‘वेल डन कोहली अँड वेल डन इंडिया’
‘वेल डन कोहली अँड वेल डन इंडिया’
मी कधीही क्रिकेटवर लिहीत नाही. कारण क्रिकेट हा खेळ माझ्यासाठीच नव्हे तर तमाम भारतीयांसाठी खेळ नसून एक जगणं आहे आणि जगण्यावर काय लिहावं आणि किती प्रेम करावं. म्हणून जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची “या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ ही कवितेतील ओळ मुद्दामहून अधोरेखित करावी वाटते. जगणं म्हणजे काय तर आयुष्याचा अविभाज्य असा घटक की ज्याला तुमच्यापासून दूर किंवा तुम्हाला त्याच्यापासून दूर करता येत नाही. असे कितीतरी भारतीय लोक तुम्हाला भेटतील की एक वेळ आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसाची तारीख विसरतील, परंतु क्रिकेटच्या मॅचची तारीख आणि वेळ विसरणार नाहीत. भारतीयांच्या मनात आणि तनात एकच खेळ अधिराज्य गाजवतो तो म्हणजे क्रिकेट. आज ज्या भारतीयांनी ‘भारत विरूद्ध पाकिस्तान’ मॅच पहिली त्यांचे तन आणि मन तृप्त झाले असे म्हणायला हरकत नाही. संयम, नियोजन, सातत्य, ताकत, नेतृत्व, टीमवर्क, दृष्टीकोण आणि आत्मविश्वास याचा सुरेख संगम विराट कोहली याच्या आजच्या खेळीत पाहायला मिळाला म्हणून त्याला दिले जाणारे ‘किंग कोहली’ हे बिरुद् तो किती सार्थपणे मिरवतो, हे पाहायला मिळाले.
खेळ म्हटलं की हार किंवा जीत आली, आणि तो खेळाचा अलिखित नियम आहे. पूर्वी भारताची टिम हरल्यावर जे दु:ख होत असे, ते आता परिपक्वता आल्याने म्हणा किंवा वाढलेले व्याप विचारात घेता म्हणा तेवढ्या तीव्रतेने जरी होत नसले, तरी उदासपणा मात्र सतावतो. म्हणून “कसे उदास नि बेचव वाटते हे आयुष्य हे क्षण..! उत्साह संपून सारे गोठून जातात आनंदाचे क्षण” या ओळी मुद्दामहून नमूद कराव्या लागतात. आज जे काही पाहिले ते आजपर्यंत पाहिलेल्या क्रिकेटचे उत्कृष्ट आणि अत्युच्य शिखर होते. चार बाद एकत्तीस असे काही तरी अवघड असलेले गणित ज्यावेळेस अठरा बॉल मध्ये अठेचाळीस धावा असे किचकट झाले तेंव्हाच आपण मॅच हरलो होतो, मात्र किंग कोहली याने मात्र हार मनाली नव्हती. बॉल संपत गेले आणि दबाव वाढत गेला. पण जो दबाव घेईल तो किंग कोहली कसला, अत्यंत गंभीरतेने आणि तेवढ्याच ताकतीने अक्षरशः त्याने विजयश्री खेचून आणली आणि भारतात वर्ल्ड कप जिंखल्याचा जल्लोष झाला आणि एक दिवस अगोदरच दिवाळी पाहायला मिळाली.
नियंत्रण, नियोजन, धीरता, संयम, ताकत आणि आत्मविश्वास याचा सुरेख संगम आज पाहायला मिळाला. माणूस फक्त नशिबानं मोठा होत नाही, तर त्या नशीबाला कायम कष्टाची आणि परिश्रमाची जोड द्यावी लागते. किंग कोहलीने मैदानावर आल्यानंतर सर्व प्रथम संयम दाखवला. आपल्या समोरचे आपले सहकारी एक एक करून आऊट होत असताना आपला तोल ढळू दिला नाही. हळू हळू संयम आणि ताकत याचा सुरेख संगम साधला आणि सावज जेंव्हा एकदम टप्यावर आल्यावर त्याने मोठा वार केला. त्याने शेवटपर्यंत धीर सोडला नाही, प्रत्येक वेळी तो आपल्या सहकार्यांना प्रोत्साहन देत राहिला म्हणूनच विजयश्री तो खेचून आणू शकला.
पाकिस्तान हा कायम मोठा प्रतिस्पर्धी असतो. साहजिकच त्याचा दबाव जेवढा मैदानात तेवढाच बाहेरही. या दबावात आपल्याला कोहली आणि हार्दिक यांचा समन्वय सुध्दा पाहायला मिळाला. जर समन्वय नसेल तर विजयाला गवसणी घालणे तेवढेच अवघड होते. नेतृत्व आणि टीम बिल्डिंग याचे नमुनेदार उदाहरण म्हणजे विराट आणि हार्दिकची भागीदारी. साधारण आयुष्यातही आपण विजयाच्या समीप येतो आणि वेळेवर ढिले पडलो की आपली हार होते. मात्र ज्या विश्वासाने कोहलीने सर्व सूत्रे हाती ठेवली ते लाजवाब होते.
नेहमी पुढे पाहावे मागे पाहू नये, याचा वस्तूपाठ त्याने घालून दिला. जागेवर उभे राहून समोर मारलेला सिक्स तर अप्रतिम होता, याला अंतिम चढाई म्हणतात. यामुळे प्रतिस्पर्धी याचे मनोधर्ये कमालीचे खच्ची झाले. गोळीच्या वेगाने येणारे बॉल आणि मैदानावर सुटलेली हवा अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही तोल ढळू न देणे हे खऱ्या योध्याचे लक्षण असते. यासाठी गरज असते ती कायम दक्ष आणि अखंड सावधानता ठेवण्याची. धावपट्टीवर तो धावतो त्यावेळी किंग कोहलीचा वेग असतो २२ किलोमीटर प्रती तास आणि आपण चालतो तो वेग असतो ७ किलोमीटर प्रती तास आणि खूप जोराने पळालो तर १२ किलोमीटर प्रती तास यातून आपल्याला या वेगाची कल्पना करता येईल. शरीर ही निसर्गदत्त देणगी आहे. मात्र शरीर कमविण्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट लागतात आणि ती फक्त साधना आणि श्रम यातूनच प्राप्त होऊ शकते याचे मोठे उदाहरण म्हणजे किंग कोहली.
खेळ कोणताही असो त्याने मला कायम अपयश पचविण्याची ताकत दिली. आपल्या देशात असे कितीतरी लोक भेटतील की त्यांनी हातात कधीही बॅट धरली नाही मात्र त्यांच्यासाठी क्रिकेट जीवन की प्राण असतो.त्यातील मी आणि तुम्हीही. क्रिकेटची पहिली खुली मॅच मी बाराव्या वर्षी खेळलो आणि तो प्रवास अजुनही चालू आहे. इयत्ता दहावीला मी असतांना आईला नेहमी भीती सतावत असे, की क्रिकेट आपल्या मुलाचा घात करेल. पण एकदा दहावीचा मोठा पाडाव पार केल्यानंतर मी कधीही मागे पाहिले नाही. क्रिकेट खेळ आणि त्यातील चढ उतार त्यातून मिळणारे दुःख आणि सुख हे कायम काही तरी शिकवत गेले. त्यामुळं क्रिकेट मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत खेळावे लागते, तसे आयष्यातही शेवटच्या क्षणापर्यंत इनिंग खेळलो. चार बॉल पंधरा धावा असे क्लिष्ट आणि किचकट गणित आपल्या आयुष्यात कायम येत असते. या वेळी गेम सोडायचा, की लढायचा हे आपल्या हातात असते. जर तुम्ही लढले तर विजय तुमचाच असतो, यावर विराटने आज शिक्कामोर्तब केले. वेळेवर डोकं शांत ठेवावे लागते, मग यश गवसणी घालते हे आपल्याला रवीचंद्रन अश्विनने लेग साईडचा बॉल सोडला तेंव्हा कळते. काय धरायचे आणि काय सोडायचे याचीही अक्कल आणि हुशारी कमवावी लागते, ती आपोआप येत नाही. खरे तर खेळ जगायला शिकवतो.
आजच्या युगात जेथे अंगभूत बुद्धिमत्ते पेक्षा भावनिक बुद्धिमत्ता वरचढ ठरते तेथे आपल्या मुलांमध्ये एक सांघिक आणि एक वैयक्तिक खेळ जाणीवपूर्वक विकसित करणे ही पालक आणि शिक्षक यांची मुख्य जबाबदारी ठरते. आजही मी मागील चाळीस वर्षाचे सिंहावलोकन करतो त्यावेळी आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर क्रिकेट असो किंवा दुसरे कोणतेही खेळ असो हे नेहमीच मला प्रेरणादायी राहिले आहेत. कदाचित मी क्रिकेट वेडा नसतो, तर इथपर्यंतचा प्रवास कदापि शक्य नव्हता हे खुप जबाबदारी पूर्वक सांगावे लागते.
निश्चितच विराटची ही विराट खेळी भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. पण ही प्रेरणा संयम,नियोजन, सातत्य , नेतृत्व , टीमवर्क ,ताकत, दृष्टीकोण आणि आत्मविश्वास यातून तयार होते. ‘42 कोटी युवकांचा देश’ अशी जेंव्हा आपण बिरुदावली मिरवतो, त्यावेळी या युवकांच्या ठिकाणी कोहली किंवा आपल्या इतर खेळातील खेळाडू मध्ये जे विराट गुण दिसून येतात ते वृद्धिंगत होत आहेत का? याची चाचपणी युवकांनी स्वतः, पालकांनी आणि शिक्षकांनी करावी लागते. तरच ही युवा शक्ती भारभुत न ठरता राष्ट्र विकासासाठी सहाय्यभूत ठरते.
शेवटी आयुष्यात दोन गोष्टी मला खुप महत्वाच्या वाटतात. त्यामध्ये आपल्याकडे असलेला संयम आणि आपली कष्ट उपसण्याची तयारी याचा मी समावेश करतो. जसे एकदम यशाला गवसणी घालता येत नाही, तर हळू हळू एक एक बॉल खेळून धावा कराव्या लागतात, तसं नशिबानं काहीच मिळत नसते तर कष्टाची एक एक वीट रचून आयुष्यातील यशाची इमारत उभी करावी लागते. म्हणून म्हणावेसे वाटते “हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला!
राजीव नंदकर ©२३.१०.२०२२
९९७०२४६४१७