आत्म्याचे स्वरूप आणि अस्तित्व The Nature and Existence of the Soul (Review Article)

आत्म्याचे स्वरूप आणि अस्तित्व The Nature and Existence of the Soul (Review Article)

         विश्व हे व्यापक आणि अथांग आहे. विश्वात ऊर्जा नामक तत्व सामावलेलं आहे. यालाच वैश्विक ऊर्जा म्हणतात. या ऊर्जा नामक तत्वाचे कायम वहन होत असते. तसेच तिचे स्वरूप सुद्धा बदलत असते. या उर्जेला कोणी चेतना म्हणते तर कोणी गती म्हणते. विश्व हे ज्ञात आणि अज्ञात गोष्टीचे भांडार आहे. जे जाणवते ते ज्ञात आणि जे जाणवत नाही ते अज्ञात होत. आपल्याला पंच महाभूते ज्ञात आहेत, यात पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश यांचा समावेश होतो. या पंच महाभूतांच्या संयोग, संमेलन आणि संश्लेषण यातून जीवसृष्टी अस्तित्वात येते असे मानले जाते. या जीवसृष्टीतील प्रत्येक सजीव मध्ये एक चेतना स्वरूप उर्जा अस्तित्वात असते. असा जीव नाही कि त्यात चेतना आणि उर्जा नाही, अगदी सूक्ष्म जीवांत तर महाकाय आणि अवाढव्य प्राणी यांचे मध्ये एक उर्जा स्वरूप चेतना वास करत असते. काही लोक त्याला प्राण, तर काही लोक त्याला आत्मा, तर काही लोक याला जीव असे म्हणतात. आत्मा हा अक्षय आणि निरंतर आहे. आत्म्याचे ज्ञान सहजगत्यापणे होत नाही. पण तो आहे, यालाच तत एकम तत्व असे म्हणतात. अनेक धार्मिक आणि तात्विक प्रणाली नुसार आत्मा देहहीन मुलतत्व आहे. आपल्या पूर्वजांनी, धार्मिक ग्रंथानी आणि तत्ववेत्ते यांनी सांगितल्याप्रमाणे आत्मा हा नश्वर असून तो कधीही नष्ट होत नाही, तर तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. एकंदर धर्मशास्र, तत्वज्ञान, मानसशाश्र, जीवशास्र आणि भौतिकशास्र यांच्या दृष्टीकोणातून आत्म्याच्या स्वरूपाचा शोध घ्यावा लागतो. अशा या अत्यंत क्लिष्ट आणि गूढ अशा आत्म्याविषयी विस्तृतपणाने जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

        आत्मा हा चेतना किंवा उर्जा या स्वरुपात असून तो हा निर्गुण आणि निराकार आहे. निर्गुण म्हणजे गुणरहित त्रिगुणांच्या पलीकडचा असा होय. तर निराकार म्हणजे आकार नसलेला आणि दृष्टीस न पडणारा होय. आपल्या कायेमध्ये म्हणजे शरीरात तो अती खोलवर आणि अती उथळ असे अस्तित्व दर्शवत असतो. तो अपरावलंबी आणि निश्चल असा आहे. तो धरून ठेवता येत नाही भरून ठेवता येत नाही. तो बिंदू रूप आहे आणि अवाढव्य सुद्धा आहे. आत्म्याचे हेच अस्तित्व अनाकलनीय आहे. म्हणजे त्याचे आकलन आपणास होवू शकत नाही. मनाचा ठाव जसा लागत नाही अगदी तसाच आत्म्याचाही ठाव लागत नाही. तो क्षितिजावरील मृगजल सारखा दूरवर पसरलेला आणि अंतराळ सारखा विस्तृत आहे. असा हा आत्मा किंवा प्राण याचा उगम आणि अंत सुद्धा नाही. तो एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करतो आणि ब्रहंम अथवा ब्रह्मांड मध्ये सामावून जातो.

        आत्म्याचा गाभाच उर्जा आणि चेतना असल्याने आपल्याला आत्मा जाणून घ्यायचे असेल तर उर्जेबाबत अधिक जाणून घेणे अगत्याचे ठरते. जेवढे उर्जेबाबत आपण अधिक जाणून घेवू तेवढे आपल्याला आपल्या आत्म्याचा शोध घेणे शक्य होते. ब्रह्म, ब्रम्हांड किंवा विश्व यात उर्जा सामावलेली आहे. म्हणजे संपूर्ण विश्व हे उर्जेने व्यापले आहे. याला आपण वैश्विक ऊर्जा असे म्हणतो. ही उर्जा आसमंत व्यापून आणि उजळून टाकत असते. फक्त प्रकाश किंवा ज्वाला म्हणजेच उर्जा नाही, तर ती अत्यंत व्यापक तशी सूक्ष्म स्वरुपात अस्तित्वात असते. जेंव्हा व्यापक स्वरुपात उर्जेचा स्रोत म्हणून आपण विचार करतो. त्यावेळी आपल्या सृष्टीला तारणारा आणि आपल्या आकाशगंगेमधील पृथ्वी या ग्रहाला सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य होय. त्याला आपण आदित्य, भास्कर, दिनकर इत्यादी नावाने संबोधतो. सृष्टीमधील प्रत्येक जीवन विषयक बाब ही सूर्याशी निगडीत असते आणि सृष्टीतील जीवन साखळी अबाधित ठेवण्याचे कार्य फक्त सूर्य करतो. त्यामुळे अगदी प्राचीन काळापासून सूर्याला देवता मानून या सूर्य देवतेची आराधना आणि उपासना केली जाते. जेंव्हा आपण उर्जेच्या सूक्ष्म स्वरूपाकडे जातो तेंव्हा आपल्याला अणू आणि रेणू पर्यंत जावे लागते.अगदी अणूच्या केंद्रकात सुद्धा उर्जेचे अस्तित्व असते. त्यातील प्रोटोन, नुट्रॉन आणि इलेक्ट्रोन हे उर्जेचे रूप आहेत. फक्त ती ऊर्जा सुप्त अवस्थेत असल्याने आणि ती मुक्त होत नसल्याने ती आपाल्याला जाणवत नाही.

         आशा प्रकारे आत्मा हे एक मूलतत्व असून ते ऊर्जेच्या आणि चेतनेच्या स्वरूपात अस्तित्वात असते. हे तत्व आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला चेतना, गती आणि हालचाल यास उद्युक्त करते. आत्मा हा प्राचीन धर्म पंडित, तत्ववेत्ते आणि संशोधक यांच्यासाठी कायम कुतुहुल, जिज्ञासा, अभ्यासाचा ,ज्ञानाचा आणि जाणून घेण्याचा विषय राहिला आहे. आशा आत्म्याला जाणून आणि समजून घ्यायचे असेल तर आपल्याला प्रथम वैदिक वाड्मय मध्ये जावे लागते. वैदिक वाड्मय हे चार वेदांवर आधारित आहे.यात ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद याचा समावेश होतो. हे चारही वेद अपौरुषेय आहेत असे समजले जाते. अपौरुषेय म्हणजे यांची निर्मिती कोणत्याही मानवाकडून झालेली नाही. तर ऋषिमुनींनी हे देवांकडून ऐकले आणि नंतर ते त्यांनी शिष्यांना संगितले.या प्रत्येक वेदांचे एकूण चार भाग पडतात. यात संहिता, ब्रह्मणे, अरण्यके आणि उपनिषदे यांचा समावेश होतो. वेदांची संहिता म्हणजे देवांची स्तुती आणि आराधना याबाबत माहिती होय. वेदांची ब्रह्मणे म्हणजे यज्ञविधींची माहिती होय. वेदांची अरण्यके म्हणजे विविध विधीमार्ग याबाबत माहिती होय. वेदांचे उपनिषदे म्हणजे तत्वविचार आहे.आपण त्यावेळी वेद आणि उपनिषदे यांच्या माध्यमातून आत्मा समजून घेतो त्यावेळी आपल्याला उपनिषदे यातील तत्त्वज्ञान अभ्यासावे लागते. उपनिषदे मध्ये आत्मा हा सर्वव्यापी आणि अंतर्यामी आहे असे नमूद केले आहे. आत्म्याला स्पर्श नाही, गधं नाही, रूप नाही, रस नाही असेही वर्णन दिसून येते. आत्मा हा जन्माला येत नाही तसेच तो कधीही मरत नाही, तो कोणापासून निर्माण होत नाही,तो आजन्म आणि शाश्वत आहे. आत्मा नित्य आणि शाश्वत आहे. आत्मा हा भोक्ती नाही तसचे तो अशारीरीक आहे. असे आत्म्याचे वर्णन उपनिषदे मध्ये केले आहे.

           वेद आणि उपनिषदे यानंतर भगवदगीते मध्ये आत्म्याबाबत श्लोक आढळून येतात. भगवद गीता अध्याय २, श्लोक २३ मध्ये असे नमूद आहे की, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:|न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत:|| २३|| याचा स्वैर मराठी अर्थ असा की आत्म्याला कोणत्याही शस्राने कापता येत नाही. त्याला आगीने जाळता येत नाही, त्याला पाणी भिजवू शकत नाही ,ना हवा त्याला सुकवू शकत नाही. तसेच भगवद गीतेमधील आत्म्या बाबत दुसरा श्लोक असे सांगतो की, वासांसि जीर्णानि यथा विहाय ,नवानि गृह्णाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही।।२.२२ ।। याचा स्वैर मराठीअर्थ असा कि मनुष्य जसे जुनी कपडे त्याग करून नवीन कपडे परिधान करतो अगदी तसेच आत्मा जुने शरीर त्याग करून नवीन शरीर धारण करतो.

          जैन तत्वज्ञान हे आत्म्याविषयी असे सांगते की प्रत्येक आत्मा मूळ स्वरूपात परमात्माच असतो. शरीरा सारख्या जड वस्तुहून भिन्न असलेला आत्मा स्वभावतःच ज्ञान गुणाने युक्त आहे. संसारातील आत्मा मात्र कर्म मलिन झाल्याने आपल्या ज्ञान गुणाने तो संपूर्णपणे प्रकाशित होत नाही, असे या तत्वज्ञानात संगितले आहे. चार घाती कर्म ज्याला ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय और अंतराय असे संबोधले जाते, त्याचा त्याग केल्यानंतर आत्म्याचा ज्ञानगुण पूर्णतः प्रकट होतो. त्यालाच आपण केवलज्ञान असे म्हणतो. जीव (आत्मा) हा सूक्ष्म व अतींद्रिय असल्यामुळे तो प्रत्यक्ष दिसत नाही, अनुमानाने तो जाणावा लागतो असेही हे तत्वज्ञान सांगते.

         बुद्ध तत्वज्ञान क्षणिकवादाचा पुरस्कार करते. क्षणिकवाद म्हणजे सर्व काही तात्पुरते आहे किंवा क्षणिक किंवा अनित्य आहे. मात्र या अनित्याशी खोलवर एक तत्व आहे. ते मात्र नित्य आहे. ते नित्य तत्व दुसरे काही नसून ते आत्मा आहे. त्याची खूप चर्चा करणे व्यर्थ आहे असे हे तत्वज्ञान सांगते. हे तत्वज्ञान असे सांगते की कोणतेही अस्तित्व म्हणजे दु:ख. तत्वाचे किंवा बाबीचे अस्तित्व तयार झाले की दु:ख निर्माण होते. आत्मा हा सजीवांच्या ठिकाणी वास करतो असे नाही, तर तो धर्म आणि गुण याचा जो आपल्याला प्रत्यय येतो त्याच्याशी निगडीत आहे. म्हणजेच तो धारण केलेला द्रव्य अथवा तत्व आहे.

       आत्म्याबाबत अजून जाणून घ्यायचे असेल तर पश्चात्य तत्ववेत्ते यांचे तत्वज्ञान आणि विचार याबाबत माहिती घ्यावी लागते.यामध्ये सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांचे महत्व आजही अबाधित आहे. सॉक्रेटिस हा महान ग्रीक तत्वज्ञ होता.सॉक्रेटिस ह्या महान अशा तत्ववेत्याचा कालखंड ई.स.पू. ४७०-३९९ असा येतो. सॉक्रेटिस म्हणतो की सत्य शोधन्यासाठी प्रत्येकाची बुद्धी समर्थ आहे. मनुष्य प्राणी हा बुद्धीच्या साहाय्याने आंतरिक ज्ञान प्राप्त करू शकतो. नैतिकता आणि नीतीमत्ता हा सॉक्रेटिसचा वस्तु विषय होता.सॉक्रेटिस आत्म्याचे अमरत्व मान्य करीत होता, आत्म्याच्या अमरत्वावर त्याची अविचल श्रद्धा होती. माणूस म्हणजे शरीर नव्हे, माणूस म्हणजे आत्मा, हा आत्मा अमर आहे असे त्याचे मत होते.

          प्लेटो हा महान ग्रीक तत्वज्ञ होता. त्याचा कालखंड हा ई.स.पू. ४२७-३४७ असा आहे. सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु होता. प्लेटो म्हणतो की आत्मा हे गती तत्व आहे. आत्मा अहं दृश्य असून त्याचा शरीराशी सुसंवाद असतो आणि त्यात अंतक्रिया होते. शरीराचा आत्म्यावर परिणाम होतो असे तो आपल्या रिपब्लिक ग्रंथात सांगतो. आत्मा हा निम्न सृष्टीत प्राण आणि गती एवढेच मर्यादित असतो. मात्र मनुष्य प्राणी म्हणजे उच्च सृष्टीत तो ज्ञान, अंतरदृष्टी, विमाशबुद्धी या आधारे तो आकाराचे आणि कल्पनांचे साम्राज्य उभे करतो. प्लेटो असे सांगतो की मृत्यूनंतरही आत्मा अस्तित्वात आहे आणि तो विचार करण्यास सक्षम आहे. त्याचा असा विश्वास होता की शरीरे मरत असतांना, त्यानंतरच्या शरीरात आत्मा सतत पुनर्जन्म घेतो. प्लेटोचा असा विश्वास होता की आत्मा हा जीवन देतो. तर आत्मगती म्हणजे आपले शरीर हलवण्याची ऊर्जा होय. आत्मा हा नैतिक गुणधर्माचा वाहक होय. आत्मा एक स्वयं-प्रवर्तक आहे. जीवन हे आत्म-गती आहे आणि आत्मा शरीरात हालचाल करून जीवन आणतो. प्लेटोची आत्म्याची त्रिविध कल्पना प्रसिद्ध आहे. यामध्ये विवेकी भाग, उदात्त अविवेकी भाग आणि अनुदात्त अविवेकी भाग याचा समावेश होतो. विवेकी भागात प्रज्ञा आणि बुद्धी असते, उदात्त अविवेकी भागात संकल्प शक्ती असते तर अनुदात अविवेकी भागात कामवासना आणि तृष्णा आहे असे तो मानतो.

        ॲरिस्टॉटल हा महान तत्ववेत्ता ई.स.पू. ३८४ -३२२ मध्ये होवून गेला. ॲरिस्टॉटलचा गुरु प्लेटो होता. ॲरिस्टॉटल च्या मतानुसार आत्मा आणि शरीर याला तो अनुक्रमे द्रव्य आणि आकार अशी उपमा देतो. आत्मा म्हणजे द्रव्ये, हे द्रव्ये शरीर म्हणजे आकार यात सामावते असे त्याचे मत होते. आपला विकास होतो म्हणजे आत्माचे अविष्कारण होते असे तो म्हणतो. आत्मा हा सुप्त रूपात शरीरात अंतरीत आसतो. आत्मा शरीराचे चलन आणि नियमन करतो असेही तो सांगतो. एकंदर ॲरिस्टॉटलची आत्मविषयक कल्पना चिंतन आणि ध्यान करून आत्मा विवेकक्षिल बनवता येते, त्यातून मानवी सुख लाभप्रत होते अशी होती.

         संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगात सांगतात की, ‘आत्मा एक बाई स्थिरचरव्यापक । सृष्टी तैसी देख एकलीच ॥१॥ पचंमहाभूतें व्यापूनी निराळा । सौंदर्य पुतळा काळाबाई ॥२॥ ज्ञानदेव ध्यान धरिले पुढती । त्रैलोक्याची वस्ती असे जेथें ॥३॥ याचा अर्थ असा की आत्मा हे चराचर जगात व्यापलेले आहे, त्याच्या पासूनच हे जग निर्माण झाले आहे. संपूर्ण जग पाच महाभूतांनी व्यापून सुद्धा आत्मा निराळा आहे. ज्याच्या सत्तेवर हे त्रिलोक भासते. जगतगुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘पंचभुताचा हा मेळा I देह सत्यत्वे निराळा II याचा अर्थ असा की सृष्टीत पंच महाभूते पसरलेले असली तरी देह आणि आत्मा हे निराळे आहेत. आत्मा हेच अंतिम सत्य आहे.

        आशा प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वाचा शोध घेत असतांना आपल्याला विश्वाची आणि सृष्टीची निर्मिती कशी झाली याबाबत स्पष्टीकरण करावे लागते. विश्वाची निर्मिती कशी झाली यासाठी बिग बैंग सिद्धांत सांगितला जातो. या सिद्धांतानुसार १३७० कोटी वर्षापूर्वी विश्व हे पोकळीत निर्माण झालेल्या महाविस्फोटाने तयार झाले. हा स्फोट उच्च घनता आणि उच्च तापमान यातून निर्माण झाला असे गृहीतक मांडले जाते. पोकळी मोठी होत गेली अथवा प्रसरण पावली आणि थंड झाली. या प्रक्रियेत विविध मूलद्रवे तयार झाली आणि या मूलद्रव्यांच्या एकीकरणातून विश्वाची निर्मिती झाली. या निर्मिती मध्ये अनेक आकाशगंगा, अनेक तारे, अनेक ग्रह , अनेक धूमकेतू,अनेक भौतिक वस्तु आणि अमर्याद ऊर्जा तयार झाली. आपली आकाशगंगा मध्ये अनेक तारे आणि ग्रह आहेत. यात आपला सूर्य आणि त्यात समाविष्ठ आठ ग्रह मिळून आपली सूर्यमाला तयार होते. या सूर्यमालेतील जीवनाचे अस्तित्व असलेला एकमेव ग्रह म्हणजे आपली पृथ्वी होय. पृथ्वी ही पंचमहाभूता पैकी एक आहे. या पृथ्वीवर जीवसृष्टि कशी तयार झाली असावी याबाबत तीन उत्पती प्रचलित आहेत. जीवन हे कशातून तरी ती निर्माण झाले, अचानक काही तरी क्रिया-प्रक्रिया होवून जीवन तयार झाले, तिसरे असे की विश्वातून कोठून तरी जीवन या पृथ्वीवर पोहचले. अशा प्रकारे एकंदर पृथ्वीवर जीवन हे ३५० कोटी वर्षापूर्वी सुरू झाले.

         ज्यावेळेस पृथ्वीवर जीवन अस्तीत्वात आले. त्यावेळी जीव हे अत्यंत साधे आणि एकपेशीय होते. हळू हळू उत्क्रांती आणि बदल होत गेले आणि अनेक नवीन जीव तयार होत गेले आणि काही जिवांचे अस्तित्व नष्ट झाले. सृष्टीतील या सर्व जीवांमद्धे दोन गुण वैशिष्टे समान होती. एक म्हणजे त्यांचे मध्ये असलेला जीव , प्राण, चेतना अथवा आत्मा आणि दुसरे म्हणजे पुनरात्पादनद्वारे नवीन जीव निर्माण करण्याची त्यांची क्षमता . या दोन गुण वैशिष्टेमुळे सृष्टी अनेक अवाढव्य, अनाकलनिय, सूक्ष्म, आशा अनेक विविध जीव जंतू यांनी व्यापली गेली आहे. त्यातील काही आपल्याला ज्ञात आहेत आणि खूप काही अजूनही अज्ञात आहेत. सृष्टीमद्धे जीवन अस्तित्व हे फक्त जैविक घटकांशी संबधित न राहता अजैविक घटकांशी त्यांनी सहसंबद्ध साधला आणि आपली वाटचाल चालू ठेवली.

        भौतिकशास्र आणि रसायनशास्र यातील मूलभूत संकल्पनाना आपण सृष्टीच्या संदर्भात पडताळतो, त्यावेळी सर्वात आधी समोर येतात ती ९४ मूलद्रवे. ही मूलद्रवे अत्यंत पायाभूत अशी असून सृष्टीच्या मुळाशी आणि प्रत्येक पदार्थ घटकाच्या मुळाशी ही मूलद्रवे अस्तित्व दाखवतात. या मूलद्रव्यांमद्धे हायड्रोजन (प्रोटॉन) हे अत्यंत नोबेल असे मूलद्रवे संबोधले जाते. ऊर्जा तयार करण्यात आणि तिचे वहन करण्यात ते महत्वाची भूमिका बजावत असते. या सर्व मूलद्रव्यांच्या सूक्ष्म स्तरावर अणू असतात हे सर्वश्रुत आहे. अणू आणि उपाणू हे कोणत्याही पदार्थाचे मूलभूत घटक होत.अणूच्या केंद्रस्थानी प्रोटॉन आणि नुट्रॉन आणि त्याच्या केंद्राच्या बाहेर इलेक्ट्रॉन असतात. प्रोटॉन हे धन प्रभारीत तर इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारीत असून नूट्रॉन हे प्रभार रहित असतात. साहजिकच प्रत्येक पदार्थ किंवा मूलद्रव्ये यांच्या अणू मध्ये सूक्ष्म ऊर्जेचे अस्तित्व असते.

आता हे समजून घेतल्यानंतर आपण आपल्या शरीरात वास आणि सहवास करत असलेल्या आत्मा, प्राण किंवा जीव याबाबत पाहूया. जर आत्मा ही ऊर्जा किंवा चेतना आहे, तर तिचा संबध नक्कीच वैश्विक उर्जेशी असायला हवा. वैश्विक ऊर्जा ही फक्त सूर्यापासूंच निर्माण होत नाही तर ती विविध मूलद्रवे यात सुद्धा सामावलेली असते. तसेच ती विश्वात विद्युत चुंबकीय तरंगाच्या रूपात सुद्धा अस्तीत्वात आहे. एका मूलद्रव्याच्या अणूमध्ये किती ऊर्जा असू शकते हे आपण हिरोशिमा आणि नागसाकी अणुबाँम्ब विस्फोट वेळी पहिली आहे. अणूचे विखंडण करून ऊर्जा निर्माण करण्याचे कौशल्ये हे मानवी बुद्धी आणि ज्ञान याची उच्च परिसीमा आहे. साहजिकच त्यामुळे आपल्या शरीरात विविध मूलद्रवे आणि त्याचे अणू आणि रेणु ऊर्जा वहन चे काम करतात. ऊर्जेचे वहन होते म्हणजे आयन चॅनेल द्वारे ऊर्जा स्थानांतरित केली जाते. हे स्थानांतरण पेशीमध्ये आणि पेशी ते पेशी असे घडते. म्हणजे प्रत्येक पेशी ही ऊर्जेने कार्यान्वित ठेवण्याचे काम आयन चॅनेल करत असतात.साहजिकच जीवन आणि गती कायम ठेवण्यासाठी आयन एक्स्चेंज आणि आयन चॅनेल खूप महत्वाचे असते. हे आयन चॅनेल कायम राखणे साठी सोडीयम , पोटाशीअम , कॅल्शियम , हायड्रोजन आणि क्लोराईड ही मूलद्रवे महत्वाची असतात. साहजिकच ही ऊर्जा आणि तिचे आयन चॅनेल आणि तिचे वहन जो पर्यंत शरीरात अस्तित्वात असते तो पर्यंत जीव किंवा प्राण हा शरीरात आहे असे आपण गृहीत धरतो.

        नर आणि मादी यांच्या मिलनातून जेंव्हा गर्भधारणा मातेच्या उदरात होते अगदी त्या वेळेस त्या जीवामध्ये प्राण, ऊर्जा ,चेतना आणि गती जागृत होते. म्हणजे आत्मा हा त्या नवीन जिवाच्या कायेमध्ये प्रवेश करतो किंवा जागृत होतो. मात्र ही ऊर्जा आणि प्राण कसा प्रवेश करतो, जागृत होतो किंवा फुलतो याबाबत विज्ञान अजूनही अनभिज्ञ आहे.ठिणगी जसा अंगार फुलवते आणि त्यातून अग्नि तयार होतो, हे एकंदर तसे असावे. मात्र या ठिणगीचा प्रकटन अथवा उगम कसा होतो हे एक अजूनही गूढ आहे. जर आपण हे ऊर्जेचे स्थानांतरण आहे.असे गृहीत धरले तर ते आई आणि वडील यांच्याकडून प्राप्त होणार्‍या पुरुष बीज आणि स्त्रीबीज पेशी मधून होत असेल तरीही त्याला जाणून आणि समजून घेण्यास मर्यादा येतात. कारण ते अधिक गुंतागुंतीचे आणि विस्मयकारक असते.

       ऊर्जेचे एका स्थानावरून दुसर्‍या स्थानावर प्रवास होतो, किंवा ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसर्‍या स्वरूपात रूपांतर होते यालाच ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. एकंदर विश्वातील ऊर्जा ही सम अथवा कायम राहते. म्हणजे वैश्विक ऊर्जा ही स्थिर राहते. त्यामुळे असे स्पष्टीकरण मांडता येते की ही ऊर्जा ही दोन जीवामधून एक नव्या जीवात स्थानांतरण करते. साहजिकच ही ऊर्जा स्थांनातरण करते तेंव्हा ती सूक्ष्म आणि ठिणगी स्वरुपात असते आणि नंतर ती हळू हळू फुलत जाते आणि पूर्ण काया व्यापते. हळू हळू या दोन पुरुष बीज आणि स्त्रीबीज पेशी पासून गर्भ तयार होतो आणि तो वाढीस लागतो. आणि तो आपल्या मातेकडून अन्नरस घेण्यास सुरवात करतो. यातून पेशी आणि उत्तींची वाढ होवून अवयव तयार होण्यास सुरुवात होते. आशा प्रकारे उर्जा अथवा चेतना त्या गर्भात सुप्तपणे सामावलेली असते आणि ती नंतर जागी होते ,जागृत होते आणि नवीन जीवात वास करते आणि त्याप्रमाणे हा आत्मा किंवा प्राण एक जीवामधून दुसऱ्या जिवामध्ये म्हणजे त्याच्या संतती मध्ये प्रवेश करतो आणि त्याचे अस्तित्व तेथे तयार करतो.

        जन्म आणि मृत्यू याचा संबंध आत्म्याशी जोडला गेला आहे. जन्म होतो म्हणजे आत्मा शरीरात प्रवेश करतो आणि मृत्यू होतो म्हणजे आत्मा शरीर सोडतो. असे विविध प्राचीन ग्रंथ आणि तत्ववेते यांनी नमूद केले आहे. मानवी शरीर हे चार अवस्था मधून प्रवास करते यात बाल्य, तरुण, प्रौढ आणि वृद्ध या अवस्था येतात. पहिल्या दोन अवस्था मध्ये शरीराची वाढ होते तर दुसऱ्या दोन अवस्था मध्ये शरीराची झीज अथवा क्षय होतो. साहजिकच असा क्षय होत असतांना मानवाचे विविध अवयव जसे मेंदू, हृदय, फुफुसे, किडनी इत्यादी कमकुवत होत जातात.ते कमकुवत झाल्याने त्या अवयव मधील पेशी आणि उत्ती ह्या सुद्धा कमकुवत झाल्याने यातील आयन चॅनेल आणि आयन एक्सचेंज यात अडथळे निर्माण होतात.असे अडथळे येत असल्याने एक दबाव शरीरावर निर्माण होऊन हळू हळू हे अवयव निकामी होत जातात आणि त्यातील आयन चॅनेल आणि आयन एक्सचेंज म्हणजे ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि मृत्यू ओढवतो. त्यातून असे स्पष्टीकरण मांडण्यास वाव तयार होतो की ज्या प्रमाणे गर्भधारणा झाल्यावर त्या गर्भात ऊर्जा ,जीव आणि आत्मा याचे वास्तव्य किंवा जाणीव निर्माण होते. तसेच मृत्यू झाल्यावर ही ऊर्जा ,जीव,प्राण आणि आत्मा वैश्विक ऊर्जेत सामावून जाते.यासाठी आपल्याला दिव्याचे उदाहरण पाहूया, दिवा पेटतो म्हणजे त्या दिव्यासाठी इंधन म्हणून जे तेल वापरले आहे त्यातील ऊर्जा ही प्रकाश निर्माण करते आणि जेंव्हा तेल संपते तेंव्हा प्रकाश संपतो अथवा शून्य होतो आणि दिवा विझतो.येथे जी ऊर्जा अस्तित्वात होती ती प्रकाशाच्या माध्यमातून वैश्विक ऊर्जेत सामावून जाते. अगदी तसेच आत्मा , प्राण, जीव याबाबत असू शकते.की जी ऊर्जा शरीराने म्हणजे कायेने धारण केली होती ती मृत्यू नंतर वैश्विक ऊर्जेत सामावून जाते.

       येथे सुद्धा ऊर्जा अक्षय्यतेचा नियम लागू होतो.अनेक प्राणी मात्र यांच्या मृत्यू अथवा नाश झाल्यानंतर मोकळी झालेली ऊर्जा वैश्विक ऊर्जेत सामावून जाते. आणि ती ब्रह्म, ब्रह्मांड किंवा विश्व यात अगदी सूक्ष्म स्वरूपात कायम राहते.म्हणजे विश्वात काहीही वाढत नाही किंवा काहीही कमी होत नाही जे आहे ते सत असत राहते, म्हणजे कायम राहते. साहजिकच ही सूक्ष्म ऊर्जा आपल्याला कधी कधी जाणवते आणि मग त्याला आपण अनेक अर्थ लावतो आणि जोडतो. साहजिकच या उर्जेचा प्रभाव आपल्याला काही प्रमानात लोकांच्या वागण्यात विचारात बोलण्यात पहावयास मिळतो.सृष्टीच्या या पसार्‍यात अनेक जीव जंतूचे वास्तव्य आहे. काही अवाढव्य तर काही अत्यंत सूक्ष्म या सर्वांचे जैविक वस्तुमान जरी मोठे असले तरी त्यांच्या मधील ऊर्जेचे स्वरूप हे विश्वाच्या या पसार्‍यात अत्यंत नगण्य आहे. वैश्विक ऊर्जा एवढी अथांग आहे की तिच्याशी या जैव ऊर्जेची तुलन होवू शक्त नाही. म्हणजे ऊर्जा विश्वात सोडणे आणि ती ग्रहण करणे हे मागील १३५ कोटी वर्षापासून निरंतर आणि अनंतपणे चालू आहे.

        एकंदर आत्मा हा विषय अत्यंत क्लिष्ट आणि गुंतगूतींचा आहे. तो मन आणि बुद्धी याला भेदणारा आहे. तसा तो विचार आणि भावना या पलीकडे असणारा गहन विषय आहे. आत्मा आणि त्याचे निर्माण, त्याचे अस्तित्व, त्याचे रूप, त्याचा आकार , त्याची व्याख्या , त्याचा रंग , त्याचा गंध, असे हजारो प्रश्‍न आपल्या हजारो वर्षांच्या मानवी इतिहासात ऋषी मुनी,तत्त्वज्ञ, विचारवंत, धार्मिक गुरू,संत आणि संशोधक यांनी वारंवार उपस्थित केले आणि त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे निश्चित असे एकमत आणि सर्वमान्य उत्तर मिळत नाही . प्रस्तुत लेखात मांडलेले स्पष्टीकरण आपण जेव्हा भारतीय वेद, उपनिषदे ,प्राचीन ग्रंथ, भगवद्गगीता, संत आणि तत्ववेते यांचे विचारांशी पडताळून पाहतो त्यावेळी आपण निश्चितच आवाक आणि विस्मयचकित होतो.काही हजारो वर्षांपूर्वी जेंव्हा विज्ञान नावापुरतेही नव्हते त्यावेळी ऋषी मुनी, संत, तत्ववेते यांनी आत्म्याविषयी मांडलेले विचार संपूर्णतः त्याज्य ठरत नाहीत उलट ते आपल्या विज्ञानाची आणि संशोधनाची दिशा ठरवतात.जी गोष्ट अथवा घटना सिद्ध करता येत नाही ती अस्तित्वातच नाही असे म्हणता येत नाही. हे तत्व आत्म्यासाठी काही अंशी लागू होते. कारण सृष्टीतील अजून कितीतरी रहस्य आणि गूढ अनुतरीत आहेत. शेवटी विज्ञान आणि संशोधन हे बदलणारे आणि परिवर्तनीय असते. परस्पर सहकार्यावर संपूर्ण सृष्टी अवलंबित आहे आणि हे परस्पर सहकार्य या तंत्रधीष्टीत जगात कमालीचे गतिमान झाले आहे. साहजिकच या गतिमानतेचा वापर मानवी रहस्य आणि ज्ञानाची वृद्धी करण्यास कायम सहाय्यभूत ठरेल. ज्ञातकडून अज्ञातकडील प्रवास हा कायम यथेच्छ चालू राहणार अगदी तो या सृष्टीच्या शेवटापर्यंत कारण विश्व हे अथांग आहे त्याला कोठेही शेवट नाही. त्यामुळे एकच गोष्ट शाश्वत आणि चिरस्थायी आहे ती म्हणजे मनुष्य प्राणी आणि त्याची उच्य कोटीची आकलन आणि कल्पनाशक्ती . याच्या जोरावर तो या सृष्टीचा अनिभिक्षित सम्राट आहे. फक्त गरज आहे ती संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या पसायदान मधून संपूर्ण विश्वाला दिलेल्या संदेशा प्रमाणे आपले वर्तन ठेवण्याची आणि त्याची अंमलबजावणी आपल्या दैनंदिन जीवनात करण्याची.
‘खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें’ ||

o४२/१०१ दिनांक १९.०२.२०२२
सुखाच्या शोधात©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७