जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि आपले भावनाविश्व
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि आपले भावनाविश्व
मानवी शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव असलेला मेंदू आणि या मेंदुच्या परिसरात विसावलेले आपले मन याचा शोध व अभ्यास हे जीवशास्त्र व मानसशास्त्राच्या अभ्यासकांना कायम आव्हानात्मक राहिले आहे. असे असले तरी सतराव्या शतकात होवून गेलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या गाथेतील अभंगात या भावना विश्वाचे अचूक असे विवेचन व विवरण केलेले आपणास पाहावयास मिळते. हाच धागा पकडून आपण आपले भावनाविश्व उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत .
आपले मन हे एकूण सहा प्रमुख भावनांचा अविष्कार करत असते. आनंद, दु:ख, राग, भीती, तिरस्कार, आश्चर्य या प्रमुख सहा भावना होत. या प्रमुख सहा भावना आपले विचार,आपल्या आठवणी, आपले वर्तन, आपले अनुभव आणि घडलेल्या किंवा घडणार असलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटना यामुळे निर्माण होत असतात. या भावना निर्माण होणे आणि त्या अनुषंगाने आपल्या शरीराचा प्रतिसाद मिळणे ही एक सर्वसाधारण जीवन शैलीचा भाग आहे. मात्र आपला स्वभाव व प्रतिकूल परिस्थिती या मुळे या निर्माण होणार्या भावना आपण दाबून ठेवतो. अशा भावना जास्त काळ दाबून ठेवल्याने त्याचे विपरीत परिणाम आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होतात हे लक्षात घ्यावे. त्यासाठी भावनांचे योग्य नियंत्रण आणि व्यवस्थापन करायला हवे.
सुख पाहता जवापाडे |दुःख पर्वता एवढे ||जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगातून संदेश देतात की सुख हे जवा एवढे असते आणि दु:ख पर्वता एवढे असते. यात ते पुढे असेही सांगतात की आपले अर्धे आयुष्य झोपेत जाते, काही आयुष्य बालपनात आणि विविध व्याधी- आजारात जातात. म्हणून संत तुकाराम सांगतात की तू असाच जगत राहिलास, असेच दु:ख करत राहिलास, तर या जन्म मृत्यू रूपी घाण्यास पुन्हा जुंपला जाशील. मित्रांनो आपल्याला दु:ख होणे ही एक सर्वसाधारण बाब असली तरी असे दु:ख जर जास्त काळ नेहमी टिकत असेल तर ते आपल्या जीवनासाठी धोक्याची घंटा आहे. एखांदी मानाविरुद्ध अथवा वाईट घटना घडली तर साहजिकच दु:ख होण अपेक्षित व साहजिकच आहे. मात्र कधी कधी उगाच कारण नसताना आणि लहान सहान गोष्टीवरून आपल्याला दु:ख होत असते किंवा दु:खाचे एपिसोड येत असतात.सबब संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्या प्रमाणे दु:ख व सुख ही वस्तुस्थिती मान्य करून सकारात्मक विचार करून आणि हे सकारात्मक विचार आपल्या मनात रुजवून आपण पुढे जायला हवे.
आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥ जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या दुसर्या अभंगात आनंदाचे विवरण सांगताना म्हणतात की माणूस म्हणजे आनंदाचा डोह असून आनंदाचे तरंग या डोहातून निर्माण होतात. आनंद हा आनंदातून निर्माण करावा लागतो. त्यामुळे आनंद जर शोधायचा असेल तर तो आपल्यात शोधा. आनंद हि एक सहज भावना आहे. आपल्याला आवडणारी अथवा आपल्या मनासारखी घटना गोष्ट घडली कि आपल्याला आनंद होतो. मात्र हा आनंद आपल्याला जास्त वेळ टिकवता येणे आणि तो सुखात परावृत्त करणे आपल्याला जमले पाहिजे. आपण आनंदी असतो त्यावेळी आपल्याला न आवडणारी, न झेपणारी आणि रटाळ कामे आपण उरकून घेतली पाहिजेत. आनंदात आपले मन व बुद्धी हि उत्साहवर्धक असल्याने त्याचा फायदा उचलायला शिका .
निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार। आणीक सांगों किती काय ॥ जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगात राग, निंदा आणि द्वेष याबाबत विवेचन करतात. राग हि भावना मनातून एकदम उफाळून येते आणि काही वेळ टिकते इतपावेतो ठीक आहे.मात्र राग ही भावना जर जास्त वेळ टिकत असेल तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात. मनासारखी गोष्ट घडली नाही किंवा अपेक्षा पूर्ण नाही झाली किंवा आपल्या कार्यात व कामात कोणी अडथळे आणले कि राग हि भावना उफाळून येते. राग ही भावना जसा पाण्याचा बांध फुटतो किंवा एखाद्या ठिकाणी अचानक आग लागल्यावर जशा ज्वाला बाहेर पडतात अगदी तशी असते. राग येणे आणि त्यातून आपल्या भावना यांचे उत्सर्जन होणे आवश्यक बाब असली तरी आपल्या रागामुळे आपले स्वत:चे तसेच दुसर्याचे नुकसान होत असेल तर असा राग आपण नियंत्रित करणे शिकून घेयला हवे. राग नियंत्रित करणे साठी मोठा स्वास घेणे, लिहून काढणे, ज्या व्यक्तीचा राग आला आहे त्याच्या पासून दूर राहणे, राग आल्यानंतर काही वेळ बाहेर फेरफटकासाठी जावून देणे, राग आल्यानंतर आपल्या आवडत्या गोष्टी अथवा छंद यावर लक्ष केंद्रित करणे या बाबी आपण करू शकतो .
मेघ पडों भीती । पिकें सांडियेली क्षिती ॥ या अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराज असे सांगतात की भूतलावर एवढं पाप वाढले आहे की ढग पाऊस पाडायला भीत आहेत आणि धरती मातेने तर पिके उगवणे सुद्धा सोडून दिले आहे. आपल्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष घडलेले पाप आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती आपण चांगले काम व कार्य करून कमी करायला हवी.एखांदा धोका जेंव्हा समोर येतो तेंव्हा आपल्याला भीती वाटते. असे असले तरी जी गोष्ट घडण्याची शक्यताच नाही किंवा जी गोष्ट खूप काळाने घडणार आहे त्याची भीतीचे घर आपण मनामध्ये करून बसतो. या मुळे काय होते कि आपण आपले कार्य व काम सोडून देतो. वास्तविक भीती हि आपण बचावात्मक पवित्रा घेवून त्यातून मार्ग काढावा म्हणून मनाने व मेंदूने दिलेलें प्रतिसाद असतो हा प्रतिसाद आपण घेवून पुढे जायचे असते. सबब घाबरले पाहिजे, भीती वाटली पण पाहिजे, मात्र ती भीती कायम आपल्यासोबत राहायला नको. भीती कमी करण्यासाठी मानवी जीवन आणि त्याची अनमोलता ही विचारात घेतली की ती कमी होते. जीवन ही एक ईश्वरी देणगी आहे आणि आपण आपले कार्य आणि कर्म करत राहू असा विचार केला की भीती कमी होते.एका बिन्दु पासून आपली उत्पती झाली असल्याने आणि आपण पुन्हा या पंच महाभूतात मिसळून जाणार असल्याने आपण भीती ही भावना हळू हळू कमी केली पाहिजे .
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती॥ जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की जर तुम्ही कायम द्वेष, तिरस्कार करत असला तर तेच तुमचे चित्त आणि आयुष्य तसेच बनते. तिरस्कार हि भावना निर्माण होण्यास आपली अकार्यक्षमता कारणीभूत असते. तसेच आपले स्वार्थी व संकुचित विचार सुद्धा याला जबाबदार असतात. आपण मागे का राहिलो? या पेक्षा तो पुढे का गेला? किंवा आपल्याला अपयश का आले? या पेक्षा त्याला यश का व कसे मिळाले? यामुळे आपल्या मनात दुसर्याविषयी तिरस्कार निर्माण होतो .एकदा आपण दुसर्याचा तिरस्कार करायला लागलो कि आपली प्रगती आणि विकास थांबतो हे लक्षात घ्यावे. कारण तिरस्कार आणि त्या अनुषंगाने येणारी नकारात्मकता आपली उत्पादकता कमी करत असते. आपली नाविण्यापुर्नता सुद्धा ती गोठवत असते हे लक्षात घ्यावे. त्यामुळे तिरस्कार करण्यापेक्षा आपण आपल्या स्वता:वर काम केले पाहिजे. जग खूप मोठे आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळू शकत नाही. त्यामुळे हे त्यालाच का ?यापेक्षा मी ते हळू हळू कष्टाने मिळवेल हि भावना रुजवायला हवी. इतरांचे यश आपल्या डोळ्यात खुपू देवू नका.
देवाचे म्हणोनि देवीं अनादर। हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥ जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात एका ठिकाणी त्यांनाही आश्चर्य वाटल्याचे नमूद करतात. ते म्हणतात की जे लोक स्वताला देवाचे भक्त मानतात मात्र त्यांचे वागणे पाहून मलाही आश्चर्य वाटते. आपल्याही आजूबाजूला अशी काही चकित करणारी आणि आश्चर्य वाटायला लावणारी माणसे असतात. त्यांचे बोलणे एक असते आणि राहणे वेगळेच. अशा लोकांपासून आपण दूर राहायला हवे.
अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची शिकवण घेवून या सहा मुख्य भावनांचे योग्य नियंत्रण आणि व्यवस्थापन आपण करायला हवे. आपली भावना ही आनंद स्वरूपाची असेल तर ती जास्त काळ कशी टिकवता येईल यावर काम करा आणि ती सुखात परावर्तीत करा. दुख हे कायम आपल्याला चिटकुन राहणार नाही याची काळजी घ्या.राग हा आगीसारखा असतो तो इतरांसोबत आपल्यालाही जाळून टाकतो हे लक्षात ठेवा. त्या अनुषंगाने काही गोष्टी सोडून देनेस शिका आणि माफ करायला शिका. भीती आवश्यक आहेच मात्र अनावश्यक भीतीवर आपण मात करायला हवी. तिरस्कार ही भावना आपण त्याग करायला हवी. अशा प्रकारे आपण भावनांचे योग्य नियंत्रण आणि व्यवस्थापन करूया आणि सोपे, सरळ, सुटसुटित, सुखी आयुष्य जगूया. शेवटी जीवन अनमोल ते अधिक सुंदर बनवूया .
०१३/१०१ दिनांक १५.०४.२०२१
राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७