जीवनात यशस्वी होण्यासाठी अकरा जीवनविषयक कौशल्ये( Eleven Life Skills )

जीवनात यशस्वी होण्यासाठी अकरा जीवनविषयक कौशल्ये( Eleven Life Skills )

      आपले पारंपारिक शिक्षण हे आपल्याला उभं करते, पण जीवनात खर्‍या अर्थाने चालायला शिकवत असतील तर ती आपली विविध जीवनविषयक कौशल्ये. शिक्षण हा फक्त जीवनाचा पाया आहे, तर या शिक्षणाच्या पायावर आपण जो पर्यंत विविध जीवनविषयक कौशल्यांच्या भिंती बांधत नाहीत तो पर्यंत आपले जीवनरूपी घर पूर्णत्वास जावू शकत नाही. पारंपारिक शिक्षण घेतले! आता सर्व शिक्षण संपले,आता आपल्याला नवीन काहीही शिकण्याची आवश्यकता नाही हीच वृत्ती आपला घात करते. शिक्षणाने माणूस शहाणा होत असला तरी तो व्यवहारी व यशस्वी होतोच असे नाही. एकंदर स्पर्धेच्या या युगात शिक्षणासोबतच किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपण विविध जीवन विषयक कौशल्ये हस्तगत करत राहिलो पाहिजे.

       मात्र कोणती कोणती कौशल्ये हस्तगत करावी, याबाबत सर्वांमध्ये संभ्रम दिसून येतो. काळाच्या ओघात मात्र आपण खालील अकरा कौशल्ये कशा प्रकारे आत्मसाद करून वृद्धिंगत करावीत यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात करण्यात आलेला आहे.

१.      आकलन कौशल्ये(Cognitive skills): आकलन कौशल्ये हि आपली प्राथमिक आणि पायभूत  कौशल्ये आहेत. एखांदी वस्तू ,बाब, घटना, समस्या याचे आपल्या मेंदूला माहिती मिळणे आणि त्या आधारे अर्थबोध होणे म्हणजे आकलन विषयक कौशल्ये होत. आकलन होण्यासाठी वस्तू ,बाब, घटना,समस्या ह्या अत्यंत बारकाईने समजून घ्याव्या लागतात. जिज्ञासू वृत्ती हि आपले आकलन कौशल्ये वाढीसाठी पूरक काम करते. त्यामुळे आपण नेहमी विविध बाबी आणि घटना जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.बऱ्याच वेळा आपण काही बाबींकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असतो,तसे केल्याने आपण मागे राहुन जातो. सबब सर्व गोष्टी डोळसपणे पाहायला शिका.

२.      महितीचा अर्थ लावणे(Interpretation Skills): सोशल मीडियाच्या या जगात आपल्या पुढे अनेक प्रकारची माहिती समोर येत असते अथवा उपलब्ध होत असते. माहितीचा भडीमार झाल्याने आपण माहितीचे अर्थ लावण्याचे बंद करत असतो आणि शेअर करत असतो हे धोकादायक आहे. उपलब्ध झालेली माहितीचा अर्थ लावणे आणि ती बरोबर आहे कि चुक याबाबत खात्री करणे हे कौशल्य आपल्याकडे असायला हवे. मात्र यासाठी सखोल वाचन आणि चर्चा आवश्यक असते तरच आपण महितीचा अर्थ लावू शकतो. नाहीतर महितीचा अर्थ एक असतो आणि आपण वेगळाच काढतो. त्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होतात.

३.      विश्लेषणात्मक क्षमता कौशल्य(Analytical Ability Skills ): आपल्या आजुबाजुला अनेक घटना घडत असतात. घडलेली घटना अथवा निर्माण झालेली समस्या याचे विश्लेषण करता येणे आणि त्या आधारे उपाययोजना करणे किंवा आपल्या कामाची दिशा ठरवणे आवश्यक असते. यासाठी आपल्या अंगी विश्लेषणात्मक कौशल्ये असणे आवश्यक असते. मात्र या कौशल्यासाठी तुमच्याकडे योग्य अशी तीक्ष्ण निरीक्षण क्षमता आवश्यक असते. आजूबाजूला काय घडतेय या बाबत आपले लक्ष असायलाच हवे तरच तुम्हाला विश्लेषण करता येते.  

४.      तार्किक कौशल्य (Logical Reasoning Skills): घडलेल्या घटनेचा अर्थ लावणे, भविष्यात काय होवू शकेल याचा तर्क लावणे, एखांदा असा का वागतो याचा तर्क लावणे, हे असेच का घडले याचा तर्क लावणे, हे सर्व तार्किक कौशल्ये यात येते. तार्किक कौशल्ये हे एखाद्या व्यक्तीवर आणि घटनेवर योग्य नियंत्रण प्राप्त करणे यासाठी आवश्यक असते. मात्र तर्क बाधण्यासाठी ज्ञान व अनुभव याचा योग्य समन्वय साधावा लागतो हे विसरता कामा नये. त्यासाठी पूर्वग्रह दुषितपणाने जे आपण तर्क लावतो त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. सबब तर्क बांधण्यासाठी योग्य माहिती घेवून आणि तिचे विश्लेषण करून पुढे जावे.  

५.      निर्णय क्षमता कौशल्य (Decision Making Skills ) : निर्णय क्षमता हि अत्यंत महत्वाची क्षमता आणि कौशल्ये असून त्या आधारे आपण योग्य वेळी आणि अचूक निर्णय घेवून विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर स्वार होतो. आपण पाहतो काही लोक निर्णय घेतच नाहीत किंवा निर्णय घेतला तर तो खूप उशिरा घेतात त्यामुळे ते पुढे मार्गक्रमण न करता, आहे तेथेच राहून जातात. मात्र या निर्णयक्षमेतेसाठी तुमचे ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव याचा तिहेरी संगम आवश्यक असतो. नुसते ज्ञान किंवा नुसते कौशल्ये असून भागत नाही तर त्याला अनुभवाची सुद्धा जोड आवश्यक असते. त्यामुळे ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव याआधारे निर्णय क्षमता कौशल्ये आपण आपल्यात वृद्धिंगत करावीत.    

६.      नेतृत्व आणि टीम कौशल्ये (Leadership and Team Building Skills): आपल्या आयुष्यात आपण अनेक ठिकाणी एकत्रित प्रयत्न आणि कामे करत असतो. मात्र अशी एकत्रित कामे हि फलदायी ठरणे साठी योग्य टीम तयार होणे आणि योग्य व्यक्तीने नेतृत्व करणे अपेक्षित आणि आवश्यक असते. त्यासाठी आपली कौशल्ये आपण वृद्धिंगत केली कि आपण हळू हळू नेतृत्वक्षम होतो आणि लोक आपला आदर करायला सुरुवात करतात. एकदा नेतृत्व मिळाले कि आपला विकास सुरु होतो.

७.      समन्वय आणि सहकार्य कौशल्ये(Coordination and Cooperation skills ) : आपली विकास आणि प्रगती साधायची असेल तर आपल्या सभोतालाचे विविध घटक यांच्याशी समन्वय आणि सहकार्य करावे लागते. समन्वय आणि सहकार्य हे एका बाजूने कधीच होत असते त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न आवश्यक असते. योग्य नियोजन असले कि समन्वय साधला जातो. सहकार्य हे मात्र परस्परपूरक असते. त्यामुळे आपण जाणीव पूर्वक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सहकार्य वृद्धिंगत केले पाहिजे.    

८.      अंतर वैयक्तिक संबंध कौशल्य(Interpersonal Skills): आपण एका विशिष्ट आणि विकसीत अशा समाजाचे घटक आहोत, त्यामुळे साहजिकच आपण एकटे राहून आपले आयुष्य जगू शकत नाहीत. अनेक वेळा आपण ऐकतो कि “मला कोणाची गरज नाही”, असे वागणे आणि बोलणे म्हणजे आपली मानसिक आत्महत्या आहे. समाजातील विविध घटकांसोबत आपल्याला संयोजन, समयोजन, समन्वय आणि सहकार्य करावेच लागते. दैनंदिन जीवनामध्ये आपला वावर जेथे असतो, म्हणजे कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी जाणीव पूर्वक अंतर वैयक्तिक संबंध कौशल्ये आपण विकसित करायला लागतात. कोण आणि कोठला व्यक्ती कधी आपल्याला कामाला अथवा मदतीला येईल हे सांगता येत नाही.

९.      संभाषण कौशल्य (Communication Skills) : संवाद आणि संभाषण हा मानवी उत्क्रांती आणि विकासाचा पाया आहे. योग्य आणि अचूक संभाषण तुम्ही साधत असाल तर तुमची कामे लवकर होतात आणि लोक तुमचा आदर करायला सुरुवात करतात. तसेच योग्य आणि स्पष्ट संवादाने तुम्ही लोकांची मने जिंखू शकता. त्यासाठी जाणीव पूर्वक आपला संवाद हा स्पष्ट आणि अचूक कसा होईल या कडे लक्ष पुरवायला हवे. तसेच आपल्या संवाद आणि संभाषणाने जाणीव पूर्वक कोणी दुखावले जाणार नाही याचीही दक्षता आपण घ्यायाला हवी.

१०.  समस्या सोडवणूक कौशल्ये (Problem Solving Skills): जीवनात आपल्याला पदोपदी अनेक समस्या येत असतात. या समस्या जर उग्र रूप धारण करत असतील तर आपल्या विकासात अडथळा आणि प्रगतीत खंड निर्माण होतो. वास्तविक जगात कोणत्याही समस्येचे निराकरण असतेच, फक्त योग्य मार्गाने ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असते आणि त्यासाठी समस्यांच्या मुळाशी जावे लागते. समस्यांचे योग्य पद्धतीने विश्लेषण केल्यास समस्यावर उपाय सापडतात. एखांद्या समस्या लहान असते मात्र तिच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ती मोठी आणि गुंतागुंतीची होते त्यासाठी अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये आपण त्यावर उपाय शोधला पाहिजे.   

११.  माहिती तंत्रज्ञान कौशल्ये (Information Technology Skills) : आजचे युग हे संगणक ,इंटरनेट,स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचे आहे. त्यामुळे याबाबतचे किमान कौशल्य आपण हस्तगत करण्याशिवाय तरणोपाय नाही. आज अगदी प्रवास ते खरेदी ह्या गोष्टी सुद्धा ओनलाईन होत आहेत. त्यामुळे ह्या बाबी आपल्याला टाळून चालणार नाही तर त्या शिकून घ्याव्या लागतील. म्हणून आज प्रत्येकाने याबाबत मागे न राहता पुढे जावे आणि माहिती तंत्रज्ञान कौशल्ये हस्तगत करावीत.

आपले शिक्षण तर महत्वाचे आहेच मात्र या शिक्षणासोबत वरील अकरा जीवनविषयक कौशल्ये हस्तगत करणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या जोडीला हि कौशल्ये असतील तर आपली प्रगती आणि विकास हा जलद गतीने होतो. चला हि कौशल्ये अंगी रुजवूया आणि एक साधे , सोपे , सरळ , सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगूया .

जीवन अनमोल आहे, ते अधिक सुंदर बनवूया !

०३०/१०१ दिनांक १३.१०.२०२१

राजू नंदकर , उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७