कीटकांचे आवाज Insect Sounds

कीटकांचे आवाज Insect Sounds

Insects Sounds with type of mechanism #insects #insectsound #stridulation #tremulation #tymbalation – YouTube

      दिवसभर दमेपर्यंत काम केल्यानंतर रात्री सुखाची झोप लागते ना लागते तोच कानाजवळ घोंगावत येणारा एक आवाज जो आपली सुखाची झोप पूर्णतः भंग करून आपल्याला अस्वस्थ करतो. किर्र अंधार्‍या रात्री सुनसान अशा जंगलात फिरत असतांना जेथे भयाण अशी शांतता पसरलेली असते ही शांताता सुद्धा भंग करणारे अनेक आवाज आपल्याला ऐकू येतात.  या रात्रीच्या आवाजात जेवढी भयानकता असते त्या पेक्षाही भीती जास्त असते. झोपतांनी कानपाशी आलेला आवाज आणि रात्री जंगलातून आलेला आवाज याची उत्सुकता आणि कुतूहल आपल्याला कायम राहते. हे आवाज कीटकांचे असतात इतपर्यंत ठीक आहे. पण हे कीटक आवाज कसे काढतात? आणि कोठून काढतात? आणि का काढतात? त्यामागचे कारणमीमांसा काय? अशा अनेक बाबींवर प्रस्तुत लेखात आपण प्रकाश टाकणार आहोत.

जीवसृष्टी मध्ये आजच्या घडीला १० लाख कीटकांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज आहे आणि त्यापैकि फक्त १२००० कीटकांच्या प्रजाती यांची माहिती उपलब्ध झाली आहे. कोणत्याही किटकाची सर्वसाधारण विभागणी डोके, छाती आणि पोट अशी असते. साधारणपणाने किटकाला दोन पंखाच्या जोड्या, तीन पायाच्या जोड्या, सात डोळे आणि एक तोंड आणि दोन मिशा/अन्टेना असतात.सर्व बाबी विचारात घेत असतांना एक बाब लक्षात घेण्यासारखी म्हणजे किटकाला आपल्या सारखे स्वरयंत्र नसल्याने त्याला त्याच्या तोंडवाटे कोणत्याही प्रकारचे आवाज काढता येत नाहीत. मग आपल्यापुढे प्रश्न पडतो की हे कीटक आवाज कसे निर्माण करतात.नक्कीच कीटकांचे आवाज हे आपल्यासाठी तेवढेच रहस्यमय आणि गूढ कथे सारखे आहे. माणूस प्राणी हा त्याच्या कानाने २० हर्ट्झ ते २० किलो हर्ट्झ या रेंजमधील ध्वनी ऐकू शकतो. साहजिकच या रेंजच्या बाहेर कीटक आवाज निर्माण करत असतील तर ते आपल्याला एकू येणार नाहीत. कीटकांत आवाजाची निर्मिती स्वरयंत्र सारख्या अंतर्गत अवयवामार्फत होत नाही तर त्यासाठी किटकांमध्ये विशेष असे अवयव अथवा शारिरीक रचना आढळून येते. कीटकांमध्ये साधारणपणे पाच पद्धतीच्या प्रकारे आवाज निर्माण होत असतात. त्या पाच पद्धती आपण विस्ताराने पाहूया.

  • स्ट्रिड्युलेशन(Stridulation): स्ट्रिड्युलेशन म्हणजे शरीराचे काही भाग एकत्र घासून आवाज निर्माण करण्याची क्रिया होय. हा एक प्रकारचा कर्कश असा आवाज असतो. नाकतोडे (Grasshopper)हे कीटक या क्रियेणे अथवा पद्धतीने आवाज निर्मिती करतात. करवतीचे दात जर आपण उंचवट्या वर घासले तर असा आवाज निर्माण होतो. या पद्धतीमध्ये कीटक आपले पंख किंवा पाय एकमेकांना घासून आवाज तयार करतात. विविध वाद्य वाजवत असताना एक लहान तुकडा तारांवर घासून जो आवाज होतो तसा हा आवाज येतो.झुरळ(cockroach)नाकतोडे(Grasshopper),टोळधाड(locust),बिटल(Beetle),क्रिकेट (Field Cricket) हे कीटक या पद्धतीने आवाज निर्मिती करतात. शक्यतो उन्हाळ्यात घरात आढळनारे आणि नाकतोडया सारखे दिसणारे क्रिकेट किटक आपण पहिले असतील. हे कीटक पंख घासून किर्र आवाज काढतात.
  • टीम्बलेशन(Tymbalation):कीटकांचे शरीराचे जे तीन भाग असतात त्यात डोके, छाती आणि पोट यांचा समावेश होतो. छातीच्या समोरच्या दोन्ही बाजूला एक विशेष असा अवयव विकसित झालेला पाहावयास मिळतो त्याला टिम्बल असे म्हणतात. काही मोजक्या कीटकांमध्ये या टिम्बलच्या जोडीद्वारे आवाज तयार केले जातात. रातकिडा(cicada)या पद्धतीने आवाज निर्माण करतो.सिकाडा हे कीटक शक्यतो पावसाळ्यात झाडावर आढळून येतात.
  • पर्क्यूशन (Percussion):पर्क्यूशन म्हणजे आपल्या हाताने दुसर्‍या वस्तूवर थाप मारून आवाज काढणे होय. अगदी या प्रमाणे काही कीटक त्यांच्या शरीराचा भाग इतर वस्तूवर टॅप करून समावेश होतो. यामध्ये फुलपाखरे, मोथ, पतंग यांचा समावेश होतो.
  • ट्रिम्युलेशन(Tremulation):या क्रियेमध्ये कीटक हे आपले पंख तालबद्ध पद्धतीने एक मेकांवर घासून ज्या प्रमाणे थरकाप होतो किंवा थरथर होते अगदी त्याप्रमाणे आवाज निर्मिती करतात. या आवाजाला पिपाणी किंवा पायपिंग आवाज म्हणतात. मधमाशी, गांधीलमाशी, मश्चर, घरमाशी या क्रियेणे आवाज निर्मिती करतात.
  • फोर्स्ड एअर (Forced Air):किटकाचा जो अन्नमार्ग असतो. त्या अन्न मार्गातील हवा जोरात बाहेर काढून हा आवाज केला जातो. हा आवाज शक्यतो कीटक त्यांची अळी अवस्थेमध्ये करतात.

कीटक हे आवाज वेगवेगळ्या उद्देशाने निर्माण करत असतात. यामध्ये आपला जोडीदार शोधणे, स्व:तचे संरक्षण करणे, इतरांना जागरूक करणे अथवा सूचना देणे, भक्षकाला दूर पळवणे, भक्ष आकर्षित करणे हे उद्देश कीटक आवाज करतांना समोर ठेवतात आणि आपला कार्यभाग साधतात. अशा प्रकारे कीटकांच्या विविध आवाज आपल्याला माहीत झाल्याने कीटकांच्या या आश्चर्यकारक दुनियेबाबत आपल्याला एक नवी माहिती मिळते.

०७/५१ दिनांक १७.०२.२०२३

कीटकांची आश्चर्यकारक दुनिया©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७