आरोग्याचा समग्र आणि सर्वसमावेशक दृष्टीकोण  Holistic & Comprehensive Approach to Health

आरोग्याचा समग्र आणि सर्वसमावेशक दृष्टीकोण  Holistic & Comprehensive Approach to Health

           आपले आरोग्य हे आपल्यासाठी कायम चिंतेचा आणि इतरांसाठी अस्थेचा विषय असतो. त्यामुळे पहिल्या भेटीत आपण समोरच्या व्यक्तिला ‘बर आहे का’? असा सूचक प्रश्न विचारतो. साहजिकच लोक आपल्या आरोग्याप्रती सजग आणि सावध असल्याचे दिसून येत असले तरी याबाबत अनेक समज आणि गैरसमज पसरलेले दिसून येतात. आपले उत्तम आरोग्य म्हणजे फक्त आपले शारीरिक आरोग्य असा समज आपल्या पैकी बहुतेकांनी करून घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावली नुसार, आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तंदुरुस्तीची स्थिती आहे आणि केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती नाही जी व्यक्तीला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उत्पादक जीवन जगण्यास सक्षम करते. साहजिकच आरोग्याची गफलत करून घेतल्याने आरोग्यपूर्ण जीवन जगत असतानी अनेक मानसिक आणि भावनिक समस्या आणि आजार बाबत अज्ञान पाहावयास मिळते. वास्तविक आरोग्य या संकल्पनेचा अर्थ समग्र आणि सर्वसमावेशक पणाने आपण समजून घेत नसल्याने ह्या समस्या निर्माण झाल्याचे आढळते. प्रस्तुत लेखात मानवी सुखाचा शोध खर्‍या अर्थाने घेण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य निरोगी कसे राखता येईल आणि त्यासाठी काय करायला हवे या बाबतचे विस्तृत विवेंचन आपण करणार आहोत.

         पैशाने सुख विकत घेता येते ! पैसा असेल तर काहीही करता येते ! हा विचार जनमानसात लगतच्या काळात रूजला आहे आणि वाढला आहे. पण हे अंतिम सत्य असते, तर आपल्याला किमान ५० टक्के लोक आजूबाजूला सुखी दिसले असते. परंतु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात सांगितल्या प्रमाणे सुख पाहता जवापाडे | दुःख पर्वता एवढे ||१|| ही स्थिति पाहावयास मिळते. आपण पाहतो, जेथे दात आहेत तेथे चणे नाहीत आणि जेथे चणे आहेत तेथे दात नाहीत याचा अर्थ असा की जेंव्हा हवे आहे तेंव्हा ते नसते आणि जेंव्हा नको आहे तेंव्हा ते असते. आपण पाहतो की लोक पै पै करून पैसा जमवत राहतात किंवा पैशाचा संचय करत राहतात. मात्र ते हे विसरून जातात की, हा पैसा कमवत असताना आपल्या या यंत्रवत शरीराची झीज होत आहे, त्याला आरामाची गरज आहे, त्याला व्यायामरूपी वंगणची गरज आहे. त्यामुळे ज्यावेळी पैशातून त्याला काही तरी उपभोगण्याची वेळ येते तेंव्हा त्याला त्याचे आरोग्य साथ देत नाही आणि त्याला उपभोग घेता येते. साहजिकच भविष्यात संचय केलेला पैशाच्या उपभोग घेण्याच्या अनुषंगाने जी काया अथवा शरीर झिजवले त्याचा पुढील काळात उपयोग होत नाही. एक वेळ अशी येते की त्यावेळेस पैशाचे मूल्य सुद्धा शून्यवत होवून जाते. पैसा तर महत्वाचा आहे, त्यातून निर्माण होणारे सुख महत्वाचे आहे मात्र त्या पेक्षाही कित्येक पटीने आपले शारीरिक ,मानसिक, भावनिक आरोग्य महत्वाचे आहे. हे आरोग्य सुदृढ बनविण्याकडे आपली निरंतर वाटचाल चालायला हवी.

      आरोग्यम धनसंपदा किंवा ‘हेत्ल्थ इज वेल्थ’ असे आपण नेहमी एकतो व म्हणतो, पण त्याची अंमलबाजवणी आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो का ? हा एक मोठा गहन प्रश्न आहे. नर व मादी यांचे मिलनातून गर्भ तयार होतो. नऊ महीने गर्भ वाढल्यानंतर मूल जन्माला येते. मूल जन्माला आल्या नंतर त्याची शाररिक व मानसिक वाढ होण्यास सुरुवात होते. आपल्या प्राचीन वाङ्मय मध्ये सोळा संस्कार संगितले आहेत. यात गर्भाधान पुंसवन अनवलोभन सीमंतोन्नयन जातकर्म नामकरण सूर्यावलोकन निष्क्रमण अन्नप्राशन वर्धापन चूडाकर्म अक्षरारंभ उपनयन समावर्तन विवाह अंत्येष्टी यांचा समावेश होतो. हे सर्व संस्कार जाणीवपूर्वक व नकळतपणे आपल्यावर होवून आपले व्यक्तिमत्व घडत असते. अगोदर सांगितल्याप्रमाणे बाळाचा जन्म झाला की लहान बाळाचे आहारातून पोषण होते व त्याची वाढ होवू लागते. बाळ ठराविक वयाचे झाले की ते कुमार अवस्थेत जाते, त्या नंतर तरुण अवस्थेत जाते त्या नंतर प्रौढ व त्यानंतर वृद्ध अवस्थेत जाते. बाल अवस्था, कुमार अवस्था, तरुण अवस्था यात शरीराची वाढ होत राहते. प्रोढ अवस्थेमध्ये ही वाढ स्थिर होते व नंतर वृद्ध अवस्थेमध्ये शरीराची झीज सुरू होते.  

          सरासरी अशी वाढ होत असताना मानवी शरीराला १८०० ते २४०० कॅलरी उष्मांक असलेला आहार आवश्यक असतो. त्या सोबत या आहारातून शरीराला आवश्यक पिष्टमय पदार्थ ,प्रोटीन्स, स्निग्ध पदार्थ, खनिजे, विटमिन्स ची आवश्यकता असते जेणेकरून शरीराचे योग्य असे भरण पोषण होवू शकते. तसेच शरीराला रोज सरासरी ३ ते ५ लीटर पाणी सुद्धा आवश्यक असते हेही लक्षात घ्यावे.असे असले तरी हे शिक्षण फक्त पुस्तकी स्वरुपात बंदिस्त केलेले आढळून येते. त्या मुळे शरीर ही जी आपली निसर्गदत्त संपती आहे तिच्याकडे लक्ष न दिले जाता भौतिक व तात्काळ मिळणार्‍या सुख व ऐश्वर्यकडे लक्ष दिले जाते. शरीराची वाढ व पोषण ही एक प्रक्रिया असते, त्या मुळे सर्व गोष्टी ह्या ठराविक वेळ घेतात. जसे आपण म्हणतो ना की, ‘तूप खाले तर लगेच रूप येत नाही’ अगदी तसेच. मात्र त्यासाठी थांबण्याची कोणाचीही तयारी नसते.

        वास्तविक सध्याच्या काळात जीवणाकडे पाहण्याची सर्वांची झालेली अनास्था व जीवनात असणारी आनिश्चितता या मुळे  मनुष्य प्राणी हा भौतिक सुखाकडे जास्त आकृष्ट झाला आहे. माझे जीवन हे अनमोल आहे, माझे शरीर ही माझी संपती आहे, शरीर कमवले पाहिजे असे जरी आपण विध्यार्थी दशेत वदवून घेत असलो तरी त्याचा विरोधाभास पुढील आयुष्यात झालेला दिसून येतो. वास्तविक अगोदर नमूद केल्या प्रमाणे प्रत्येकाने आपले जीवन अनमोल आहे व आपले शरीर ही आपली संपती आहे आणि तिचे संरक्षण व संवर्धन करणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे हे स्वत:च्या मनावर बिंबवले पाहिजे.  

       शरीरातील पाच अवयव आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत,  जसे मेंदू, हृदय, फुफुसे, लिव्हर, किडनी होय. मात्र आपण या अवयवांवर किती प्रमाणात प्रेशर अथवा दाब निर्माण करत आहोत, हे आपण समजून घेत नाहीत. सरासरी ५०  ते ७० किलोग्रामच्या दरम्यान आपले वजन आवश्यक असताना, काही लोक ७० ते १०० किलोग्राम वजन घेवून आयुष्य कंठत असतात. साहजिकच या अवयवांना त्याच्या नॉर्मल कामापेक्षा दीड ते दुप्पट काम करावे लागते. त्यामुळे जर हे पंच अवयव दिड पट काम करत असतील तर ६०-७० वर्ष व दुप्पट काम करत असतील तर ४०-५० वर्ष पर्यंत मानवाचे आयुष्य सीमित होते. यासाठी वेगळी गणितीय आकडेमोड करण्याची आवश्यकता नाही. वजन आणि व्यसन या दोन गोष्टी आपले आयुर्मान कमी करत असतात हे लक्षात घ्यावे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेतांना आपले वजनाचा बीएमआय १८  ते २४ या दरम्यान ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे  एखान्द्या व्यक्तीचे ऊंची १६० से. मी.असेल व वजन ६० किलो असेल तर त्याचा बीएमआय हा २३ ते २४ च्या दरम्यान येतो हे एक चांगले निर्देशांक आहे.

        आपला आहार हा सुद्धा खूप महत्वाची बाब आहे हे लक्षात घ्यावे. आपण काय खातो ,किती खातो ,कसे खातो, व किती वेळा खातो हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. आपला आहार सकस व पौष्टिक असावा म्हणजे नक्की कसा असावा याबाबत अनेक समज गैरसमज पसरले आहेत. आपली शरीराची ऊर्जा व उत्साह टिकवून ठेवण्यासाठी १८०० ते २४०० कॅलरी उष्मांक निर्माण करणारा व आपला BMI २४ च्या आत ठेवणारा आपला आहार असावा. अजून विस्ताराने पहायचे झाल्यास प्रती दिवस २०० ते ३०० ग्रॅम पिस्टमय पदार्थ, ४०-६० ग्रॅम प्रोटीन, ५०-७० ग्रॅम स्निग्ध पदार्थ, २०-३० ग्राम तंतुमय पदार्थ, तसेच विटामीन व मिनरल आवश्यक त्या प्रमाणात आपल्याला आहारातून मिळायला हवेत. या अनुषंगाने विविध पदार्थ ,भाज्या, फळे यांचा समावेश आपल्या आहारात आहे का? याबाबत आपण जागरूक असायला हवे आपल्या खाण्याच्या वेळा ह्या किमान २ व कमाल ३ असाव्यात व सरासरी  सकाळच्या जेवणाची वेळ ही दुपारी एक वाजायच्या आसपास व रात्रीच्या जेवणाची वेळ रात्री आठ वाजायच्या आसपास असावी.

      दुसरी  महत्वपूर्ण बाब म्हणजे आपला शारीरिक व्यायाम होय. व्यायाम बाबत बोलायचे झाल्यास व्यक्तीची दोन ग्रुप मध्ये विभागणी करावी लागते. पहिला ग्रुप म्हणजे असे लोक की जे दिवसभर शारीरिक कष्टाची कामे करतात व दूसरा ग्रुप म्हणजे शारीरिक कष्टाच्या कामाशी संबधित नसलेला ग्रुप. या दुसरे ग्रुप मध्ये आपण असू तर आपण रोज किमान ३० ते ४५  मिनिटे व्यायाम करणे अनिवार्य व अत्यावश्यक आहे. व्यायाम म्हणजे फक्त जिम अथवा व्यायामशाळा नाही, तर तुम्ही यात चालणे, धावणे , वॉर्म अप , स्ट्रेचिंग इत्यादि प्रकार करून  शारीरिक लवचिकता आणि स्ट्रेग्थ साधू शकता. माझे असे निरीक्षण आहे की कष्टाचे काम न करणारे सरासरी ५-७ टक्के लोकच शारीरिक व्यायाम कडे लक्ष देत असतात. इतर लोक आपल्या शरीर संपदे कडे लक्ष देत नाहीत. त्या मुळे ते लवकर रक्तदाब, मधुमेह या सारख्या व्याधीने ग्रस्त होतात. त्यामुळे नोकरदार आणि व्यावसायिक व्यक्तींनी रोज किमान ३० ते ४५ मिनिटे स्वत:च्या शरीर संपदेसाठी देणे आवश्यक आहे.

     तिसरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे झोप. झोप ही मानवी शरीरास अत्यंत उपयोगी आहे. आपला मेंदू आपल्या शरीराने निर्माण केलेल्या उर्जेपैकी ३० टक्के ऊर्जा वापरत असतो. त्याच सोबत सारखे काम करत राहिल्याने त्याला एक प्रकारचा थकवा येत असतो. हा थकवा दूर होणे साठी आपल्याला झोप आवश्यक असते. सरासरी ७ ते ८ तास झोप शरीरासाठी आवश्यक आहे. मात्र सध्या सोशल मीडियाच्या युगात ही झोप सरासरी ४-५ तास झाली आहे. त्या मुळे हळू हळू निद्रानाश व चिडचिडेपना मध्ये निर्माण होत आहे. जर आपण रात्री १० वाजता झोपी गेलो तर सकाळी ६ वाजता उठले पाहिजे आणि आपण ११ वाजता  झोपी गेलो सकाळी ७ वाजता उठले पाहिजे. आहार, व्यायाम एवढीच झोप सुद्धा महत्वाची आहे. हे आपण लक्षात घेत नाहीत.

      शारीरिक आरोग्य हा विषय ज्या प्रमाणे चर्चिला जातो त्यावर विचार मंथन केले जाते अगदी तसे मानसिक आरोग्य बाबत होताना दिसत नाही. शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य तसे पहिले तर नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र शारीरिक आरोग्य सोबतच मानसिक आरोग्या कडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य बाबत असणारे अज्ञान व त्याचे कडे होणारे जाणीव पूर्वक दुर्लक्ष या बाबी आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहेत. मानसिक आरोग्य हे आपले मन व त्या मधून निघणारे विचार व भावना याच्याशी निगडीत असते. तसेच मानसिक आरोग्यावर आपल स्वभाव, आपले वर्तन व आपल्या सवयी ह्या सुद्धा प्रभाव टाकत असतात. शिक्षण, करियर आणि भवितव्य यामधील निश्चितता या मुळे ताण तनावाचे प्रमाण  दिवेसेन दिवस वाढत आहे. ताण तनाव  जास्त दिवस निर्माण  झाले की त्याचे पर्यावसण चिंता, खिन्नता आणि उदासिनता या मध्ये होते, आणि या बाबी प्रत्यक्ष मानसिक आजाराशी संबधित आहेत. मानसिक आरोग्य ढासळण्याचे मुख्य कारण म्हणजे आपले जीवन व सभोवतालची परिस्थिती हिच्याशी मेळ न घालता येणे होय. मी मानसिक दृष्ट्या आजारी आहे हे, मानसिक आजाराने व्यथित असलेले ९० टक्के लोक मान्य करत नाहीत. जे १० टक्के  लोक मान्य करतात त्यापैकि ९० टक्के लोक मनोसोपचार तज्ञाची मदत घेत नाहीत.  दिवेसेनदिवस या धावपळीच्या व धाकधकीच्या जीवनता व्यक्ती हा मानसिक तनाव खाली असून त्याचे विपरीत परिणाम त्याच्या शारीरिक आरोग्यावर सुद्धा होत आहेत हे आपण ध्यानात घेयला हवे. अनेक शारीरिक रोगांचे मूळ हे मानसिक आजारात आहे हे आता संशोधन अंती सिद्ध झाले आहे. त्या मुळे  मानसिक आरोग्य व व्याधीची योग्य चिकीत्सा करणे व त्यावर योग्य असे उपचार करणे आवश्यक आहे.

       त्यानुषंगाने सकारात्मक जीवन शैलीचा अंगीकार करणे व भौतिक सुखांच्या मागे न लागता वस्तुस्थिती काय आहे हे समजले की हळू हळू मानसिक तनाव कमी होवून मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यासाठी  सकारात्मक  लोकांसोबत राहणे, आपले राहणीमान बदलणे, आपल्या गरजा किमान करणे, वाईट सवयीचा त्याग करणे, शॉर्टकट मार्ग न अवलंबणे, संभाषण कौशल्य अवगत करणे , अडचणीत सापडलेल्या व्यक्तिला मदत करणे, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे, आपले चांगले छंद जोपासणे, वाचन करणे या सारख्या बाबींचा स्वीकार केल्याने मानसिक तनाव मधून बाहेर पडून एक सुखी व समाधानी आयुष्याच्या नावेवर स्वार होवू शकाल. तसेच योग , प्राणायाम , ध्यानधारणा , विपश्यना या सारख्या मानसिक आरोग्य अजून भक्कम  करणार्‍या पद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. या बाबत योग्य सल्ला व मार्गदशन घेवून आपण हे करू शकतो. योग केल्याने तुमचे शरीर लवचिक होते, प्राणायाम मुळे  शरीरात प्राणवायुचा पुरवठा वाढून शरीरातील अनावश्यक द्रव्ये उत्सर्जित करता येतात. घ्यानधारणा मधून आपले स्वत:चा शोध आपल्याला घेता येतो.

        वरील सर्व बाबी विचारात घेता आणि कोणत्याही प्रलोभनला बळी न पडता आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य उत्तम कसे राहील, याबाबत दक्ष आणि जागरूक राहिले पाहिजे. आपला रोजचा आहार हा संतुलित असला पाहिजे. आपली रोजची झोप सरासरी ७-८ तास असायला हवी. रोज सकाळी अथवा सायंकाळी ३०-४५ मिनिटे व्यायाम हा झालाच पाहिजे. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा योग्य मार्गदर्शन घेवून रोज किमान १५ मिनीटे करायला हवा.

आशा प्रकारे या सर्व बाबी आणि घटक यांचा स्वीकार केला की तुम्ही एक साधे, सोपे, सरळ, शांत, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्याकडे वाटचाल करता.

        जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया !

४७/१०१ दिनांक १२.०४.२०२२

सुखाच्या शोधात© 

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७