आपले आयुष्याचे आपण स्वत: व्यवस्थापक बनून योग्य व्यवस्थापन करूया(Manage Your Life as like Manager)

आपले आयुष्याचे आपण स्वत: व्यवस्थापक बनून योग्य व्यवस्थापन करूया(Manage Your Life as like Manager)

      ‘यश हा एक टप्पा आहे ते अंतिम नाही’, हे ज्यांना कळते आणि उमजते ते कायम प्रगती करत राहतात. साहजिकच यश मिळवणे आणि स्व:प्रगती करणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मात्र आपली स्व:प्रगती आणि यशाचे विविध टप्पे गाठण्यासाठी आपल्या आयुष्याचे आपणच स्वत: व्यवस्थापक होवून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागते. आपल्या आयुष्याचे व्यवस्थापक कसे बनावे? आणि त्या आधारे आपल्या आयुष्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे? याचे विवेंचन आज आपण प्रस्तुत लेखात करणार आहोत.

      व्यवस्थापन याचा शब्दश: अर्थ आपल्या आजूबाजूला घडणार्‍या अनेक घटना, संपर्कात येणार्‍या व्यक्ती, अनेक बाबी आणि गोष्टी यांचे योग्य प्रकारे संघटन, समन्वय, सहकार्य आणि संयोजन करणे होय. जेंव्हा हे संघटन, समन्वय, सहकार्य आणि संयोजन आपण स्वत: करतो तेंव्हा आपण व्यवस्थापकाच्या भूमिकेत येत असतो. मात्र असे दिसते आणि जाणवते की आपण आपल्या आयुष्यात व्यवस्थापकाच्या भूमिकेत प्रवेशच करत नाहीत. बर्‍याच गोष्टी आपण इतरांवर आणि नशिबावर सोडून देतो. त्यामुळे आयुष्यात सर्व काही विस्कळीत होत जाते आणि आपली प्रगती थांबते. एकदा प्रगती थांबली की यशाचा टप्पा अधिक दूर जातो. सबब आपल्या आयुष्याचे आपणच स्वत: व्यवस्थापक होवून खालील बाबींचा अंगीकार करून आपल्या आयुष्याचे योग्य असे व्यवस्थापन करायला हवे.

  1. नियोजन आणि संघटन( Planning & Organizing)

ही आयुष्य व्यवस्थापन मधील पहिली आणि महत्वाची पायरी आहे. प्रत्येक कृती आणि कामाचे योग्य नियोजन करणे. आजूबाजूचे घटक आणि व्यक्ती यांचे योग्य संघटन असेल तरच प्रगतीचा मार्ग सुरू होतो. नियोजन हे वर्तमान काळावर प्रभाव ठेवते तर भविष्याची दिशा स्पष्ट करते. संघटन हे संसाधनांचा योग्य अचूक आणि कार्यक्षम वापर करून देते. नियोजन हे लहान, मध्यम आणि मोठे असे असावे लागते. तसेच ते दैनिक,आठवडी, मासिक,सहामाही आणि वार्षिकही असावे लागते. नियोजन म्हणजे कामाची सुटसुटीत मांडणी होय. तर संघटन म्हणजे विविध घटक आणि व्यक्ती यांचे योग्य समन्वय होय. व्यवस्थापक म्हणून आपण सर्वप्रथम आपल्या आयुष्याचे नियोजन आणि संघटन यावर भर द्यावा.

  1. नियंत्रण आणि दिशादर्शक ( Control & Directing )

आपले आयुष्यातील काही बाबी आपल्याला जाणीव पूर्वक नियंत्रित कराव्या लागतात तर काही बाबींना आपल्याला योग्य दिशा द्यावी लागते. आपल्या आयुष्याचे व्यवस्थापक म्हणून नियंत्रण आणि दिशादर्शक याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक ठरते. वाईट सवयी, वाईट वर्तन आणि वाईट विचार याला नियंत्रित करावे लागते. त्याच बरोबर आपले विचार आणि आणि आपली ऊर्जा याला योग्य दिशेने प्रवाहीत करावे लागते. एकदा नियंत्रण प्राप्त केले आणि दिशा योग्य राखली की अजून आयुष्याचे व्यवस्थापन मजबूत होते.

  1. समन्वय आणि सहकार्य (Coordination & Cooperation)

समन्वय आणि सहकार्य यातून आपण अधिक प्रभावशाली होत जातो. समन्वयातून आपण अडचणीमधून मार्ग काढण्याची कला वृद्धिंगत करतो. सहकार्य हे मानवाचे पायाभूत गुण वैशिष्टे आहे. जेवढे आपण सहकार्य करू तेवढे अनेक हात आपल्याला मदतीसाठी उभे राहतात. समन्वय असला की वाद कमी होतात हे नव्याने सांगायला नको. आपल्या आयुष्याचे व्यवस्थापक म्हणून आपण समन्वय आणि सहकार्य ही वृती अंगी बाळगायलाच हवी.

  1. संसाधने आणि क्षमता (Resources & Capacities)

संसाधने ही आपली आयुधे असतात. आपल्या संसाधनांमद्धे वेळ, पैसा, वस्तु, क्षमता आणि कौशल्ये याचा समावेश होतो. संसाधनांचा व्यवस्थापक म्हणून वेळेचा सदूपयोग, पैशाची काटकसर आणि क्षमतेचा कौशल्यपूर्ण वापर करावा लागतो. जेवढा संसाधंनांचा कार्यक्षमपने आणि शाश्वतेने वापर होईल तेवढी त्याची जास्त उपयुक्तता तयार होते.

  1. प्राथमिकता आणि कार्यतत्परता (Priority & Proactive)

आयुष्याचे व्यवस्थापन करत असतांना कोणत्या गोष्टींना आणि कामांना प्राथमिकता द्यायची आणि कधी द्यायची यावर आपली कार्यक्षमता अवलंबून असते. महत्वाचे आणि तातडीचे यात भेद करणेच अनेकांना जमत नाही त्यामुळे महत्वाची कामे कधी कधी मागे पडून जातात. आपली आवड, सवड आणि कामाची निवड ह्या बाबी खूप महत्वाच्या  ठरतात. कोणत्याही कामात कार्यतत्परता असणे खूप आवश्यक ठरते. त्यामुळे कामे लवकर पूर्ण होवून आपण अजून आरामदायी होतो. त्यामुळे आपल्याकडे प्राथमिकतेचे व्यवस्थापन आणि कार्यतत्परता असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होतो.

  1. वर्गीकरण आणि पृथक्करण (Classification and Segregation)

आपले आयुष्य हे अनेक घटक आणि घटना यांचा समुच्यय असतो. यातील काही घटक हे आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष प्रभाव टाकतात तर काही घटक अप्रत्यक्ष प्रभाव टाकतात.हे घटक आणि घटना यांची वर्गीकरण करून पृथक्करण आपण करत नसल्याने आपल्याला या घटक आणि घटना यांचे योग्य व्यवस्थापन करता येत नाही. कोणताही घटक आणि घटना यांचेवर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यासाठी वर्गीकरण आणि पृथक्करण ही पहिली पायरी आहे. एकदा हे जमायला लागले की आपल्याला त्याचे संघटन करून योग्य उपचार त्यावर सुरू करता येतात.

  1. वस्तुस्थिती आणि वस्तूनिष्ठता (Facts & Objectivity)

पुढची पद्धती येते ती म्हणजे वस्तुस्थिती आणि वस्तूनिष्ठतातपासणे होय. एखांदी वस्तु, व्यक्ती, घटना आणि घटक यांची वस्तुस्थिती आणि वस्तूनिष्ठता काय आहे याबाबत आपण बर्‍याच वेळा पडताळणी करत नाही. वस्तुस्थिती म्हणजे तथ्य आणि सत्यता तपासणे तर वस्तूनिष्ठता म्हणजे एखांद्या बाबीची आणि घटनेची सत्यता ही कोणताही पूर्वग्रह दूषितपणा आणि पक्षपात न ठेवता तपासणे होय. त्या अनुषंगाने आपण वस्तुस्थिती आणि वस्तूनिष्ठता तपासणे यावर भर देणे आवश्यक आहे. यामुळे काय होते की तुमचे निर्णय शक्यतो चुकत नाहीत.

  1. विश्लेषण आणि निष्कर्ष (Analysis & Conclusion)

आजूबाजूला घडणार्‍या घटना आणि बाबी यांचे कायम विश्लेषण करणे आणि त्या आधारे निष्कर्ष काढून आपली दिशा ठरवणे हे सुद्धा खूप महत्वाचे असते. विश्लेषण ही अशी प्रक्रिया आहे की त्यात घटना आणि बाबी याचे सखोल आणि विस्तृत असे परीक्षण आणि तपासणी केली जाते. म्हणजे वरवर न पाहता खोलवर जावून निष्कर्ष काढले जातात. साहजिकच आपल्या आयुष्याचा व्यवस्थापक म्हणून विश्लेषण करून आणि निष्कर्ष काढण्यात आपण तत्पर असायला हवे.

  1. तार्किक कौशल्य (Logic & Reasoning)

तार्किक कौशल्ये आत्मसाद असणे ही सुद्धा महत्वाची क्षमता आहे. या साठी वस्तु, व्यक्ती, घटना आणि घटक यांचा समुचय आणि संयोजन होत असतांना तर्क लावणे आवश्यक ठरते. यामुळे आपल्याला तर्कसंगत तर्क करता येतो आणि योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य निर्णय घेणे शक्य होते. पुढे काय होवू शकते याचा तर्क लावणे म्हणजे अंदाज बांधणे आणि त्या आधारे निर्णय घेणे हे सुद्धा एक उत्तम व्यवस्थापकाचे लक्षण आहे.

  1. काम आणि आयुष्य समतोल ( Work & Life )

वर्क-लाईफ बॅलन्स हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. आपले काम आणि मानसिक-शारीरिक आरोग्य हे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. या बाबत असे दिसून येते की आपण फक्त दिवस ढकलत राहतो. त्यामुळे आपल्या कामकाजता आणि आरोग्यात खूप समस्या निर्माण होतात. काही लोक कामात एवढे व्यस्त होतात की त्यांचे आरोग्याकडे पूर्णत; दुर्लक्ष होते. यासाठी आपल्या कामकाजाचा आणि आरोग्याचा व्यवस्थापक म्हणून आपण काम करायला हवे. कामाची प्राथमिकता निश्चित करणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि आरोग्यासाठी दैनंदिन पंचेचाळीस मिनिटे देणे हेच व्यवस्थापन तुम्हाला असाधारण बनवते.

  1. अर्थ लावणे आणि निर्णय क्षमता (Defining & Decision)

दैनंदिन आयुष्य जगत असतांना आजूबाजूला घटणार्‍या घटनांचा अर्थ लावावा लागतो. हे असेच का घडले? हे तसेच का घडले? हे समजण्याची कला आपण हस्तगत करायला हवी. तुमची निर्णय क्षमता ही तुम्हाला मजबूत करते.घटनेचा अर्थ लावणे आणि तुमची निर्णय क्षमता ही तुमचे ज्ञान, अनुभव आणि तुमचे कौशल्ये यावर अवलंबून असते. ह्या तीनही गोष्टींचा जो पर्यंत  मेळ  होत नाही तो पर्यंत तुमची निर्णय क्षमता अचूक होत नाही. त्या साठी आपले ज्ञान, अनुभव आणि तुमचे कौशल्ये ही वृद्धिंगत करणे आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते.

  1. पर्यवेक्षनआणि मूल्यमापन (Monitoring & Evaluation)

आपल्या आयुष्याचे कायम आणि वेळोवेळी पर्यवेक्षन आणि मूल्यमापन करणे आवश्यक ठरते. आपण काय करत आहोत ? आपण योग्य करत आहोत का?  आपली दिशा बरोबर आहे का? आपली ठरवलेली उदीष्टे पूर्ण होत आहेत का? यांचे वेळोवेळी पर्यवेक्षन आणि मूल्यमापन करणे आवश्यक ठरते. यालाच आपण आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन म्हणतो. आपल्या आयुष्याचा व्यवस्थापक म्हणून वेळोवेळी पर्यवेक्षन आणि मूल्यमापन करणे अनिवार्य ठरते, तरच आयुष्यरूपी प्रवासातील अडथळे दूर होवू शकतील. अन्यथा त्याच त्याच चुका परत परत होवून आपली कार्यक्षमता घटू शकते आणि आपण अपयशाचे धनी होवू शकतो.

       एकंदरच आपल्या आयुष्याचे व्यवस्थापक म्हणून नियोजन आणि संघटन, नियंत्रण आणि दिशादर्शक, समन्वय आणि सहकार्य, संसाधने आणि क्षमता, प्राथमिकता आणि कार्यतत्परता, वर्गीकरण आणि पृथकरन, वस्तुस्थिती आणि वस्तूनिष्ठता, विश्लेषण आणि निष्कर्ष, तार्किक कौशल्य, काम आणि आयुष्य समतोल, अर्थ लावणे आणि निर्णय क्षमता, पर्यवेक्षन आणि मूल्यमापन या गोष्टी आणि बाबींचे योग्य व्यवस्थापन आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात केले  की आपले आयुष्य अधिक साधे,सोपे,सुटसुटीत,सरळ आणि सुखी होते .

      आयुष्य अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया!

०२७/१०१ दिनांक: १९ सप्टेंबर २०२१

                                                 राजीव नंदकर,उपजिल्हाधिकारी

                                                           ९९७०२४६४१७