प्रेम एक सुंदर आविष्कार Love is a Beautiful Invention

प्रेम एक सुंदर आविष्कार Love is a Beautiful Invention

      अनादी काळापासून प्रेम या शब्दाने संपूर्ण मानव जातीवर भुरळ पाडली आहे. प्रेम हा मनाचा अविष्कार आहे की विचारांचा चमत्कार या बाबत तमाम मानव जात अजूनही अनुत्तरीत आहे. प्रेम सर्वकाही व्यापते आणि ते सर्वकाही सामाहून घेते. प्रेम हा एक संस्कार आहे की जो मनावर होतो. प्रेम ही एक श्रद्धा आहे की जी आपल्याला दुसऱ्या प्रती वाटते, मग हे वाटणे सजीव किंवा निर्जीव आणि ज्ञात किंवा अज्ञात गोष्टीविषयी असू शकते. प्रेमाला अंत नाही, त्यामुळे तसे ते निरंतर वाहते. मनाच्या भावनेतून आणि विचाराच्या प्रवाहातून ते अलगद तयार होते आणि संपूर्ण आयुष्य व्यापते. प्रेम कधीही पूर्ण होत नाही आणि ते कधी संपत नाही. ते कायम पूर्णत्वाकडे वाटचाल करते, मात्र कायम अपूर्ण असे राहते. ते कधी प्रेरणा बनते, कधी माया बनते, कधी आकर्षण बनते, कधी मोह बनते आणि कधी आशा बनते. निश्चितच या प्रेमाकडे तमाम मानवजात आकर्षित होत आली आहे, ती या प्रेमाच्या अनेक अशा गुण वैशिष्ट्यामुळेच. अनेक संत, महात्मे, तत्ववेते, अभ्यासक, संशोधक, बुद्धीजीवी ,कवी, लेखक, ग्रंथकार, यांनी प्रेम या विषयावर भरभरून लिहिले आहे. आशा हा प्रेमा विषयी या प्रस्तुत लेखात आपण विविध अंगानी प्रकाश टाकणार आहोत.

प्रेमाला कधीही एकांगी म्हणजे फक्त एका बाजूने समजून घेता येत नाही. तर त्यासाठी तत्वज्ञान, मानसशास्र, समाजशास्र आणि जीवशास्र या शास्रांचा आधार घेवून समजून घ्यावे लागते. मानसशास्र हे मानवी मन, भावना, विचार आणि वर्तणूक याचा अभ्यास करणारे शास्र आहे. मानसशास्राच्या दृष्टीने प्रेम हे एक मानवी मनातून आणि विचारातून निघणारे स्पंदन आणि हुंकार असून ते आनंद हा भावनेशी संबंध जोडते. तत्वज्ञानामध्ये जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या विविध तत्वांचा अभ्यास केला जातो. प्रेम तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रेम हा काळजी आणि सांभाळ यांचा एक संश्लेषण आणि संयोजन आहे की जे जीवनाला अर्थ प्राप्त करून देते. समाजशास्र हे समाजातील व्यक्ती मधील विविध संबंध आणि त्यांचेतील परस्पर सहकार्य याचा अभ्यास करते. समाजशास्राच्या दृष्टीकोनातून प्रेम म्हणजे नातेसंबंधाची लयबधत्ता आणि परस्पर सहकार्य होय. जीवशास्रामध्ये सजीव आणि त्याच्या शरीरांतर्गत क्रिया आणि प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. जीवशास्राच्या दृष्टीकोणातून पाहिल्यास प्रेम हे मेंदू मधील विविध जोडण्या त्यामधील जैव रासायनिक प्रक्रिया आणि विविध संप्रेरके याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे प्रेमाला तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्र आणि जीवशास्र यांच्या दृष्टीकोनातून समजून उमजून घ्यावे लागते. आपण काय करतो की प्रेमाला एका अंगाने किंवा एक शाखीय दृष्टीकोणातून समजून घेतो आणि त्यामुळे अनेक दोष निर्माण होतात. साहजिकच प्रेम ही बाब करण्यास आणि स्विकारण्यास सोपी, पण समजण्यात आणि समजून घेण्यात तेवढीच क्लिष्ट आणि अवघड अशी आहे. त्यामुळे तिला अनेक कोनातून आणि बाबीतून समजून आणि उमजून घ्यावे लागते.

सृष्टीतील सर्व प्राण्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात प्रेम भावना दिसून येते, मात्र मानवाने प्रेम भावनेला एका उच्च अशा पातळीवर नेवून ठेवले आहे. मानवी जीवनात प्रेम हे फक्त नर आणि मादी एवढ्या पुरते न राहता ते मानवी जीवनामधील अनेक नाते संबधांचा धागा म्हणून काम करते. कधी ते मित्र प्रेम असते, कधी ते बंधू प्रेम असते, कधी ते आई प्रेम असते, कधी ते वडील प्रेम असते, कधी ते बहीण प्रेम असते, कधी ते गुरु प्रेम असते, कधी ते आप्तेष्ट आणि नातेवाईक प्रेम असते, तर कधी ते राजा-प्रजा प्रेम असते. तसेच पितापुत्रांचे वात्सल्य, मातृभक्ती, पितृभक्ती, गुरुभक्ती, देशभक्ती, राजनिष्ठा, मैत्री, मानवतेची सहानुभूती, सहकार्याची उत्कंठा इ. सामाजिक संबंध ही प्रेमाचीच विविध रूपे होत. साहजिकच प्रेमाच्या आशा अनेक छटा फक्त मानवी जीवनातच आपल्याला पहावयास मिळतील. एक समाजशील प्राणी म्हणून मानवी जीवन हे परस्पर सहकार्य यावर आधारित असते. असे सहकार्य एक काम किंवा अनेक कामे पुढे घेवून जाते. साहजिकच हे परस्पर सहकार्य प्रेमाची उधळण करते आणि प्रेमाच्या धाग्याने दोन व्यक्तींना बांधून ठेवते. सहकार्यातून संबध वाढीस लागतात, तर संबंधातून प्रेम वृद्धिंगत होण्याची वाटचाल सुरु होते. प्रेमात सहकार्य हे कायम हा एक दुवा म्हणून काम करते मग ते वैयक्तिक संबंध असो किंवा आंतरवैयक्तिक संबध असो. एका व्यक्तीला दुसऱ्या एक किंवा अनेक व्यक्तींची सामाजिक गरज असते. त्या एक किंवा अनेक व्यक्ती सामाजिक गरज भागविण्यास उपयुक्त ठरतात. अशा गरजवंत आणि गरज भागविणाऱ्या व्यक्तींची जी मानसिक नाती तयार होतात, त्यांतील एक भावना म्हणजे प्रेम होय. परस्पर सहकार्यातून जी गरज भावना निर्माण होते तिला आपण प्रेम म्हणूया. त्यामुळे विविध सामाजिक संबध प्रेमाला जन्म देतात.

प्रेम या सृष्टीवर कसे अवतरले असावे, ते कसे निर्माण झाले, या मागची प्रेरणा काय हे समजून घेणे आवश्यक ठरते. सृष्टीत काहीच अकारण घडत नाही. प्रत्येक गोष्टीला काही तरी कारण आहे. या समजूतीद्वारे प्रेमाची मीमांसा आणि विश्लेषण करावे लागते. प्रेमाची व्याख्या आणि स्पष्टीकरण देण्याचा मागील पाच हजार वर्षात अनेकांनी प्रयत्न केला मात्र सर्वमान्य अशी व्याख्या कोणी देवू शकले नाही. प्रेमाला एका अंगाने अथवा एका बाजूने समजून घेता येत नाही. तसे केले तर त्यामध्ये व्यक्ती सापेक्षता येते. त्यामुळे प्रेमाला व्यक्तिनिरपेक्ष, समग्र आणि सर्वसमावेशक स्वरूप द्यावे लागते. सृष्टी निर्माण झाली आणि अनेक प्रजाती उदयास आल्या. त्यापैकी काहींनी आपले अस्तित्व टिकवले आणि काहीं काळानुरूप नष्टही झाल्या. या सर्व प्राणीमात्र मध्ये मानवाने आपल्या आकलन शक्ती आणि उच्च बुद्धीच्या जोरावर न भूतो भविष्यतो अशी प्रगती करून सर्वाना मागे टाकले आणि जीवन साखळीत सर्वात वरचे स्थान प्राप्त केले. साहजिकच उत्क्रांतीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये मानव भावनिक दृष्ट्या आणि बुद्धीमत्ता दृष्ट्या आजच्या सारखा उन्नत नव्हता. त्याला त्याच्या भावना आणि त्याच्याकडे असलेली बुद्धी याच्या मर्यादा होत्या. आकलन आणि अनुभव काही प्रमाणात असले तरी त्यातून अगदी प्राथमिक आणि सोप्या समस्या सोडवण्यावर भर दिला जात असे, तसेच नातेसंबध आजच्या इतके विकसित नव्हते. नातेसंबंध आणि सामाजिक व्यवस्था सुद्धा एवढी क्लिष्ट, गुंतागुंतीची आणि जटील नव्हती. मानवी समूह आणि त्यांच्यातील नर आणि मादी म्हणून असलेले परस्पर संबंध, पुनरात्पादन ,आपल्या समूहाचा संकटापासून बचाव आणि परस्पर सहकार्य एवढे मर्यादित होते. त्यामुळे जे प्रेम निर्माण होत होते ते सुद्धा अत्यंत मर्यादित स्वरूपाचे असणार.

अगदी जेंव्हा पासून मानवाला त्याच्या मेंदूद्वारे विविध गोष्टी,घटना आणि बाबीचे आकलन जेंव्हा सुरु झाले, त्यावेळीच प्रेम निर्माण झाले असे मानावे लागते. पौराणिक कथा, प्राचीन ग्रंथ, इतिहासात या प्रेमाबाबत आणि त्याच्या स्वरूपाबाबत विवेचन मिळते. ज्या गतीने आकलन आणि ज्ञान याच्या कक्षा वाढत गेल्या त्या प्रमाणे विचार आणि भावना यात समप्रमाणात वृद्धी होत गेली. मानवी संबंध हे हळू हळू भावनेच्या आधारे ठरायला लागले आणि त्याला विचारांची जोड मिळायला लागली. साहजिकच या मध्ये उत्कट पणाने पुढे आली ती भावना म्हणजे प्रेम होय. प्रेमाची अनेक व्याख्या आहेत त्यापैकी प्रेम म्हणजे परस्पर मधील सहकार्य, सहचर्य आणि समभाव होय. साहजिकच प्रेमाने संपूर्ण विश्व व्यापले असून संपूर्ण मानवजात त्या भोवती फिरत राहते. प्रेम हे जरी मानवी मेंदू आणि मानवी मन याची देणगी असली तरी त्याचे मूळ हे मानवी सहचर्य आणि मानवी समाजशीलता या मध्ये शोधावे लागते. समाजशीलता ही काही गुणसूत्रात अथवा अनुवांशिकेत मध्ये दडलेळी नसते तर ती एक प्रेरणा आणि परंपरा असून चालत आल्याप्रमाणे प्रत्येक मानव त्याची वागणूक ठरवतो. मात्र ही वागणूक आणि वर्तुणूक ही अत्यंत क्लिष्ट अशी प्रक्रिया असते आणि ती जीवनभर निरंतर चालू असते.

मानवी समाज हा अत्यंत परिपक्व असा समाज असून तो परस्पर सहकार्यावर चालत असतो. एवढे सहकार्य आणि सहचर्य मानवी समाज सोडून इतर कोणत्याही विकसित प्राणी, पक्षी अथवा कीटक यांच्यात दिसत नाही. साहजिकच मानवी उत्क्रांती आणि त्या सोबत आलेली प्रगती आणि विकास यात ह्या सामाजिक सहकार्य आणि सहचर्य यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. हे सहकार्य आणि सहचर्य घडत असतांना परस्परमध्ये एक बंध तयार होतो की तो अनेक मुख्य आणि उप भावनाचा समुचय असतो. त्याला प्रेम असे संबोधले जाते. निश्चितच प्रेमात एक सुखावणारी भावना असते.

प्रेमाची गुण वैशिष्टे पाहायला गेल्यास, प्रेमाला खोली असते तसे ते उथळ सुद्धा असते. त्याला चढ असतो, तसा उतार सुद्धा असतो. प्रेम कायम वाहत असते मात्र ते थांबले की ते दुर्गंधी निर्माण करते आणि जीवन असह्य करते. प्रेमाला भाषा अथवा लिपी असावी असा काही नियम नसतो. ते कधी कधी तर मुके असते, कधी कधी ते स्पर्शातून जाणवते, कधी कधी ते फक्त डोळ्यातून जाणवते, कधी कधी ते कृतीतून जाणवते. साहजिकच प्रेमाने दोन व्यक्ती मधील बंध एका अदृश्य अशा शक्तीने जोडले जातात.

प्रेम आणि प्रेरणा याचा सहसंबंध खूप मोठा आहे. प्रेम आहे तेथे प्रेरणा आहे. प्रेरणा आहे तेथे प्रेम आहे. प्रेमातून प्रेरणा निर्माण होण्यास अनेक घटक जबाबदार असतात. प्रेम अचूक आणि अतूट असेल तर त्याला योग्य प्रकारे प्रवाहित करता येते. प्रेमाचे अनेक रंग आणि ऋतू असतात. प्रेमाची पालवी आणि बहर कायम असतो. ते फुलत राहते आणि सुगंध दरवळत ठेवते. तो सुंगंध नाते संबंध अजून दृढ असे करतो. प्रेम दृष्टी देते आणि ते सृष्टी सुद्धा दाखवते. प्रेम म्हणजे धेर्ये, प्रेम म्हणजे शक्ती आणि प्रेम म्हणजे भक्ती. प्रेमा बाबत कवी, लेखक, कथा आणि कादंबरीकार यांनी विपुल असे लेखन केले आहे. प्रेम म्हणजे महासागर आहे. या महासागरात एक धागा मात्र समान आहे.तो म्हणजे प्रेम हे भावनेशी आणि विचाराशी निगडीत असून त्या पलीकडे जग शून्यवत वाटते .

मानवी नातेसंबंधाच्या अनेक पैलूवर प्रेमाच्या छटा कशा आहेत. बाळ जन्माला आले की त्याचे पहिले प्रेम आपल्या आईवर होते. आई आणि फक्त आई असा त्याचा प्रवास हा पुढे आयुष्यभर कायम असतो. आईने घेतलेली काळजी आणि सांभाळ हा त्याच्या मनावर कोरला जातो. त्या नंतर वडिलांविषयी वाटणारी आत्मीयता आणि प्रेम याचाही प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनावर खूप असतो. त्या नंतर येतात ते भाऊ आणि बहिण यामधील भाऊ भाऊ , बहिण बहिण , आणि भाऊ बहिण दोघेही मोठे होत असतांना अनेक अंतर्गत आणि बाह्य घटक कसे काम करतात यावर हे प्रेम अवलंबून असते. त्यानंतर आजी, आजोबा, काका, काकी, मामा मामी, आत्या मामा असे कौटुंबिक नातेसंबधात प्रेम, आत्मीयता आणि आपुलकीची भावना निर्माण होते. या नंतर येतात ते मित्र मित्र, मित्र मैत्रिणी , मैत्रीण मैत्रीण यांची ओढ आणि प्रेम हे आपल्या आजूबाजूच्या परिसरात आणि शालेय जीवनात तयार होते. एकमेकासोबत अभ्यास करणे, खेळणे, प्रवास करणे, जेवण करणे, चर्चा करणे, गप्पा करणे, अनुभव कथन करणे, भावनाचे आदान प्रदान करणे यातून हे प्रेम तयार होते.

प्रेमाच्या या अनेक नात्यामध्ये एका प्रेमाची मात्र कायम चर्चा होते ते म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्रेम होय. हे प्रेम मूलत: जीवशास्रीय असते, त्याला तत्वज्ञानाचा आधार असतो मानशास्र  हा त्याचा पाया असतो मात्र सामाजिकशास्र नुसार सामाजिक अधिमान्यता प्राप्त होण्यासाठी वैवाहिक नाते विषयक संबधांची जोड त्याला द्यावी लागते. विशेषत स्त्री आणि पुरुष यांच्या मधील प्रेम या मध्ये उत्कटता ,जवळीकता, काळजी, मदत, सहकार्य आणि शारीरिक आकर्षण या सर्व गोष्टीचा तीव्र असा मिलाप पाहायला मिळतो.

आकर्षण, वासना आणि आसक्ती या तीन टप्यात प्रेमाची विभागांनी हेलन फिशर करतात. वासना हे तीव्र लैंगिक ईछा आहे. आकर्षण ही मानसिक ओढ आहे, तर आसक्ती मध्ये संरक्षण आणि सुरक्षितता आहे. तथागत गौतम बुद्ध म्हणतात प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ. हे दोन जीव एकत्र आले कि, ते परिपूर्ण होतात. प्रेमाने तर जग ही जिंकता येते. ते असेही सांगतात की, जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका. भगवान महावीर सांगतात माणसांवर आणि समाजावर तितकेच प्रेम करा.संत ज्ञानेश्वर यांनीही आपल्या अभंगातून प्रेमाचा मार्ग तमाम मानव जातीस दाखवला. जगतगुरू संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥ याचा अर्थ असा की प्रेम देवाचे देणे आहे आणि प्रेमानेच माणसाचा देहभाव नाहीसा होतो. प्रेमाने देश कालाची देखील मनाला शुद्ध राहत नाही. संत कबीर आपल्या दोहयात परमेश्वरावरील प्रेमाबाबत म्हणतात ’प्रेम प्रेम सब कोई कहै, प्रेम ना चिन्है कोई जा मारग हरि जी मिलै, प्रेम कहाये सोई। प्रेमाबाबत ग्रीक तत्ववेत्त्ता ॲरिस्टॉटल प्रेमाबाबत सांगतो की ज्या व्यक्तीची भीती वाटते त्या व्यक्तीवर कोणी प्रेम करू शकत नाही. प्लेटो म्हणतो की प्रेम ही एक प्रेरणा आहे जी आपल्याला सौंदर्य जाणून घेण्यास आणि प्रतिबिंबित करण्यास प्रवृत्त करते. आधुनिक लोकप्रिय अर्थाने प्लॅटोनिक प्रेम हे एक स्नेहपूर्ण नाते आहे ज्यामध्ये लैंगिक घटक प्रवेश करत नाहीत, विशेषत: अशा प्रकरणांमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती सहजपणे अन्यथा गृहित धरू शकते. रॉबर्ट स्टनबर्ग हे प्रेमाचा त्रिकोणीय थेअरी मांडतात. यात जिव्हाळा, बांधिलकी आणि उत्कटता याला ते महत्व देतात. विल्यम मद्रायाल हे प्रेम हि भावना हि सहज प्रवृत्ती मधून निर्माण होते असे सांगतात. सिग्मंड फ्रॉइड हे प्रेमाचा जन्म जीवनाभिमुख सहज प्रेरणेमधून होतो, असे मानतात.

स्त्री आणि पुरुष प्रेमात जास्त आसक्ती आणि आकर्षण अस्तित्वात आले कि प्रेमाचा लोप होतो. कारण प्रेम हे एका रेषेत सदैव कायम राहत नाही. आसक्ती संपली कि विरक्ती येते आणि हळू हळू आकर्षण संपते. आकर्षण संपले की वाद आणि विवादास सुरुवात होते. प्रेम उंच गेले कि ते असूया निर्माण करते आणि असूया रागात परावर्तित होते. जेंव्हा ते साधारण पातळीच्या खाली जाते, तेंव्हा ते द्वेष निर्माण करते. द्वेष हळू हळू दुखात परावर्तीत होतो. तात्कालिक आणि भौतिक प्रेम आणि त्यातून साध्य केलेले सुख हे जास्त काळ टिकत नाही. कारण त्याला फक्त भावनेची किनार असते, मात्र विचारची जोड राहत नाही. फक्त आकर्षण असले की तेथे भ्रमनिरस होणे ठरलेले असते. कारण आकर्षण हे धुरासारखे असते ते विरळ होत जावून नाहीसे होते.

जे एकत्र आणते, एकत्र बांधते आणि समतोल साधते त्याला प्रेम म्हणावे. स्वता:वर प्रेम करता आले तरच आपण इतरांवर प्रेम करू शकतो. कारण प्रेमाचा बंध हा आपल्या मनातून तयार होतो आणि तो नाते गुंफत जातो. प्रेमाला उदीष्टे असतात तसे ध्येय सुद्धा असते. त्यामुळे प्रेमाचे ध्येय गाठायचे असेल तर उदीष्टावर काम करावे लागते. समजून घेणे आणि समजावून सांगणे या दोन्ही बाजू प्रेमाला अधिक समृद्ध बनवतात. त्यासाठी एका विशाल अशा पातळीवर आणि उच्च अशा दृष्टीकोणावर काम करावे लागते.

प्रेमात सिद्धता नसते, जेंव्हा तुम्ही काहीतरी सिद्ध करता अथवा सिद्ध करण्यास सांगता, तेथे प्रेमाला ओहोटी लागल्याचे दिसेल. शंकेची पाल चुकचुकली की प्रेम हळू हळू वितळण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रेमात शंका आणि सिद्धता याची बाधा होणार नाही यासाठी अखंड सावध आणि दक्ष राहावे लागते. चिरंतरता, अपूर्णता आणि अंतहीनता ही तीन वैशिष्टे प्रेमाला अर्थपूर्ण बनवतात. प्रेम चिरंतर असावे लागते तरच ते बहरते. प्रेमात कायम अपूर्णता असावी लागते तरच त्यातून आनंद उत्पन्न होतो. प्रेमाला अंत नसतो म्हणजे ते कधीही शेवट गाठत नाही. प्रेम, माया आणि जिव्हाळा ह्या अंतप्रेरणा आहेत. पण जसे आपण प्रेम करतो तसे या अंतप्रेरणा उफाळून येतात आणि त्या प्रेमाला उत्तुंग रूप देतात.

प्रेम करणं आणि प्रेम मिळणं ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रेम करतो त्यावेळेस आपण काही तरी देतोय, यातून आपण सुखावतो आणि प्रेम मिळतंय यातून आपण काही तरी मिळवतोय यातून सुखावतो. वास्तविक प्रेमात सदैव काही दिले जात नाही आणि काही मिळत नाही. कारण ते कायम अपूर्णता आणि कमतरता यावर आधारलेले असते हे सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे. प्रेमामुळे जाणीवा आणि चेतना जास्त विकसित होतात असे म्हटले जाते. कारण त्यामुळे आपले मन आणि विचार विस्तारतात आपण दुसर्‍याच्या नजरेतून स्वत:कडे पाहायला सुरुवात करतो. जगात  सर्व सकारात्मक आणि प्रेमपूर्ण असावे असे आपल्याला वारंवार वाटू लागते. आपली दृष्टी विशाल झाल्याने आपल्याला जग आणि निसर्ग सुंदर दिसू लागतो तो यामुळेच. जाणीव आणि चेतना जास्त विकसित झाल्याने आपण अधिक संवेदनशील सुद्धा होतो. अनेक लहान सहन गोष्टी सुद्धा तुम्हाला विचलित करायला लागतात. प्रेम हा मानवी जीवनाचा एक अभेद्य आणि अविभाज्य असा भाग आहे. मात्र हेच उलट घडले आणि प्रेमापासून वंचित राहणे आले तर अनेक मानसिक विकार जन्माला येतात. ऐकुन घेणे, आधार देणे आणि काळजी घेणे या तीन तत्वावर प्रेम आधारलेले असते आणि जिव्हाळा संपला कि प्रेम संपते

पैशावरील प्रेम, प्रसिद्धीसाठी प्रेम, संपती वरील प्रेम, व्यसनावरील प्रेम, एकंदर प्रेम हे सजीव आणि निर्जीव आशा दोन्ही गोष्टीवर केले जाते. ज्यातून आनंद आणि सुख याची अनुभव किंवा अनुभूती मिळते त्या गोष्टीवर आपण प्रेम करतो. भौतिक वस्तू आणि भोगणारी इंद्रिये ही प्रेम निर्माण करतात मात्र या भौतिक वस्तू नाशवंत आणि संपणार्‍या असतात. त्यामुळे ते प्रेम नसून ते मोह आणि आकर्षण असते. त्या मुळे  या भौतिक गोष्टीचा ज्यावेळी ऱ्हास होतो त्यावेळी ते प्रेम धुरासारखे निघून जाते आणि खाली फक्त दुखा:ची राख शिल्लक राहते

दिखावा आणि वास्तव यात अंतर असले कि तेथे प्रेम नसते. तर तेथे फक्त जुळवून घेतलेले असते. प्रेम आणि तिरस्कार या दोन बाबी विरुद्ध दिशेने चालतात. अविश्वासाची चादर ओढली की प्रेम द्वेषा मध्ये बदलते. प्रेमात आकलन असले तरी प्रेम मनात जाणवावे लागते, तरच त्याचा प्रवास सुरू होतो. आपण म्हणतो की प्रेम हृदयात जाणवते वास्तविक ते मनात जाणवते हे लक्षात घ्यावे. दयाळूपणा आणि आपुलकीपणा हि प्रेमाची दोन रूपे आहेत. त्यामुळे माणूस प्रेमात हळुवार प्रवास करतो.

अशा प्रकारे प्रेम हे फक्त व्यक्तीवर नाही तर वस्तू, घटक, बाब, उदिष्ट आणि ध्येय यावर केले जाते. दृश्य आणि अदृश्य अशा बाबीवर, ज्ञात आणि अज्ञात अशा गोष्टीवर सुद्धा प्रेम केले जाते. प्रेम हे दु:ख आणि सुख यात कायम साथ देते. प्रेमातून एक उर्जा तयार होते, ती आपल्याला मानसिक, भावनिक आणि शारीरिक आनंद आणि उभारी देते. सात्विकता आणि निरागसता ह्या दोन गोष्टी प्रेमाला भक्कम आणि अभेद्य बनवतात. त्यामुळे जीवन प्रवासात प्रेम आणि त्याचे विविध बंध आणि छटा ह्या आपण जपाव्या लागतात. प्रेमाला फक्त एका नजरेतून आणि एकाच अंगाने न पाहता समग्र, सर्वसामवेक्षक आणि एकात्मिक रीतीने पहावे लागते. प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष या संबंधात न पाहता त्याला सर्वव्यापी स्वरूप देता आले पाहिजे. आजूबाजूला जे काही आहे त्या बाबत प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होयला हवा. दु:ख दिल्याने दु:ख निर्माण  होते, परंतु प्रेमाने जग जिंकता येते. यासाठी फक्त आपल्याकडे विनम्रता असावी लागते. एकंदर आपण आपल्या स्वता:वर आणि संपूर्ण सृष्टीवर प्रेम करायला लागलो की तुमचे आयुष्य अजून सोपे, साधे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी होण्यास सुरुवात होईल. जीवन अनमोल आहे, त्याला अधिक सुंदर बनवूया!

५२/१०१ दिनांक ०६.०७.२०२२

सुखाच्या शोधात©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७