अहंकार कमी कसा करावा How to Reduce Ego

अहंकार कमी कसा करावा How to Reduce Ego

       अहंकार हा बहुतांशी श्रेष्ठत्वाशी निगडीत आहे. हे श्रेष्ठत्व हे स्थान, दर्जा आणि वर्चस्व याच्याशी संबधित असते. साहजिकच स्थान, दर्जा आणि वर्चस्व अहंकाराला जन्म देतात. इतरांना हीन आणि कमी लेखण्याची वृत्ती अहंकार निर्माण करते. अभिमान आणि अहंकार या वृतींचा भेद करणे ज्यावेळी शक्य होत नाही, त्यावेळी अहंकाराचा दोष निर्माण होतो. राग आणि तिरस्कार या दोन मुख्य भावना आपल्या मनातून निर्माण होतात त्या संयोग अथवा संयोजन पावल्या की अहंकार निर्माण होतो. आपल्या द्वेषकारी आणि इतरांना हीन लेखणार्‍या स्वभावाची जोड तिरस्काराला मिळाली की अहंकार निर्माण होतो. असा अहंकार आपल्या वृतीत आणि कृतीत निर्माण झाल्याने आपल्या जीवनविषयक प्रवासात अनेक दोष निर्माण होतात. वरकरनी अहंकार हा दोष नाही असे आपण गृहीत धरत असलो तरी मानवी संबंधमद्धे कटुता आणण्यात अहंकार भूमिका बजावत असतो. अहंकार हा इतका प्रबळ होतो की व्यक्ती मध्ये असणारे इतर गुणांना तो पूर्णत: नाहीसे करून टाकतो. प्रस्तुत लेखात अहंकाराची पूर्वपीठिका काय आहे, त्याचा उगम आणि निर्मिती कशी होते, त्यामुळे मानवी आयुष्यावर आणि संबंधावर काय परिणाम होतात आणि अहंकाराचा त्याग कसा करावा, याचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

       अहंकार किंवा इंग्रजी मध्ये त्याला आपण इगो म्हणतो. सोप्या शब्दात सांगायचं झाला तर अहंकार म्हणजे स्वत:ला श्रेष्ठ समजून दुसर्‍याला कमी लेखणे होय. राग आणि तिरस्कार या दोन मुख्य भावनांच्या संयोग आणि संयोजन मधून अहंकार निर्माण होते. रागाचा उगम जरी अपेक्षा आणि इश्चा यातून होतो तर  तिरस्कार हा दुसर्‍याच्या बद्दल असलेल्या द्वेषा मधून निर्माण होतो. साहजिकच राग आणि तिरस्कार एकत्र होवून अहंकार रूपी स्वभाव आणि वृतीची निर्मिती होते. आणि साहजिकचा असा हा अहंकार आपल्याला वागण्यात, बोलण्यात आणि कृतीत दिसून येतो.

       अहंकाराचे मूळ हे मानवी उत्क्रांतीत दडलेले आहे. मानवी इतिहासात ३० लाख वर्षापूर्वी मानवाने दगडापासून पहिले हत्यार बनवले. या हत्यारामुळे त्याला प्राण्याची हत्या करणे सोपे होवू लागले. त्या वेळी मानवामध्ये अहंकाराची बीजे रोवण्यास सुरुवात झाली ती अगदी आज पर्यन्त. १० लाख वर्षापूर्वी मानवाने आगीवर काबू अथवा नियंत्रण मिळवणे किंवा ती तयार करण्याचे कौशल्य अंगी बाळगल्यानंतर तर त्याचा अहंकार अजून वाढला. हळू हळू मी श्रेष्ठ आहे आणि इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे आणि मी इतरांवर प्रभुत्व गाजवू शकतो, यातूनच अहंकार जन्माला आला. सर्वात आधी हा अहंकार मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी असा मर्यादित होता. मात्र नंतर हा अहंकार मानवा मानवा मधेच दिसून येवू लागला. एक मानव दुसर्‍या मानवाशी किंवा एक गट दुसर्‍या गट सोबत वर्चस्व आणि श्रेष्टत्व साठी लढू लागला. 

       माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याच्यात ही सामाजिकता किंवा सामाजिक सहकार्य हळू हळू विकसित होत गेले. सामाजिकता ही एक उत्क्रांती असून ती आकलन आणि समज यातून तयार होते. निसर्ग नियम हे एकदम सोपे असतात मात्र खरी गुंतागुंत होते ती संबंधांमद्धेच. सृष्टीच्या जीवन साखळी मधील मानवाचा सर्वोच्य स्थानी जावून थांबण्याचा प्रवास हा काही अचानक झाला नाही. त्यासाठी लाखो वर्ष त्याला खर्ची घालावी लागली. त्याने त्याचे स्थान हे भक्कम करण्यामध्ये त्याचे उच्च आकलन क्षमतेने महत्वाची भूमिका बजावली आहे. दगडाला आकार देवून तिष्ण हत्यारे बनवता येतात आणि त्यातून शिकार करणे सहज शक्य होते हे मानवी मेंदूच्या आकलन शक्ती शिवाय कदापि शक्य नव्हते. अशा प्रकारे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत स्वार होत असतांना मानवी स्वभावाचा अहंकार हळू हळू वाढत गेला. मात्र मागील ३५० वर्षाच्या कालावधीत हा अंहकार अति तीव्र बनत गेला. त्याची करणेही तशीच आहेत १७६५ साली तयार झालेले वाफेचे इंजिन आणि त्या नंतर १८३० मध्ये झालेली पहिली औद्योगिक क्रांति यामुळे खर्‍या अर्थाने मानवी अंहकार वाढण्यास मदत झाली. वाफेचे इंजिन ते कुत्रीम बुद्धिमता पर्यंतचा मानवी प्रवास, प्रगति आणि विकास हा जरी विलक्षण आणि आश्चर्य चकित करणार असला तरी मानवी अहंकाराचीही वाढ त्याच पटीत झाली.

       व्यक्ति कोणत्या वातावरणात वाढतो आणि त्याच्यात कोणती मूल्ये रुजवली जातात आणि संस्कार कसे केले जातात या आधारे अहंकाराची तीव्रता ठरते. साहजिकच अंहकार हा एकदम अचानक तयार होत नाही तर हळू हळू वृद्धिंगत होतो. अहंकाराचा उगम हा अगदी लहानपणात होतो. लहान सहान गोष्टी अजूबाजूच्या घडणारर्‍या घडामोडी आई वडील यांचे वर्तन, नातेवाईक आणि अप्तेष्ट यांचं दृष्टीकोण इत्यादि बाबी अहंकाराला खतपाणी घालून तो मोठा करतात. बर्‍याच वेळा आपण पाहतो की अहंकार आणि संपत्ती असे समप्रमाण दाखवले जाते. जो जास्त श्रीमंत तो अधिक अहंकारी आणि जो अधिक गरीब तो कमी अहंकारी असीही सर्वसाधारण व्याख्या दाखवली जाते. वास्तविक एका वर्गाला दुसर्‍या वर्गाबाबत असलेली असूया आणि तिरस्कार हीच भावना अहंकाराला जन्म देते.  अहंकार हा मदतीची भावना हळू हळू लोप करतो. अहंकारी वृती ही इतर सकारात्मक आणि सामाजिक कामांना बाजूला करून वैयक्तिक स्वार्थाला पुढे ढकलते. काही प्रमाणात स्व विकास साठी स्वार्थ असणे गैर नाही मात्र इतरांना कमी लेखणारा आणि अडचणीत आणणारा स्वार्थ काही कामाचा नसतो. शेवटी नशिबाचे चक्र वर्तुळाकार फिरत असते. आजचा राव उद्या रंक आणि आजचा रंक उद्याचा राव होतो तो यामुळेच

       आपण जसे मोठे होत जातो आणि आपल्याला काही वंश परंपरेने किंवा स्व-हिमतीवर दर्जा अथवा स्थान मिळत राहतात. म्हणजे राजाच्या मुलाला राजपदाची गादी खूप काही विशेष कर्तुत्व न दाखवता मिळू शकते. किंवा एका सामान्य कुटुंबातील सैनिकाला सेनापतीपद हे स्व-कर्तुत्ववारही मिळू शकते. साहजिकच या दोन्ही ठिकाणी अहंकार जन्म घेवू शकतो. जागा सहज प्राप्त झाली म्हणून अहंकार तयार होवू शकतो आणि अत्यंत कष्टसाध्य रीतीने जागा मिळाल्यानेही अहंकार निर्माण होवू शकतो. अहंकार कोणत्याही पद्धतीने निर्माण होवू, त्याचे समर्थन कदापि करता येत नाही अथवा ते करूही नये.

       अहंकाराला ज्यावेळी द्वेषाची किनार लागते त्यावेळी मात्र तो मानवी संबधाची होळी साजरा करतो. वाटेत येणार्‍या सर्वच व्यक्ति आणि कामांना त्याची झळ पोहचते. काही नातेसंबंध हे तर कायमचे संपुष्टात येतात. कोणाला कर्तुत्वाचा अहंकार असतो, कोणाला संपत्तीचा अहंकार असतो, कोणाला शक्तीचा अहंकार असतो,  कोणाला सामर्थ्याचा अहंकार असतो, तर कोणाला सौंदर्याचा अहंकार असतो. ही अहंकाराची रुपे आपल्या अवतीभोवती आणि आजूबाजूला वेळोवेळी दिसून येतात. अभिमान असणे यात गैर नाही, मात्र त्या अभिमानाचा अंहकार होता कामा नये.     

       अहंकार हा व्यक्ति परत्वे तयार होतो. अत्यंत अती सामान्य माणसाकडेही तुम्हाला अहंकार सापडू शकतो आणि अति असामान्य माणूसही तुम्हाला अहंकारी सापडू शकतो. असे असले तरी सर्वसाधारणपणे विविध कारणाने प्राप्त झालेले उच स्थान आणि दर्जा अहंकाराला कायम खतपाणी घालण्याचे काम करत असते. अहंकार आणि गर्व यात किंचित फरक आहे. गर्वामध्ये आपण स्व:तचा आदर करतो आणि इतरांकडूनही आदर मिळावा अशी भावना किंवा अपेक्षा ठेवतो. अहंकारामद्धे मात्र श्रेष्ठत्व आणि मी इतरांपेक्षा वेगळा अथवा वैशिष्ट्यपूर्ण आणि अधिक सामर्थ्यवान आहे ही भावना प्रबळ असते.

       अहंकार हा फक्त नातेसंबंध नष्ट करत नाही तर तो परस्पर सहकार्य आणि समन्वय सुद्धा नष्ट करतो. अहंकारी व्यक्ती हा पाण्याच्या प्रवाहात तयार झालेला भोवरा किंवा वावटळ सदृश्य असतो. तो इतरांना त्यामध्ये लपेटुन घेतो आणि त्यांना दूर कोठे तरी सोडून देतो किंवा त्यांचा नाशही करतो. अहंकार का संवाद सुद्धा कमी करतो. अहंकारी व्यक्ति संवाद साधण्यात सुद्धा पुढे होत नाहीत. संवाद साधल्याने आपले काही तरी चुकेल अथवा आपल्यामधील कमतरता समोरच्याच्या लक्षात येतील अशीही भीती त्यांच्यात असते. त्यामुळे ते कधीही समान पातळीवर संवाद साधत नाहीत. व्यक्तिपरत्वे त्यांची संवाद भाषा बदलते. साहजिकच त्यांच्या वागण्यात स्वार्थीपणा कायम जाणवत राहतो. साहजिकच मानवी संबंध खराब करण्यामध्ये सर्वात अग्रेसर असणारी वृती म्हणजे अंहकार होय.

       अहंकार हा निश्चितच व्यक्तिदोष असून तो व्यक्ति परत्वे निदर्शनास येतो. एखानद्या वर्चस्वचा किंवा स्थानाचा अंहकार असेल मात्र दुसर्‍याल तो असेलच असे नाही. तसेच या अहंकाराची तीव्रता कमी जास्त असू शकते. अहंकार हा दृष्टिकोनातही दिसून येतो. अहंकार हा वागण्यातही दिसून येतो आणि अहकार हा कृती मधेही दिसून येतो. जेंव्हा तो फक्त दृष्टीकोनात असतो तेंव्हा तो इतरांना प्रत्यक्ष धोका निर्माण करत नाही. मात्र तो जेंव्हा तो वागण्यात आणि कृतीत उतरतो तेंव्हा मात्र तो इतरांना धोका आणि कधी कधी अपाय सुद्धा करू शकतो.

     अशा प्रकारे अहंकार हा आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर नकारात्मक परिणाम साधत असल्याने त्याचा हळू हळू त्याग करणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते. सर्वात आधी मी अहंकारी आहे हेच आपण मान्य करत नाहीत. माझे वागणेच तसे आहे ! असे बोलून अहंकार वृतीची पाठराखण केली जाते. त्यामुळे जो पर्यंत आपण आपल्या अंतर्मनात डोकावत नाहीत. आपल्या भूतकालीन जीवनाचे सिंहावलोकन करत नाहीत. तो पर्यंत आपल्यामध्ये अहंकाराची बीजे आहेत, की रोप आहे की त्याचा वटवृक्ष झाला आहे हे समजणे कठीण होवून बसते. त्यामुळे स्व-चा शोध आणि त्यातून अहंकाराचा शोध सर्व प्रथम घ्यावा लागतो. 

     अहंकाराचा शोध घेत असतांना आपल्या राग, तिरस्कार, द्वेष, घृणा आणि असूया या पाच भावनाचा सखोल असे अवलोकन करावे लागते. या पाच भावना जर सारख्या सारख्या उफाळून येत असतील आणि त्यामुळे आपण स्व:ताला इतरांपेक्षा उच्च आणि इतरांना कनिष्ट अथवा बे-अक्कल समजत असू तर तुम्ही अहंकारी झाले आहेत हे समजून घ्या. तसेच तुमचे वागणे हे समोरच्या व्यक्तीच्या दर्जा आणि स्थान यावरून कायम बदलत असेल तर तुम्हाला अहंकाराची लागण होण्याची शक्यत असते. आपले म्हणणे आणि आपली विचार आपण इतरांवर कायम आपल्या उच्च दर्जाचा वापर करून लादत असाल तरीही तुम्हाला अंहकारची लागण झाली आहे. आपले संबंध हळू हळू कमी होत असतील. आपले संबध हळू हळू तुटत असतील. आणि लोक तुम्हाला टाळत असतील तर सुद्धा अहंकाराची लागण तुम्हाला झालेली आहे असे समजायला हरकत नाही.

       एकदा आपल्यात अहंकार आला आहे किंवा वाढत आहे ह्याची जाणीव आणि समज आली की तो कमी कसा करता येईल यावर काम करणे आवश्यक ठरते. या साठी आपल्या भूतकाळाचे स्मरण करणे आवश्यक ठरते. आपण कोण होतो? आणि आता काय आहोत? यामधील कालावधीची चिकित्सा आणि तपासणी करावी लागते. आपण शून्यवत असतांना तेथून आज पर्यंतचा प्रवास हा आपल्या एकट्याचा प्रवास कधीच नसतो. अनेक हात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणाने हा साठी झिजलेले असतात. बर्‍याच वेळा आपण प्रत्यक्ष झिजलेल्या हातांची म्हणजे आपले आई, वडील, भाऊ, बहीण, काही नातेवाईक आणि काही मित्र यांनाच गृहीत धरून आपली वृती अजून संकुचित आणि निमुळती करतो. हे जवळचे हात सोडले तर इतर सर्वच दुनिया ही स्वार्थी आहे असा विचार करून त्या सर्वांना दोषीच्या पिंजर्‍यात बसवतो आणि आपला एकाकी आणि एकांगी जीवन विषयक प्रवास सुरू ठेवतो. साहजिकच हा प्रवास एवढा एकांगी असतो की आपल्याला आजूबाजूचे काहीच दिसत नाही, किंवा आपण जाणीव पूर्वक पाहत नाही, आपण झापड लावून घेत असतो आणि आपल्या जोशात आणि उन्मादत पुढे चालत राहतो. असे पुढे चालत असतांना आपल्याला जर दर्जा किंवा स्थान बहाल असेल आणि त्यातून अधिकार प्राप्त असतील तर आपण आपल्याला श्रेष्ठ समजायला लागतो. असे श्रेष्ठत्व आपण इतरांवर अहंकारी वृती धारण करून लादण्याचा प्रयत्न करतो. कित्येक लोक आपल्या हा श्रेष्ठत्व मुळे दुखावले जात आहे आणि दूरही जात आहेत. त्याची फिकीर अन तमा आपल्याला नसते. आपला अश्व हा सुसाट सुटलेला असतो. काहींना तर आपल्या मधील अहंकाराची जाणीव अगदी मरे पर्यंत सुद्धा होत नाही.

       हे सर्व समजून घेतले, की आपल्या ठायी असावी लागते ती आपली अक्कल हुशारी, आपल्यातलाच आपण ओळखण्याची, आपल्यातलाच आपण समजून घेण्याची आणि आपल्यातलाच आपण जपण्याची. यातून आपल्याला आपलाच शोध लागतो आणि त्यातून शोधला जातो तो आपल्या मधील अहंकार. असा अहंकार एकदा शोधून झाला की त्याचे विविध पदर उलगडायला लागतात. आपले वागणे कसे बदलले आहे. आपण पूर्वी कसा होतो? आता कसे झालो? आपल्याला एक समाजातील जबाबदारी असलेला महत्वाचा घटक म्हणून कसे पहिले जाते. आपल्या बद्दल लोक कसे विचार करतात? ह्या सर्व बाबी आणि गोष्टी तपासाव्या लागतात. हयातून मग शेवटी आपण कोठे आहोत आणि आपल्या अहंकाराची पातळी काय आहे याची निश्चिती होते. एकदा हि निश्चिती झाली की आपल्याला अंहकार कमी करण्यासाठी जाणीव पूर्वक नियोजन आणि आराखडे बनवावे लागतात.जगत गुरु संत तुकाराम अहंकार बाबत सांगताना म्हणतात की सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥ तसेच दुसर्‍या अभंगात ते सांगतात की काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥ तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥३॥ या दोन्ही अभंगातून ते अहंकार आणि अहंकारी वृती यावर जोराचा प्रहार करतात.

         आधी आपल्या विचारात बदल होतो आणि हा बदल आपल्या प्रत्यक्ष वागण्यात आणि कृतीत येत असतो. त्या मुळे अगोदर नमूद केल्या प्रमाणे अहंकाराचे बीज पेरणार्‍या दोन भावना म्हणजे राग आणि तिरस्कार यांच्यावर काम सुरू करावे लागते. राग येणे जरी मानवी स्वभावाला धरून असले तरी राग हा तिरस्कारात बदलणार नाही. राग आणि तिरस्कार हा एकत्र येवून अहंकाराला जन्म देणार नाही याबाबत आपल्याला काम करावे लागते. काम करावे लागते म्हणजे काय तर राग आला की तो तेवढ्या पुरताच हवा. आपल्या एका मित्राने आपल्याला वेळेवर मदत केली नाही महणून आपले नुकसान झाले हे राग येण्याचे कारण झाले आणि एका मित्राने आपले काम होवू नये म्हणून जाणीव पूर्वक अडथळे आणले तर तिरस्कार निर्माण होतो. या मागे मदत का केली नाही ? आणि अडथळे का आणले गेले? याची चिकित्सा न करता आपण राग आणि तिरस्कार या भावनांना प्राथमिकता देवून त्यातून अहंकार निर्माण करून या दोन्ही मित्रांना एका झटक्यात आपल्या आयुष्याच्या नकाशावरून पुसून टाकतो. असे अनेक लोक आपण आपल्या आयुष्याच्या नकाशावरून पुसत चाललो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही आणि आले तरी आपली अहंकारी वृती हे त्यावर उपाययोजना करू देत नाही. त्यामुळे घटनेची आणि त्या घटनेत समाविष्ट असलेले लोक पार्श्व्भुमी लक्षात घेणे, घटनेचा कार्यकारण भाव शोधणे, घटनेची चिकित्सा होणे आणि घटनेचा हेतु आणि उद्देश ओळखणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते. एकदा हे आपल्याला कळायला लागले की त्या घटनेचा आणि त्यातील व्यक्तींबाबतचा प्रवास हा राग, तिरस्कार असा होत नाही आणि त्यातून अहंकार जन्माला येत नाही. अहंकार कमी करण्यासाठी आपल्याला वैयक्तिकरित्या समोरच्याच्या निम्न पातळीवर आणणे होय. पण असे दिसून येते की आपण आपली पातळी तर खाली आणत नाहीत उलट समोरच्या पेक्षा आपली पातळी वरची कशी आहे हे दाखवण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न करत असतो. त्यामुळे काय होते की आपला अहंकारीपणा लगेच लक्षात येतो. साहजिकच अहंकाराचा त्याग आणि त्या पासून सुटका करून घेण्यासाठी त्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या पातळीवर येवून संवाद साधने हितवाह ठरते.

        अशा प्रकारे अहंकार हा आपल्या स्वभावाचा एक मोठा दोष असून आपली अहंकारी वृत्ती कमी करणे हे आपल्या जीवन विषयक प्रवासासाठी अनिवार्य ठरते. अहंकार कमी झाल्याने मानवी संबंध सुधारण्यास आणि त्यातून सहकार्य आणि समन्वय वाढण्यास मदत होते. अहंकार कमी झाल्याने सामाजिकता वाढून सामाजिक अभिसरण वाढते. सामाजिक अभिसरण हे व्यक्ती आणि एकंदर राष्ट्र विकासासाठी महत्वाचे ठरते. अहंकार कमी करण्यासाठी आपला भूतकाळ तपासावा लागतो. आपले हे भूतलावरील अस्तित्व हे किती शून्यवत आहे आणि आपण असलो काय किंवा नसलो काय, निसर्ग चक्र कायम चालू राहते हा विचार आपल्यात रुजवावा लागतो. अहंकार कमी करण्यासाठी राग आणि तिरस्कार हा मूळ भावनांना नियंत्रित करावे लागते. अशा पद्धतीने अहंकार कमी केला की आपले जीवन अधिक प्रवाही, सरळ ,साधे, सोपे, सुटसुटीत आणि सुखी होते. 

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया.

०४०/ १०१ दिनांक २९.०१.२०२२ 

सुखाच्या शोधात © 

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी 

९९७०२४६४१७