पारदर्शकता व विश्‍वासाची हमी म्‍हणजे- व्हीव्‍हीपॅट यंत्र

                                                                                                   पारदर्शकता व विश्‍वासाची हमी म्‍हणजे

                                                                                                                     व्हीव्‍हीपॅट यंत्र

                  जगामध्‍ये सर्व श्रे‍ष्‍ठ अशी भारतीय लोकशाही असून या लोकशाहीचा कणा तो म्‍हणजे या ठिकाणी पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पडणा-या निवडणूका. २५ जानेवारी, १९५०रोजी देशात भारत निवडणूक आयोगाची स्‍थापना झाली या द्वारे मुक्‍त,  नि:पक्षपाती, निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात दर पाच वर्षाला निवडणूकीच्‍या रूपाने आपण देश चालविण्‍यासाठी एक सशक्‍त सरकार निवडण्‍यास मदत करतो.

                  १९५० नंतर आयोगाने वेळोवेळी नवनवीन गोष्‍टींचा अंर्तभाव करून  आधुनिकतेकडे वाटचाल केली आहे. या लोकसभा निवडणूकी दरम्यान व्‍हीव्‍हीपॅट यंत्राचा वापर करून खरोखरच आयोगाने लोकाभिमुखतेकडे वाटचाल करत आहोत याची प्रचिती जागतिक स्‍तरावर करून दिली आहे.  पारंपारिक पद्धतीने चालत आलेली कागदावर मोहोरेचा ठप्पा मारुन पार पडणारी  मतदानाची प्रक्रिया बदलण्यासाठी   ईव्हीमएम मशीन्सचा वापर आयोगाने  भारतात सुरु केला.मात्र २०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीनंतर ईव्हीमएम मशिनवर  चहू बाजूनी  आरोप होवू लागले.अशावेळी बऱ्याच राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केल्या.सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवर लावलेले सर्व आरोप फेटाळले मात्र निवडणूक आयोगालाही कुठलातरी सक्षम पुरावा मतदारांना मी ज्या उमेदवाराला मतदान केले याचा मिळावा यासाठी एखादे यंत्र उपयोगात आणावे व यातूनच व्हीव्हीपॅट यंत्र ईव्हीएम सोबत वापरायचे आयोगाने ठरविले. सर्वोच्च न्यायालयानं याबाबत सावध भूमिका घेतली आहे. मतदारांचा मतदान यंत्रणेवरचा विश्वास वाढावा यासाठी न्यायालयानं 2013  मध्ये निवडणूक आयोगाला VVPAT लागू करण्याचा आदेश दिला होता.

               सर्वप्रथम व्हीव्हीपॅट मशिन ईव्हीम सोबत जोडण्यास २०१३ साली सुरुवात झाली.प्रायोगिक तत्वावर देशातील नागालँड व मिझोराम विधानसभा मतदार संघातील काही ठिकाणी याचा वापर करुन आयोगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राबवून देशासमोर एक नवीन आदर्श उभा केला.यावर्षी म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत देशात सर्व मतदान केंद्रावर  व्हीव्हीपॅटचा उपयोग केला व ज्याचे परिणामही खुप चांगले आले.

                 महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्हात सर्वत्र यावर्षी ईव्हीएम व्हीव्हीपॅटची जनजागृत्ती मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.आक्टोबंर महिण्यात आयोगाकडून या मशिन्स प्राप्त झाल्यानंतर प्रथम त्यांची प्रथमस्तरीय तपासणी( एफ एल सी) करुन यातून दुरुस्त नादुरुस्त मशिन वेगवेगळ्या काढल्या.यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना  

                 व्हीव्हीपॅट हाताळणी व मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी अचूक नियोजन करण्यात आले.यासाठी पाच विधानसभा मतदारसंघातील १६७८ मतदान केंद्रावर  ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे दिनांक २० डिसेंबर २०१८ ते  ८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत पहिली फेरी यशस्वीपणे राबवून लोकांचा ईव्हीएम व्हीव्हीपॅट वरील विश्वासवाढविला.तसेच यादरम्यान विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना,शासकीय, निमशासकीय,खासगी कार्यालयातील कर्मचा-यांना तसेच न्‍यायालयातील न्‍यायाधिश, वकील, यांना ईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट प्रत्यक्ष हाताळण्‍याची संधी दिली. यांत जिल्‍हयातील १,०१,३७७ लोकांनी ईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅटची पाहणी  केली तर ७०,००० मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून या जनजागृती विषयक मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिला.

               जिल्‍हयात एकुण३८३४ बीयु, २२७२ सीयु, २३६२ व्‍हीव्‍हीपॅट मशीन आयोगाकडून पाठविण्‍यात आल्‍या प्रथमस्‍तरीय तपासणी झाल्‍यानंतर दुरूस्‍त असलेल्‍या मशीनचे ईएमएस सॉफ्टवेअर द्वारे चार वेळेस ‘रॅंडमायझेशन’ करण्यात आले.

            जिल्‍हयातील १६७८ मतदान केंद्रावर जिल्‍हा निवडणूक कार्यालयाच्‍या वतीने चार प्रकारची ईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट विषयक डिजीटल बॅनर तयार करून नोव्‍हेंबर, २०१८ मध्‍ये लावले. त्‍यानंतर प्रत्‍यक्ष प्रथमईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट जनजागृती फेरी २० डिसेंबर, २०१८ रोजी प्रत्‍यक्ष सुरू झाली त्‍यावेळी  प्रत्‍येक वाहनामध्‍ये चार कर्मचारी व एक ईव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट मशीन देण्‍यात आली होती. या वेळी पाचही मतदारसंघातील ११३८ ठिकाणी प्रत्‍यक्ष मतदानाचा अनुभव घेतला. ९९-परतुर विधानसभा मतदारसंघातीलरानमळा या गावातील ५१ वर्षीय द्रोपदाबाई मुसळे यांचा या विषयीचा अनुभव खुप बोलका होता. त्‍या म्हणाल्‍या की हे नवीन मशीन खरोखर चांगले असून मी ज्‍या मतदाराला मत केले याचा पुरावा मला लगेच दिसल्‍यामुळे माझ्या मनात कसल्‍याही प्रकारची शंका राहिली नाही.

            १०१-जालना विधानसभा मतदारसंघातील गुंडेवाडी येथील प्रा. अर्जुन गजर म्हणाले की, २०१४ साली निवडणूक आयोगाने इव्‍हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रीया राबवूण जगासमोर एक नवीन आदर्श उभा केला मात्र या मशीनवर झालेले आरोप बघता माझाही ईव्‍हीएमवरील थोडाफार विश्वास उडत चालला होता. मात्र या वेळी आयोगाने व्‍हीव्‍हीपॅट नामक यंत्र आणून या सर्व आरोपांना पूर्ण विराम दिला आहे. या मुळे माझ्यासह माझ्या गावातील नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेविषयी विश्‍वास वाढला आहे. १०२-बदनापुर मतदारसंघातील हिवरा (राळा) येथील मीरा बबनराव बोरूडे या शिक्षीत गृहिणी म्‍हणाल्‍या की, प्रथमच आमच्‍या गावात जिल्‍हा निवडणूक कार्यालयाच्या वतीनेजनजागृती मोहिम राबविण्‍यात आली होती. ज्‍या दिवशी गावात हे प्रात्‍यक्षिक आयोजित केले त्‍या वेळी मी आजुबाजुच्‍या महिलांना सोबत घेऊन प्रत्‍यक्ष मतदान करण्‍याचा अनुभव घेतला. त्या वेळी मला समजले की,व्‍हीव्‍हीपॅट मशीन म्हणजे पारदर्शकतेचा आरसाच आहे.

            १८-जालना लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल,२०१९ रोजी २०५८ मतदान केंद्रावर मतदानप्रक्रीया सुर‍ळीतपणे पार पडली. इतर जिल्हयाचा अनुभव बघता जालना लोकसभा मतदारसंघात इव्‍हीएम व्‍हीव्‍हीपॅट मशीनची जोडणी कर्मचा-यांनी योग्‍य कसल्‍याही प्रकारची अडचण आली नाही. जिल्‍हयावरून विधानसभा मतदारसंघाच्‍या ठिकाणी मशीन पाठवताना योग्‍य ती काळजी घेण्‍यात आली सर्व ठिकाणी कंटेनरद्वारे मशीन पोहचविण्‍यात आल्‍या या मुळे सुरक्षा विषयक एकही प्रश्‍न आमच्‍या समोर उभा राहिला नाही.

            एकंदरीत मतदारांचा अनुभव बघता व्‍हीव्‍हीपॅट मशीनने मतदारांमध्‍ये सकारात्‍मक विश्‍वास निर्माण करण्‍यात जिल्हा निवडणूक कार्यालय जालना निश्‍चीतच यशस्‍वी झाले आहे.

                                                                                                            राजु नंदकर

                                                                                   उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी

                                                                                               जालना