दक्षता आणि अखंड सावधानता Vigilance and Constant Alertness

दक्षता आणि अखंड सावधानता Vigilance and Constant Alertness

        मानवी जीवन हा पाण्याचा बुडबुडा आहे असे म्हटले जाते. यातील अतिशयोक्तीचा भाग जर सोडला तर मानवी जीवनाचा खडतर प्रवास आणि त्यातील अडथळे पाहता ते कधीही अचानक संपू शकते याची जाणीव तमाम मानव जातीस आहे. असे असले तरी मानव हा कायम आव्हाने स्विकारत असतो. मात्र अशी आव्हाने स्विकारत असतांना आणि साहस दाखवताना त्याला दक्षता आणि अखंड सावधानता कायम बाळगावी लागते. ती ठायी नसेल तर अपयशाला सामोरे जायला लागू शकते. ही दक्षता आणि अखंड सावधानता आपोआप येत नाही तर प्रत्येकाच्या स्व-अनुभवातून आणि सामाजिकरणातून येते. जीवनाच्या प्रत्येक टप्यावर ही दक्षता आणि अखंड सावधानता कामाला येते हे नाकारता येत नाही. त्यामुळे जीवनात मार्गक्रमण करत असतांना  दक्षता आणि अखंड सावधानता याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. प्रस्तुत लेखात जीवनातील दक्षता आणि अखंड सावधानता म्हणजे काय? ती कशा प्रकारे अंगी बाळगायची? तिचे फायदे काय आहेत? यासह अनेक बाबीवर प्रकाश टाकणार आहोत.

        आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी आणि घटना घडत असतात. सकाळी ऑफिसला निघाल्यावर कोणाची ट्रेन अथवा बस चुकते. कोणाच्या गाडीचा टायर पंचर होतो. कोणाच्या गाडीचा लहानसा अपघात होतो. कार्यालयात आल्यावर वरिष्ठ यांचा रोष सहन करावा लागतो. कनिष्ठ यानी सोपविलेली जबाबदारी पार पडलेली नसते. घरी मुलगा सायकल वरून पडलेला असतो. घरातील गॅस संपलेला असतो. अशा अनेक घटना आपल्या दैनंदिन जीवनात घडत असतात. कार्यालयातील अमुक सहकाऱ्याचे ब्रेन हम्रेज झालेले असते. दोन दिवसापूर्वी शिपाई याला ट्रकने उडविले असते. शेजारच्या कार्यालयाचा अधिकारी हा एका फ्रॉड मध्ये निलंबित झालेला असतो. आपण मागील महिन्यात घेतलेले शेअर्स कोसळलेले असतात. आपण ठेवलेला भाडेकरू हा त्याच्या अडचणी मुळे घर खाली करणार असतो. अशा अनेक घटना आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामजिक जीवनात घडत असतात.

     आजूबाजूला काय घटना घडत आहेत हे नुसते  पाहत राहणे म्हणजे दक्षता नव्हे हे प्रथम लक्षात घ्यावे. तर जे काही चालले आहे त्याचा आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनावर काय परिणाम होवू शकतो. याबाबत विश्लेषण करून आपली भूमिका ठरवणे म्हणजे दक्षता होय. आपल्या सभोवताली जे काही चालते त्याचा चांगला आणि वाईट परिणाम किंवा प्रभाव आपल्यावर होत असतो. असा परिणाम किंवा प्रभाव जसा चांगला असतो तसा तो वाईट सुद्धा असतो. जसा तो सकारात्मक असतो तसा तो नकारात्मक असतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे चालते त्याचे आकलन करून घेणे आणि नुसते आकलन करून न घेता त्याचे विश्लेषण करणे. विश्लेषनातून जे काही निष्कर्ष आले आहेत त्यातून आपले जीवन अधिक सुखकर आणि अधिक सुरक्षित कसे करता येवू शकेल यावर काम करणे म्हणजे दक्षता होय. जेवढे आपण दक्ष राहू  तेवढी आपली प्रगती जलद होत राहते.

       दक्षता आपल्या अंगी असेल तर आपण यशस्वी होण्याची शक्यता वाढते. कारण ही दक्षता तुमच्या मार्गातील अडथळे आणि अडचणी दूर करण्यास मदत करते. तुम्ही दक्ष असाल तर पुढे काय अडचण येणार आहे, त्याचा अंदाज आपल्याला अगोदर येत असल्याने विविध उपाययोजना करणे आपल्याला सोपे जाते. दक्षता ही आपल्याला अधिक चौकस बनवते आणि आपण विस्तृत असा विचार करतो. दक्ष राहिल्याने तुमचे मन आणि विचार हे केंद्रित होतात. त्यामुळे चुकीचे आणि नकारात्मक विचार याला आपल्या मनात आणि विचारात थारा मिळत नाही. आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा जी अनेक वेळा चुकीच्या ठिकाणी खर्च होते ती होत नसल्याने या ऊर्जेचा वापर तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांकडे आणि ध्येयाकडे मार्गक्रमण करण्याकडे होतो.

       नोकरी, व्यवसाय, उद्योग इत्यादी क्षेत्रात काम करत असताना कायम दक्ष राहणे खूप आवश्यक असते. जेवढी तुमची उंची जास्त तेवढ तुम्हाला अधिक दक्ष व्हावे लागते. जास्त उंची वरील व्यक्ती सर्वांना स्पष्ट दिसतो. तुम्ही एका उंचीवर असल्याने समाजातील चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती तुम्हाला पाहत असतात. तुमच्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे लक्ष असते. साहजिकच तुम्ही आतले आणि ते बाहेरचे असल्याने तुमच्या चुका आणि तुमचे वैगुण्य शोधण्याकडे त्यांचा कल असतो.  एकदा त्यांना संधी मिळाली की ते आपल्यावर तुटून पडतात. तसेच तुम्ही ज्या वेळी चांगले काम सुरु करतात, त्यावेळी हेच लोक अडथळे निर्माण करतात. असे का होते कारण आपण एका उंचीवर गेलो की आपल्या उंचीच्या खाली जे आहेत त्यांना आपण गृहीत धरतो. या लोकांना गृहीत धरल्यामुळे त्यांचा अहंकार उफाळून येवून ते तुमच्या विरुद्ध अनेक ठिकाणी गरळ ओकून तुमची छबी आणि तुमचे काम खराब करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर आपण तेवढेच जमिनीवर राहून नतमस्तक असायला हवे. जेवढे तुम्ही जमिनीवर राहाल आणि दक्षता घेणार तेवढे तुही पुढे जाणार. त्यामुळे कायम दक्ष राहणे आणि विशेषत उंचीवर गेल्यावर अतिदक्षता कायम बाळगणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते.

        दक्षता सोबतच अखंड सावधानता तेवढीच महत्वाची आणि अनिवार्य अशी बाब आहे. दक्षता आणि अखंड सावधानता ह्या दोन बाबी जरी एकच दिसत असल्या तरी त्यात सूक्ष्म भेद आहे. दक्षता ही वेळेपुरती किंवा काळापुरती असते, मात्र अखंड सावधानता ही पूर्व नियोजित असते. मोटार सायकल चालवतांनी रस्त्याच्या कडेने कमी वेगाने चालावे ही झाली दक्षता मात्र रोज हेल्मेट घालून मोटार सायकल चालविणे ही झाली अखंड सावधनता.  म्हणजे अखंड सावधानता म्हणजे कायम सावध राहून आपला बचाव करणे होय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेंव्हा अफजलखानाच्या भेटीचा बेत आखला तेंव्हा त्यांना अफजलखान दगाफटका करू शकतो याची जाणीव होती. भेटीच्या वेळी अखंड सावधानता राहावी यासाठी त्यांनी चिलखत, वाघनख्या अशी शस्त्रसामग्री सोबत ठेवली होती. तसेच योग्य दक्षता राहावी यासाठी त्यांनी विश्वासू माणसे सोबत घेतली होती. साहजिकच दक्षता आणि अखंड सावधनता या दोन्ही गुणांचा समयसुचकतेने महाराजांनी वापर करून मोहीम फत्ते केली. आपण ज्या वेळी गाडी चालवत आहोत त्या वेळी आपली नजर चौफेर अशी असते. कोणी अचानक मध्ये आले तर आपण गाडीचा वेग कमी करतो किंवा ब्रेक दाबतो त्याला म्हणायचे दक्षता. आपली गाडीचे ब्रेक ऑयल आणि स्टेरिंग ऑयल फुल आहे.गाडीची योग्य वेळी सर्विसिंग केली आहे. या सर्व बाबी अखंड सावधानतेमध्ये अंतर्भूत होतात

      आपल्या कामाच्या ठिकाणी आपली कामे, कर्तव्ये आणि लक्षांके याबाबत आपल्याला कायम दक्ष राहावे लागते. अखंड सावधानता बाळगून ही कामे, कर्तव्ये आणि लक्षांके आपण कोणतीही अडचणी आणि समस्या न उद्भवता मार्गी लावू शकलो तर आपण एक यशस्वी व्यक्ती बनू शकतो. दूरच्या प्रवासाला निघताना सर्व चीजवस्तू सोबत घेणे. वरिष्ठांनी बोलविलेल्या बैठकीला सर्व कागदपत्र आणि टिपण्या घेवून उपस्थित राहणे. नवीन आर्थिक स्वरूपाचे व्यवहार करत असला तर दक्षता बाळगणे. वैद्यकीय समस्या निर्माण झाली तर एका डॉक्टरवर विसंबून न राहता अजून दोन डॉक्टर यांचा सल्ला घेणे. आपला अ प्लान जर अयशस्वी झाला तर ब प्लान तयार ठेवणे. आपल्या आरोग्याची काळजी घेनेसाठी धुम्रपान आणि मद्यपान या पासून दूर राहणे ही अखंड सावधानतेचे लक्षणे आहेत.

      अखंड सावधानता आणि दक्षता ही तुमच्या ज्ञान, कौशल्ये, अनुभव आणि दृष्टीकोण यातून निर्माण होत असते. मात्र त्या साठी वेळ व्यवस्थापन, प्राथमिकता व्यवस्थापन आणि संवाद व्यवस्थापन साधावे लागते. असे केले तर काय होईल? तसे केले तर काय होईल?  असा निर्णय घेतला तर काय परिणाम होतील? तसा निर्णय घेतला तर काय परिणाम होतील ? असे विचार आपल्या मनामध्ये रुजवावे लागतात आणि त्यातून निर्णय घ्यावे लागतात. माझे एक मित्र तहसिलदार आहेत.काही सामाजिक संघटना यांनी रस्ता रोको केले. ते अडून बसले की  तहसिलदार महोदय रस्त्यावर निवेदन घेण्यासाठी आल्याशिवाय रस्ता रोको मागे घेणार नाहीत. अशा ठिकाणी निवेदन घेणे हे कायम संकटात सापडण्यासारखे असते. तहसिलदार महोदय हे कोणतीही दक्षता न घेता निवेदन घेण्यासाठी गेले. जायमोक्यावर निवेदन घेत असतांनीच त्यांच्या चेहऱ्याला काळे फासले.साहजिकच थोडी चर्चा आणि विचार विनिमय करून आणि जायमोक्यावर काय परिस्थिती आहे हे लक्षात घेवून त्यांनी पावले उचलली असती तर ही घटना घडली नसती.

     एकंदर दक्षता आणि अखंड सावधानता ह्या दोन बाबी मध्ये सूक्ष्म फरक असला तरी दैनंदिन जीवनात यावर डोळसपणाने काम करावे लागते आणि त्याचा अंगीकार करावा लागतो. काही वेळा दुर्लक्ष करणे परवडत असले तरी नेहमीच दुर्लक्ष करणे हे आपल्याला अडचणीचे ठरू शकते. अनेक वेळा दक्षता आणि अखंड सावधानता याचे फायदे तात्काळ दृष्टीक्षेपात येत नसले तरी एका ठराविक कालावधीनंतर त्याची फळे दिसून येतात. दिवसाची सुरवात ही दक्षतेने आणि अखंड सावधानतेने करणे ही आपल्या यशाची आणि प्रगतीची गुरुकिल्ली ठरते आणि त्याआधारे आपण एक सोपे, सुटसुटीत, साधे, सरळ आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करतो.

           जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया.

५८/१०१ दिनांक ०२.०२.२०२३

जीवन विषयक कौशल्ये ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७