतच शारीरिक तक्रारी वाढलेल्या असतात. त्या मुळे ही निराशा आणि त्यातून येणारे नैराश्य वाढलेले असते. साहजिकच ही अवस्था थोडीशी संवेदनशील बनलेली असते. तसे पहिले तर आयुष्याचे सिंहावलोकन हे तिसर्‍या आणि चौथ्या अवस्थेत होणे आवश्यक असते. पाचव्या अवस्थेत मागे वळून जास्त न पाहता पुढील आयुष्य अजून सोपे आणि सुखकर कसे होईल यासाठी प्रयत्न हवेत. जे झाले ते सर्व उत्तम झाले आहे, या पुढे अजून सर्वोतम कसे होईल यासाठी प्रयत्न हवेत. मला काय मिळाले नाही, या पेक्षा मला काय मिळाले आहे याचे मोजमाप करायला हवे. आपल्याकडे काय आहे? आणि काय नाही? याची तुलना या अवस्थेत इतरांशी करणे तर सर्वथा चूक आहे. कारण प्रत्येक व्यक्ति एक विशिष्ट परिस्थितीमध्ये  मोठा होत असतो, वाढत असतो. त्यामुळे एकाची तुलना दुसर्‍या सोबत कधीच होवू शकत नाही हे कायम लक्षात घ्यावे. या अवस्थेत आपल्या पुढील दोन अवस्थाबाबत कामकाज करता येवू शकते त्या वरही काम करायला हवे. बरेच लोक ६० वर्ष झाल्यावर किंवा रिटायर्ड झाल्यावर बघू या प्रमाणे चालतात, परंतु असे ठीक नाही. आयुष्य जगत आसतांनी किमान पुढील पाच वर्षाचे तरी नियोजन आपल्याकडे कायम असणे आवश्यक ठरते. माझे काय खरे आहे!, आता सर्व संपले! , आता काय जगून उपयोग! असे नकारार्थी बोलणे आणि विचार करणे, याचा त्याग करायला हवा. त्या मुळे सकारात्मक व्यक्तींसोबत कायम राहून सकारात्मक विचार करत राहणे या अवस्थेत खूप महत्वाचे ठरते.  

         सहावी आणि सातवी अवस्था ही वृद्ध अवस्था (वय ६१ ते ७२ वर्ष) आणि अती  वृद्ध अवस्था(वय ७३ -८४ आणि पुढे) होय. मानवी जीवनातील ही अवस्था मागील पाच अवस्थांचा परिपाक असतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. आपण कशा प्रकारे मागील पाच अवस्थांमद्धे आपल्या सवयी आणि आपले वागणे ठेवतो,आपले आयुष्य कसे फुलवतो,त्याचीच परिणती या अवस्थेमध्ये दिसून येते. ही अवस्था जरी उतार वय असली तरी ही अवस्था खूप संवेदनशील झालेली असते. अगदी थोड्या थोड्या गोष्टी वरुन आणि घटनांवरून चिडचिड होत असते. या दोन्ही अवस्थामध्ये शारीरिक आजार प्रतिकारक्षमता कमी झाल्याने डोके वर काढत असतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या या अवस्थामद्धे थोडे कणखर राहणे आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करणे अनिवार्य ठरत असते. आपल्या आयुष्यात आपण करू न शकलेल्या गोष्टींना दोष देत बसने अथवा त्या उगाळत बसने याला या अवस्थामद्धे काही अर्थ राहत नाही. मानवी जीवनात सर्वच काही आपण ठरवतो त्या प्रमाणे होत नसते तर अनेक गोष्टी ह्या अचानक आणि अनाहूतपणाने घडलेल्या असतात. त्यामुळे या अवस्थामद्धे खूप वरच्या पातळीवर येवून विचार आणि कामकाज करावे लागते. पुस्तके वाचने, पेपर वाचने, फेरफटका मारणे, विविध ठिकाणांना भेटी देणे या सारख्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागते. शक्य होत असेल तर धार्मिक, ऐतीहासिक, सांस्कृतिक, पर्यटन करणे चांगले ठरते. या अवस्थामद्धे प्राणायाम आणि अध्यात्म स्विकार करणे ही आपले मन आणि चित्त शांत ठेवण्यासाठी उपकारक ठरते.

       अशा प्रकारे भूतलावरील एक महत्वाची आणि अनमोल अशी साधन संपत्ती म्हणून मानवी जीवन या सात अवस्थांमधून प्रवास करते. हा प्रवास अत्यंत खडतर जरी असला तरी या प्रवासात आपण शक्य तेवढं चांगलं कस करता येईल आणि त्यातून आनंद आणि दीर्घ सुख कसे मिळवता येईल याचा विचार साकल्याने होणे गरजेचे आहे. आयुष्याची प्रत्येक अवस्था अजून सुंदर आणि अर्थपूर्ण कशी बनवता येईल यावरही विचारमंथन असणे आवश्यक आहे. आयुष्याच्या या प्रवासात कोणीही कायम सोबत नसतो. काही वेळ काही जण सोबत असतात नंतर तेही सोडून जातात. कोणतीही गोष्ट ही चिरस्थायी नसते. जग सारखे बदलत असते ते पुढे पुढे जात असते. आपण जगाच्या सोबत किंवा थोडे पुढे चालण्याचा प्रयत्न करायला हवा. जसे सुख कायम राहत नाही तसे दु:खही कायम राहत नाही. फक्त आपण हे कशा प्रकारे सामोरे जायचे रडत रडत, कुझत कुझत, झुरत झुरत की हसत हसत हे आपले आपण ठरवायचे असते. त्या साठी मन आधी स्थिर आणि शांत करावे लागते. आपली ध्येये आणि उदीष्टे ही ठरवून त्यावर काम व्हावे लागते. लहान, माध्यम आणि माठे असे अनुक्रमे ६ महीने, १ वर्ष आणि ५ वर्ष असे नियोजन करून त्यावर प्रामाणिकपणाने काम करावे लागते. त्यानंतर एक समाधानी आणि सुकर असा प्रवास सुरू होतो आणि तो कायम आनंद देतो. चला आपली प्रत्येक अवस्था अजून कशी सरळ, साधी, सोपी, समाधानकारक आणि सुखी होईल यावर काम करूया.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया .

०३९ /१०१ दिनांक २७.०१.२०२२

सुखाच्या शोधात ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७