स्वप्नांचा शोध
स्वप्नांचा शोध
स्वप्नांचा अनुभव भूतलावरील तमाम मानव जातीस येतो. स्वप्न का पडतात ? स्वप्नांचे अर्थ काय ? याबाबतचे संशोधन अजूनही बाल्यावस्थेत आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे , अशी सर्वसाधारण स्वप्नाची व्याख्या केली जाते. ती काही अंशी खरी असली तरी ती स्वप्नांचा अर्थ पूर्णपणे सांगण्यास अपुरी पडते. प्रत्येकाला कधी ना कधी स्वप्न पडलेले असते.
आपल्या संस्कृतीत स्वप्नात साक्षात्कार झाला, अशी जोडही दिल्याचे आपणास दृष्टीक्षेपात पडते. स्वप्नाची अनुभूती निद्रिस्त अवस्थेमध्येच येते. त्यामुळे सर्वप्रथम निद्रिस्त अवस्था म्हणजे काय ? हे पाहणे आवश्यक ठरते.भूतलावर प्रत्येक सजीव शारीरिक रचनेप्रमाणे आणि मेंदूच्या विकासा प्रमाणे निद्रिस्त अवस्थेत जातो. मनुष्य दिवसांत सरासरी सहा ते आठ तास झोप घेतो. झोप अत्यावश्यक बाब आहे. झोपेत मेंदूच्या एका विशिष्ट भागाचे कार्य थांबते . मात्र यावेळी शरीरातील इतर काही अवयव काम करत असतात. अशा प्रकारे एकदा निद्रिस्त अवस्था सुरु झाली कि स्वप्नाचा उगम व प्रवास सुरु होतो.
सर्वसाधारणपणे कोणत्याही निरोगी माणसाला स्वप्ने पडतात . भीतीदायक स्वप्न , रहस्यमय स्वप्न, आनंददायी स्वप्न, प्रवास स्वप्न, पाठलाग स्वप्न, हरवल्याचे स्वप्न, यशाचे स्वप्न , अपयशाचे स्वप्न, अपराधीपणाचे स्वप्न, पश्चाताप बाबत स्वप्न अशी विविध स्वप्ने पडत असतात. स्वप्ने ही बहुतांशी पूर्णतः वस्तुस्थितीला धरून नसतात. स्थळांची व पात्रांची सरमिसळ व अदलाबदल प्रत्येक स्वप्नात पहावयास मिळते , काही स्वप्न आवाज असणारी तर काही स्वप्ने मुकी असतात. निद्रित अवस्थेत गेलो की आपल्या मेंदू मधील विचार केंद्र , स्मृति केंद्र , भावना केंद्र यांचे परस्परातील जोडणी तात्पुरती बंद होते. त्वचा, नाक, डोळे, कान आणि जीभ यासारख्या शरीराच्या संवेदी अवयवांचे काही प्रमाणात मेंदूशी असलेले न्यूरोटिक कनेक्शन तात्पुरते डिस्कनेक्ट होते. शरीर निर्माण करत असलेल्या एकूण उर्जेपैकी 30 टक्के ऊर्जा मेंदू जागेपणी वापरतो . त्यामुळे एकदा आपण झोपलो की मेंदूची उर्जेची गरज कमी होते. मेंदूला आवश्यक असणारी विश्रांती पूर्ण झाली की तो हळू हळू जागृत होण्यास सुरुवात करतो. नेमकी या वेळेसच स्वप्नांची निर्मिती सुरू होते. तसेच जर आपण खूप दगदगीमध्ये असाल किंवा मेंदूवर मानसिक व भावनिक आघात करणारी घटना जर घडली असेल तर मात्र मेंदूची आवश्यक विश्रांती व निद्रिस्त अवस्था पूर्ण होण्याआधीच स्वप्न सुरू होतात, मात्र अशी स्वप्ने ही शरीरसाठी व मानसिक आरोग्यासाठी घातक असतात .
झोपल्या नंतर साधारणपणे चार ते सहा तासानंतर स्वप्ने सुरु होतात. म्हणजेच मेंदूचा निद्रिस्त अवस्तेत गेलेला भाग त्याची उर्जा पुन्हा प्राप्त झाल्याने त्याचे कार्य सुरु झालेले असते. त्याच्या कार्याला आपल्या शरीराचा कोणताही आधार न मिळाल्याने तो त्याची एक कथा आपल्या आठवणीत असलेल्या काही घटना, काही पात्रे व काही स्थळे यांचा परस्पर संबंध निर्माण करून तयार करतो आणि स्वप्नाचा प्रवास सुरु होतो. एकदा स्वप्नाचा प्रवास सुरु झाला कि ती घटना प्रत्यक्ष घडत आहे असा भास झोपेत आपणास होतो . प्राप्त झालेली अपुरी माहिती व अपुरे विचार याचा मेळ न घालता आल्याने एक कथा तयार केली जाते व तिचे चित्रण मेंदूच्या पटलावर सुरु होते. मात्र हे चित्रण अत्यंत विस्कळीत स्वरुपात असल्याने ते फक्त निद्रिस्त अवस्थेत अनुभवले जाते . जसे जागेपणी आपल्या मनात येणारे विचार व निर्णय आपण म्हणजेच आपला मेंदू नियंत्रित करत असतो. मात्र स्वप्नाच्या दुनियेत स्वप्नावर मेंदूचे अत्यंत अल्प नियंत्रण असते. जसे आपल्याला चित्रपटगृहात नेण्यात आले व तुमचे हात पाय बांधून चित्रपट पाहायला सांगितलं तर तुमची जी अवस्था होईल अगदी त्या प्रमाणेच आपल्या संपूर्ण शरीराची अवस्था स्वप्न पाहतानी झालेली असते . त्यामुळे स्वप्न सुरु करणे व ते बंद करणे हे आपल्या हातात राहत नाही. अगदी हताशपणे आपण भयानक स्वप्न अनुभवत असतो आणि या उलट आनंददायी स्वप्नाचा आनंद सुद्धा आपण निर्विकारपणे घेत असतो.
मेंदूच्या ज्या भागात आठवणी साठवली जाते तेथूनही त्या स्वप्नाला एक हलकसा प्रतिसाद मिळायला लागतो. ज्या स्वप्नांना स्मृति भागाचा प्रतिसाद मिळतो ती स्वप्न आपल्याला पूर्ण जागी झाल्यावर आठवतात तर ज्या स्वप्नाना स्मृति भागाचा प्रतिसाद मिळत नाही ती स्वप्ने आपण जागी झाल्यावर आठवत नाहीत. स्वप्नांच्या दुनियेत आपला रोल महत्वाचा असतो किंवा स्वप्नाच्या केंद्र बिंदूवर आपण असतो.स्वप्नात आपल्याला कधीही साईड रोल दिला जात नाही किंवा आपला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग न दाखवता स्वप्न सुरु केले जात नाही.एकदा स्वप्न सुरु झाले कि ते सलग चालत राहते मात्र काही बाह्य अडथळ्याने जरी आपल्याला जाग आली आणि स्वप्नाचा अंमल आपल्यावर जास्त असेल तर चित्रपटाच्या मध्यांतर नंतर ज्या प्रमाणे चित्रपट सुरू होतो तसे स्वप्न पुन्हा सुरु झालेले असते . स्वप्न शक्यतो तीन मिनटे ते तीस मिनटे पर्यंत चालतात. एकाच वेळी वेग वेगळ्या प्रकारची दोन ते तीन स्वप्ने पडत नाहीत तर एक स्वप्न संपल्या नंतर दुसरे स्वप्न सुरू होते, स्वप्नात आपण हस्तक्षेप करू शकत नाही कारण आपली विचार शक्ती पूर्णतः क्षीण झालेली असते. स्वप्नात एक बाब मात्र प्रकर्षाने सर्वांना जाणवते ती अशी की जर तुम्ही स्वप्नात धावत आहात आणि अचानक तुम्ही उंचावरून खाली उडी मारता किंवा पडता तेंव्हा तुमची पूर्ण बॉडी हालते व छातीत धस होते . याचे मागचे कारण असे की अशी घटना स्वप्नात जरी घडत असली तरी तो संदेश आपल्या तोल सावरणार्या मेंदूतील केंद्र मार्फत मज्जातंतू द्वारे शरीराच्या इतर अवयवांकडे पाठवला जातो. हे एकंदर झोपेत काही लोक चालतात या सारखे आहे .लहान वयात किंवा तरुण वयात स्वप्ने जास्त का पडतात याचे एकमेव कारण हेच की तुमचा मेंदू हा जास्त सक्रिय असतो आणि पुरेशी झोप घेतली जाते .एकदा निद्रिस्त अवस्थेत आपण गेलो की अशा या स्वप्नाच्या दुनियेत आपण प्रवेश करणे न करणे आपल्या हातात नसते . पहाटे स्वप्ने पडणे ही उत्तम आरोग्याचे व तुमचा मेंदू अॅक्टिव असल्याचे ते एक लक्षण आहे . स्वप्न ही आभासी असल्याने त्यांचा तसा प्रत्यक्ष जीवनावर लगेच परिणाम होत नाही. लक्षात राहणारी व वारंवार पडणारी स्वप्नांचा संबध आपल्या प्रत्यक्ष जीवनपद्धतीशी असतोच असेही नाही . स्वप्नांचा अर्थ लावण्याचा व शोधण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो. आपली भावनिक स्थैर्यता व भावनिक बुद्धिमता प्रत्यक्ष स्वप्नांची दुनिया निर्माण करत असतात.त्यामुळे स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आपले पूर्व आयुष्या मधील घटना व त्या घटनांचा आपल्या भावनांशी असलेला कार्यकारण भाव शोधावा लागतो. असा संबध शोधताना राग,आनंद,दुख,तिरस्कार,भीती व आश्चर्य ह्या सहा मुख्य भावनांचा विचार करावा लागतो . पडलेले स्वप्न या सहा भावना पैकी एकीचे प्रतिनिधीत्व करत असते . एकदा हा संबध शोधला की त्या प्रमाणे त्या मागील कारणाची मनोसोपचार चिकित्सा करून त्या प्रमाणे उपयोजन करता येते. मात्र झोप पूर्ण होण्या अगोदरच स्वप्न पडत असतील तर निद्रानाश होवून मानसिक व भावनिक संतुलन ढासळते . तसेच पडणारी स्वप्न ही मेंदूच्या स्मूर्त्ति केंद्रात वारंवार साठायला लागली तर तुमची दैनंदिन विचार प्रक्रिया विस्कळीत होते . असे असले तरी स्वप्ने ही भविष्याची मुहर्तमेढ रोवण्याचे काम करत असतात . अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी व धेये साध्य करण्यासाठीचा आत्मविश्वास ही स्वप्नेच आपणास देत असतात . स्वप्ने ही मानवीमनाला आशावादी ठेवतात त्याचबरोबर जीवनाला एक अर्थ प्राप्त करून देतात.
राजीव नंदकर,हिंगोली.
(लेखक उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत )
rsnandkar@gmail.com ,9970246417