परस्पर सहकार्य-एक अनिवार्यता Mutual Cooperation a Necessity of Life

परस्पर सहकार्य-एक अनिवार्यता Mutual Cooperation a Necessity of Life

         मानव हा एक  समाजशील प्राणी आहे. मागील तीन लाख वर्षात एकंदर मानवाची प्रगती आणि विकास यात या समाजशीलतेने खूप महत्वाची आणि प्रमुख भूमिका बजावली आहे. माणसाकडे असलेलं हे विकसित असे सामाजिक गुणवैशिष्ट्ये त्याला इतर प्राण्यांपेक्षा उजवे आणि भक्कम बनवत असते. समाजशीलता ही परस्पर सहकार्यावर अवलंबून असते. समाजशीलतेमध्ये कामकाजाच्या वाटपाचे निश्चितीकरण झालेले असते आणि त्याप्रमाणे समान ध्येये किंवा उदिष्टे ही साध्य केली जातात. आज आपण पाहतो की कोणतीही बाब आणि गोष्ट ही परस्पर सहकार्या शिवाय साध्य होत नाही. मात्र जागतिक स्थरावर आणि व्यावसायिक पातळीवर परस्पर सहकार्ये वाढत असतांना वैयक्तिक आणि सामजिक पातळीवर हे परस्पर सहकार्ये कमालीचे घसरले आहे. आपले जीवन आपण जगत असतांनी समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून परस्पर सहकार्य साधने आणि त्यातून स्वत:चा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास साधने आवश्यक असते. मात्र सध्याच्या काळात परस्पर सहकार्य कमी कमी होत असल्याचे अनेक उदाहरणे यावरून दिसून येत आहे. भविष्यात कोरोना सारखी अनेक संकटे आणि आव्हाने याचा सामना मानव जातीस करावयाचा असेल तर परस्पर सहकार्या शिवाय पर्याय दिसत नाही. त्या अनुषंगाने प्रस्तुत लेखात आपण परस्पर सहकार्य आणि त्याची अनिवार्यता याबाबत सविस्तर असे विवेचन करणार आहोत.

      परस्पर सहकार्य हा शब्द सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात अनेक वेळा वापरला जातो. जगतगुरु संत तुकाराम महाराज ‘एक मेका सहाय्य करूI अवघे धरू सुपंथ I  या अभंगातून तमाम मानव जातीस परस्पर सहकार्य हाच उत्तम मार्ग  आहे याबाबतचा संदेश देतात. परस्पर सहकार्य  म्हणजे फक्त देणे आणि घेणे एवढे मर्यादित आणि संकुचित नसते. तर त्यातून समान वाढ आणि वृद्धी अपेक्षित असते. अवघे या शब्दातच सर्व हा अर्थ बोध होतो. फार पूर्वी खेडोपाडी अस्तित्वात असलेली आणि काही हजारो वर्ष टिकून असलेली बारा बलुतेदारी पद्धती सुद्धा परस्पर सहकार्य वर आधारित होती. विभागून दिलेली कामे, त्यातून  होणारे परस्पर सहकार्य ,परस्पर विश्वास आणि एकंदर मानव विकास यावर गाव गाडा मार्गस्थ होत असे. उदाहरण दाखल सांगायचे तर शेतकरी शेती कामासाठी लागणारी औजारे लोहरा कडून बनवून घेई आणि लोहार त्या बदल्यात शेतकरी यांच्याकडून धान्य घेई. साहजिकच या पद्धतीला अनेक वर्षे कोणताही पर्याय उपस्थित नव्हता.

       मात्र जग हे कायम बदलणारे आणि नाविन्याचा स्विकार करणारे असते. साधारण नव्वदीच्या दशकात जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या धोरणाचा पुरस्कार केला गेला. जग ही एक मुक्त अर्थव्यवस्था आणि खुली बाजारपेठ झाली. त्यानंतर दळणवळण आणि संदेशवहन याबाबत मोठी क्रांती झाली आणि जग हे भौतिक दृष्ट्या खूप जवळ आले. मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाने भौतिक अंतर तर जवळपास शून्य करून टाकले. यानंतर जगातील अनेक संदर्भ बदलले गेले. अनेक स्थितांतरे आली. अनेक उलथापालथ झाल्या. त्यातील एक महत्वाचा आणि मोठा बदल म्हणजे हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली बलुतेदारी पद्धत संपुष्टात आली. बलुतेदारी पध्दत संपुष्टात आली तसे लोंढेच्या लोंढे गावांमधून शहराकडे स्थलांतरित होऊ लागले आणि गावे ओस पडली. साहजिकच संपूर्ण जग इतक्या मोठा व्यापक बदल स्विकारत असताना मात्र वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरील परस्पर सहकार्य याचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली होती.

       असे असले तरी या वेळी या उलट एक दुसरा बदल घडून येत होता तो म्हणजे व्यावसायिक पातळीवर वाढत असलेले परस्पर सहकार्ये. जागतिक बाजारपेठ खुली झाल्याने आणि जग कमालीचे जवळ आल्याने व्यावसायिक पातळीवरील सहकार्य कमालीचे सुधारले. व्यवसायिक पातळीवरील सहकार्य या बाबत मोबाईल फोनचे उदाहरण समर्पक ठरते.  मोबाइल फोन मध्ये दोन महत्वाचे विभाग असतात एक सॉफ्टवेअर आणि दूसरा हार्डवेअर. सॉफ्टवेअर बाबत मोबाईलचा की-बोर्ड जर घेतला तर त्यासाठी लाखो हात तो तयार करत असतील. हार्डवेअर बाबत फक्त कॅमेरा आणि त्याच्या लेन्स घेतल्या तर त्या साठी सुद्धा लाखो हात कार्यरत असतील. साहजिकच व्यावसायिक पातळीवरील हे सहकार्य एवढे पद्धतशीर असते की या सहकार्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लागणार्‍या हाताचा योग्य आणि प्रमाणशीर मोबदला शेवटचा ग्राहक त्याला अदा करतो. म्हणजे आपण जेंव्हा 25 हजार रुपयाचा रुपयाचा मोबाइल खरेदी करतो त्यावेळी त्यातील त्या 25 हजार रुपयाचे प्रमाणशीर भाग त्या त्या ठिकाणी व्यावसायिक सहकार्य करणार्‍या व्यक्तीच्या खिश्यात जातो. साहजिकच जागतिक विकास आणि प्रगती आणि आपल्या पुढे येत असलेले नवीन तंत्रज्ञान हे परस्पर सहकार्य आणि मदत यावर विसंबलेले आहे आणि हे परस्पर सहकार्य एवढे पद्धतशीर आहे की त्याच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणि गती दिसून येते. रेल्वेच आरक्षण ऑनलाईन बूक करणे,  झोमटो वरुन घरी जेवण मागवणे, ऑनलाईन कपडे खरेदी करणे, ओला कार बुक करणे, किराणा आणि भाजीपाला ऑनलाइन मागवणे या सर्व गोष्टी आणि बाबी व्यावसायिक परस्पर सहकार्यावर आधारित आणि अवलंबित आहेत. 

      आशा प्रकारे एकीकडे व्यावसायिक पातळीवर वाढलेले आणि वृद्धिंगत होत असलेले परस्पर सहकार्ये आणि वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर कमी कमी होत असलले परस्पर सहकार्य हा तीव्र स्वरूपाचा विरोधाभास तयार झाला. फार पूर्वी गावातील एका दूरवरच्या वस्तीवर कोणाला मदत आणि सल्ला लागला तर धावत जाणारे आपण आज फक्त दोन फुटावर मागील तीन वर्षापासून राहत असलेला शेजार्‍याला ओळखत नाहीत, मदत आणि सल्ला तर खूप लांब राहिला. परस्पर सहकार्य बाबत अधोगती होण्यास अनेक कारणे आहेत. मानवी नातेसंबंधात उथळपणा, वरवरपणा आणि अपुरेपणा येण्यामागे मागील काही शतकात झालेली औद्योगिक क्रांती आणि काही दशकात झालेली माहिती तंत्रज्ञान प्रगती काही अंशी कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. आद्योगिक क्रांती झाली आणि जी कामे माणसे सामुहिकरित्या करत होती ती यंत्रे करू लागली. हजारो माणसाचं काम एक यंत्र करू लागले. साहजिकच कामाच्या निमिताने होत असलेला संवाद आणि परस्पर सहकार्य लोप पावले. माहिती तंत्रज्ञान क्रांतीने तर त्यावर कडी केली जी कामे लाखो माणस करत होती तो एक संगणक करू लागला. या पुढे ही  जावून मोबाईल क्रांतीने कहरच केला त्याने परस्पर संवाद संपुष्टात आणून आभासी जगाकडे आणि आभासी संवादाकडे जगाचे धुर्विकरण केले. साहजिकच औद्योगिक क्रांती, माहिती तंत्रज्ञान क्रांती आणि मोबाईल क्रांती यांनी मानवाच्या विकास आणि प्रगतीला हातभार लावला असला तरी त्या मुळे मानवाच्या जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यातील महत्वाची समस्या म्हणजे कमी झालेला संवाद आणि संपुष्टात येत असलेले परस्पर सहकार्य होय.

     एकीकडे माणसाच्या आयुष्याला गती आली तर दुसरीकडे मानसिक आणि भावनिक समस्यांनी उग्र रूप धारण केले. औद्योगिक क्रांती असो किंवा संगणक क्रांती असो या क्रांतीचे मुलभूत वैशिष्टे असे प्रतिपादण्यात आले की या क्रांती मुळे मानवाकडे खूप वेळ शिल्लक राहील आणि तो वेळ त्याला त्याच्या स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी त्याला देता येईल. मात्र हा फक्त फक्त कोरडा दिलासा किंवा पोकळ वासा ठरला. उलट जो वेळ पूर्वी स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी दिला जात होता तो सुद्धा या क्रांत्यानी हिरावून घेतला. आता असे का झाले? किंवा हा शिल्लक वेळ कोठे गेला? ते तपासणे आवश्यक ठरते. साहजिकच हजारो किंवा लाखो लोकांचे काम एक यंत्र करणार असल्याने माणसांकडे वेळ शिल्लक राहणे अपेक्षित होते. मात्र असे झाले नाही, कारण माणसाने त्याच्या भौतिक सुखासाठी इतर मार्ग धुंडाळले आणि त्याने त्याचा शिल्लक वेळ त्यामध्ये गुंतवून टाकला. तसेच अशी भौतिक साधने तंत्रज्ञानाने एवढी असंख्य उपलब्ध करून दिली की तो तेथेच कार्यमग्न झाला.

     आपण म्हणतो आधी विचाराची गती वाढते आणि मग कृती आणि कामकाजाची गती वाढते. साहजिकच आज विचारांचा एवढा कल्लोळ तयार झाला आहे की माणूस हा लगेच भौतिक आणि कृत्रिम अशा गोष्टीकडे आकृष्ट होत आहे. आज तंत्रज्ञानामुळे जग आणि तेथील बाजारपेठा  इतक्या जवळ आल्या आहेत की माणस बाजारपेठ नाही तर बाजारपेठ माणसाला शोधत त्यांच्या घरात पोहचल्या. कृत्रिम बुद्धिमता वापरून हजारो नजरा आपल्यावर मोबाईल आणि संगणक याच्या माध्यमातून रोखल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला काय हवे हे या कृत्रिम बुद्धिमता द्वारे समोरच्या विक्रेत्याला कळल्यानंतर तो अनेक पर्याय आपल्यासमोर आपल्याला न विचारता ठेवत आहे. त्यामुळे परस्पर सहकार्यातून जे उपलब्ध होत होते ते एका क्लिक वर उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. साहजिकच यामुळे आपले कुटुंबिय, शेजारी आणि समाज यांचे वरचे असलेले अवलंबित्व अत्यंत कमी झाल्याने परस्पर सहकार्ये कमालीचे घसरले आहे.  

        सामाजिक परस्पर सहकार्य हा तमाम मानव जातीचा आधार असल्याने ते संपुष्टात येणे ही गोष्ट मानवजातीच्या विनाशाकडे तर घेवून जाणार नाही ना? अशी अनामिक भीती आता  तत्ववेते आणि समाजशास्राचे अभ्यासक यांच्या सामोर आहे. परस्पर सहकार्य कमी होते तेंव्हा तंत्रज्ञानधीष्टीत व्यवस्थेवरचे परावलंबीत्व खूप वाढते. ही व्यवस्था जर भविष्यात कोलमडली तर त्याला पर्याय काय? याबाबत सर्वच जण अनुत्तरीत आहोत. परस्पर सहकार्य हा मानवाचा स्थायीभाव आहे. आज परस्पर सहकार्य संपुष्टात येत असल्याने मानवा मानवा मधील प्रेम, स्नेह आणि सहानभूती कमी होत आहे. साहजिकच आचरण आणि सामजिक आवरण यात बदल होत आहेत.  परस्पर सहकार्य संपत असल्याने, एकीकडे व्यावसायिक वाढ  आणि भरभराट होत असतांना मात्र वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाची पीछेहाट होतान दिसत आहे. विचार आणि भावना याचे आदान प्रदान कमालीचे खालवले असल्याने आणि त्याला फक्त सोशल मीडियाचा आभासी आधार असल्याने तणावाची पातळी भयंकर वाढली आहे . मदतीची आस घेवून उभे असलेले अनेक लोक अक्षरश परस्पर सहकार्य नसल्याने स्पर्धेच्या बाहेर फेकले गेले आहेत. मदत, सल्ला आणि सहकार्य नसल्याने माणस एकलकोंडी झाली आहेत आणि ती मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. तसेच सहकार्याची जागा ही फक्त असहकार्याने घेतली नसून द्वेष आणि तिरस्कार याची वाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे. ‘ते मला मिळाले नाही तरी चालते, पण त्याला ते मिळता कामा नये’ ही वृती कमालीची वाढली आहे. दुसर्‍याचे यश आणि प्रगती पाहून त्याची प्रगती झाली म्हणून असह्य अशा मानसिक वेदना होणारे अथवा करून घेणार्‍याची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

      असे होण्यामागे वैयक्तिक पातळीवर आपण जेंव्हा कारण शोधतो त्यावेळी एक बाब प्रकर्षाने लक्षात येते कि औद्योगिक आणि संगणक क्रांती मध्ये आपण व्यावसायिक स्तरावर प्रगती जरी केली असली तरी त्याच्या बरोबरीने पायाभूत शिक्षण, संस्कार आणि नीती-मुल्ये यावर भरीव असे काम होवू शकले नाही. शिक्षण हे मानवाच्या व्यक्तिमत्वामध्ये अपेक्षित असे वर्तन घडवून आणण्याचे साधन आहे. शिक्षणाने माणूस आपले जीवनाचे योग्य असे सहयोग, संयोजन, सहजीवन आणि नियोजन करू शकतो. संस्कार करणे म्हणजे व्यक्तिमत्वाला आकार आणि रूप देणे होय. असे संस्कार विचार, वागणे आणि वर्तन याबाबत असतात. आपले विचार, वागणे आणि वर्तन चांगले आणि उत्तम कसे राहील याबाबत जे धडे दिले जातात त्यास आपण संस्कार असे म्हणूया. मातीच्या गोळ्यावर संस्कार करून त्याला आकार दिला जातो. साहजिकच आवश्यक असा आकार त्याला दिल्याने त्या मातीचे गोळ्याचे मूल्य आणि तयार झालेल्या मातीच्या भांड्याचे मूल्य यात भरपूर वाढ होते ती योग्य असे संस्कार दिल्यामुळेच. उदाहरण द्यायचे झाल्यास वडीलधारे आणि शिक्षक यांचा कायम आदर करावा. रोज सकाळी परमेश्वराचे नामस्मरण करावे हे झाले संस्कार. नीती मूल्ये ही नैतिकता आणि सुयोग्य अशा आचारण विषयी जोडलेली असतात. मूल्य ही काळाच्या कसोटीवर तपासलेली असतात आणि ती प्रस्तापित सुद्धा असतात. या मुल्यांचा स्वीकार करणे आणि ती वर्तनात समाविष्ट करणे आवश्यक असते. नेहमी खरे बोलावे किंवा रंजल्या गांजलेल्याना मदत करावी हे प्रस्तापित मूल्ये आहेत. या मूल्यांचे माहिती देणे आणि ती आचरणात आणणे म्हणजे मूल्य शिक्षण होय.  संस्कार हे मानवाला काय योग्य आणि काय अयोग्य याचा वस्तुपाठ किंवा धडा देतात तर मुल्ये ही माणसाला त्याची भविष्यात वाटचाल कशी असावी याबाबत मार्ग दाखवतात.

       अशा प्रकारे लगतच्या काळात औद्योगिक क्रांती आणि संगणक क्रांती यासोबतच शिक्षण ,संस्कार आणि निती-मूल्य याची प्रमाणशीर वाढ न झाल्याने परस्पर सहकार्य यावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. शिक्षण सुयोग्य नसेल, संस्कार जर अयोग्य असतील आणि मूल्यांचा समावेश दैनदिन जीवनात नसेल तर साहजिकच सहकार्ये आणि मदत याची जोपासवणूक होत नाही आणि कालांतराने तसे वर्तन पण होत नाही. सहकार्ये हे दगडाच्या किंवा विटाच्या भिंती सारखे असते. एक दगड किंवा वीट निघाली तर भिंत कोसळू शकते अगदी तसेच सहकार्ये असते आणि ते परस्पर मदतीवर अवलंबून असते. सहकार्ये हे शिडी सारखे असते. त्यात प्रत्येक व्यक्ती शिडीच्या पायरीची भूमिका बजावत असतो आणि आपल्याला आधाररूपी आधार देत असतो.  सहकार्ये हे विचारातून उमलते आणि शब्दातून फुलते तर कृतीतून त्याचे फळ तयार  होते. सहकार्यातून नातेसंबद्ध मजबूत होतात आणि त्याला प्रेमाची आणि स्नेहाची किनार लाभते. सहकार्ये हे फक्त आधार नसतो तर तो एक विश्वास असतो. हा विश्वास शक्ति आणि ऊर्जा निर्माण करतो आणि त्यातून असाध्य ते साध्य होण्यास मदत होते. सहकार्ये हे निरपेक्ष असायला हवे अशी काही अट नाही परंतु प्रत्येक सहकार्याला अपेक्षा आणि फळाची किनार नको. सहकार्ये ही अशी बाब आहे की ती केंव्हा उमलेल आणि फुलेले हे आपण सांगू शकत नाही. आपले सहकार्य हे गुणाकार सारखे असावे त्यातून आपण पुढे जावे आणि इतरांनाही सोबत पुढे घेवून जावे.

         वैयक्तिक पातळीवर दिवेसेंदिवस सहकार्ये कमी होत असल्याने त्यास जर वृद्धिंगत करायचे असेल तर संवाद वाढवावा लागतो. शेवटी सहकार्ये हे मदत आणि सल्ला यातूनच पुढे वाढीस लागते. निकोप संवाद आणि दुसर्‍याची ऐकून घेण्याची आपली क्षमता आणि कुवत वाढवायला लागते.  लोक आपल्यावर विश्वास दाखवतात म्हणजे ते आपल्या सहकार्याची अपेक्षा ठेवतात आणि त्यातून त्यांना अपेक्षित असे साध्य साधता येते. शिक्षण फक्त पुस्तकी न ठेवता ते समाजाच्या सर्व अंगांना कसे स्पर्श करेल आणि ते अधिक कौशल्ये निर्माण करणारे कसे असेल यावर काम करावे लागते. संस्कार आणि नीती मुल्ये शिक्षण ही काय एका दिवसात घडणारी बाब नाही. त्यामुळे अगदी बालवयातच पालक आणि शिक्षक यांनी आपल्या पाल्याबाबत दक्ष असायला हवे. परस्पर सहकार्ये, मदत आणि सल्ला याबाबत आपले पालक कामकाज करतात का? याचे अवलोकन त्यांचे पाल्य करत असतात आणि तुम्ही जर तसं करत असाल तरच ते तुमचे अनुकरण करतात. एकंदर परस्पर सहकार्याची सुरुवात सर्वप्रथम आपल्यापासून होते आणि मग ती इतरांपर्यंत पोहचते. चला सर्वप्रथम परस्पर सहकार्ये आपल्यात वृद्धिंगत करूया आणि एक साधे, सोपे,सरळ,सुटसुटीत,सुखी आयुष्य जगूया.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया .

५०/१०१ दिनांक १८.०५.२०२२

सुखाच्या शोधात© 

राजीव नंदकरउपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७