झोपेचे रहस्य (𝐓𝐡𝐞 𝐌𝐲𝐬𝐭𝐞𝐫𝐲 𝐨𝐟 𝐒𝐥𝐞𝐞𝐩)
झोपेचे रहस्य (𝐓𝐡𝐞 𝐌𝐲𝐬𝐭𝐞𝐫𝐲 𝐨𝐟 𝐒𝐥𝐞𝐞𝐩)
शांत, चांगली आणि पुरेशी झोप अशी बाब आहे की ती कोणत्याही औषधातून, यंत्राचा वापर करून, मनोसोपचार सल्यातून आणि दुसर्याची मदत घेवून आपण मिळवू शकत नाही. अर्थातच लक्षात घ्यावे की झोपेला अजूनही कोणताही दूसरा पर्याय सापडला नाही. आपले काम आणि आपला आहार जेवढा महत्वाचा आहे, अगदी तेवढीच आपली झोप महत्वाची आहे.
आपण झोपतो म्हणजे काय होते? आपले मन झोपते की, आपला मेंदू झोपतो? हे सांगणे खूप आव्हानात्मक आहे. काही मित्रांना असे वाटत असेल की आपण झोपलो तर मेंदू सुद्धा झोपत असेल.वास्तविक मित्रांनो मेंदू हा कधीच झोपत नाही.आपले मन हे मेंदूच्या अंतर्गत व बाह्य परिसरात अस्तीत्वात असते. ज्या वेळी आपण ठरवतो की आपल्याला आता झोपायचे आहे. त्यावेळी हळू हळू मनाची विचार प्रक्रिया बंद होते. आपले सचेतन मन आणि अचेतन मन त्याचा मेंदू सोबत असलेला संपर्क तोडून टाकते.
अशा प्रकारे मन व मेंदूचा संपर्क तुटला की आपले दैनंदिन कार्य व कृती बंद होतात. अशा प्रकारे आपले दैनंदिन कार्य व कृती बंद झाली व आवश्यक ते मनाकडून येणारे संदेश बंद झाले की मेंदू हा थोडा शिथिल होतो. त्यानंतर आपण झोपेच्या अवस्थेत जातो. मात्र मेंदूचे कामकाज काही प्रमाणात चालूच असते. एकदा आपल्याला संपूर्ण झोप लागली की मेंदू आपले बाह्य कार्य बंद करून आपण झोपण्यापूर्वी दिवसभरात कामकाज करतांना आपल्याला आलेला विस्कळीतपणा, डोळ्यावर आलेला ताण , केलेले विचार ,मिळवलेली माहिती ,घडलेल्या घटना ह्या सर्व बाबींची जुळवा जुळव मेंदू पटलात आणि केंद्रामध्ये सुरू करतो. अशा प्रकारे आपला मेंदू हा Non Rapid Eye Movement(NREM) आणि Rapid Eye Movement(REM) या अवस्थांमधून जावून आपली मोहीम फत्ते करतो. आपल्याला जाग आल्यावर परत नवीन कामासाठी नवीन ऊर्जा व उत्साह घेवून तयार होतो.
एवढे सांगण्याचा हेतु हाच की आपल्या आयुष्याबाबत आणि आपल्या भवितव्याबाबत आपण जेवढे सजग आणि जागरूक असतो तेवढे आपल्या झोपेबाबत कधीच नसतो. असेही काही लोक युक्तिवाद करतात की झोपे मधून आपण आपले मौल्यवान व किमती आयुष्य वाया घालवत असतो. वास्तविक झोप ही सृष्टीतील कोणत्याही प्राण्यासाठी मग तो माणूस असो किंवा कोणीही ती एक आवश्यक नव्हे तर अत्यावश्यक बाब असते.
असे असले तरी आजच्या या धावपळीच्या व व्यस्त युगात माणसं चांगली व पुरेशी झोप घेण्याचे विसरून गेलेली आहेत. जे झोपायचा प्रयत्न करत आहेत त्यांना झोप येत नाही. झोपलेच तर तुटक तुटक झोप आणि अडथळे ची झोप असते. एकंदरच पुरेशी झोप झाली नाही की आपण चिडचिडे, उद्विग्न,खिन्न आणि निराशावादी बनतो. तसेच पुरेशी झोप न मिळाल्याने आपली कार्यक्षमता आणि उत्पादकता याच्या मध्ये सुद्धा खूप घट होते.
सर्वात भयानक म्हणजे अपुर्या झोपेचे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर खूप विपरीत आणि भयंकर असे परिणाम होत होत आहेत. झोप अपुरी असेल तर आपली ऊर्जा,उत्साह आणि एकाग्रता भंग पावते. शारीरिक परिणामांमध्ये लठपणा,उच्च रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांचे विकार, अपचन, मूळव्याद असे आजार होतात. तर मानसिक आजारांमध्ये चिडचिडेपणा, उदासीनता, खिन्नता असे आजार होतात. साहजिकच असे आजार हे तात्काळ दिसून येत नसल्याने आणि आपण त्याकडे अजाणतेपणाने किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ते जो पर्यन्त गंभीर रूप धारण करत नाहीत तो पर्यन्त लक्षात येत नाहीत .
त्यामुळे पुरेशी झोप घेणे साठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आणि त्या आधारे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राखणे आवश्यक ठरणार आहे.त्या अनुषंगाने आपण रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यायला हवी. आपली झोप किमान सात तास राहील याबाबत आपण दक्ष असायला हवे. दुपारी शक्यतो झोपू नका आणि झोपलेच तर फक्त १५ मिनिटे झोप घ्या. दिवसभर एकच गोष्ट सारखी सारखी करू नका जसे दिवस दिवसभर टीव्ही पाहणे , दिवस दिवसभर सोशल मीडिया पाहणे, दिवस दिवसभर पुस्तके वाचत बसने. यामुळे आपली विचार शक्ति क्षीण झाल्याने आपला मेंदू बधिर होवून जावू शकतो. मोबाइलची स्क्रीन आणि संगणकावर सतत काम करत राहिल्याने त्या मधून निघणारे निळे तरंग किरण डोळ्यावर कायम पडत राहिले तर त्यामुळे मेलाटोनिन नावाचे संप्रेरक स्त्राव कमी होतो. त्यामुळे आपल्यामध्ये निद्रानाश सुरू होतो. आधी विचार येतात आणि मग कृती घडते. त्यामुळे चांगले सकारात्मक विचार हे चांगले जीवनशैली साठी आवश्यक आहेत. मात्र विचारांची पुनरावृत्ती आणि नकारात्मक विचार सारखे सारखे येत असतील तर त्यांच्या मुळाशी जावून ते काढून टाकायला हवेत.
रोज सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम, प्राणायाम आणि योग किमान ४५ मिनिटे करायला हवा. रात्री चे जेवण हलके म्हणजे कमी कार्बोदके असलेले घ्या आणि शतपावली करायला विसरू नका. तसेच रात्री झोपण्यापूर्वी चहा आणि कॉफी टाळायला हवी. झोपण्यापूर्वी नामस्मरण करा. आवडत असेल तर संगीत किंवा आनंददायी गाणे एकावे. चांगले सकारात्मक पुस्तक वाचावे, मात्र असे वाचन झोपण्यापूर्वी १५ मिनिटे थांबवावे. आपली झोपण्याची जागा, आपली उशी, बेडशीट, आपले पांघरून याबाबत दक्ष रहा. आपण जेथे झोपतो तेथे ऑक्सिजन जास्त राहील याची काळजी घ्या. घराची किमान एक खिडकी उघडी ठेवा. एका कुशीवर झोपण्याची सवय लावा. शक्य होत असेल तर तुमचे कामाचे स्वरूप लक्षात घेवून सायंकाळी बाहेरून आल्यावर आंघोळ करा. रात्री झोपण्यापूर्वी नकारात्मक व रक्तरंजित चित्रपट अथवा मालिका पाहू नका. रात्री झोपण्यापूर्वी ४५ मिनिटे अगोदर पाणी घ्या आणि झोपण्यापूर्वी पाणी घेणे खूपच आवश्यक असेल तर अगदी थोडे घ्या. सैल कपडे घालून झोपा. फॅन हा मध्यम ठेवा.
मुले आणि पत्नी यांच्या सोबत झोपण्यापूर्वी सकारात्मक विषयावर व हसत खेळत चर्चा करा. झोपण्यापूर्वी पद्मासन किंवा वज्रासन मध्ये ५ मिनिटे बसून खोलवर श्वास घ्या. त्या नंतर शरीर ढिल्ले करा आणि मन शांत करा . हळू हळू श्वास गती कमी करा. डोळे मिटून घ्या. आपण आज केलेल्या चांगल्या गोष्टी आणि आपण आज केलेली दुसर्यांना मदत हे आपण कायम सुरू ठेवू असा मनाशी निर्धार करा. असे झाले की तुम्ही शांतपणे झोपी जाणार. चांगली व पुरेशी झोप रोज मिळायला लागली की तुमचे जीवन सरळ, साधे , सुटसुटीत आणि सुखी होईल. जीवन सुंदर आहे त्याला अजून अनमोल बनवूया .
०१७ /१०१ दिनांक २७.०४.२०२१
राजीव नंदकर उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७