हलक्या कानाचे आणि फाटक्या तोंडाचे बनू नका !

हलक्या कानाचे आणि फाटक्या तोंडाचे बनू नका !

             मानवी देह हा अनमोल आहे. तसेच तो ग्राही सुद्धा आहे. जे काही ग्रहण होते ते आपल्या पाच ज्ञानेंद्रिये मार्फत होते. नेत्र आपल्याला दृष्टी देतात, कान आपल्याला श्रवण करण्यास मदत करतात, जीभ आपल्याला चव देते, नाक आपल्याला गंध देते आणि त्वचा आपल्याला स्पर्श देते. साहजिकच ही पाच ज्ञानेंद्रिये हेच खऱ्या अर्थाने आपले वैभव आणि संपत्ती असते. आपल्या आयुष्याला परिपूर्णता मिळते ती या पाच ज्ञानेंद्रिया मुळेच. मात्र या ज्ञानेंद्रियांचा वापर आपण जेंव्हा स्वैर आणि निष्काळजी पणाने करायला लागतो तेंव्हा मात्र अडचणी निर्माण होतात. या अनमोल अशा पंच ज्ञानेंद्रियांचा जपून आणि आवश्यक तेवढाच वापर करणे कायम हितावह ठरते. या पाच इंद्रियांपैकी तोंडाचा (जीभ) वापर अत्यंत स्वैर असा आपण करतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. तसेच कान हा आपला दुसरा महत्वाचा अवयव त्याद्वारे आपण अनेक ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवतो किंवा त्यावरून आपले मत बनवत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचे पहावयास मिळते. प्रस्तुत लेखात हलक्या कानाचे आपण असल्याने अनेक गैरसमज आणि गैरसमजुती कशा तयार होतात. तसेच आपण फाटक्या तोंडाचे असल्यामुळे अनेक लोक दुखावले जावून वैयक्तिक आणि अंतर वैयक्तिक संबध खराब कसे होतात. याबाबतचे विवेचन केले आहे.

हलक्या कानाचे हे वाक्य आपण अनेक वेळा आपल्या दैनंदिन जीवनात सहजपणाने वापरतो. ‘दुसर्‍याचे डोळ्यातील कुसळ दिसते, मात्र स्वत:च्या डोळ्यातील मूसळ दिसत नाही’  याचीही याला जोड दिली जाते. आपले साहेब आणि नातेवाईक कसे हलके कानाचे आहेत असे आपण नेहमी प्रतिपादीत असतो. पण आपण त्या पेक्षाही किती तरी पटीने हलक्या कानाचे आहोत, हे मात्र सोयिस्कररित्या विसरून जातो. हलक्या कानाचे आपण का बनतो? हे आपण समजून घेवूया. मनुष्य हा स्तुतिसाठी हपापलेला असा प्राणी आहे. पार पूर्वी राजे रजवाडे आपल्या दरबारी स्तुतिपाठक ठेवत असत. यांचे काम फक्त राजाची भरभरून स्तुति करत राहणे एवढेच असे. इतिहास तोच राहतो फक्त साधने आणि साध्य बदलत राहतात, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे आजही आपली स्तुति करणारे आणि ही स्तुति करता करता हळुच पुडी सोडणारे आपल्या आजूबाजूला काही कमी नाहीत. पुडी सोडणे म्हणजे काय तर एखान्द्या त्रयस्थ व्यक्ति बाबत चुकीची माहिती किंवा अर्थवट माहिती किंवा आपुर्‍या ज्ञानावर आधारित माहिती जाणीवपूर्वक अथवा अजानतेपणे आपल्या पर्यंत पोहचवणे होय.

 कोणतीही माहिती ज्या वेळेस इतरांच्या मार्फत आपल्याला प्राप्त होते, त्यावेळी आपण त्या माहितीची शहानिशा करणे, ती पडताळून पाहणे, तिचा उद्देश समजून घेणे या बाबी आवश्यक असतात. मात्र आपण अनेक कामांत(सोशल मीडिया) व्यस्त असल्याने आणि आपल्याकडे वेळ नसल्याने आपण प्राप्त झालेली माहिती हीच खरी माहिती आहे, असे समजून आवश्यक ते मत बनवतो अथवा कार्यवाही सुरु करतो. वास्तविक चुकीची आणि अपुरी माहितीच्या आधारे मत बनविल्यामुळे विविध नातेसंबद्धत गैरसमज निर्माण होवून कटुता येते. तसेच आपुर्‍या, अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे आपण कार्यवाही केल्यास अथवा निर्णय घेतल्यास अपयश येण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.

त्यामुळे आपण कधीही फक्त ऐकिव माहितीवर विश्वास ठेवू नये आणि ठेवायचा झाल्यास त्या माहितीची अधिकृतता तपासणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते. एखांदी व्यक्ति आपली स्तुति करत असेल तर त्याची जाणीव आणि आकलन आपल्याला होयला हवे. त्या स्तुति मागे काय अर्थ दडला आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे. ऐकीव महितीचा अधिकृत स्रोत तपासण्यासाठी आपण कायम कार्यतत्पर राहणे आवश्यक आहे. पूर्ण पडताळणी आपण करत गेलो की आपली त्या प्रमाणे ओळख अथवा दबदबा तयार होवून लोक आपल्याला चुकीचा सल्ला अथवा चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करत नाहीत. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असे जे म्हटले जाते ते यामुळेच कारण शेवटी निर्णय आपल्याला घ्यायचा असतो आणि त्या मधून निर्माण होणारे यश आणि अपयश याचे वाटेकरी आपणच असतो.  

फाटक्या तोंडचे याचा शब्दश अर्थ पाहावयाचा गेल्यास आपल्या वाणी आणि त्यातून निघणाऱ्या शब्दांचा स्वैर असा वापर करणे होय. आपण पाहतो की समाजात असे लोक आपल्याला अनेक ठिकाणी पदोपदी आणि सर्वत्र पहावयास मिळतात. असे लोक त्याचे वाणीचा वापर इतरांना दोष देण्यात खर्च करत असता. वाचाळपणाने बडबड करणे आणि इतरांची निंदा नालस्ती करणे यातच ते आनंदी असतात किंवा त्यांचा तो दिनक्रम ठरलेला असतो. त्यांचे त्यांच्या वाणीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने ते चार चौघात त्यांचे हसू सुद्धा करून घेत असतात. असे लोक हे कायम भांडण आणि संघर्ष याला निमंत्रण देत असतात. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ अशी यांची गत असते. त्यामुळे हे चार चौघात कोणाविषयी काय बोलतील याचा अंदाज बांधणे कठीण होवू शकते. साहजिकच या मुळे या लोकांपासून दूर राहणे लोक पसंद करतात. आपल्या पासून लोक का दूर जात आहेत हे मात्र त्यांना कळत नाही. ते आपल्याच धुंदीत आणि आपलेच सर्व बरोबर आहे असे समजून चालत राहतात. स्वत:च्या स्वभावाचे अथवा आपण काय बोलतोय? याचे आत्मपरीक्षण ते करत नसल्याने त्यांच्या मध्ये आणि त्यांच्या वाणी मध्ये बदल होत नाही. असे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात आणि सापडतातही परंतु आपणही त्या प्रमाणे वागत नाहीत ना याची स्व-खात्री आपण करणे अनिवार्य ठरते.

      निसर्ग आणि त्या अनुषंगाने मानवी उत्क्रांती या मध्ये मानवाला प्राप्त झालेली वाचा आणि त्या आधारे झालेली भाषेची निर्मिती हा मानवी विकासा मधील महत्वाचा टप्पा आहे. भाषेमुळे मानवी समाजात परस्पर संवाद वाढल्याने निश्चितच परस्पर सहकार्ये वाढीस लागले. या संवादाची आणि परस्पर सहकार्याची मानवी विकास आणि प्रगतीत मोठी मदत झाली. जे काही घडले आणि जे काही पुढे गेले ते भाषा आणि लिपी मुळेच. भाषा आणि लिपी यांनी मानवी पायाभूत विकासात महत्वाची अशी भूमिका बजावली आहे.

      भाषा हे माध्यम आहे. त्यातून संवाद साधला जातो. आपले म्हणणे, आपले विचार आणि आपल्या भावना इतरांकडे पोहचविण्याचे काम भाषा करत असते. अशी ही भाषा आणि तिचे स्वरूप कसे असावे, याबाबत काळाच्या ओघात काही मूल्य आणि संस्कार त्या भाषेवर झालेले असतात. त्यामुळे तुमची भाषा अथवा वाणी कशी असावी, तिचे उच्चार कसे असावेत, त्यात कशी लयबद्धता असावी, तिच्यात कसे चढ उतर असावेत, याबाबत संकेत आणि प्रघात काळाच्या ओघात तयार झालेले असतात. मात्र यामध्ये नकारात्मक बदल झाले की ती भाषा न राहता फक्त आवाज किंवा गोंगाट बनून जाते.

आपण पाहतो की काही लोक वाणीचा स्वैर असा वापर करताना दिसून येतात. तसेच काही लोक तर अत्यंत हीन अथवा गलीछ असा भाषेचा वापर करतात.  काही लोक या वाणीचा वापर दुसर्‍याला त्रास देणे, दुसर्‍याला कमी आणि तुच्छ लेखने यासाठी, तसेच नेहमी नकारात्मकता निर्माण करणे यासाठीही करत असतात. त्या मुळे मानवी संबंध, त्यातील संयोजन, त्यातील समन्वय यात अनेक अडथळे निर्माण होतात, स्वैर अशी भाषा वापरल्याने सर्वात महत्वाचा तोटा होता, तो म्हणजे माणसं आणि त्यांच्यातील हितसंबंध कमालीचे ताणले आणि दुखावले जातात. कोणतीही माहिती न घेता काही लोक वाणीचा अनिर्बंध वापर करतात. दुसर्‍याला हीनपणाने दुखवायचे यासाठी काही लोक जाणीवपूर्वक वापर करत. काही लोक तर मुद्दामहून इतरांना त्रास होईल या पद्धतीने वाणीचा वापर करतात.

पद्धत आणि प्रक्रिया कोणतेही असो आपल्याला प्राप्त झालेल्या या दैवी, निसर्गदत्त आणि  अनमोल अशा या शक्तीचा वापर जपून आणि जाणीवपूर्वक करणे हे तमाम मानवजातीच्या कल्याणासाठी आवश्यक ठरते. त्यासाठी आपली वाणी आणि त्या वाणीतून बाहेर पडणारे शब्द हे बाणासारखे असून ते परत कधीही घेता येत नाहीत, हे लक्षात घ्यावे. शब्द छल, शब्द फिरवणे, शब्द मागे घेणे यासारखे उपाय जरी वापरले जात असतील तरीही त्याची भरमसाठ किंमत आपल्याला मोजावी लागते. त्यामुळे आपण कोणाविषयी बोलतोय, काय बोलतोय, कोणाच्या समोर बोलतोय आणि कोणत्या ठिकाणी बोलतोय ही चार सूत्रे आपण कायम ध्यानात ठेवली पाहिजेत.

अशा प्रकारे आपले पाच ज्ञान इंद्रिये आणि त्यातील महत्वाचे म्हणजे कान आणि जीभ याचा जपून वापर करणे गरजेचे ठरते. आपली ही पाच इंद्रिये ही निसर्गाची मोठी देणगी असून तिचा वापर दक्षता पूर्वक होयलाच हवा. आपण जे ऐकतो ते खरे आणि वस्तुस्थितीला धरून आहे काय? याची खात्री आपण पदोपदी करायला हवी. जे फक्त ऐकले आहे, त्याच्यावरून आपले मत बनवणे अथवा निर्णय घेणे आपल्या साठी कायम धोकादायक ठरते. त्यामुळे एकांगी विचार न करता सर्वसमावेक्षक, समग्र आणि दोन्ही बाजू तपासूनच पुढे जावे. संधी आहे आणि व्यासपीठ आहे, म्हणून काही पण बोलायचे आपण टाळायला हवे. आपली जीभ आणि त्याद्वारे आपली वाणीचा वापर हा अत्यंत नम्रपणे आणि तेवढाच आदरयुक्त असा असावा. आपली वाणीने कोणी शक्यतो दुखवला जाणार नाही, हे सुद्धा वेळोवेळी तपासावे आणि त्यात इष्टतम असे बदल करावेत. एकंदर आपले ऐकणे आणि त्याची चिकित्सा करणे, तसेच आपल्या वाणी वर नियंत्रण ठेवून तिच्यात गोडवा आणणे हे आपल्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप उपयोगी ठरते आणि आपण एक साधे, सोपे, सरळ, सूटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करतो.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया.

५३/१०१ दिनांक ०८.०७.२०२२

जीवन विषयक कौशल्ये ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७