बी-प्लान (𝐏𝐥𝐚𝐧-𝐁)
बी-प्लान (𝐏𝐥𝐚𝐧-𝐁)
जीवनरुपी प्रवासात आपण कायम यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो. मानवी जीवन हे आशावादाच्या डोलाऱ्यावर उभे असते तसेच ते यशाची चव घेण्यास कायम उत्सुक असते. असे असले तरी प्रत्येकाला कायम यश मिळतेच असे नाही. यश-अपयश, हार-जीत ,जय-पराजय हा खेळ उन-पाऊस किंवा उन-सावल्या सारखा असतो. त्यामुळे यश आले कि कदाचित नंतर अपयश येणार आणि पराजय झाला तर कदाचित नंतर जय होणार हे चक्र कायम फिरत असते.
असे असले तरी बरेच लोक मी कायम यश मिळवणारच, मी कायम जिंखनारच अशा अविर्भावात वावरत असतात आणि जगत असतात. साहजिकच आपल्या आयुष्याचे नियोजन करत असतानी असे लोक फक्त ए-प्लान तयार करतात. त्यामुळे काय होते कि, एक दिवस अचानक मोठे अपयश किंवा मोठा पराजय झाल्याने ते पूर्णतः खचून जातात आणि त्यांचा प्रवास शून्याच्याही मागे होतो. त्यामुळे आपण जेंव्हा ए-प्लान करून पुढे जात असतो. त्या वेळी आपल्या कडे कायम बी-प्लान तयार असणे आवश्यक ठरते. संकटात आपल्याला हाच बी-प्लान कामी येतो. या लेखात आपण बी-प्लान आणि त्याचे महत्व याबाबत विवेंचन करणार आहोत .
जीवनरूपी प्रवासात आपण अनेक प्रकारचे नियोजन करून वाटचाल करत असतो. म्हणजे अनेक गोष्टी ठरवतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो. यालाच आपण आपल्या आयुष्याचा ए–प्लान असे म्हणतो. मात्र ए- प्लान प्रमाणे आपण जे जे ठरवले ते सर्व पूर्णच होते किंवा यश आणि विजय यात परावर्तीत होते असे नाही. कारण आपल्या ह्या ए-प्लान वर अनेक घटक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असतात. प्रत्यक्ष घटक आपल्या हातात किंवा आपल्या आवाक्यात असले तरी अप्रत्यक्ष घटक हे आपल्या हातात अथवा आवाक्यात नसतात. उदाहरण द्यायचे झाल्यास परीक्षेचा पेपर देत असतांना आपले लिखाण,आपले अक्षरआणि आपली मांडणी हे प्रत्यक्ष घटक होत तर पेपर तपासात असतांनी परीक्षक यांचा दृष्टीकोन, मनस्थिती आणि वातावरण ह्या अप्रत्यक्ष बाबी होत. साहजिकच त्यामुळे हे अप्रत्यक्ष घटक अनेक वेळा प्रभावी होवून आपल्याला यश अथवा विजय मिळवून देण्यात अडथळे निर्माण करतात. हार-जीत आणि यश-अपयश हे आपल्याच नाहीतर सृष्टीतील कोणत्याही प्राणीमात्राच्या जीवनाचे अविभाज्य अंग असतात. त्यामुळे हा लपंडाव कायम चालू राहणार आहे हि धारणा मनाशी घट्ट करावी लागते.
असे असले तरी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे काही लोक आपल्याला प्रत्येक वेळी यश मिळायलाच हवे आपण नेहमी जिंखायलाच हवे आणि आपण नेहमी यशस्वी होयालाच हवे असा अट्टाहास करतात. फक्त यश आणि विजय हेच अंतिम सत्य आहे, असे मानून अनेक लोक प्राप्त परिस्थिती दुख:मय आणि आपले जीवन अंधारमय करतात. मात्र ते हे विसरून जातात कि जीवन हा एक संघर्षमय प्रवास असून त्यात आपण ठरवलेली ध्येय आणि उदिष्टे हि संपूर्णतः कधीच पूर्ण होत नसतात आणि तसे अपेक्षितही नसते.
त्या अनुषंगाने बी-प्लान चे महत्व समोर येते. मात्र असा बी-प्लान आपल्याकडे ठेवणे आणि योग्य वेळी त्याचा वापर करणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. ज्याला जमते तो पुढे जात राहतो. जे लोक फक्त यशच हवे आणि विजयच हवा एवढाच ए-प्लान तयार ठेवतात ते हळू हळू मागे पडत जातात. आजूबाजूची उद्भवलेली परिस्थिती आणि आपली अंगभूत आणि साध्य केलेली क्षमता विचारात घेणे आणि त्या प्रमाणे बी-प्लान तयार ठेवणे हे संयुक्तिक असतांना आपण फक्त ए-प्लान वर लक्ष केंद्रित करून कधी कधी अपयशाचे धनी होतो. त्यामुळे आपली तर फरफट आणि त्या सोबतच आपल्या कुटुंबाची फरफट होते आणि याचा मनस्ताप सर्वांनाच होतो.
सबब आपला बी-प्लान हा कायम आपल्या सोबत असला पाहिजे. ज्या वेळी परिस्थिती प्रतिकूल असते आणि कोणाचेही सहकार्य मिळण्याची शास्वती नसते, त्यावेळी आपण आपला बी-प्लान वर काम करायला हवे. ज्याच्याकडे बी-प्लान असतो तो कधीही दु:खी आणि उदास होत नाही. कारण तो यशस्वी जरी होत नसला तरी तो अपयशी कधीच होत नाही. बी –प्लान हा ए-प्लान सोबतच तयार करणे आवश्यक असते. मात्र काही लोक ए-प्लान अयशस्वी झाल्यावर अथवा त्यात अडथळा आल्यावर बी-प्लान बनवू असे नियोजन करतात. मग अशा वेळी जेंव्हा त्यांचा ए- प्लान कोलमडून पडतो त्यावेळेस त्याच्या सोबत तेही कोलमडतात आणि भुईसपाट होतात.
उदाहरण द्यायचे झाल्यास तुम्ही जेंव्हा मेडीकल शाखेला जाण्याची तयारी करत आहात त्या वेळी तुम्ही कृषी महाविद्यालयाचा अडमिशन फॉर्म भरून बी-प्लान तयार ठेवायला हवा. तुम्ही जेंव्हा उपजिल्हाधिकारी पदाची तयारी करत आहात त्यावेळी तुम्ही पोलीस उपनिरीक्षक/ कर सहायकचा बी-प्लान तयार ठेवायला हवा. तुम्ही जेंव्हा शेळी पालन व्यवसाय सुरु करत आहात त्या वेळी गाई पालन व्यवसायाचा बी-प्लान तयार ठेवा. तुम्ही खाजगी आयटी कंपनी मध्ये नोकरी करत आहात अशा वेळी तुम्ही तुमची छोटीशी कंपनीचा बी-प्लान तयार ठेवा. तुम्ही जेंव्हा खाजगी ऑटोमोबाइल कंपनीत काम करत आहात,त्यावेळी एक छोटा शॉपचा बी-प्लान तयार ठेवा. तुम्ही शेतात जर कापूस घेणार असाल तर सोबत तूर आणि मका चा बी-प्लान तयार ठेवा.
एकंदर आपण ए-प्लान मध्ये एवढे सुखावून आणि हरवून जातो कि आपल्याला कधी कधी आकाश ठेंगणे होते आणि मागे पाहायचे तर आपण विसरून जातो. एक दिवस असा येतो कि आपण अचानक अपयशी होतो अथवा बाहेर फेकले जातो. अशा परीस्थितीत आपण बी-प्लान वर काम न केल्याने आपण आर्थिक आणि सामजिक दृष्ट्या कुमकुवत होतो. एकदा आपण बाहेर पडलो अथवा दूर फेकलो गेलो कि आपली आणि आपल्या कुटुंबाची ससेहेलपट आणि दुरावस्था होते. आपणही नैराश्य, चिंता आणि औदासिन्यच्या गर्तेत आणि अंधारमय भविष्याच्या काळ्याकुट्ट अंधारात हरवून जातो .
सबब मित्रानो आपण नेहमी कार्यमग्न आणि कार्यतत्पर राहायला हवे. आपल्या कामाला कष्टाची जोड देवून आपल्या मुख्य ए-प्लान सोबतच आपला बी-प्लान कायम तयार ठेवायला हवा. योग्य वेळी त्याचा वापर करायला हवा. तरच तुमचे आयुष्य सोपे, सुटसुटीत, सरळ ,साधे आणि सुखी होईल .
जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया.
०२२/१०१ दिनांक १३.०७.२०२१
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७